शनिवार, १ मार्च, २०१४

मोदी चुकीचे बोलून काय साधतात?


   गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, यांच्या भाषणातले चुकीचे संदर्भ शोधून त्यावर टिकेचे आसूड ओढण्याचे सध्या मोठेच पेव फ़ुटले आहे. अन्यथा त्यातले कच्चे दुवे शोधून टवाळी करण्यात धन्यता मानली जात आहे. थोडक्यात मोदींचा इतिहास व ज्ञान एकूणच कसे कमी आहे, ते सिद्ध करून त्याद्वारे मोदींना मुर्ख ठरवल्याने आपण कसे हुशार आहोत; ते दाखवण्यात धन्यता मानली जात आहे. अशा तमाम शहाण्यांविषयी माझी काहीही तक्रार नाही. किंवा त्यांचे दावे खोडून मोदींनाच योग्य व शहाणे ठरवण्याची मला अजिबात हौस नाही. काही मंडळी तेही काम उत्साहाने करीतच असतात. या दोन्हीमध्ये पडायची मला गरज वाटत नाही. किंबहूना मोदी सुद्धा त्याबद्दल स्पष्टीकरण देत नाहीत. खरे तर त्यामुळेच मला वेगळ्या पद्धतीने हा विषय लिहावासा वाटला. आपण चुकीचे संदर्भ दिले किंवा चुकीचे बोललो, हे उघड झाले, तर आपली लोकप्रियता कमी होईल आणि त्याचा आपल्याला मिळू शकणार्‍या मतांवर विपरित परिणाम होईल; असे मोदींना वाटत नसेल काय? वाटत असेल तर त्यांनी वेळोवेळी आपल्या चुकांबद्दल माफ़ी मागून दुरुस्ती का करू नये? उलट अशा स्वरूपात होणार्‍या टिकाटिप्पणीकडे मोदी संपुर्ण दुर्लक्ष कशाला करतात? अशा प्रश्नांचा शोध घ्यावा व उत्तरे शोधावीत हे माझ्या लक्षात आले. मग मोदीच कशाला बहुतेक विद्वान व बुद्धीमंत विश्लेषणकर्तेही तितकेच निर्ढावलेपणाने आपल्या चुका दाखवल्या गेल्या तरी त्याकडे साफ़ दुर्लक्ष करतात, हेही माझ्या नजरेस आले. याचा अर्थ मोदी आणि त्यांच्यावर टिका करणारे तमाम विद्वान एकाच माळेचे मणी ठरतात ना?

   मी नेहमीच विद्वान, संपादक व विश्लेषणकर्ते यांना लक्ष्य करतो, यात शंका नाही. त्यांच्या चुका व खोटेपणाकडे मी पुराव्यानिशी सातत्याने लक्ष वेधलेले आहे. पण त्यापैकी कितीजणांनी आपल्या चुकांची कबुली देण्याचा प्रामाणिकपणा दाखवला आहे? खर्‍याच विद्वान कुमार केतकरांपासून नि शुद्ध निर्बुद्ध निखील वागळेपर्यंत अनेकांचेच उतारे देऊन, मी त्यांचा खोटेपणा वारंवार दाखवला आहे. त्यांनी त्याकडे साफ़ दुर्लक्ष केल्याने बुद्धीमत्तेच्या बाजारातील त्यांच्या किंमतीत काही फ़रक पडला आहे काय? ज्या मुठभर लोकांपर्यंत मी पोहोचू शकतो, त्याच्या शंभर पटीने अधिक लोकांपर्यंत मी पोहोचू शकत नसतो. म्हणून केतकर वागळे खरेच विद्वान ठरत असतात ना? खेरीज त्यांच्या थापाच ऐकायला उत्सुक असलेल्यांसाठी तर माझ्यासारख्याने दिलेल्या पुराव्याची किंमत कवडीमोल असते. म्हणूनच माझ्या आक्षेपांच्या समोर त्यांना खरेपणा सिद्ध करण्याची कधी गरज भासलेली नाही. कारण माझे आक्षेप खोडण्यासाठी असल्या विद्वानांना त्यांच्याच हुकूमी वाचक श्रोत्यांसमोर मुळात आपल्या विधानाची चिकित्सा करावी लागेल. म्हणजेच ज्यांच्यापर्यंत मी दाखवलेला त्यांचा खोटेपणा पोहोचू शकलेला नाही, त्यांच्यापर्यंत त्यांच्या चुका त्यांना स्वत:च न्याव्या लागतील. त्यापेक्षा गप्प रहाणे त्यांच्या पथ्यावर पडत असते. जो नियम त्यांना लागू होतो, तोच मोदींसाठी लागू होतो. म्हणूनच त्या बाबतीत हे विद्वान, विश्लेषक व मोदी विरोधक आणि खुद्द मोदी एकाच माळेचे मणी आहेत. त्यांनी मोदींच्या कितीही खर्‍याखोट्या चुका दाखवाव्यात, त्याचा काहीच उपयोग नसतो. कारण ज्या काही हजार लोकांपर्यंत असले आक्षेप जात असतात, त्याच्या कित्येक पटीने अधिक लोकांपर्यंत ते आक्षेप जाऊच शकत नसतात. उलट त्याबद्दल मोदींनी माफ़ी मागितली वा चुक कबुल केली; तर त्याच सर्व लोकांपर्यंत मोदींची चुक जाऊ शकत असते. म्हणूनच कितीही आक्षेप घेतले गेले वा चुका दाखवल्या, तरी मोदी एकाचाही खुलासा करीत नाहीत.

   मोदी खुलासा कशाला करीत नाहीत, त्याचे उत्तर असे आपल्याला सापडू शकते. पण मग त्यांना खोटे पाडणा‍रे तरी मोदींच्या खोटेपणाचा हेतू का शोधत नाहीत? ज्या चुका वा खोटेपणा म्हणून समोर आणले जात असते, त्यातल्या बहुतेक गोष्टी मोदी यांनी आपल्या जाहिर भाषणाच्या ओघात केलेल्या दिसतील. जिथे लाखो हजारो लोकांची गर्दी जमलेली आहे, त्याच भाषणात मोदींकडून अशा चुका झालेल्या वा केलेल्या दिसतील. पण जिथे मोजकी अभ्यासू माणसे श्रोता म्हणून जमा झालेली असतील किंवा व्यावसायिक श्रोता असेल; तिथे मोदींच्या भाषणात असे आक्षेप घ्यायला सहसा जागा सापडणार नाही. याचा अर्थ जे काही मोदी बोलतात, त्यात सत्य असण्यापेक्षा ज्याचा प्रभाव पडावा, असे बोलायचा त्यांना हेतू असावा. ज्याचा समोर जमलेल्या जनमानसावर प्रभाव पडेल असे शब्द, प्रसंग व संदर्भ आणायचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यात शब्दांचे महत्व कितीसे असते? जाहिर सभेतील भाषण हा व्यक्तींमधला संवाद नसतो, एक व्यक्ती बोलत असते आणि बाकीचे ऐकत असतात. तिथे त्याला काहीतरी लोकांना सांगायचे असते आणि जमलेल्यांना त्याचे ऐकायचे असते. अशावेळी समोरच्या जमावाला प्रभावित करून परिणाम साधण्याचा हेतू प्रमुख असतो. त्यासाठी लागणारी साधने, शब्द व संदर्भ महत्वाचे असतात. त्यातला खरेखोटेपणा दुय्यम असतो. आणि संपर्काच्या बाबतीत देहबोली शब्दापेक्षा अधिक प्रभावी असते. यातले जाणकार सांगतात, की आपले मत समोरच्याला पटवून देताना शब्दाचे महात्म्य खुपच दुय्यम असते आणि देहाच्या हालचाली, हावभाव अधिक प्रभावशाली असतात. नेमके सांगायचे तर अवघे ७ टक्केच शब्दाचे महत्व असते. बाकीचे काम बोलणार्‍याचा देह करीत असतो.

   मोदी जेव्हा भाषण करतात, तेव्हा ते आजचे सर्वात प्रभावी वक्ते असल्याची कबुली त्यांचे बहुतेक विरोधकही देतात. पण वक्ता जमावाला प्रभावित करत असतो, तेव्हा त्याने उच्चारलेल्या शब्दातल्या तथ्यापेक्षा, त्याच्या प्रभावाला अधिक मोल असते हे विसरून चालेल काय? प्रेमात पडलेल्या मुलीला तिचा भणंग प्रियकर झोपडीही घेऊन देऊ शकत नसतो किंवा विमानप्रवासही घडवू शकणारा नसतो. पण त्याने तिच्यासाठी ताजमहाल बांधायचे वचन दिले किंवा चांदतारे तोडून आणायचे आश्वासन दिले, तरी तिचा त्याच्यावर विश्वास बसतो. उलट तिचे आईबाप त्याच्या गरीबी बेकारीचे पुरावे देऊन खोटारडेपणा कितीही सिद्ध करीत असले; म्हणून त्याचा उपयोग असतो काय? सवाल सत्याचा वा तथ्याचा नसतोच. ऐकणारा व बोलणारा यांच्यातल्या परस्पर संपर्कातील दृढतेवर सर्वकाही अवलंबून असते. आज मोदींच्या भोवताली जमा होणारी गर्दी भाजपावर विश्वास ठेवणारी वा मोदींवर प्रेम करणारी असण्यापेक्षा कॉग्रेसच्या सेक्युलर कारभाराने गांजलेली आहे. सेक्युलर म्हणजे महागाई, अराजक, गुन्हेगारी मोकाट, बेशिस्त अशी जी मानसिकता झालेली आहे; त्या लोकांना अशा अस्थिर अशाश्वत जीवनातून मुक्ती देणारा कुणी हवा आहे. आणि ते आश्वासन देण्य़ाची भाषा कोणी ठामपणे बोलत असेल, तर त्यातला खरेखोटेपणा तपासायची गरज त्या जनतेला वाटेनाशी झालेली आहे. भले त्यातली आश्वासने व तथ्य खोटेही असेल, तरी ते आश्वासनही त्या भेदरलेल्या जनतेला धीर देणारे ठरते आहे. म्हणूनच त्यातला खरेपणा वा सत्य शोधायची गरज जनतेला वाटत नाही. मोदींच्या भाषणातले शब्द, संदर्भ किंवा वास्तविकता याचे तपशील विद्वान शोधत बसतात. पण त्या बुद्धीमंतांसाठी मोदींनी ते तपशील सांगितलेलेच नाहीत. ज्या भेदरलेल्या, ग्रासलेल्या जनतेला आश्वासक शब्द हवा आहे, तिला धीर देण्यासाठीच मोदी बोलत असतात. आणि ते आश्वासन त्यांच्या देहबोलीतून व्यक्त होत असते. ती देहबोली जे हेतू बोलते, त्याकडे पाठ फ़िरवून विचारवंत मोदींच्या भाषणातले शब्द व तपशील तपासू लागतात, तिथे सगळी गल्लत होते.

   आज अनेक मुस्लिम संघटना व धार्मिक नेतेही मोदींच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत. देवबंदसारख्या मुस्लिम धर्मपीठाचे मौलाना मोदींना पाठींबा देण्याची भाषा बोलू लागले आहेत. हा चमत्कार कोणी घडवला असेल? दोन वर्षापुर्वी मोदींनी गुजरातच्या विधानसभा निवडणूकीपुर्वी एक सदभावना यात्रा काढलेली होती. त्यात लक्षणिय प्रमाणात मुस्लिमांचाही सहभाग होता. पण त्यातील एक प्रसंग माध्यमातून जाणीवपुर्वक सातत्याने प्रक्षेपित केला गेला. आजही तोच प्रसंग मोदींना मुस्लिम विरोधक म्हणून सिद्ध करयासाठी मुद्दाम दाखवला जात असतो. त्यात एक मुस्लिम मौलवी मोदींना टोपी देऊ करतो आणि मोदी त्याला थांबवतात. मग तो आपल्या खांद्यावरचा शेला काढून मोदींना अर्पण करतो; असे ते दृष्य आहे. यावर दोन वर्षात लाखो शब्द बोलले गेले आहेत. पण त्याचा मुस्लिमांवर विपरित परिणाम झाला असता, तर मुस्लिमांचा ओढा मोदींकडे वळूच शकला नसता. पण ते काम त्या एका प्रसंगाच्या लाखो प्रसारणांनी मोदीसाठी केलेले आहे. ते चित्र जितक्या वेळा दाखवले गेले, त्यातून मोदींच्या व्यासपीठावर मुस्लिम हजेरी लावतात, त्यांच्याशी संवाद साधतात, याचा इतका भडीमार झाला, की मोदींना मुस्लिम घाबरतात, ह्या समजाला त्यातून छेद देण्याचे बहुमोल काम सेक्युलर माध्यमांनी केले. ते चित्रण सातत्याने दाखवताना बोलले जाणारे शब्द ज्यांच्या कानावर पडले, त्यांनी ऐकलेच असे नाही किंवा फ़ारसे लक्षात घेतलेले नाहीत. पण मोदींच्या समवेत व्यासपीठावर मुस्लिमांचा गोतवळा दिसतो, तो कायमचा करोडो मुस्लिमांच्या मनावर कोरला गेलेला आहे. त्याला देहबोलीचा प्रभाव म्हणतात. आपल्या सोबत मुस्लिमही गुयागोविंदाने बोलतात व वागतात, हेच तर मोदींना त्या प्रसंगातून मुस्लिमांच्या मनावर बिंबवायचे होते आणि तेच काम त्या एका प्रसंगाने केले. त्याचा हजारो पटीने प्रभाव वाढवायचे काम मोदींच्या सेक्युलर विरोधक पत्रकार माध्यमांनी केलेले नाही काय? वास्तवात मोदी कदाचित मुस्लिमांशी इतके मनमोकळेही नसतील. पण त्या प्रसंगी जे चित्र दिसते, त्यातून काय प्रतिमा जनमानसावर परिणाम घडवते?

   त्या एका प्रसंगाने मुस्लिमांमध्ये मोदींविषयी सदिच्छा निर्माण करण्याचे जे काम केले, तितका त्याच चित्रण दाखवताना बोलल्या गेलेल्या शब्दांनी मुस्लिमांवर विपरित परिणाम मात्र घडवला नाही. कारण शब्दांपेक्षा चित्रमाध्यम आणि प्रतिमांचा प्रभाव अधिक असतो. बोलणारा काय शब्द बोलतो, त्यापेक्षा बोलण्यात किती आत्मविश्वास असतो, त्याचा ऐकणार्‍यावर प्रभाव पडत असतो. ‘आगळीक सहन केली जाणार नाही’ असे शब्द मनमोहन सिंग ज्या मुळमुळीत स्वरात बोलतात, त्याचा परिणाम पाकिस्तानवर कितीसा होऊ शकतो? त्यांचे शब्द खुप कठोर असतात. पण त्याचा उच्चार व बोलतानाची देहबोली इतकी निष्प्रभ असते, की त्यांनी दिलेली धमकीही भेदरून पळ काढल्यासारखी वाटते. त्याच्या उलट मोदींची भाषा व शब्द कितीही सौम्य वा सोज्वळ असले, तरी उच्चार व देहबोली बघता अत्यंत बोचरे असतात. त्यातून मोदी जो परिणाम साधतात, तोच त्यामागचा हेतू असतो. त्यातल्या सत्य वा तथ्याला अर्थ नसतो. म्हणूनच त्यातले दोष काढून उपयोग नाही, की त्याच दोष वा चुकांवर खुलासे देत बसण्याचा उद्योगही निरर्थक आहे. कारण जनमानसावर प्रभाव पाडणे हाच मूळात शब्दांच्या पलिकडला उद्योग आहे. म्हणूनच ज्यांना मोदींच्या चुका काढायच्या आहेत त्यांनी आपला उद्योग चालू ठेवावा आणि ज्यांना मोदींच्या चुकांचे समर्थन करण्यात शक्तीचा अपव्यय करायचा असेल, त्यांनी जरूर डोकी आपटावीत. माझे त्यातून मनोरंजन होण्यापेक्षा अधिक काही होत नाही. अर्थात जिथे आपल्याला सत्याचा शोध घ्यायचा असतो, तिथे असली चिकित्सा आवश्यकच असते. पण त्यामुळे अवघे जग शहाणे होईल अशा भ्रमात निदान मी तरी जगत नाही.

1 टिप्पणी:

  1. आपल्या प्रत्येक लेखातील चिकित्सा खुपच वेगळी अणि नाविन्य पूर्ण असते.

    प्रत्युत्तर द्याहटवा