बुधवार, ५ मार्च, २०१४

केजरीवालांमुळे आठवले शिवसेनाप्रमुख
   केजरीवाल यांच्या गाडीला गुजरातमध्ये रोखून पोलिसांनी त्यांना आचारसंहिता लागू झाल्याची सूचना दिली. तर या कांगावखोर माणसाने आपल्याला गुजरातमध्ये मोदींच्या आदेशानेच पोलिसांनी अटक केल्याची अफ़वा मोबाईल संदेशाद्वारे पसरवली आणि दिल्लीत आपल्या सहकार्‍यांना भाजपाच्या मुख्यालयावर हल्ला करायला चिथावणी दिली. शाझिया इल्मी व आशुतोष या आप नेत्यांनी त्यात पुढाकार घेऊन त्या हल्ल्याचे नेतृत्व केले. मात्र हाणामारी झाल्यावर आपण शांततापुर्ण निदर्शने करीत असल्याचेही अत्यंत शहाजोगपणे सांगितले. कॅमेरावर हेच नेते आगावूपणा करताना दिसत होते. इतके बेछूट खोटे बोलणारे राजकीय नेते कार्यकर्ते निदान आजवर भारतीय राजकारणात दुसरे कोणी दिसले नव्हते. पण बुधवारचा केजरीवाल टोळीचा तमाशा बघितल्यावर मला ४४ वर्षापुर्वीची एक अशीच घटना आठवली.

   १९७० सालात मुंबईच्या गिरणगावात तेव्हाचे कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कॉम्रेड कृष्णा देसाई यांची शिवसैनिकांनी हत्या केलेली होती. त्यानंतर त्याच परळच्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली. त्यात सेनेतर्फ़े वामनराव महाडीक यांना उभे करण्यात आलेले होते. त्यांच्या विरोधात देसाई यांच्या विधवा पत्नी सरोजिनी देसाई यांना कम्युनिस्ट पक्षाने उभे केले होते. मग त्यांना सर्वच सेक्युलर पक्षांनी पाठीबा दिलेला होता. कॉग्रेस पक्षानेही त्या राजकीय दबावात आपला उमेदवार उभा केला नाही आणि देसाई यांना पाठींबा दिलेला होता. त्यांच्यासाठी सर्वच पक्षिय नेत्यांनी तेव्हा प्रचारसभांचे रान उठवले होते. तेव्हाच मुख्यमंत्री वसंतराव नाईक परदेश दौर्‍यावर गेलेले होते. त्यांच्याजागी हंगामी मुख्यमंत्री म्हणून काम बघणारे शंकरराव चव्हाण यांनीही सरोजिनी देसाई यांच्यासार्ठी खास प्रचारसभा घेतलेली होती. त्यांच्यावर औटघटकेचा मुख्यमंत्री अशी शेलकी टिका सेनाप्रमुखांनी केलेली होती. त्या काळात शिवसेनेवर सरसकट हिंसाचाराचा आरोप होत असे आणि आज जसा केजरीवाल म्हणतील त्याला तात्काळ प्रचंड प्रसिद्धी वाहिन्यांवर मिळते, तशीच सेनेविरुद्ध कोणीही कसलाही आरोप केला, मग त्याला वर्तमानपत्रात अफ़ाट प्रसिद्धी दिली जात असे. त्याच निवडणूकीचा प्रचार संपायचा होता, त्याच दिवशी बहुतेक वृत्तपत्रात एक बातमी छायाचित्रासह छापून आलेली होती आणि त्याचा खुप गाजावाजा केला जात होता.

   छायाचित्रात एक तरूण कार्यकर्ता बॅन्डेज गुंडाळलेला दिसत होता आणि त्याचे हातपाय पट्ट्यांनी गुंडाळलेले होते. सोबत बातमी होती शिवसैनिकांच्या हल्ल्यात सरोजिनी देसाई यांचा कार्यकर्ता गंभीर जखमी झाल्याची. नेमका तोच दिवस प्रचाराचा शेवटचा होता आणि संध्याकाळी पाच वाजता प्रचार थांबायचा होता. म्हणून ऐन दुपारच्या उन्हात बाळासाहेब ठाकरे यांनी लालबागच्या गणेशगल्ली मैदानात अखेरची प्रचरसभा योजलेली होती. तिथे ठाकरे यांनी कम्युनिस्ट व कॉग्रेससह तमाम सेक्युलर पक्षांची मनसोक्त खिल्ली उडवलीच. पण वृत्तपत्रातल्या त्या बातमीचाही समाचार घेतला. पण त्यापेक्षा त्यांनी तिथे सादर केलेल्या नाट्याची घटना मोठी परिणामकारक होती. शिवसैनिक हल्ले करतात, अशा खोट्या बातम्या दिल्या जातात. पण शिवसैनिकांवर हल्ले होतात, त्याचा एकही शब्द वृत्तपत्रे छापत नाहीत, असे त्यांनी म्हटल्यावर निषेधाचा सूर सभेतून उमटला. मग त्यांनी एका तरूणाला व्यासपीठावर बोलावले आणि तोही डोक्याला व हाताला बॅन्डेज गुंडाळलेला होता. याच्यावर कम्युनिस्ट गुंडांनी हल्ला केल्याचे बाळासाहेबांनी म्हणताच सभेत निषेधाचा गजर झाला. पाचसातशे तरूण उभे राहून डरकाळ्याच फ़ोडू लागले. त्यांना शांततेचे आवाहन करून साहेब म्हणाले, जरा शांत बसा आणि ऐका.

   मग त्यांनी त्या जखमी तरूणाला जवळ बोलावून त्याच्या हाताला बांधलेल्या पट्ट्या उलगडल्या, त्याच्या डोक्याला असलेल्या पट्ट्याही काढून टाकल्या. मग त्याला उड्या मारून दाखवायला सांगितले. तेव्हा सभेत हास्याचा कल्लोळ उडाला. तो शांत झाल्यावर साहेब म्हणाले, आजच्या वृत्तपत्रात बघितलात तोही असाच जखमी होता. फ़ोटो काढण्यापुरत्या पट्ट्य़ा गुंडाळल्या, की झाले. तुमच्या भावना प्रक्षुब्ध झाल्या तशाच मतदारांच्या भावना भडकवण्याचा खेळ वृत्तपत्रे करीत असल्याचा आक्षेप त्यांनी तिथे नोंदवला होता. त्याची मग दोन दिवस गिरणगावात खुप चर्चा झाली होती. अर्थात त्यावेळी वामनराव महाडीक निवडून आले आणि सेनेचा पहिला आमदार होण्याचा मान त्यांना मिळाला. पण तो विषय महत्वाचा नाही. आज केजरीवाल किंवा त्यांचे ‘इमानदार’नेते कार्यकर्ते किती सराईतपणे देखावे उभे करतात, त्यात तसे काही नवे डावपेच नाहीत. तेव्हा छायाचित्रातून असली दिशाभूल केली जात असे आणि आज टिव्हीचे कॅमेरे सत्य दाखवत असतानाही केजरीवाल वा त्यांच्या प्रेमात पडलेले पत्रकार चित्रणाच्या विपरित बातम्या रंगवतात, तेव्हा हा जुना इतिहास आठवला. मात्र त्यामुळे सामान्य जनता वा मतदार तेव्हाही फ़सला नव्हता, की आजचा अधिक चौकस झालेला मतदार फ़सण्याची अजिबात शक्यता नाही. पण प्रत्येक प्रियकर-प्रेयसीला जसे आपणच जगात पहिलेवहिले प्रेम करतोय असा भ्रम असतो, तशीच केजरिवाल आणि त्यांच्या टोळीची समजूत आहे.

   उपरोक्त छायाचित्रात स्पष्टपणे आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते दगडफ़ेक करताना दिसत आहेत. पक्षाचे एक बुद्धीमान नेते व माजी पत्रकार आशुतोष भाजपाच्या मुख्यालयाच्या गेटवर चढलेले दिसत आहेत. आणि तरीही त्यांच्यासह शाझिया इल्मी नावाच्या आप नेत्या आम्ही अत्यंत शांततापुर्ण निदर्शने करीत होतो, असे दडपून सांगत आहेत. इतके खरे त्यांना बोलता येत असेल आणि तेच माध्यमांना खरे वाटत असेल, तर मग खोटे तरी नेमके कशाला म्हणतात, त्याचा त्या सर्वांनीच खुलासा केलेला बरा. याबद्दलच्या बुधवारी रात्री टिव्ही वाहिन्यांवर चाललेल्या चर्चा ऐकल्यावर मोठेच मनोरंजन झाले. बहुतेक एन्करचे म्हणणे असे होते, की भाजपाच्या लोकांनी त्यांच्या मुख्यालयावर हल्ला झाल्यानंतर आपच्या गुंडांचा प्रतिकार करायला नको होता. त्यांना दगडफ़ेक करू द्यायची होती. त्यांची गुंडगिरीच त्यातून समोर आली असती आणि आपनेते उघडे पडले असते. हा जो सल्ला आहे वा युक्तीवाद आहे, त्याचा अर्थ तरी असल्या दिवाळखोर बुद्धीच्या लोकांना कळतो काय? की असे उपदेश भाजपाला करणार्‍यांचा आसाराम झाला आहे? आसाराम किंवा तत्सम कोणा शहाण्याने मागल्या वर्षी दिल्लीच्या सामुहिक बलात्कारानंतर असाच काहीसा उपदेश केलेला होता. त्या मुलीने प्रतिकार करण्यापेक्षा त्या बलात्काराला सरसावलेल्यांना बंधू म्हणून वा त्यांच्याशी सहकार्य करून स्वत:चा जीव वाचवायला हवा होता, असेच तो आसाराम म्हणाला होता ना? मग आज आपच्या हल्लेखोरांना प्रतिकार न करता त्यांनी मारलेले दगड अंगावर घ्यायचा उपदेश करणारे तरी काय वेगळे सांगत आहेत?

   या सर्व घटना घडून गेल्यावर रात्री उशीरा कुठल्या तरी वाहिनीने केजरीवाल यांचीही मुलाखत घेतली आणि त्यांनी चित्रण बघितल्यावर आप कार्यकर्त्यांच्या दंगामस्तीबद्दल माफ़ी मागितली. पण गंमत बघा, तोपर्यंत त्यांच्या कुठल्या प्रवक्त्याने माफ़ी मागितलेली नव्हती. उलट आशुतोष वा इल्मी यांच्यासारखे घटनास्थळी उपस्थित असलेले नेते; त्या दंगामस्तीचे समर्थनच करत होते. नुसते समर्थन करीत नव्हते, तर आपण अत्यंत शांतपणे निदर्शने करीत होतो, हाच त्यांचा दावा होता. मग प्रश्न असा पडतो, की खोटारडा कोण आहे? घटनास्थळी नसताना चित्रण बघून माफ़ी मागणारा केजरीवाल खरा, की आशुतोष व इल्मी खरे. यातला कोणी तरी पक्का खोटारडा असलाच पाहिजे. एक मात्र मान्यच करायला हवे, की खरे असो किंवा धडधडीत खोटे असो, ते बोलताना आपचे नेते अत्यंत इमानदार असतात, जे काही बोलतात, त्यावर त्यांचा पुर्ण विश्वास असतो. जगाच्या दृष्टीने ते धडधडीत खोटे असले तरी त्यांच्यापुरते ते इमानदारीने बोलत असतात. खरे वा खोटे बोलताना त्यांची नियत खोटी नसते, हे कोणालाही मान्य करावेच लागेल. कारण इतके बेमालून खोटे बेइमानी करून बोलताच येणार नाही. या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्याचे आपण ऐकलेले आहे. पण केजरीवाल व त्यांच्या टोळीतले लोक इतक्या सफ़ाईने बोटावरची नखेही बदलून दाखवतात, की अट्टल थापेबाजालाही शरमेने मान खाली घालावी लागेल.

   केजरीवाल यांचा गुजरात दौरा म्हणजे झाडूमार्च होता आणि त्याची सोमवार मंगळवार सर्वच वाहिन्या जाहिरात करीत होत्या. तिथे जाऊन त्यांनी लोकांशी बोलताना कॉग्रेस व भाजपाला पाडण्याचेही आवाहन केले. पण त्याला राजकीय वा निवडणूक प्रचार म्हणता येणार नाही. कारण आता आचारसंहिता लागू झाल्याचे पोलिसांनी सांगताच, केजरीवाल त्या दौर्‍याला गुजरातच्या विकासाचा अभ्यास दौरा म्हणत आहेत. आपण मोदींनी केलेल्या विकासाचा अभ्यास करायला व बघायला आलो होतो आणि त्याच अभ्यास दौर्‍यात पोलिसांनी आपल्याला रोखले; असा केजरीवाल यांचा दावा आहे. अर्थात गुजरातमध्ये पोलिसांनी त्यांना रोखले म्हणजे मोदींच्याच आदेशावरून रोखलेले असणार. आशुतोश यांचे म्हणणे तर असे आहे, की दिल्लीतले पोलिसही आतापासूनच मोदींच्या आदेशावरून आपच्या कार्यकर्त्यांना झोडपू लागले आहेत. थोडक्यात आपची टोपी डोक्यावर चढवली, मग तुमच्या कुठल्याही बेताल आरोपासाठी पुरावा आवश्यक रहात नाही. तुम्ही बोलाल तेच सत्य आणि इमानदार वचन असते. केजरीवाल यांचा निवडणूक प्रचार दौरा आणि झाडू मार्च त्यांनी व्याख्या बदलताच अभ्यासदौरा होऊन जातो. आपल्या देशात मागल्या दोनतीन महिन्यात किती आमुलाग्र परिवर्तन घडले आहे, त्याचा हा सज्जड पुरावा आहे. कुठल्याही शब्दाला, व्याख्येला नेमका कुठलाच अर्थ उरलेला नाही. आज इमानदारीचा अर्थ जो असेल, तोच उद्या असेल याची कोणी हमी देऊ शकत नाही. आता सतत परिवर्तनाच्या प्रक्रियेतून आपण जात आहोत.

   एक मात्र खरे आहे. माध्यमांनाच या देशातले सरकार निवडण्याची संधी मिळाली वा अधिकार असता, तर एव्हाना केजरीवाल देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, सेनाप्रमुख, सरन्यायाधीश असे सगळ्याच जागी एकाचवेळी बसले असते. त्यांनीच कोणावरही आरोप केले असते, त्यांनीच एफ़ आय आर दाखल केले असते. त्यांनीच आरोप केलेला असल्याने त्यांच्याच तपासात आरोप हाच पुरावा झाला असता आणि गुन्हाही सिद्ध होऊन केजरीवाल यांनी शिक्षाही फ़र्मावल्या असत्या. कोर्टाच्या तारखा घेण्य़ात, तपासकामात वा सुनावण्या होण्यात विलंब लागला नसता. तीन महिने अखंड हीच पोपटपंची माध्यमे दाखवत आहेत आणि केजरीवाल यांचा देशव्यापी फ़ुगा फ़ुगवला जात आहे. आणि तेच केजरीवाल म्हणतात, माध्यमे मोदींचा फ़ुगा फ़ुगवत आहेत. माध्यमातच मोदींची हवा आहे. बाकी कुठेच नाही. इतकी इमानदार भाषा आपण कधी कुठे ऐकलेली आहे काय? दिल्लीचे सरकार त्यांनी बनवल्यानंतर त्यांच्याच एक मंत्री राखी बिर्ला यांनी त्यांच्या गाडीवर कोणीतरी दगडफ़ेक केल्याचा गुन्हा नोंदवला होता. काल गुजरातमध्येही केजरीवाल यांच्या गाडीवर दगडफ़ेक झाल्याचा फ़ोटोच त्यांनी इंटरनेटवर टाकला आहे. अर्थात मोदींच्या आदेशाशिवाय असा दगड कोणी कशाला मारणार? कुठल्या तरी वाहिनीने रात्री उशीरा त्या गाडीच्या फ़ुटलेल्या काचेचे छायाचित्र दाखवले आणि ४४ वर्षे जुना लालबागच्या गणेशगल्लीतला प्रसंग आठवला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा