रविवार, १६ मार्च, २०१४

युझफ़ुल इडीयटस अर्थात उपयुक्त मुर्ख



‘थ्री इडियटस’ नावाचा एक चित्रपट आपल्याकडे आला आणि खुप गाजला सुद्धा. इडियट म्हणजे खुळा, मुर्ख वेडगळ वगैरे संदर्भाप्रमाणे अर्थ काढता येतो. पण इडीयट म्हणजे अक्कलच नसेल तर तो युझफ़ुल म्हणजे उपयुक्त कसा? ही उक्ती रशियन कम्युनिस्ट क्रांतीचा जनक ब्लादिमीर लेनीन याची असल्याचे म्हटले जाते. त्याचा सज्जड पुरावा नाही. पण खरेखोटेपणाचा मामला इथे महत्वाचा नाही. त्यातला बोध मोलाचा.

   सोवियत सत्ता स्थापन झाल्यावर तिथल्या साम्यवादी हुकूमशाहीने विचारस्वातंत्र्याची गळचेपी केली होती. म्हणजेच कम्युनिस्ट विचारसरणी आणि त्यातही सत्ताधार्‍याची भूमिका, यावर टिका करायला मुभा नव्हती. भिन्न मतप्रदर्शनालाही बंदी होती. पण अशा सत्तेचे व व्यवस्थेचे कौतुक पाश्चात्य देशातील मुक्त स्वातंत्र्य उपभोगणारे विचारवंत व अभ्यासक सातत्याने करीत असत. ज्या व्यवस्थेने स्वातंत्र्य दिले आहे, तिचीच निंदा करण्यात धन्यता मानणारे हे विचार स्वातंत्र्यवीर; विचारस्वातंत्र्याची गळचेपी करणार्‍या व्यवस्थेचे कौतुक कशामुळे करीत, ते त्यांनाच माहित. पण यातल्या विरोधाभासाबद्दल सोवियत नेता लेनीन यालाच प्रश्न विचारण्य़ात आला होता. त्यावर उत्तर देण्यापेक्षा त्याने काय मतप्रदर्शन केले? त्याने अशा विचारवंतांना उपयुक्त मुर्ख अशी उपाधी दिली. मुर्ख हा उपयुक्त कसा? असे विचारता लेनीन म्हणाला ते स्वत:च्या स्वार्थाबाबतीत मुर्ख आहेत, पण आमच्या राजकारणासाठी उपयुक्त आहेत.

   याचा मतितार्थ असा, की अशा विचारवंतांच्या विवेचन समर्थनातून उद्या पाश्चात्य देशात कम्युनिझम आलाच, तर सर्वात प्रथम गळचेपी झाली असती ती त्याच विचारस्वातंत्र्याची म्हणजे विचारवंतांची. म्हणजे आपण आपल्याच स्वातंत्र्यावर गदा आणायच्या राजकारणाचे समर्थन करतोय, याचे भान सुटलेले विचारवंत शत्रूसाठी उपयुक्त आणि स्वत:सह विचारस्वातंत्र्यासाठी मुर्ख असतात. केजरीवाल यांना मागल्या चार महिन्यात ज्यांनी इतके प्रसिद्धीझोतात आणले, त्यांना आता आपण कसे उपयुक्त मुर्ख आहोत याचा साक्षात्कार व्हायला हरकत नाही. अर्थात तितके डोके ठिकाणावर असेल तर.



   हा सगळा विषय आम आदमी पक्ष किंवा केजरीवाल यांच्या जाळ्यात फ़सलेल्या तथाकथीत पुर्वाश्रमीच्या समाजवादी वा उदारमतवाद्यांशी कुठे जोडला जातो, तेही समजून घेण्यासारखे आहे. १९७७ पासूनचा हा संघर्ष आहे. तेव्हा आणिबाणीच्या विरोधात अशा सेक्युलर उदारमतवाद्यांच्या बरोबरीने संघ व तेव्हाच्या भाजपाला (जनसंघाला) लढावे व तुरूंगात जावे लागले होते. त्याच्याही आधी याच लोकांनी इंदिरा गांधी यांच्या समाजवादी भाषेला भुलून फ़ुटलेल्या कॉग्रेसपैकी इंदिरा गटाला समर्थन दिले होते. त्यातून इंदिराजींना दोनतृतियांश इतके प्रचंड बहूमत मिळाले आणि त्यांना लोकशाहीसह राज्यघटना गुंडाळून ठेवायची शक्ती प्राप्त झाली होती. पर्यायाने ज्या संघ वा जनसंघाच्या विरोधात ही उदारमतवादी सेक्युलरांची शेळी हुरळली व इंदिराजींच्या मागे गेली होती, तिचाही संघासोबतच बळी गेला. त्यांच्याच विचारस्वातंत्र्याला व नागरी हक्काला बेड्या ठोकल्या गेल्या होत्या. त्यातून मुक्त होण्यासाठी त्याच संघासोबत या सेक्युलरांना हातमिळवणी करावी लागली होती. त्यामुळेच मग १९७७ सालात जनता पार्टीचा प्रयोग झाला आणि जनतेने त्याला भरभरून प्रतिसाद दिला होता. पण कुत्र्याचे शेपूट वाकडेच म्हणतात, तशी या लोकांची अवस्था असते. त्यांनी इंदिराजी पराभूत झाल्या म्हणजे कॉग्रेस संपली; असे गृहीत धरून जनता पक्षात सेक्युलर थोतांडाचे नाटक नव्याने सुरू केले आणि जनतेचा पुरता भ्रमनिरास केला. पर्यायाने असल्या सावळ्यागोंधळाने जनता पुन्हा इंदिरा गांधींकडे वळावे लागले. त्या अराजकाला लोक इतके कंटाळले होते, की अवघ्या ३० महिन्यात लोकांनी त्याच आणिबाणीफ़ेम इंदिराजींना दोनतृतियांश बहूमताने पुन्हा निरंकूश सत्ता बहाल केली. म्हणून सेक्युलर इडियट शहाणे होतील, अशी अपेक्षा बाळगणेच चुक होते. अखेर पुढलीही निवडणूक कॉग्रेसलाच मोठे यश मिळाले आणि त्या वैफ़ल्यातून बाहेर पडण्यासाठी सेक्युलर शहाण्यांना तब्बल बारा वर्षांनी विश्वनाथ प्रताप सिंग नावाच्या बंडखोर कॉग्रेस नेत्याला शरण जावे लागले. पण तेवढेही पुरेसे नव्हते. विखुरलेल्या विविध समाजवादी व सेक्युलरांना त्याच संघ भाजपाची १९८९ मध्ये सोबत घ्यावी लागली होती.

   तसे बघितले तर भाजपा आधी गांधीवादी होता आणि त्यातच त्याचा बट्ट्याबोळ झालेला होता. अखेर आपला मतदार पुन्हा मि्ळवण्यासाठी भाजपाला हिंदूत्वाचा झेंडा खांद्यावर घ्यावा लागला होता. हिंदू परिषदेला शरण जाऊन भाजपाने अयोध्येतील रामजन्मभूमीचा विषय हाती घेतला. अशा कडव्या हिंदूत्ववादी झालेल्या धर्मांध भाजपाशी व्ही. पी. सिंग यांना निवडणूकपुर्व आघाडी करावी लागली आणि पुढे सत्तेसाठी त्याच भाजपाचा पाठींबाही घ्यावा लागला. पण कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच. पुन्हा लोकांनी दिलेला कौल मातीमोल करून सिंग सरकार पडले आणि मध्यावधी निवडणूकीत जनता दलाचा पुरता धुव्वा उडाला. त्यातूनच भाजपा देशातला कॉग्रेसला पर्यायी राष्ट्रव्यापी पक्ष होत गेला. लोकांकडे मते मागताना सेक्युलॅरिझम गुंडाळून ठेवायचा आणि निकाल लागले की सेक्युलर नाटक सुरू करायचे; हा जुनाच खेळ होऊन बसलाय. असो, मुद्दा इतकाच की मागल्या दोन दशकात सेक्युलर समाजवाद्यांनी आपली विश्वासार्हता संपुर्णपणे गमावली आणि अन्य कुठल्या नाही तर कॉग्रेस पक्षाच्या वळचणीला गेले. ज्यांना ते साधले नाही त्यांनी स्वयंसेवी संघटनेचा बुरखा पांघरून राजकीय अज्ञातवास पत्करला. आता तर कॉग्रेसही रसातळाला चालली आहे. मग यांच्या सेक्युलर नाटकाचे प्रयोग कोणी लावायचे? त्यातून त्यांना नवा प्रेषित सापडला. त्याचे नाव केजरीवाल. अलिकडल्या विधानसभा निवडणूकीत दिल्लीत केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने थोडे यश मिळवले आणि महाराष्ट्रातले अनेक वैफ़ल्यग्रस्त समाजवादी नव्या नेत्याला शरण गेलेत. पंचवीस वर्षापुर्वी त्यांना असाच विश्वनाथ प्रताप सिंग यांच्यात प्रेषित सापडला होता. आज ते उपयुक्त मुर्ख केजरीवालच्या मागे धावत सुटले आहेत. पण केजरीवाल यांनीच पत्रकार आणि माध्यमांना तुरूंगात डांबण्याची भाषा केली आहे. थोडक्यात जे विचारस्वातंत्र्य या समाजवादी उदारमतवाद्यांना प्राणप्रिय आहे, त्याचाच गळा घोटण्याची भाषा केजरीवालच्या तोंडी आली आहे. इंदिराजी निवडणूका जिंकेपर्यंत तरी थांबल्या होत्या. पण केजरीवाल आधीच तसल्या वल्गना करू लागले आहेत.

   १९७७च्याच सुमारास भारताचा एक शेजारी इराणमध्येही क्रांती झाली होती. तिथल्या राजा आणि हुकूमशहा विरोधात म्हणजे मोठाच उठाव सुरू झाला होता. तिथल्या कम्युनिस्ट पक्षाने तो विद्यार्थ्यांचा लढा उभारला होता. पण त्याला चिरडण्याची कारवाई शहाने सुरू केली आणि त्या कम्युनिस्टांनी जनमताचा रेटा निर्माण करण्यासाठी लोकांच्या धर्मभावनेला हात घातला. इराणचा माथेफ़िरू धर्ममार्तंड आयातुल्ला खोमेनी तेव्हा पॅरिसमध्ये परागंदा होता. त्याच्याविषयी लोकांना खुप आस्था होती. कम्युनिस्टांनी त्याच्याच नावाचा जयजयकार सुरू केला. त्याला प्रतिसादही मिळाला. आंदोलन भडकतच गेले. शेवटी शहाला देश सोडून पळ काढायची वेळ आली. तोपर्यंत खोमेनी इराणी जनतेचा अनभिषिक्त नेता सत्ताधीश होऊन बसला होता. मायदेशी येऊन सत्ता हाती घेतल्यावर त्याने सर्वप्रथम काय केले असेल; तर मतस्वातंत्र्य आणि विचारस्वातंत्र्याचे हट्ट धरणार्‍या कम्युनिस्टांचे शोधून शोधून शिरकाण केले. काही कम्युनिस्टांना तुरूंगात डांबले, तर उरलेल्यांना ठार मारले. ज्यांना शक्य झाले त्यांना इराण सोडून पळ काढावा लागला. थोडक्यात इराणचा हुकूमशहा परवडला, म्हणायची पाळी त्यांच्यावर आली. कारण त्याने मर्यादित स्वातंत्र्य तरी उपभोगू दिले होते. खोमेनीने कत्तल केली आणि अवघा देशच धर्माच्या साखळदंडांनी जखडून टाकला. ती क्रांती ज्यांनी सुरू केली होती आणि ज्या उद्दीष्टांसाठी सुरू केली होती, त्या दोन्हीचा त्यात बळी गेला. आणि आततायीपणाने खोमेनीला दैवत बनवून जनतेला रस्त्यावर आणणारे कोणी अडाणी अशिक्षीत लोक नव्हते. तर राजकारणाचा शास्त्रशुद्ध अभ्यास आपणच करतो, अशा भ्रमात कायम जगणारे कम्युनिस्ट, उदारमतवादी व समाजवादीच पुढे होते. ४८

   त्यांनी जे काही केले, ते स्वत:च्या पायावर कुर्‍हाड मारून घेण्या्सारखे होते. म्हणजेच ते स्वत:साठी मुर्ख होते. कारण असलेले मर्यादित स्वातंत्र्यही त्यांनी गमावलेच. पण त्याचवेळी धर्मांध हुकूमशाही प्रस्थापित व्हायला त्यांनी सर्वस्व पणाला लावून मदत केली होती. म्हणूनच लेनीन त्यांना युझफ़ुल इडीयटस असे म्हणतो. मागल्या काही काळात मोदींचा द्वेष आणि संघ-भाजपा यांच्याविषयी पुर्वग्रह असल्याने केजरीवाल यांच्या समर्थनासाठी पुढे सरसावले, त्या पत्रकार, राजकीय विश्लेषक, डावे उदारमतवादी विचारवंत यांची कहाणी वेगळी आहे काय? तीन महिन्यात दिल्लीपुरत्या मर्यादित केजरीवाल व त्याच्या आप या पक्षाला राष्ट्रीय प्रतिमा उभी करून देणार्‍या पत्रकार माध्यमांना जेलमध्ये डांबण्याची भाषा केजरीवाल वापरतात, तेव्हा कोण इडीयट आणि कोणाला युझफ़ुल हे वेगळे सांगण्याची गरज आहे काय? मागल्या दोनतीन वर्षात केजरीवाल यांनी अशा किती इडीयटसना आपल्या कारस्थानात वापरून उकीरड्यावर फ़ेकून दिले, त्याची यादी वेगळी द्यायला हवी काय? स्वामी अग्नीवेश, अण्णा हजारे, किरण बेदी ही मोठी नावे. आम आदमी पक्षाची स्थापना केल्यावर वापरलेले आणि आता नागवले गेलो म्हणून टाहो फ़ोडणारे कमी नाहीत. पण अशा बळी जाणार्‍यांचा जगात कधीच तुटवडा नसतो. ते उतावळेपणाने आपल्याला बळी देणार्‍या खाटकाच्या प्रतिक्षेत बसलेलेच असतात.

   १९९९ सालात सेना-भाजपा युतीला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या, पण बहूमत हुकले होते. तेव्हा रिपब्लीकन, जनता दल, मार्क्सवादी व शेकाप हे पक्ष सेक्युलर राजकारणाला जीवदान देण्य़ासाठी पुढे सरसावले आणि त्यांच्यासह सेक्युलर विचारवंत पत्रकारांनी दोन्ही कॉग्रेस गटांना एकत्र यायला भाग पाडले. पुढल्या चौदा वर्षात काय झाले आहे? त्याच चार सेक्युलर पक्षांची दुरावस्था काय आहे? त्यांचे नामोनिशाण शिल्लक उरले आहे काय? दहा वर्षापुर्वी त्याचाच प्रयोग अखील भारतीय पातळीवर होऊन लालू, पासवान व डावी आघाडी रसातळाला गेली. त्यात हे लोक मरगळल्या कॉग्रेसला संजीवनी देऊन बळी गेले. भाजपाला आज पुन्हा उर्जितावस्था आलेली आहे. मग त्यांचेच विस्कटलेले वैफ़ल्यग्रस्त कार्यकर्ते आता केजरीवालच्या मागे धावत सुटलेले आहेत. त्यांनाही वापरून फ़ेकून देणारा कोणीतरी भामटा हवाच असतो. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा म्हणतात, त्याचे हे बुद्धीमान अवतार. असो, आज महाराष्ट्रात केजरीवालच्या मागे धावलेले समाजवादी बघितल्यावर लेनीनची उक्ती आठवली.

1 टिप्पणी:

  1. भारतात राहूनच हिंदू देव-देवतांवर टीका करणाऱ्या निधर्मी मंडळींनी आणि तथाकथित समाजवाद्यांनी डोळे उघडे ठेवून हि पोस्ट वाचावी... आणि हो ज्या ब्रिगेडी बाटग्यांना वाच्रायला येत असेल त्यांनीही हि पोस्ट जरूर वाचावी.

    ब्राझीलच्या कार्निव्हलमध्ये शिवशंभो — एक नवी सुरुवात?
    भारत देश किती जरी दांभिक-धर्मनिरपेक्षतेच्या गाळात रुतत असला, तरीही शेष जग कसे हळुहळू परंतू निश्चितपणे हिंदू धर्म, संस्कृती आणि हिंदुत्वाकडे आकर्षित होते आहे, याची अनेक उदाहरणे मी सातत्याने देत असतो. मग तो लिसा मिलर या अमेरिकन विदुषीचा "We Are All Hindus Now" हा अमेरिकेचे हिंदुत्वाकडे वाढते आकर्षण साधार सांगणारा लेख असो (लिंक: http://www.thedailybeast.com/newsweek/2009/08/14/we-are-all-hindus-now.html) वा कोस्टारिका देशाने पाडलेले श्रीगणेशाचे सुंदर नाणे असो वा घाना या आफ्रिकन देशात प्रतिवर्षी वाढत जाणारा गणेशोत्सवाचा प्रभाव असो (लिंक: http://www.patheos.com/blogs/drishtikone/2013/09/hinduism-growing-in-africa-without-proselytizing/) वा अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंडमध्ये सातत्याने चर्चेसचे मंदिरांमध्ये होत असलेले रुपांतर असो (लिंक: http://vikramedke.com/blog/churches-chi-hotayat-mandire-chahul-badalatya-pravahachi/) वा कॅलिफोर्नियात साजरा होणारा हिंदू-मास असो (लिंक: http://www.hafsite.org/CA_Declares_Oct_Hindu_American_Month) वा अन्य काही!

    आजही मी असेच एक अगदी अलिकडचे उदाहरण सादर करतोय. रिओ-दि-जानेरोचा सांबा-महोत्सव (कार्निव्हल) अवघ्या जगात प्रसिद्ध आहे. "रिओ" या इंग्रजी चित्रपटातही त्याचे अतिशय मनोवेधक दर्शन सर्वांनी घेतले आहे! यावर्षीही (३ मार्च २०१४) तो अतिशय उत्साहाने साजरा होतोय. विविध सांबा-कलाकार आणि स्थानिक मंडळी या महोत्सवात अतिशय उत्साहाने सहभागी होत असतात. विविध मूर्त्या, आराशी यांची मिरवणुकीत रेलचेल असते! यावर्षीही या मिरवणुकीत अनेक प्रकारच्या आराशी होत्या. परंतू सर्वांचे लक्ष वेधून घेत होती ती 'सल्गिरो सांबा स्कुल'च्या आराशीतील मूर्ती! तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ती होती देवाधिदेव महादेवांची अतिप्रचंड आकाराची मूर्ती! आहे की नाही गंमत.

    इथे एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की, ब्राझील हा एक ख्रिश्चन देश आहे. किंबहुना ख्रिस्ताची अतिप्रचंड मूर्ती याच रिओ शहरात आहे. तेथील वार्षिक महोत्सवात शिवशंकरांची मूर्ती समाविष्ट करावीशी वाटणे, ही हिंदुत्वाच्या दृष्टीने निश्चितच अत्यंत आशादायी आणि सकारात्मक बाब आहे! इतर अनेक देशांप्रमाणे ब्राझीलनेही हिंदुत्वाचा सनातन मार्ग अनुसरण्याची ही केवळ सुरुवात आहे. तरीही प्रश्न उरतोच की, सबंध जग हळूहळू या मार्गावर चालू लागताना ही हिंदुत्वाची गंगोत्री मूळात जिथून उगम पावली तो हिंदुस्थान खोट्या धर्मनिरपेक्षतेचा बुरखा कधी उतरवणार? अन्यथा देव न करो, परंतू भविष्यात परिस्थिती अशी होईल की, जगभरात सर्वत्र हिंदूच हिंदू दिसतील परंतू हिंदुत्वाच्या पितृभूत मात्र हिंदू औषधालाही सापडणार नाही. हे होता उपयोगी नाही. शेवटी आपला वारसा जपणं आणि तो वाढवणं आपल्याच हाती आहे, हो ना?

    - © विक्रम श्रीराम एडके
    श्री विक्रम एडके हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते आणि लेखक आहेत. त्यांच्या संकेतस्थळावर आपण भेट देऊ शकता .
    www.vikramedke.com

    उत्तर द्याहटवा