रविवार, १७ जून, २०१२

औषध नाही तर पैसे उपचार करतात ना?


   डेव्ही नावाच्या एका मानसशास्त्रज्ञाने केलेला एक प्रयोग मोठा विलक्षण होता. या प्रयोगासाठी त्यांनी स्वत:च्या निरिक्षणशक्तीबद्दल प्रसिद्ध असलेल्या अनेकांना प्रेक्षक व परिक्षक म्हणून आमंत्रित केले होते. त्यात पोलिस अधिकारी, डॉक्टर, विद्वानांचा समावेश होता. तो प्रयोग पिशाच्च दिसण्यासंबंधी होता. त्या प्रयोगात डेव्ही यांनी पिशाच्च दृगोचर होणे, मानवी मदतीशिवाय पाटीवर अक्षरे लिहिली जाणे; अशा अनेक गोष्टी करून दाखवल्या. तो प्रयोग संपल्यावर अनेक उपस्थितांनी पिशाच्चांच्या मदतीशिवाय झाले ते शक्य नव्हते असे लेखी कबूल केले. मग डेव्ही यांनी तो सगळा हातचलाखीचा प्रयोग होता हे पुराव्यानिशी तिथेच सिद्ध करून दाखवले. या घटनेची साक्षिदार असलेल्या एका पत्रकाराने त्याची बातमी नंतर प्रसिद्ध केली, त्यात तो म्हणतो, " या हातचलाखीच्या प्रयोगाच्या आश्चर्यकारकतेपेक्षा सुद्धा तिथे जमा असलेल्या निरिक्षकांच्या अहवालाचा आश्चर्यकारकपणा अधिक विलक्षण होता. डेव्ही यांनी वापरलेल्या युक्त्या वापरण्याचे धैर्य त्यांनी दाखवावे, याचेच कोणाला आश्चर्य वाटेल. परंतू तिथे जमलेल्या जमावाच्या मनावर इतका विलक्षण ताबा डेव्ही यांनी प्रस्थापित केला होता, की जे त्यांन दिसत नव्हते तेच ते पहात आहेत, असे वाटावयास डेव्ही यांनी प्रेक्षकांना भाग पाडले होते. वास्तविक आपण हातचलाखीचा प्रयोग करणार आहोत अशी आगावू सुचना त्यांनी प्रेक्षकांना दिली होती. तरीही प्रेक्षक फ़सले होते." 

    "झूंडीचे मानसशास्त्र" या दिवंगत चिंतनशील लेखक विश्वास पाटिल यांच्या पुस्तकातला हा उतारा. त्यात माणसाच्या सामुहिक मनावर कसा प्रभाव पाडता येतो, त्याचा दाखला आलेला आहे. ब्रॅन्ड म्हणजे काय ते म्हणूनच समजून घ्यायला हवे. ब्रॅन्ड म्हणजे तुमच्या आमच्या सामुहिक मनावर पाडलेली छाप असते. जे नाव, चेहरा, चिन्ह घेतले मग आपण त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो, त्याला ब्रॅन्ड म्हणतात. एक जाहिरात अनेक्दा वाहिन्यंवर लागले. खैतान, बस नाम काफ़ी है. त्याचा अर्थ काय होतो? तेवढ्या नावावर विश्वास ठेवायचा. बाकी किंमत, लायकी, उपयुक्तता यापैकी कशाचाच विचारही करायचा नाही. अशा नावाची, ब्रॅन्डची भुरळ घातली; मग त्याला पुढे करून काहीही खपवता येत असते. टाटा, रिलायन्स, ग्लॅक्सो, हिंदुस्तान लिव्हर असे जे ब्रॅन्ड आपल्या देशात आज उदयास आले आहेत, त्यासाठीच पैसे मोजावे लागत असतात. आमिर खानही असाच ब्रॅन्ड आहे. त्याने कुठलीही नवी माहिती जगासमोर आणली नाही. पण तो सादर करतो म्हणुन आपल्याला त्याची भुरळ पडत असते. तेच मुद्दे व प्रश्न कित्येक दिवस व वर्षे आधीपासून अनेकांनी मांडले आहेत. त्यासाठी संघर्षही केला व चालविलेला आहे, पण त्या धडपड्यांना कोणी इतकी प्रसिद्धी दिली नाही. त्यांची गंभीईर दखलही घेतली नाही कारण त्यांच्या नावाभोवती आमिरसारखे वलय नाही. त्यांचे नाव हा ब्रॅन्ड नाही. त्यातल्या अनेकांनी जीव धोक्यात घालून अनेक मुजोरांचे शत्रूत्व पत्करून संघर्ष केला आहे. त्यांचे काय? मग होते काय, की उपाय होणार्‍या औषधांची कोणाला गरज आहे? प्रत्येकाला ब्रॅन्ड हवा आहे. जसलोक वा लिलावतीमध्ये शस्त्रक्रिया केल्याचे कौतुक आपण किती लोकांकडून ऐकत असतो? तिथे झालेल्या प्रचंड खर्चातले मोठेपण सांगणार्‍याच्या शब्दातून लपते का?

   स्त्री भृणहत्येचीच गोष्ट घ्या. वर्षा देशपांडे यांनी शेकडो सोनोग्राफ़ी मशीनना सील ठोकायची वेळ आणली. पण त्यांच्या नावाला ब्रॅन्ड व्हॅल्यू नाही ना? त्यांच्या कष्ट, प्रयत्नांना किंमत नाही. तशीच स्वस्तातल्या औषधांना किंमत नसते. कमी पैशात उपचार करणारे डॉक्टर थोडे नाहीत. पण त्यांच्या उपचाराकडे फ़िरकतो कोण? देखावा फ़क्त सत्यमेव जयते पुरताच मर्यादित नाही. गरीबाला औषधे व महागडे उपचार परवडत नाहीत, असे म्हण्णे सोपे आहे. पण खरेच गरीबाला स्वस्तातले परवडणारे उपचार व औषधे हवी आहेत काय, याचेही उत्तर शोधावे लागेल. माझाच अनुभव सांगतो. आज ज्याला दुष्काळी भाग म्हणतात, त्या सातार्‍याच्या माण तालुक्यात महिनानगड नामक गावात माझे महिन्यात किमान दहाबारा दिवस तरी वास्तव्य असते. तिथे एक सामन्य डॉक्टरचा दवाखाना आहे. दोन वर्षापुर्वी त्या गावात उलट्या जुलाबाच्या विकाराने अर्धेअधिक लोक बेजार झालेले होते. मीसुद्धा त्याचा एक बळी होतो. मग फ़रक इतकाच होता, की मी घरच्या घरी उपचार घेत होतो. अनेकांना साखरमीठ मिसळून भरपूर पाणी प्यावे असे सांगत होतो. पण को्ण दाद देतो मला. उठेल तो दवाखान्यात जाऊन "सलाईन चढवून" ठणठणीत बरा व्हायला उतावळा झालेला होता. माझ्यासारखा शहरात आयुष्य घालवलेला शहाणा साधे साखरमीठाचे पाणी पितो म्हणजे त्यांना मुर्ख वाटत होता. हे म्हटले तर रहस्य आहे. पण समजून घेतले तर त्यात कसलेही गुढ नाही.

   उपचार औषधाने वा डॉक्टरी उपायांनी होत नसतो. शारिरीक आजारात मानसिक प्रभाव अधिक असतो. डॉक्टरकडे गेले मग लोकांना अर्धे आपोआपच बरे वाटते. उरलेला अर्धा आजार औषध व उपचारांनी बरा होत असतो. त्यात पुन्हा डॉक्टर कुठला व किती नावाजलेला, यावर गुण येणे अवलंबून असते. त्या गावातला माझा अनुभव त्यापेक्षा वेगळा नव्हता. उत्तम उपाय म्हणजे सलाईन चढवणे या समजूतीचे ते सगळे बळी होते. उलट्या वा जुलाब होतात तेव्हा शरीरातील पाणी घटत असते. त्याची अधिकाधीक भरपाई आवश्यक असते. आणि हे काही माझे ज्ञान नाही. सरकारच्या आरोग्य खात्याकडून सतत त्याच्या जाहिराती टिव्ही किंवा रेडिओवरून चालूच असतात. चिमुटभर साखर व मीठ टाकून पाणी घ्यावे, असे सल्ले त्यातून दिले जात असतात. मग त्याकडे पाठ फ़िरवून लोक डॉक्टरकडे धावत कशाला जातात? मला आठवते, त्याच गावातील एक म्हातारी नानी म्हणून आहे. कष्टकरी असलेल्या त्या म्हातारीचा तरूण मुलगा तसाच आजारी होता. पैसे नाहीत म्हणुन ती दु:खी होती. माझा सल्ला गरीबीमुळे तिने मानला आणि नंदू गुजले नुसत्या भाताच्या पेजेवर चार दिवस राहिला आणि ठणठणीत बरा झाला. मग बाकीच्यांना सलाईन चढवण्य़ाची काय गरज होती? त्यांना खरोखरच स्वस्तातले उत्तम व गुण देणारे उपचार हवे होते, की पैसे खर्च केल्यावरच गुण येतो अशा समजूतीचे ते बळी आहेत?

   हा सुद्धा एक प्रकारचा गंभीर भ्रष्टाचारच आहे. त्यात पैसे द्यावे घ्यावे लागत नाहीत. इथे बुद्धी भ्रष्ट केली जात असते. अमुक घेतले मग तमुक होते, अशा ज्या समजूती घडवल्या जात असतात, त्यातून अवघे समाज जीवनच भ्रष्ट करून टाकण्यात आले आहे. ज्या सलाईनच्या बाटलीची वा पिशवीची खुल्या बाजारातील किंमतही वीसपंचवीस रुपये नव्हती, तिच्यासाठी दिडशे दोनशे रुपये खर्चायची हौस कशाला असते? बारीकसारीक बाबतीत औषध सोडा इंजेक्शन का घ्यावे लागते? तसाच एक अनुभव आहे. बैलाच्या धक्क्याने मुका मार लागलेला संभा गायकवाड त्याच महिमानगडातला रहिवासी आहे. त्याची छाती दुखत होती. माझ्याकडे असलेली एक ट्य़ूब लेप म्हणून त्याला लावली. त्याला थोडा आराम पडला. तरी तो दुसर्‍या दिवशी तालुक्याच्या गावी जाऊन एक्सरे काढून आला. मग डॉक्टरने त्याला जी ट्यूब दिली ती त्याने अगत्याने आणून मला दाखवली. कारण त्याच ट्यूबचा लेप मी लगेच त्याला लावला होता. पण त्याला गुण आला तो खिशातले चारपाचशे रुपये खर्च केल्यावरच ना? या आजारावरचा उपाय कोणाकडे आहे? डॉक्टर नावाची जी जादू लोकांच्या मनावर गेल्या काही दशकात चालवण्यात आली आहे, त्याचाच हा दुष्परिणाम नाही काय? खुट्ट वाजले तरी डॉक्टरकडे धावायचे. शिंक आली औषध घ्याचे. तेसुद्धा झटपट गुण देणारे असायला हवे. पथ्य, शिस्त यापेक्षा बेशिस्त आणि कुपथ्य़ यांनी आपले आयुष्य़ आज खुप बेजार झाले आहे. त्यातूनच डॉक्टरवर अवलंबून रहाण्याची सवय अंगवळणी पडली आहे. त्यातून औषधे व डॉक्टरी उपचार ही आपली मानसिक गरज बनली आहे. किंबहूना बनवण्यात आली आहे.

   जेव्हा अशा रितीने कृत्रीम गरज निर्माण होते, तेव्हा त्याचा पुरवठा करून त्यातच आपला धंदा जमवणारे व्यापारी आपोआपच पुढे येत असतात. इतरांची गरज ही व्यापार्‍यासाठी संधी असते. मग ती गरज खरी असो की खोटी असो. व्यापार्‍याला त्याच्याशी कर्तव्य नसते. व्यापारी नफ़्याच्या हेतूनेच काम करत असतो. लोकांच्या समजुती, भ्रम, गैरसमज जर नफ़ा देत असतील तर व्यापारी ते दुर करत नाही. आज औषधे व उपचार यांच्याबद्दल ज्या समजुती व भ्रम तयार करण्यात आले आहेत; त्यांनी लोकांची अधिक लूट होत असते. कित्यकदा तर गरज वा आवश्यकता नाही, असा माल लोकांच्या गळ्यात मारला जात असतो. ज्या देशात तीन पैकी एक माणुस उपासमारी व अर्धपोटी जगतो आहे, ७० टक्के जनतेला पाण्याचा पुरवठाच होत नाही, तेव्हा अक्वागार्ड सारखी कंपनी पिण्याचे पाणी घरच्या घरी शुद्ध करण्याची यंत्रे विकण्याचा धंदा करते आणि सत्यमेव जयतेला प्रायोजित सुद्धा करते, यातला विरोधाभास आपण समजूनच घ्यायचा नाही काय?     ( क्रमश:)

भाग  ( २९९ )    १८/६/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा