सोमवार, २५ जून, २०१२

आपली मुले हेच त्यांचे धंद्यातले भांडवल


   आपण रोजच्या जीवनात अनेक बारीकसारीक खर्च करत असतो. त्यातून सरकार करोडो रुपयाचे अप्रत्यक्ष कर वसूल करत असते. साधी काडीपेटी किंवा औषधे, अशा प्रत्येक गोष्टीवर कर लादला जात असतो. ते पैसे कशासाठी वसूल केले जात असतात? कायदा सुव्यवस्था, आरोग्य, रस्ते, दिवाबत्ती, प्राथमिक शिक्षण अशा सामन्य जनतेच्या ज्या मुलभूत गरजा मानल्या गेलेल्या आहेत, त्यासाठी लागणारा खर्च म्हणुन सरकार ही रक्कम वेगवेगळ्या मार्गाने आपल्याकडून वसूल करत असते. म्हणजेच आपण आपल्या मुलाचे, मुलीचे प्राथमिक शिक्षण होण्यासाठी आधीच पैसे मोजलेले आहेत. मग आपण त्याच्या शालेय शिक्षणाच्या खर्चाची चिंता करण्याचे काही कारण आहे काय? नसेल तर आपण असे प्रवेश देणगी वा वाढणारी फ़ी यांच्या विरोधात का ओरडत असतो? तर आपण सरकारने जी शिक्षणाची सोय उपलध करून दिली आहे, ती नाकारून खाजगी शिक्षण सुविधांकडे वळलो आहोत. जे फ़ुकट उपलब्ध आहे, ते आपल्याला नको आहे. कारण ते पुरेसे नाही अशी आपली धारणा झालेली आहे. त्यातुन आपल्या मुलांचे भवितव्य उज्ज्वल होणार नाही, म्हणून आपण चांगले शिक्षण मुलांना मिळावे, या काळजीने अन्यत्र व्यवस्था शोधलेली आहे. आपण असा शोध सुरू केला म्हणुन मग ती सुविधा पुरवणारे, तशा सुविधा उभारण्यास पुढे झाले आहेत. त्यांनी आपल्याला तशा सुविधा पुरवण्याच्या बदल्यात त्यांना हवी त्शी किंमत लावली आहे. मग ती परवडते तोवर आपली तक्रार नाही. पण जेव्हा ती सुविधा परवडेनाशी होते, तेव्हा आपण ओरडा करत असतो. पण खरेच ती सुविधा आहे काय, याचा आपण विचारही करत नाही. खरेच आपल्या मुलांना या खाजगी शाळा उत्तम शिक्षण देतात काय? 

   इंग्रजी माध्यम म्हणजेच उत्तम शिक्षण, अशी जी समजूत तयार झाली त्याचा लाभ उठवायला शेकडो चलाख लोक पुढे आले. त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढल्या. सरकारनेही त्यांना पटापट मान्यता दिली. कारण इंग्रजी शाळा काढली तर तिला कधीच अनुदान मिळणार नाही असे सरकारचे धोरण आहे. मग अशाच शाळांचे पेव फ़ुटले. दुसरीकडे मराठी माध्यमातली शाळा काढली तर सरकारचे नियम व दंडक खुप कठोर असतात. कारण आज ना उद्या तिला अनुदान द्यावे लागणार. तेव्हा नव्या मराठी शाळा होऊच नयेत, अशा पद्धतीने सरकारी धोरण राबवले जाते. शिवाय पालकांना इंग्रजीच शाळा हवी असल्याने, कुठे तक्रार नव्हती. मग अशा नव्या शाळा पालकांकडून देणग्या घेउनच उभ्या रहात गेल्या. त्यासाठी होणारी गर्दी बघून शाळाचालकांनीही देणगीचे दुकानच थाटले. हा एक चमत्कारिक धंदा किंवा व्यापार उदयास आला. त्यात तुमची मुले हे शिक्षणसंस्था काढणार्‍यासाठी भांडवल बनले. सरकारच्या धोरणाने त्याला प्रोत्साहन मिळत गेले. आता तर उच्च शिक्षणापर्यंत हा देणगीचा व्यापार पोहोचला आहे. त्यात सरकार जेवढे जबाबदार आहे, तेवढेच हे पालकांचेही पाप आहे. इंग्रजी माध्यमात पहिलीपासून मुलांना शिकवले, मग ती हुशार होतातच ह्या समजूतीने ही अवस्था आणली आहे. पण वास्तवात त्या समजूतीला कुठलाही आधार नाही.

  आता तर ह्या देणगीचे आकडे ऐकले मग चक्कर येते. पण त्या मार्गाने जाण्याची खरेच गरज आहे काय? जे मुल दिवसातले अवघे चारपाच तास शाळेत व उरलेले तास घरात असते, ते कुठे शिकणार? जिथे त्याचा अधिक वेळ जातो तिथेच ते शिकत असते. म्हणजेच घरच्यांकडून मुलाचे अधिक शिक्षण होत असते. एक साधी प्रक्रिया समजून घेतली तर मुद्दा लक्षात तेऊ शकेल. मातृभाषा म्हणजे तरी काय? तर आईची भाषा. आईची भाषा तामी्ळ असेल तर मुलाची मातृभाषा तामीळ होते. असे का व्हावे? तर जन्मापासून मुल ज्याच्या सहवासात रहाते त्याचेच अनुकरण करत जाते. त्यात जो आपुलकीने वागवतो किंवा प्रभाव पाडतो, त्याचे अनुकरण करते. त्या अनुकरणातूनच मुल शिकत असते. त्यातले जे सहजसाध्य असते ते लौकर शिकले जाते. जे कंटाळवाणे वा त्रासदायक असते, ते शिकायला वेळ लागतो. ज्याला हसतखेळत कौतुकाचा प्रतिसाद मिळतो ते लौकर आत्मसात केले जाते. ज्या मुलाला जन्मत: साधे बोलताही येत नसते व जगातली कुठलीही भाषाच ठाऊक नसते, ते मुल घरच्या घरी पहिली भाषा शिकते. आणि कोणी शिकवत नसताना शिकते. ज्याला कुठली शाळा वा शिक्षक शिकवू शकत नसतो, त्याला घरातले कुटुंबिय नकळत खुप काही शिकवून जातात ना? मग शाळा मोठी की घर कुटुंब मोलाचे? मुलाचा सर्वात उत्तम शिक्षक कोण? त्याच्यासाठी कुठली शाळा अधिक उपकारक आहे? घर की सरकारी मान्यतेचे विद्यालय?

   ज्या अजाण जीवाला पहिला शब्द, पहिली भाषा व पहिले पाऊल उचलायला आपण घरचे लोक शिकवतो, तेच त्याच्या पुढल्या आयुष्यातल्या शिक्षणासाठी नालायक कसे असू शकतो? दुर्दैव असे, की आज तोच सर्वोत्तम शिक्षक आपण आपल्या मुलांसाठी नाकारला आहे. तिथेच त्याचे मोठे नुकसान करून ठेवले आहे. मग त्याचा फ़ायदा शिक्षणाचे दुकानदार घेत असतात. आपल्या मुलांना अशा दुकानदारांच्या शाळेत घालून आपण स्वत:ची भलतीच कोंडी करून घेतली आहे. इंग्रजी शाळेत मुल घालायचे. मग त्याला तिथे शिकवण्यापेक्षा घरचा अभ्यास भरपूर दिला जातो. तो करून घेताना पालकांच्या नाकी दम येतो. त्यांना इंग्रजी जमत नसेल तर त्या कोवळ्या बालकाला आपले आईबाप बुद्दू वाटु लागतात. त्यांच्याविषयी त्या मुलाच्या मनात कमीपणाची भावना मूळ धरते. दुसरीकडे त्या होमवर्कसाठी भुर्दंड पडतो तो वेगळाच. त्याहीपेक्षा मोठे नुकसान होते ते मुलाच्या बौद्धिक विकासाचे. प्राथमिक शिक्षण म्हणजे चौथीपर्यंतच्या वयात मुलांना विषय शिकवायचे नसतात, तर ज्ञानग्रहणाच्या उपजत वृत्तीची जोपासना करायची असते. हे वय असे असते, की ज्या समजुती तयार होतात व मुलाचे स्वत:चे निकष तयार होतात, ते त्याला आयुष्यभर उपयोगी पडणार असतात. त्याच्या बौद्धिक विकासाचा पाया त्यातून घातला जात असतो. शेकडो शंका व प्रश्न मुले या वयात विचारत असतात. त्यांचे शंकानिरसन, प्रत्येक गोष्टीतले त्यांचे कुतूहल, हीच शिकण्याची प्रक्रिया असते. घोकंफट्टीच्या अभ्यासाने त्यावर पाणी ओतले जाते. उत्साह मारून टाकला जातो. शिकण्याच्या उपजत वृत्ती कोमेजून टाकल्या जातात. विचार न करता, निमूटपणे समोर आहे ते स्विकारण्याची सक्ती त्याच्यावर केली जाते. थोडक्यात त्याच्या शिकण्याच्या इच्छेचाच गळा घोटला जातो.

   साध्या भाषेत बोलायचे तर उत्साही पालक आपल्याच खर्चाने मुलाच्या शिकण्याच्या उपजत वृत्तीचा खुन पाडुन घेतात. तेवढेच नाही तर त्यातच धन्यता मानतात. प्रत्येक मुलाला जन्मत: मानवी मेंदू ही सर्वात मोठी निसर्गाने दिलेली देणगी असते. त्या मेंदूचा वापर करण्याची उपजत वृत्ती माणसात असते. तिला योग्य दिशा दे्णे म्हणजे शिक्षण असते. मात्र स्वभावानुसार प्रत्येक मुलात फ़रक पडतो. काही मुले शांत स्वभावाची असतात तर काही मुले खोडकर स्वभावाची असतात. त्या स्वभावाचा त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेवर प्रभाव पडत असतो. म्हणुनच त्या त्या मुलाच्या स्वभावानुसार त्याच्या शिकण्याला चालना देण्य़ाचा प्रयास झाला पाहिजे. ते काम शाळेत होऊ शकत नाही. तिथला शिक्षक किंवा व्यवस्था सर्वांना एकाच मापाने मोजत असते. इथे पालक महत्वाचा असतो. मुलाचे दोष, त्रुटी वा गुण पालकांना चांगले माहित असतात. त्यामुळेच पालक त्याच्या कलाने जाऊन त्याच्या शिकण्याच्या प्रवृत्तीला नेमकी चालना देऊ शकतो. मुलांच्या वागण्यातले दोष वा वृत्ती यांचा नेमका वापर करून त्यांच्या नकळत त्यांना शिकवता येत असते. मी असे अनेक प्रयोग केले आहेत. अशक्य वाटणार्‍या गोष्टी त्यातून सहजशक्य झाल्या आहेत.

   पालक तेवढा वेळ आपल्या मुलांसाठी खर्च करणार असेल, तर त्याला देणगी वा मोठी फ़ी घेणार्‍या शाळांकडे आशाळभूत होऊन बघण्याची वेळ येणार नाही. कुठल्याही सामान्य शाळेत मुलाचे नाव घालूनही त्याला हुशार बनवणे शक्य आहे. जर पालकाने पहिल्या चारपाच शालेय वर्षात मुलाकडे अगत्यपुर्वक लक्ष दिले, तर पुढल्या काळात मुल स्वयंभू होऊ शकते, हे मी अनुभवातून सांगू शकतो. आपल्या मुलांसाठी पैसे खर्चण्याची अजिबात गरज नाही. पण त्याला वेळ देण्याची तयारी असायला हवी. पण आज सर्वच नाती व आपुलकी पैशाच्या मोजपट्टीने मोजली जात असते. मग प्रेम व्यक्त करायला भेटकार्ड द्यावे लागते. गिफ़्ट द्यावे लागते. पैसे किती खर्च करता यावर नात्यांची जवळीक ठरणार असेल, तर त्याचा धंदा करणारे लाभ उठवायला पुढे येणारच. मग विषय प्रेमाचा असो, रागाचा असो, दुष्मनीचा असो किंवा दुखण्याचा असो.    ( क्रमश:)
 भाग  ( ३०५ )    २४/६/१२

३ टिप्पण्या:

 1. खरे आहे भाऊ तुमचे... आम्हिसुद्धा महानगरपालिकेच्या शालेमधूनच शिकलो सातवीपर्यंत. पण फड़ाफड़ा इंग्रजी बोलतो आम्हीसुद्धा. अभिमान आहे आजही आमच्या शालेचा !!!

  उत्तर द्याहटवा
 2. अगदी १००% सहमत. उच्च शिक्षणाची अवस्थाही फार वाईट झाली आहे. मी स्वतः इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलंय आणि आता आय.आय.टी. मद्रासमधून मास्टर्स करतोय. प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये फी भरमसाठ असते, इन्फ्रास्ट्रक्चरही असतं पण शिक्षण मात्र अगदी खालच्या दर्जाचे असते. बरं एवढी भरमसाठ फीस घेऊनसुद्धा अशा कॉलेजेसमध्ये शिक्षकांना पुरेसा आणि वेळेवर पगार मात्र दिला जात नाही.

  उत्तर द्याहटवा
 3. भाऊ आपले म्हणने १००% खरे आहे. मात्रूभाषेतूनच मुलांचे शिक्षण झाले पाहिजे. इंग्रजी शाळा ह्या ३-४ वर्षांच्या मुलांना एवढा अभ्यास देतात की पालक मारून झोडून त्यांच्याकडून अभ्यास करुण घेतात. इंग्रजी शाळेतील मुलांना धड इंग्रजी येत नाही आणि धड मराठीही येत नाही. याचा परीणाम म्हणुनच चांगले लेखक, कवी यापुढे निर्माण होणार नाहीत अशी भीती वाटते. आजकाल इंग्रजीचे एवढे प्रस्थ वाढले आहेकी मराठी शाळेत जाणाऱ्या मुलां मधे एक प्रकारचा न्यूनगंड तयार होत आहे. ही परिस्तिथि बदलायची असेलतर मराठी शाळेत फक्त इंग्रजी बोलण्याचा वेगळा तास सुरु केला पाहिजे. तोही पहिली पासूनच. त्यात फक्त इंग्रजी बोलण्याची तोंडी परीक्षा झाली पाहिजे. लहान मूल जर दोन वर्षात आपली मातृभाषा शिकू शकत आहे तर ते पाचवी पर्यंत म्हणजे पाच वर्षात नक्कीच फाडफाड इंग्रजी बोलतील. आणि मग कोणत्याही पालकांना मुलांना इंग्रजी शाळेत पाठविन्याची आवश्यकता भासणार नाही.
  मी माझा स्वत:चा अनुभव सांगतो. मी माझ्या मोठ्या मुलाला मराठी शाळेत घालण्याच्या विचारात होतो. परंतु मला घरातून आणि नातेवाईकांकडून इतका दबाव आलाकी नाईलाजाने इंग्रजी शाळेत घालावे लागले. शेवटी जे व्हायचे तेच सुरु झाले, Jr. KG, Sr. KG त त्याला एवढा अभ्यास द्यायचे की माझी पत्नी त्याला मारझोड करुण अभ्यास करुण घेत असे. ही मारझोड सहन न होऊन मी त्याला मराठी शाळेत घातले. सरळ पहिलीत घातल्यामुळे त्याचा मराठी शिशुवर्ग आणि बालवाडीचा अभ्यास बुडाला आणि त्यामुळे तो अभ्यासात मागे पडला. तो अजुनही मला टोमने मारतो की तुमच्या मुळे मला इंग्रजी येत नाही.
  नंतरच्या दोन जुळ्या मुलांना मी शिशुवर्गा पासूनच मराठी शाळेत घातले. उल्हासनगरला चांगली मराठी शाळा नसल्यामुळे त्यांच्यासाठी अंबरनाथला रहायला आलो. कर्मधर्म संयोगाने त्यांना पहिली पासूनच इंग्रजी विषय सुरु झाला. ते आता उत्तम इंग्रजी बोलतात.

  उत्तर द्याहटवा