रविवार, २६ ऑगस्ट, २०१२

सेक्युलर घातपातीच खरे गुन्हेगार


   काही गोष्टी दिसत असतात, कानावर येत असतात. पन आपण त्याची फ़ारशी दखल घेत नाही. आपल्याला असे वाटत असते, की त्या गोष्टी आपल्याशी संबंधीत नाहीत. त्या गोष्टी दुरच्या व आपल्यापर्यंत न येणार्‍या आहेत. पण प्रत्यक्षात तसे काही नसते. त्या गोष्टींशी आपलाही घनिष्ट संबंध असतो. पण त्याची चिंता नको म्हणून आपण त्या झटकून टाकत असतो. त्या दिसणार्‍या सत्यापेक्षा आपल्याला फ़सवे असत्य खुप प्रिय असते. एक साधी बाब आपण अनेकदा ऐकत असतो. तशा बातम्याही सर्वत्र सातत्याने येतच असतात. कुठली तरी वयात येणारी मुलगी प्रेमात पडते आणि घरच्यांची नजर चुकवून आपल्या प्रियकराला भेटत वगैरे असते. अनेकदा त्याच्याविषयी तिला खुपशी माहिती नसते. पण ‘आवडला’ या एकाच विश्वासावर ती त्याच्या आहारी जाते. तो म्हणेल ते तिच्यासाठी खरे असते आणि त्याच्याबद्दल कोणी भयंकर सत्य जरी समोर आणून ठेवले; तरी त्या प्रेयसीचा त्या सत्यावर विश्वास बसत नाही. पण जेव्हा असे सत्य रौद्ररुप धारण करून तिच्या समोर उभे रहाते; तेव्हा त्यातून बाहेर पडण्याची वेळ टळून गेलेली असते. खुप उशिर झालेला असतो. म्हणजे असे; की तो प्रियकर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून प्रत्यक्षात तिची दिशाभूल करत असतो. जेव्हा ती त्याच्या संपुर्ण आहारी जाते, तेव्हा ती त्याच्यासा्ठी कुठलेही धाडस करायच्या मनस्थितीत असते. तेव्हा तो त्या मुलीला पळून जाऊन लग्न करण्याचे आमिष दाखवतो आणि ही तरूणी घरदार नातीगोती सोडुन त्याच्या मागे आंधळेपणाने जातेसुद्धा. मग तिची मागे फ़िरायची दारे बंद झालेली असतात. काही दिवस असे प्रेमाचे जातात आणि घरच्या भानगडी आटोक्यात आल्या, मग तिच्या घरच्यांनी तिचा नाद सोडून दिलेला असतो. अशावेळी तो प्रियकर तिला कु्ठल्या तरी कु्टणखान्यामध्ये नेऊन विकून टाकतो.

   ही काही नवी चकित करणारी गोष्ट नाही. आजवर अशा शेकडो बातम्या किंवा आसपास घडलेल्या घटना तुम्हाला ऐकुन वा वाचून माहिती असतील. कधी ही मुलगी प्रेमात पडलेली असते किंवा कधी ती कसल्या तरी चांगल्या पगाराच्या नोकरी वा अन्य मोहपाशात सापडून घराबाहेर पडलेली असते. पण ती जाऊन पोहोचते ती कुंटणखान्यात. मग पुढला हिंस्र प्रकार सर्वश्रूत आहे. तिच्यावर गुंडांकडून बलात्कार होतात. तिचे मन मारून टाकले जाते. तिच्या मनातला प्रतिकार निष्क्रीय केला जातो. तिला असे देहविक्रयाच्या धंद्याला लावणार्‍याकडे आपण लोक रागाने बघतो. पण त्य कुंटणखान्याच्या मालकीणीने तिला घरातून पळवून आणलेले नसते. त्यांनी तिला फ़ुस लावून घराबाहेर काढलेले नसते. त्यांनी तिला मोहपाशात अडकवून तिची अशी फ़सगत किंवा दुर्दशा केलेली नसते. खरा गुन्हेगार दुरच रहातो. ज्याने तिला प्रेमाच्या मोहपाशात अडकवून एका गाफ़ील क्षणी तिला वेश्याव्यवसायाच्या जबड्यात आणुन सोडले, तोच खरा गुन्हेगार असतो. आणि म्हणूनच शिक्षा व्हायची असेल तर त्याला व्हायला हवी. पण दुर्दैवाने तसे कधीच होत नाही. नेहमी अशा कुंटणखान्याच्या मालकीणीला किंवा मालकाला पोलिस पकडतात व त्यांच्यावरच खटले भरले जातात. आणि यातला खरा सैतान असतो तो नव्या सावजाला जाळ्यात ओढायला मोकळाच असतो. तो नव्या मुलीला प्रेमाचे रंग दाखवून त्याच नरकात घेऊन जाण्य़ाचे डाव नव्याने खेळत असतो.

   आता तुम्ही म्हणाल यात भाऊंनी काय नवे सांगितले? तर त्यात नवे काहीच नाही. पण जे त्यातले दाहक सत्य आहे, त्याच अनुभवातून एक समाज म्हणून आपण जात आहोत. पण फ़सल्यावर सुद्धा आपण जागे व्हायला तयार नसतो हे त्यातले दुर्दैव आहे. ती फ़सलेली मुलगी निदान त्या नरकात जाऊन पडल्यावर पश्चातापाने शहाणपण शिकते आणि फ़सवणार्‍यावर पुन्हा विश्वास ठेवू नये, अशी तरी काळजी घेते. आपले काय? आपण तर त्याच त्याच फ़सव्या प्रियकराच्या आहारी जात असतो. एकदा चुकला असेल, दुसर्‍यांदा चुकला असेल अशी मनाची समजूत घालत त्याचे गुन्हे पोटात घालत असतो. त्यातूनच आज आपले जीवन कमालीचे असुरक्षित झाले आहे. कोण आहे तो आपला लफ़ंगा प्रियकर?

   कालचा (लेखमालेतला दहावा) लेख वाचून ज्या वाचक प्रतिक्रिया मला फ़ोनवरून मिळाल्या, त्यामुळे मलाही या लफ़ंग्याचा चेहरा दिसलेला आहे. कालच्या लेखात मी मुंबई आझाद मैदानच्या घातपाताचे विश्लेषण केलेले होते. त्याचवे्ळी दोन छायाचित्रे छापलेली होती. ती छायाचित्रे आणि त्याचे केलेले विश्लेषण वाचून बहुतांश वाचक कमालीचा विचलित होऊन गेला. ११ ऑगस्टला जे घडले त्याला दंगल म्हणता येत नाही, तो देशद्रोह होता आणि त्याच्याच समोर सरकार व पोलिसांनी नांगी टाकली होती, हे त्या घटनेतले सत्य आहे. पण तमाम माध्यमे व वाहिन्या-वृत्तपत्रांनी त्यालाच दंगल म्हणून सत्य झाकण्याचे पाप केलेले आहे. गुजरातच्या दंगलीची विदारक छायाचित्रे छापणार्‍या वृत्तपत्रे व वाहिन्यांनी अमर जवान स्मारकाची मोडतोड व विटंबना लपवण्याचा केलेला प्रयत्न लांच्छ्नास्पद असाच आहे. त्यातून त्यांनी काय केले? सामान्य भारतीयांना गाफ़ील ठेवण्य़ाचा प्रयत्न केलेला नाही काय? जो प्रकार घडला तो कुठल्या धर्माच्या अनुयायांवर नव्हे, कुठल्या समाज घटकावर नव्हे; तर भारतीय राष्ट्रीय सार्वभौमत्वावर झालेला हल्ला होता. ते सांगितले तर सामान्य देशप्रेमी भारतीय जनता संतप्त होईल, याची माध्यमांना भिती का वाटावी? मला ज्यांचे फ़ोन आले त्यात सात फ़ोन मुस्लिमांचेही होते. म्हणजेच झाल्या प्रकाराने मुस्लिमही चिडलेले आहेत. आपल्या देशाच्या स्वाभिमानाची ही विटंबना त्यांनाही आवडलेली नाही. मग अशी भावना राष्ट्राची ताकद वाढवते की देशाला खिळखिळा करते? लोकांमध्ये राष्ट्रभावना पेटवली जाईल, याची माध्यमांना भिती का वाटावी? त्यांनी राष्ट्रीय स्मारकाच्या विटंबना व मोडतोडीची छायाचित्रे उपलब्ध असूनही सामान्य वाचकांपासून का लपवावित? देशप्रेम जागले तर त्यापासून आपल्याच देशाला धोका आहे, असे या माध्यमांना वाटते काय? त्यातून त्यांना मुस्लिमांना बदनाम करायचे आहे काय? सेक्युलॅरिझम म्हणजे मुस्लिम गुंडांना पाठीशी घालून राष्ट्रप्रेमी मुस्लिमांचा आवाज दडपणे असते काय? नसेल तर अशा गोष्टी का लपवल्या जातात? हा सगळा प्रकार त्या फ़सवणार्‍या प्रियकरासारखाच नाही काय?

   आजवर नेहमी असेच होत आलेले आहे. श्रीनगर वा काश्मिर हा भारताचा अविभाज्य प्रांत असेल तर तिथे तिरंगा फ़डकवण्याच्या प्रत्येक मोहिमेची सेक्युलर माध्यमे का ट्वाळी करतात? त्यात हिंदूत्व का शोधले जाते? आता इथे मुंबईत राष्ट्रीय स्मारक विटंबले जाते तर माध्यमे ते सत्य वाचकापासून का लपवतात? त्यात जो कोणी गुंतला आहे, तो मुस्लिम आहे म्हणुन लपवणे म्हणजे एकप्रकारे तमाम भारतीय मुस्लिमांना अकारण बदनाम करणे आहे. शंभरातला एकसुद्धा मुस्लिम असा नसेल. पण जेव्हा अशा देशद्रोही मुस्लिम गुंडांची सेक्युलर पाठराखण होते; तेव्हा सर्वच मुस्लिमांकडे संशयाने बघितले जात असते. जो विषय हिंदू मुस्लिम असा नसताना त्याला धर्माचे रंग माध्यमेच देत असतील, तर कसे व्हायचे? जे गुंड आहेत ते गुंड, ज्यांनी देशद्रोह केला तो देशद्रोह. त्याकडे बोट दाखवताना धर्म बघण्याचे वा दाखवण्याचे कारण नाही. पण सेक्युलर माध्यमे किंवा राजकारण्यांकडुन तेच होत असते. त्यातून मग सामान्य माणसाची फ़सगत होत असते. खरे सांगायचे तर अधिक व रंगीत पानांच्या चमचमणार्‍या देखाव्याच्या प्रेमात पडलेल्या वाचकाने ही फ़सवणूक ओढवून आणली आहे. कमी किंमतीत अधिक भरपुर पाने आणि तीही रंगीत मिळतात, म्हणुन वाचक खोटारडेपणा सहन करायला शिकला आहे. त्यातूनच ही फ़सवणूक शिरजोर झालेली आहे.

   तो प्रियकर जसा त्या प्रेमात पडलेल्या मुलीला शेवटपर्यंत गाफ़ील ठेवतो, तशीचा आजची सेक्युलर माध्यमे आपल्याला, सामान्य माणसाला खर्‍या धोक्यापासून गाफ़ील ठेवत नाहीत काय? जे १९८८ पर्यंत पाकव्याप्त काश्मिरात चालले होते, त्याबद्दल आपल्याला गाफ़ील ठेवले; म्हणुन १९९८ सालात श्रीनगरमध्ये घातपात सुरू झाले. तिथून काश्मिरी पंडीतांना घरदार सोडून पळ काढायची वेळ आली. मग त्यातल्या राष्ट्रवादी मुस्लिमांनाही पळवून लावण्यात आले. तरी आपल्याला इथे गाफ़ील ठेवले जात होते. आता हळुहळू तो सैतान आपल्या घरापर्यंत इथे येऊन पोहोचला आहे. तर हे सत्य माध्यमे आपल्यापासून लपवत आहेत. म्हणुनच मुंबईतल्या या राष्ट्रद्रोहाला धर्माचा रंग चढ्वून सेक्युलर माध्यमांनीच आपली खरी फ़सवणूक केली आहे. ती छायाचीत्रे का लपवली? आपल्याला म्हणजे त्या पोलिस व महिला पोलिसांना विकृत गुंडांच्या तावडीत देण्याचे पाप सेक्युलर मंडळींनी केले आहे. प्रत्येकवेळी सेक्युलर भूमिकेच्या नावाखाली मुस्लिम गुंडागिरीला पाठीशी घालण्याच्या या पापाने, सामान्य मुस्लिमही त्याचे बळी होत आहेत. म्हणुनच मला वाटते, ज्यांनी आझाद मैदानावर धुडगुस घातला ते दुसर्‍या नंबरचे आरोपी आहेत. त्यांच्यापेक्षा आपल्याला सत्यापासून वंचित ठेवणारे व गाफ़ीलपणे गुंडांच्या तावडीत सोडुन देणारे सेक्युलर पक्ष, राजकारणी माध्यमे व विचारवंत त्या लफ़ंग्या प्रियकरासारखे एक नंबरचे गुन्हेगार आहेत. गुंड व हैदोस घालणार्‍यांचा बंदोबस्त पोलिस व कायदा यथावकाश करतीलच. पण आपली अशी दुर्गत व दुर्दशा करणार्‍या या सेक्युलर माध्यमांचा बंदोबस्त कोणी करायचा? कसा करायचा? कारण तेच तर आज आपल्यासाठी खरा धोका बनलेले आहेत ना?
( क्रमश:)
भाग  ( ११ ) २६/८/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा