शनिवार, ८ मार्च, २०१४

माल जुनाच, मॉडेल नवे   आमच्या बालपणी घरात रेडीओ नसायचा तर टेलिव्हिजन कुठला? सिनेमा तर मुलांनी बघायचेच नसत. त्यामुळे सिनेमा नावा़चा प्रकार शाळकरी वयात पोस्टरपुरता मर्यादित असायचा. त्यामुळे ज्यांना सिनेमाविषयी माहिती असायची, ती तरून मुले कोणी मोठे जाणकार असल्यासारखे वाटायचे. बाकी चित्रातून अभिनेते वा अभिनेत्री माहिती असायच्या. पोस्टरखेरीज असे देखणे चेहरे दिसायचे, ते वृत्तपत्रातल्या जाहिरातीमध्ये. तेव्हा मधुबाला, मीनाकुमारी अशा नट्यांचा बोलबाला होता आणि त्यापैकी मधूबाला अनेक जाहिरातीमध्ये दिसायची. लक्स नावाचा एकच सर्वपरिचित सौंदर्य साबुन तेव्हा माहिती होता. त्याचे कौतुक म्हणजे, तोच साबण वापरल्याने या सिनेमातल्या नट्या सुंदर देखण्या होतात, अशी समजूत करून देणार्‍या जाहिराती होत. पुढल्या काळात आम्ही तरूण झालो आणि कॉलेजात जाऊ लागल्यावर स्वतंत्रपणे सिनेमा बघण्याइतके ‘स्वतंत्र’ झालो होतो. नट्यांचा जमानाही बदलला होता. मधूबाला मागे पडून नुतन, वैजयंतीमाला आणि पुढे हेमा मालिनी पडद्यावर झळकू लागल्या होत्या. त्यांचीही गोरी कांती व सौंदर्य पुन्हा लक्स याच साबणातून आल्याच्या जाहिराती रंगीत मासिकातून बघायला मिळू लागल्या होत्या. पण बाजारात लक्सशी स्पर्धा करणारे आणखी काही नवे सौंदर्य साबून दाखल झालेले होते. नुतनची पिढी मागे पडून शर्मिला टागोर व मुमताज सौंदर्यवती म्हणून पुढे येत होत्या. त्यांच्याही सौंदर्याचे रहस्य पुन्हा तोच लक्स साबून होता. कोवळ्या शाळकरी वयापसून आमची चाळीशी आली आणि सिनेमातल्या नट्यांची तिसरी पिढी दाखल झाली, तरी सौंदर्य साबुन कायम होता. फ़क्त त्याची जाहिरात करणार्‍या सौंदर्यवती बदलत होत्या. आता तर मधुबाला सोडाच तिच्यानंतरच्या चौथ्या पाचव्या पिढीतल्या नट्याही मागे पडल्या आहेत. पण म्हणून त्या नट्यांच्या सौंदर्याचे रहस्य आजही कायम आहे. तसल्या जाहिराती कायम आहेत. साबणाचे प्रकारही नवे आलेत.

   मुद्दा इतकाच की जाहिरातीमधली मॉडेल बदलत गेली, पण साबून तोच राहिला. विकायचा माल तोच राहिला. असे का व्हावे? वीस वर्षापुर्वीच्या पेप्सीकोलाच्या जाहिराती आठवतात? तेव्हा तेंडूलकर नवखा होता. त्याचा शाळकरी सवंगडी विनोद कांबळीही नवाच होता. मग त्या दोघांमध्ये पेप्सीसाठी झोंबाझोंबी होते अशी एक जाहिरात होती. पण हे दोघे पेप्सीच्या बाटलीपर्यंत जाण्याआधीच तिथे अझरुद्दीन पोहोचतो अशी एक जाहिरात होती. कारण तेव्हा अझर सिनीयर होता आणि कर्णधार सुद्धा होता. पुढे त्याच्यावर मॅचफ़िक्सिंगचा आरोप झाला आणि अझर संघातून बाहेर फ़ेकला गेला. त्यानंतर पेप्सीच्या जाहिरातीतून अझरही गायब झाला. पण सचिन कायम होता. त्यात मग अझरच्या ऐवजी नवा सिने सुपरस्टार शाहरुख सचिनच्या जोडीला आलेला होता. अझरची जागा शाहरुखने घेतली. काळ बदलला, जाहिराती बदलल्या तरी विकावू माल कायम तोच होता. पेप्सीकोला. पुढे तर शाहरुख पेप्सीचा कायम मॉडेल होता. जोवर अझर, सचिन वा शाहरुखचा जमाना होता, तोपर्यंत तेच जाहिरातीमध्ये दिसायचे. जमाना बदलला आणि नवे हिरो किंवा खेळाडू पेप्सीची जाहिरात करू लागले. थोडक्यात माल तोच असतो, पण काळानुसार मॉडेल बदलते. कारण आज कोणी मधुबालाच्या जाहिरातीमुळे सौंदर्य साबून किंवा अझरच्या जाहिरातीमुळे पेप्सीकडे आकर्षित होणार नाही. जाहिरातीचा हाच मामला असतो. आपल्या मालाचे आकर्षण वाढवायला किंवा त्याकडे लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आकर्षक वा लोकप्रिय चेहरा आवश्यक असतो. त्या चेह्र्‍याकडून बोलून वा लक्ष वेधून घेण्याला जाहिरात म्हणतात. अशी माणसे हेरून त्यांना आपल्या मालाच्या जाहिरातीसाठी वापरण्याच्या कलेला पासष्टावी कला म्हणजे जाहिरातबाजी म्हणतात. आज माध्यमे, पत्रकारिता आणि पासष्टावी जाहिरातबाजीची कला यातली सीमारेषा कमालीची पुसट होऊन गेली आहे. त्यातूनच मग पेडन्यूज नावाचा प्रकार उदयास आलेला आहे. बातम्या म्हणून छापले जाते किंवा वाहिन्यांवर प्रसारीत होते, ती प्रत्यक्षात जाहिरात असते. थोड्या डोळसपणे बघितले तर वृत्तपत्रे आणि वाहिन्यांवरच्या बातम्या किंवा लेख चर्चा अशाच पासष्टाव्या कलेचे अविष्कार असल्याचे आपल्याला सहज ओळखता येतील.

   हे आज इतक्या तपशीलाने का सांगायची वेळ आली? सध्या तमाम वाहिन्यांवर असाच एक पासष्टाव्या कलेचा अहोरात्र अविष्कार रंगलेला आहे. केजरीवाल यांच्या बातम्यांनी व प्रसारणाने दिवसाचे चोविस तासच नव्हे, तर तीस तास व्यापलेत की काय अशी शंका येण्याची पाळी आलेली आहे. काय बोलतात हे महाशय? प्रामुख्याने त्यांनी गेल्या दोनतीन दिवसात गुजरातचा दौरा करून जी आरोपबाजी व तमाशे सादर केले; त्यात नेमके काय नवे होते? मागल्या दहा वर्षात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर अखंड ज्या आरोपांचा भडीमार सुरू होता, त्यापेक्षा केजरीवाल यांनी कुठला नवा आरोप केलेला आहे? गुजरात मागासलेला आहे, तिथे मुलांचे कुपोषण होते आहे, तिथे विकास झालेला नसून मोदी देशभर विकासाच्या थापा मारत फ़िरतात. गुजरातची जनता भयग्रस्त आहे, दहशतीखाली आहे, शेतकर्‍यांच्या जमीनी लुबाडलेल्या आहेत. उद्योगपतींना गुजरात आंदण दिलेला आहे. यातला कुठला आरोप नवा आहे? मागल्या दहाबारा वर्षात प्रत्येक कॉग्रेस नेत्याने वा सेक्युलर नेता आणि पुरोगामी पत्रकाराने तोच आरोप सातत्याने केलेला आहे. अशा आरोपबाजीचा इतका सुकाळ झाला, की लोकच त्याला कंटाळले आणि माध्यमांना त्यातून काढता पाय घ्यावा लागला. आजही कुठल्या राजकीय चर्चेत तेच आरोप कॉग्रेस किंवा सेक्युलर नेत्यांकडून होताना दिसतील. मग गुजरातच्या दौर्‍यावर जाऊन केजरीवाल किंवा आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी असा कोणता नवा शोध लावला, की ज्याचा इतका गाजावाजा माध्यमातून चालू आहे? त्या आरोपाच्या सादरीकरणात जुनेपणा नाही. जे आरोप कॉग्रेसजन सभा घेऊन करीत होते, पत्रकार परिषद घेऊन करीत होते, तेच केजरीवाल यांनी पथनाट्य स्वरूपात सादर केलेले आहे. पण त्याचे थेट प्रक्षेपण चोविस तास करून त्याचा मनोरंजनात्मक रियालिटी शो बनवण्यात आला आहे. साध्या भाषेत सांगायचे, तर आरोपांचा माल तोच आहे, फ़क्त सादर करणारे जाहिरातीतले मॉडेल बदलले आहे. मॉडेल फ़क्त नवे आहे.

   काही दिवसांपुर्वी हेच केजरीवाल हरयाणाच्या दौर्‍यावर गेलेले होते. तिथे त्यांनी तिथले मुख्यमंत्री भुपिंदरसिंग हुड्डा यांच्यावर वाड्राचा प्रॉपर्टी डीलर असल्याचा आरोप केला होता. शनिवारी अहमदाबादच्या आरोपात दोन नावे बदलली. मुख्यमंत्री मोदी आणि वाड्राच्या जागी अंबानी, अदानी अशी नावे बदलली. आरोप मोदींवरचे असोत, हुड्डावरचे असोत किंवा वाड्रावरचे असोत, त्यात नवे काहीच नाही. मग बघणार्‍यांना कंटाळा येत नसेल काय? दाखवणार्‍या वाहिन्यांनाही कंटाळा येऊ नये काय? अखंड तेच आरोप व तोच अभिनय बघून लोक कंटाळणार नाहीत काय? इथे कलवंताची खरी कसोटी असते. केजरीवाल त्यात उत्तम पारंगत आहेत. आपल्या प्रत्येक कार्यक्रमात नाविन्यपुर्ण मनोरंजक मूल्य असले पाहिजे, याची ते पुरेपुर काळजी घेतात. त्यासाठी सातत्याने आपल्या कार्यक्रमात व वागण्यात नाट्य असावे याची बेमालूम योजना ठेवतात. शुक्रवारी त्यांनी सकाळी पत्रकारांना बोलावून घेतले आणि अकस्मात मुख्यमंत्री मोदींच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी जाण्याची घोषणा केली. आता अशी मोदींची भेट होऊ शकणार नाही आणि पोलिस आपल्याला रोखणार, याची केजरीवाल यांना पुर्ण जाणिव होती. पण जे काही करायचे ते नाट्यपुर्ण करायची सज्जता त्यांनी ठेवलेली असते. वाहिन्यांना इतके नाट्यमय काही सहज उपलब्ध असेल, तर तिथला वृत्तसंपादक कशाला जगात घडणार्‍या इतर कटकटीच्या बातम्यांकडे बघेल? त्याचेही कष्ट वाचतात. सहाजिकच स्टूडीओमध्ये एक पोपटपंची करणारा निवेदक आणि थेट प्रक्षेपणाची सोय असलेला कॅमेरा लावला, की काम संपले. क्षणोक्षणी बदलणारा उत्कंठावर्धक कार्यक्रम आयता मिळतो. प्रेक्षकांनाही टिव्हीसमोर खिळवून ठेवायचा रियालिटी शो अखंड चालू आहे. कपील शर्माच्या कॉमेडी सर्कसमध्ये जशी त्याच्याकडून बेईज्जत होणारी पात्रे बदलतात, तसे केजरीवाल यांच्या आरोपाचे लक्ष्य होणारे पक्ष वा नेते बदलत असतात. बाकी डायलॉग तेच तेच झालेले आहेत.

   अर्थात जाहिरात व्यवसायात एक नैतिकता पाळली जाते. आपला माल लोकांच्या गळ्यात मारण्यासाठी करायच्या प्रयत्नात दुसर्‍याच्या मालाला नावे ठेवायची नाहीत किंवा त्यांची बदनामी करायची नाही; हे पथ्य जाहिरातदार कटाक्षाने पाळतात, केजरीवाल परिवर्तनवादी असल्याने त्यांनी नैतिकतेची व्याख्याच बदलून टाकली आहे,  त्यांनी सर्वप्रकारच्या नैतिकता व सभ्यतेला आपल्या वागण्यातून पुरती तिलांजली दिलेली आहे. आपण सत्तेला हपापलेलो नाही म्हणून, बंगला गाडी घेणार नाही, असा डंका पिटायचा आणि दुसरीकडे सत्ता सोडल्यावरही सरकारी बंगला बळकावून बसायचे. अण्णांनी पाठवलेल्या प्रश्नांची उत्तरे स्वत: द्यायची नाहीत आणि दुसर्‍यांना मात्र रोज नवे प्रश्न विचारायचे. आपण दिल्लीकरांना वीजदर अर्धे करून दिले, सहाशे लिटर पाणी मोफ़त दिले आणि हे सर्व अवघ्या पन्नास दिवसात केले; म्हणून बेधडक थापा ठोकायच्या. पण त्यांच्या तीन आप आमदारांना रहिवाशांनी पाणी मिळत नाही म्हणून चोपले, त्याबद्दल अवाक्षर बोलायचे नाही. मोदींना सामान्य माणूस म्हणून भेटायचा आव आणायचा आणि माजी मुख्यमंत्र्याला भेट मिळत नाही म्हणूनही गळा काढायचा. मात्र आपल्याला दिल्लीचा आम आदमी दरबारात भेटायला आल्यावर छतावर पळ काढायचा. किती म्हणून खोटारडेपणाचे दाखले द्यायचे? त्यांचेच एक संस्थापक सदस्य आता उमेदवारीसाठी केजरीवाल यांनी एकाकडून कोटी रुपये घेतल्याचा आरोप करतात, त्याला उत्तर द्यायचे नाही. इतक्या इमानदारीने बेईमान वागणारा कुठला नेता वा राजकीय पक्ष निदान आपल्या देशात आजवर झालेला नसेल. इतक्या सातत्याने धडधडीत खोटे बोलण्याचा विक्रम सुद्धा दुसर्‍या कुणा नेत्याने आजवर केलेला नसावा. आता तर आपल्याला दुसरा कोणी मारतो वा रोखतो, असे सांगायचीही सोय उरली नाही म्हणून शनिवारी जंतरमंतर येथे ‘आप’नेते योगेंद्र यादव यांच्या तोंडाला काळे फ़ासण्याचा उद्योग स्वपक्षाच्याच कार्यकर्त्याकडून करून घेण्यात आला. इतके नाटक कुठल्याही सेट किंवा सजावटीशिवाय स्टुडिओच्या खर्चाशिवाय वाहिन्यांना आयते मिळत असेल, तर त्यांनाही अहोरात्र थेट प्रक्षेपण करायला काय जाते?

   पण दिसतो तेवढा हा सगळा तमाशा निरर्थक नाही. त्यामागे आपली पापे लपवण्याचाही हेतू आहे. आपण शीला दिक्षीत यांच्या विरोधात एफ़ आय आर दाखल केला म्हणून महिनाभर केजरीवाल यांनी आपली पाठ थोपटून घेतली. पण आता त्याच दिक्षीतांची केरळच्या राज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्याने तो एफ़ आय आर निकामी झाला आहे. त्याची चर्चा होऊ नये, म्हणून गुजरातेत पाटनला अटकेचे नाटक रंगवण्यात आले. केजरीवाल सरकारी बंगला सोडत नाहीत म्हणून सरकारने नोटीस काढली, दिल्लीचा रहिवासी आम आदमी पक्षावर संतापला आहे, तो त्यांच्या आमदारांना ओलीस ठेवतो आहे, जाब विचारतो आहे, दिल्लीकरांची भावना फ़सवले गेल्याची झाली आहे. अशा बातम्यांना झाकण्यासाठी मग रोजच्यारोज नवनवी धमाल उडवून दिल्लीतल्या आपल्या नाकर्तेपणाची पातके झाकण्याची केविलवाणी कसरत चालू आहे. पण माध्यमांनाही मोदी विरोधात तेच जुने कालबाह्य आरोप करणारे नवे मॉडेलही सापडले आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणूकीचे निकाल लागेपर्यंत हा पोरखेळ चालणार आहे. मात्र त्यामुळे त्या पक्षाला लोकांची मते मिळणार नाहीत, की मोठे लक्षणीय यशही मिळणार नाही. कारण माध्यमातले सेक्युलर जितके सहजगत्या मुर्ख बनवले जाऊ शकतात, तितका या देशातला अडाणी, अशिक्षित मतदार अजिबात मुर्ख नाही. त्यामुळेच मनोरंजनात रमला तरी आयुष्याला भेडसावणार्‍या समस्यांचा पोरखेळ तो होऊ देत नाही.

२ टिप्पण्या:

  1. केजरीवाल ला उत्तर न देउन मोदी काय साधत आहेत...

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. केजरिवालला का उत्तर दिले नाही हे आता कळले कां ? लोकांनीच उत्तर दिले आहे.

      हटवा