शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१२

समोरच्या गर्दीमुळे चढणारी झिंग फ़सवी असते


   मागल्या वर्षी एप्रिल महिन्यात अण्णांचे पहिले आंदोलन किंवा उपोषण जंतरमंतर येथेच सुरू झाले. तेव्हा अण्णा हजारे यांच्याविषयी दिल्लीत कमालीचे कुतूहल होते. त्यातच त्यांना भेटायला आमिरखान वगैरे गेल्यावर आणखीनच गाजावाजा झाला. पण त्याचवेळी दुसरीकडे रामदेव बाबा आवाज देत होते. कॉग्रेसला अण्णांना गुंडाळणे सोपे वाटले होते. पण त्या सताधारी पक्षाला बाबा रामदेवाची भिती अधिक वाटत होती आणि त्याचे कारणही स्पष्टच होते. अण्णा टीम म्हणजे शेवटी नावाजलेल्या मुठभर लोकांचा घोळका होता. त्यांचा आवाज माध्यमांपुरता मर्यादित होता. माध्यमांना चाप लावला मग अण्णा टीमच्या आंदोलनातील हवा काढून घेणे शक्य होते. पण रामदेव बाबाची गोष्ट तशी नव्हती. त्यांच्याकडे देशाच्या जवळपास प्रत्येक तालुक्यापर्यंत बांधलेली संघटना होती. म्हणूनच अण्णा टीमला प्राधान्य व महत्व देऊन रामदेवांच्या आंदोलनाला धोपटण्याची रणनिती कॉग्रेसने पद्धतशीर अवलंबली होती. म्हणूनच जंतरमंतरच्या मुठभर गर्दीला लोकपाल विधेयक बनवण्याच्या संयुक्त समितीमध्ये सहभागी करून देण्याचा उदात्त पवित्रा कॉग्रेसने घेतला होता. पण त्यांच्यापेक्षा मोठी गर्दी रामलिला मैदानावर जामवून रामदेव यांनी सामुहिक उपोषणाचे हत्यार उपसताच, त्यांच्यावर विनाविलंब कायद्याचा बडगा उगारण्यात आला. त्याची दखल खुद्द सुप्रिम कोर्टाने स्वत:च घेऊन सरकारची कानउघडणी केली होती. रामलिला मैदानावर शांतपणे उपोषण करणार्‍यांवर मध्यरात्री लाठ्य़ा चालवण्याचा अतिरेक करणार्‍या सरकार वा कॉग्रेसने जंतरमंतरच्या मुठभर अण्णा टीमसमोर शरणागती मागल्या वर्षी पत्करली; ते निव्वळ नाटक होते. त्यातून त्यांना जनलोकपाल अण्णांना हवे तसे आणायचे नव्हतेच. तर अण्णा व रामदेव यांच्यात एकजुट होऊ नये, अशीच योजना होती. ती कमालीची यशस्वी झाली. कारण रामदेव आपल्या जखमा चाटत बसले आणि अण्णा विधेयकाच्या मसुद्यासाठी संसद भवनात फ़ेर्‍या मारू लागले. दोघांनाही काहीच मिळाले नव्हते. आपल्याला सरकारने मुर्ख बनवले आहे त्याची अण्णा टीमला जाणीव व्हायला चार महिने खर्ची पडले. बैठका चालू होत्या आणि सुचना ऐकून घेतल्या जात होत्या.

   तुमच्यासाठी खास इस्पितळाची सोय केली आहे म्हणून सांगायचे, की तुम्ही खुश. सर्व तयारीनिशी शस्त्रक्रिया करून घ्यायला तिथे पोहोचता आणि तिथले डॉक्टर नुसतेच तुमच्या आजाराची लक्षणे विचारत बसतात. पुढे काहीच होत नाही.. चाचण्या चालू आहेत हेच एक उत्तर मि्ळत रहाते आणि तुमचा धीर सुटत जातो, तशीच अण्णा टीमची अवस्था झाली. शेवटी त्यांना पुन्हा उपोषणाच्या आखाड्यात उतरावे लागले. तेव्हा मात्र उलट कॉग्रेसची फ़सगत झाली. आता रामदेवाप्रमाणेच अण्णा टीमला पळवून लावता येईल, अशा भ्रमात कॉग्रेस होती. म्हणुनच त्यांनी गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनाच्या दुसर्‍या दिवशी पहाटेच अण्णांना उचलून थेट तुरूंगात डांबण्याचा आगावूपणा केला. याचे कारण सत्ताधार्‍यानी रामदेव किंवा अण्णा टीमला हिशोबात घेतले होते; तरी सामान्य जनतेच्या भावना लक्षात घेतल्या नव्हत्या. सामान्य जनता कशी विचार करते, त्याकडे पाठ फ़िरवून सता राबवता येत नसते, की आंदोलनही चालवता येत नसते. तेव्हा म्हणजे 16 ऑगस्टला कॉग्रेसने ती चुक केली आणि त्याच्यानंतर अण्णा टीमने तीच चुक वारंवार केली. अण्णा उपोषणाला बसणार होते त्याच्याआधी रामदेव यांना वाईट वागणूक दिल्याने, लोकांना सरकारची मस्ती आवडली नव्हती. म्हणूनच नेमके तसेच अण्णांच्या बाबतीत होताना दिसले, तेव्हा लोकांचा संयम संपला, हजारो लोक रस्त्यावर उतरले. आणि सकाळी अण्णांना कायदा सुव्यवस्थेचे कारण सांगून अटक करणार्‍या सरकारने दुपारी व्यवस्था पुर्ण कोलमडून पडल्यावर तीच कायदाव्यवस्था सावरण्यासा्ठी त्याच अण्णांची सुटका केली. अण्णा तुरूंगातून बाहेर पडायला तयार होईनात, तर त्यांना बाहेर पिटाळून लावायची हिंमतही सरकार गमावून बसले होते.

   जी चुक सरकारने तेव्हा केली, तीच चुक नंतर अण्णा टीम करत गेली. लोकभावना सरकारला व कॉग्रेसला ओळखता आली नाही, म्हणुन रामलिला मैदान अण्णांना नाकारण्यापासून त्यांना अटक करण्यापर्यंतचा मुर्खपणा कॉग्रेसकडून झाला होता. लोक असे चिडून रस्त्यावर येतील व पोलिसांनाही परिस्थिती आवरता येणार नाही; याचा अंदाज सरकारला नव्हता. पण दुसरीकडे असे लोक दिल्लीच्या रस्त्यावर का उतरले किंवा देशभर लोकभावना अशी प्रक्षुब्ध का झाली, त्याचा नेमका अंदाज अण्णा टीमलाही आलेला नव्हता आणि अजून आलेला नाही. अजून अण्णा टीम 16 ते 29 ऑगस्ट 2011 याच कालखंडात मग्न आहेत असे वाटते. तेव्हा भ्रष्टाचारापेक्षा लोक सरकारच्या अत्याचारी आगावूपणावर संतापून रस्त्यावर उतरले होते. सरकार रामदेव पाठोपाठ अण्णा टीमची गळचेपी करते, त्या रागापोटी रस्त्यावर आले होते. ती अण्णा टीमच्या लोकप्रियतेची किमया नव्हती. पण अण्णा टीम मात्र त्याच उसळलेल्या गर्दीच्या नशेत कायम राहिली. म्हणून तर त्यांना वाटले मुंबईतही तशीच गर्दी लोटणार. म्हणून मोठे मैदान शोधण्यात त्यांनी वेळ वाया घालवला. तेवढेच नाही, त्यानंतर त्यांच्याच या हट्टापायी गर्दी म्हणजे अण्णा टीमचे आंदोलन; अशी प्रतिमा तयार झाली आणि तशी प्रतिमा बनवण्यास त्यांनीच हातभार लावला. नव्हे गर्दी नसेल तर आंदोलन फ़सले, अशी समजूत तयार करण्यातही त्यांनीच हातभार लावला. गर्दी बघण्याची नशा त्यांना जडली म्हणायला हरकत नाही अशीच अवस्था झाली. आणि नेमकी हीच चुक दोन दशकापुर्वी शरद जोशी यांनी केली होती. सामान्य कांदा उत्पादकांच्या आंदोलनापासून त्यांनी शेतकरी संघटनेची आंदोलने सुरू केली. पण पुढे ऊस उत्पादकांच्या आंदोलनात शिरल्यावर त्यांना सहकारी साखर सम्राटांनी घेरले आणि ट्रक वा ट्रॅक्टरने गर्दी आणली जाऊ लागली. लाखालाखाच्या सभा मेळाव्यात बोलायची नशा वेगळीच असते. ती जडल्यावर शरद जोशींना गर्दीशिवाय आंदोलन जमेना. ऊसवाले आणि सहकार सम्राट बाजूला झाल्यावर त्यांचे आंदोलन विस्कटत गेले. त्यानंतर दहा वर्षांनी जोशी निवडणूकीच्या राजकारणात उतरले. पहिली निवडणूक त्यांच्या समर्थकांनी 1990 साली जनता दलाच्या झेंड्याखाली लढवली. त्यानंतर चार वर्षांनी त्यांनी स्वतंत्र भारत पक्ष हा आपल्या राजकीय पर्याय लोकांसमोर ठेवला. पण तेव्हा शेतकरी चळवळ संपुष्टात आली होती.

   अण्णा टीम आणि जोशींच्या शेतकरी संघटनेची तुलना करायचीच असेल तर दोघेही गर्दीच्या नशेत फ़सले अशी होऊ शकते. तेव्हा सहकार सम्राटांच्या माध्यमातून जोशींना गर्दीचे व्यसन लावण्याचा डाव कॉग्रेसने यशस्वीरित्या खे्ळला होता. त्यामुळेच जेव्हा शेतकरी संघटना कॉग्रेस विरोधात राजकीय पवित्रा घेऊ लागली, तेव्हा तिला वार्‍यावर सोडून देण्यात आले. आणि गर्दीशिवाय जोशींना आंदोलन जमेना. अण्णा टीमची आजची स्थिती नेमकी तशीच झाली आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यातील अफ़ाट गर्दीने त्यांना जी नशा चढली आहे; त्यातून ही मंडळी बाहेरच पडायला तयार नाहीत. मात्र त्यासाठी कॉग्रेसला दोष देता येणार नाही. तेव्हा कॉग्रेसच्या मुर्खपणामुळे त्यांना इतक्या मोठ्या गर्दीचा प्रतिसाद मिळाला, तरी तो कॉग्रेसने मुद्दाम खेळलेला डाव नव्हता. मात्र त्या सापळ्यात अण्णा टीम स्वत:च अडकली आहे. त्यामुळेच मुंबईत गर्दी जमली नाही, तेव्हा त्यांना उपोषण गुंडाळण्याची घाई झाली. आता जंतरमंतरचा प्रयोगही तसाच गर्दी अभावी फ़सला आहे. देशातल्या करोडो लोकाना भ्रष्टाचार नको आहे व सरकारचा राग आलेला आहे. पण म्हणून रोजच्यारोज लाखो लोक कामधंदा सोडुन उपोषणाच्या जागी गर्दी करू शकत नाहीत. हे ओळखूनच आंदोलनाची दिशा ठरवायला हवी होती. आणि हे मी आजच सांगतो असे मानायचे कारण नाही. मागल्या डिसेंबर महिन्यात मुंबईत जे उपोषण झाले होते आणि त्यासाठी मोठ्या मैदानाचा आग्रह धरत अण्णा टीमने हायकोर्टाकडे दाद मागितली होती. तेव्हाही मी हेच मुद्दे मांडले होते. आंदोलन हे लहानमोठ्या जागेशी संबधित नसते, गर्दीशी संबंध नसतो. आंदोलनाचा संबंध ज्वलंत विषयाशी असतो. त्याच्या तिव्रतेनुसार लोक त्यात सहभागी होतात. आपल्या सोयी व प्राधान्यानुसारच लोक त्यात सहभागी होत असतात. म्हणुनच आंदोलनाच्या नेतृत्वाने विषय व मुद्दे यांच्या गांभिर्याकडे जास्त लक्ष द्यायला हवे असते. तिथे करायच्या सोयीसुविधा किंवा क्षेत्रफ़ळाची काळजी करायची नसते.

   अण्णा टीम आपला मुद्दाही विसरून गेली आहे. आपले सामर्थ्यही विसरली आहे. आपला समर्थक व त्याच्या अपेक्षांकडे टीमचे दुर्लक्ष झाले आहे. लोकपाल किंवा कुठला कायदा महत्वाचा नसून लोकांच्या जगण्यातले गांजलेपण, ही लोकांच्या सहभागाची गुरूकिल्ली आहे. समोर गर्दी जमणे किंवा सरकारने उपोषण सोडण्यासाठी शरणागती पत्करणे हे आंदोलनाचे यश तेव्हाही नव्हते आणि आजसुद्धा त्याला यश मानता येणार नाही. लोकांच्या जीवनात कुठला फ़रक पडणार आहे आणि त्याची सरकारपेक्षा आंदोलनकर्त्यांना किती आच आहे, त्यावर लोकांचा प्रतिसाद अवलंबून असतो. मग तो उपोषणाच्या मैदानात येण्यासाठीचा असो किंवा निवडणुकीच्या दिवशी मत देतानाचा असो. नुसते लोक सरकारवर चिडले आहेत; म्हणुन तुमच्या मागे येत नसतात वा तुम्हाला मतदान करतील अशा भ्रमात राहून राजकारण होऊ शकणार नाही. आंदोलनसुद्धा यशस्वी करता येत नसते. अण्णा टीमला अत्मपरिक्षणाची आत्यंतिक गरज आहे. चुकणे गैर नाही. पण त्याच त्याच चुक सातत्याने करणे हा मात्र गुन्हा असतो. मुंबई पाठोपाठ जंतरमंत्र येथे तेच नेमके झाले आहे.   ( क्रमश:)
भाग  ( ३५३ )  ११/८/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा