गुरुवार, २८ जून, २०१२

मंत्रालयाच्या आगीतले चित्तवेधक थरारनाट्य


    मंत्रालय बेचिराख होत असताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अग्नीशमन दलाला लाजवणारी जी धाडसी कामगिरी पार पाडली, त्याचे वर्णन करणार्‍या पुढील दोन बातम्या आहेत. पुढारी व सकाळ या दोन दैनिकात छापून आल्या तशाच शब्द्श: मुद्दाम इथे पुनर्मुद्रित केल्या आहेत. वाचकांनी त्या बारकाईने वाचाव्यात. त्यात कोणती विसंगती वा विरोधाभास आहे, त्याची उलटतपासणी उद्या सविस्तरपणे करू या.

आम्ही वाचलो ते केवळ अजितदादांमु्ळेच
    मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या वेळी सहाव्या मजल्यावरील उपमुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षाच्या खिडकीबाहेर पाऊण तास लटकत होतो. पाऊण तासानंतर नाकातोंडावर तापलेल्या धुराचे काळे लोट यायला लागले. खिडकीत लटकणे अगदीच अशक्य झाले. त्यामुळे खिडकीतून खाली पाचव्या मजल्याच्या सज्ज्यावर उडी मारण्याचा निर्णय अगदी शेवटच्या क्षणी घेतला. जीव वाचवण्यासाठी आता दुसरा कुठलाही उपाय नसल्याने आगीत जळून मरणे किंवा उडी मारून एक संधी घेणे; एवढेच बाकी उरले होते. डळमळत्या पीव्हीसी पाईपच्या आधाराने खाली उडी मारली, सुदैवाने तोल गेला नाही. सज्जावर नीट पोहोचलो. सज्जावर आता आम्ही ३०-४० जण उभे होतो. सज्जा पडे्ल की काय अशी भिती होती. त्याचवेळी अग्नीशमन दलाची शिडी वर आली आणि तिच्या मदतीने आम्ही सर्वजण टप्प्या टप्प्याने खाली आलो. आतापर्यंत आमच्या सोबत असलेले दोघेजण धुराने गुदमरून वर सहाव्या मजल्याच्या खिडकीत बेशुद्ध पडले होते. अग्नीशमन दलाच्या जवानांनी त्यांनाही खाली आणले. त्या कार्यवाहीमुळे आमचे सर्वांचे प्राण वाचले. परंतु ही कार्यवाही यशस्वी होऊ शकली ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातला कार्यकर्ता जागा असल्यामुळे.
   सहाव्या मजल्यावरील खिडकीतून आम्ही मदतीची वाट बघत होतो. परंतू आम्हाला खाली उतरवण्यासाठी कुणीच येत नव्हते. अर्ध्या तासानंतर धुराचे लोट खुपच वाढले आणि मग आमचा धीर सुटायला लागला. खाली उडी मारायचा विचार डोक्यात चमकून गेला आणि नेमक्या त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजितदादा खाली आलेले आम्हाला दिसले. त्यांनीही हात हलवून आम्हाला विश्वास दिला. त्यानंतर आम्हाला सुखरूप उतरवण्यासाठी त्यांनी खाली सुरू केलेली धावपळ कधीच विसरता येणार नाही. आमच्या सुटकेसाठी अजित पवार यांनी वेगाने सुत्रे हलवली. सातव्या मजल्यापर्यंत पोहोचणारी शिडी तात्काळ आणण्यासाठी दादांनी अधिकार्‍यांना सांगितले, नव्हे तर पि्टाळलेच. शिडी असलेली गाडी उभी करण्यात अडचण येईल हे लक्षात घेऊन, तेथील नेहमीची वाहने बाहेर काढण्याचे आदेश त्यांनी दिले. चालक नव्हते ती वाहनेही धक्का मारून बाहेर काढायला लावली. गेल्या ४० मिनीटापासून आम्ही वाट पहात असलेले ते शिडीधारी वाहन अखेर दादांच्या कार्यवाहीमुळे वेळेत येऊ शकले. नंतर शिडी लावण्यात उशीर होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी अधिकार्‍यांना दम देऊन मदत कार्याचा वेग वाढवायला लावला. सुटकेसाठी आलेली क्रेन केवळ चार जणांनाच घेऊन खाली जाताना दिसताच अजितदादांनी, एकावेळी जास्तीतजास्त लोकांना खाली आणण्याचा आदेश दिला. त्यामुळे सज्जावरील लोक कमीतकमी फ़ेर्‍यांमध्ये खाली येऊ शकले. सहाव्या मजल्यावर बेशुद्ध असलेल्या दोघांनाही लौकर खाली आणून त्यांचे प्राण वाचविता आले. त्याचवेळी अजितदादा अग्नीशमन दलाच्या अधिकर्‍यांकडे उष्णतारोधक सूट असलेल्या जवानांना आत पाठवून अडकलेल्यांना कसे वाचविता येईल याची चाचपणी करीत होते. हे जर शक्य झाले असते तर मृत्यूमुखी पडलेल्या त्या पाच जणांचाही जीव कदाचित वाचविता आला असता. आगीतून सुटका झालेल्यांना तात्काळ उपचार मिळावेत, तसेच त्यांना रुग्णालयात पाठवण्याकडेही दादांनी जातीने लक्ष पुरवले.
   पाचव्या, सहाव्या आणि सातव्या मजल्यावर अडकलेल्या आमच्यासारख्या ३०-४० जणांना सुटकेसाठी सुमारे ४५ मिनीटे वाट पहावी लागली. परंतू सुटकेची खरी कार्यवाही झाली ती शेवटच्या १५ मिनीटात. त्या १५ मिनीटात दादांच्या नेतृत्वाखालीच सगळी सुत्रे हलली. आम्हाला अग्नीशमन दलाच्या शिडीने खाली उतरवत असतानाच वरचे तिन्ही मजले आगीने धगधगू लागले होते. आम्हाला वाचवण्य़ात आणखी एक-दोन मिनीटाचा जरी उशीर झाला असता, तरी आमचे मरण अटळ होते.
     तत्पुर्वी दुपारी पावणे तीनच्या सुमारास अजितदादांच्या अध्यक्षतेखाली सहाव्या मजल्यावरील त्यांच्या समिती कक्षामध्ये बैठक होणार होती. त्यासाठी ते आले देखील. परंतू धुराचा वास येऊ ला्गल्याने धुर जाईपर्यंत सचिवांच्या दालनात दुसर्‍या ठिकाणी बसावे म्हणून ते बाहेर पडले. परंतु तोवर धुर जमा होऊ लागला होता. त्यामुळे सचिवांच्या दालनात न थांबता नाकावर रुमाल धरत आणि धुरातून वाट काढत, मध्ये भेटणार्‍या प्रर्त्येकाला बाहेर पड्ण्यासाठी खाली पिटा्ळत ते मंत्रालयाच्या विस्तार इमारतीकडे गेले. तिथून आरसा गेटच्या जिन्याने सहाव्या मजल्यावरून तळमजल्यापर्यंत खाली आले. अजितदादा समिती कक्षातून बाहेर पडल्यानंतर आम्ही सर्वांनी त्यांच्या पाठोपाठ बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. परंतु चौथ्या आणि पाचव्या मजल्यवरील धुराचा प्रचंड मोठा लोळ जिन्याच्या मार्गाने आमच्या कक्षासमोरच्या जागेत आल्याने आम्हाला कुणालाही बाहेर पडणे शक्य झाले नाही. त्यानंतर सुमारे पाऊण तास आम्ही सर्वजण अजितदादांच्या समिती कक्षात अडकून पडलो होतो. परंतु, सुखरुप खाली पोहोचल्यानंतर त्यांनी प्रयत्नपुर्वक आमची सर्वांचीही सुखरूप सुटका केली. परंतू त्या पाचजणांचे प्राणही न वाचविता आल्याचे शल्य त्यांच्या मनात होते. सुटकेनंतर त्यांचे आभार मानण्यासाठी गेलो असताना त्यांनी ते बोलूनही दाखवले होते. (दादांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांचे कथन दै. पुढारी, सोमवार २५ जुन २०१२)

 ... थरार अजित पवार यांच्या दालनातला 
मुंबई - 'सहाव्या मजल्याच्या खिडकीची काच फोडून पाचव्या मजल्यावर पाईपाला पकडून आलो. आत आगीचे रौद्ररुप दिसत होते, तर बाहेर पाचव्या मजल्यावरून खाली पाहताना मरणाच्या दारात उभा असल्याचे जाणवत होते; पण दैव बलवत्तर म्हणून मदत मिळाली. अन्‌ मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडलो.' विशाल ढगे आणि संजय देशमुख हे अजितदादांचे जनसंपर्क अधिकारी मृत्यूच्या दाढेतून परतल्यावर भावविवश होऊन सांगत होते. दोन मिनिटे थांबण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला असता, तर तेही अशाच प्रकारे अडकले असते, असे सांगताना या दोन्ही अधिकाऱ्यांचे डोळे पाणावले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात आज (गुरुवार) दैनंदिन कामकाज सुरू होते. जनसंपर्क विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक सुरू होणार होती. अजित पवार बरोबर 2.45 वाजता बैठकीच्या दालनात दाखल झाले आणि तेवढ्यातच सुरक्षा रक्षकाने आग लागल्याचा निरोप देत बाहेर पडा... बाहेर पडा... असा आवाज दिला. त्यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी सतीश लळीत, अनिरुद्ध अष्टपुत्रे, गृह विभागाचे किशोर गांगुर्डे, संजय देशमुख आणि विशाल ढगे; तसेच इतर जनसंपर्क अधिकारी उपस्थित होते. आग लागल्याचे कळताच अजित पवार यांचे खासगी सचिव विजय पाटील यांनी बाहेर पडा, अशी विनंती केली. दादा उठले, बाहेर पडले, तर समोर धुरांचे लोट दिसले. नेहमीच्या मुख्य दरवाजाच्या जिन्याकडे ते गेले; पण आगीचा दाह आणि धुरांचे लोट पाहून त्यांनी विस्तार इमारतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. समोर काही दिसत नव्हते. मोठ्याने आवाज देत, दिसेल त्याला बाहेर पडा... बाहेर चला... असे ओरडून सांगत अजित पवार यांनी त्यांच्या कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांना सावध केले. अजित पवार याचे खासगी सचिव साजणीकर देशमुख, सुरेश जाधव यांची दादांनी सोबत घेत जिन्याकडे धाव घेतली. धुरांच्या लोटामुळे काहीही दिसत नव्हते. अधिकाऱ्यांनी मोबाईलच्या प्रकाशात बाहेर येण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात दादांनी जिना गाठला आणि तळमजल्याच्या दिशेने धावत सुटले. सहाव्या मजल्यावरून खाली उतरताना आगीची भीषणता त्यांना जाणवली. काही तरी भयानक असल्याची जाणीव त्यांना झाली; मात्र केवळ एका मिनिटाच्या आत त्यांनी जिन्यातून तळमजला गाठला. आरसा गेटसमोर येताक्षणी अजित पवार यांनी वर नजर टाकली, तर त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर खिडक्‍यांच्या काचा फोडून सुमारे 40 ते 45 जण मदतीचा धावा करीत होते. यामध्ये त्यांच्या जनसंपर्क अधिकार्‍यांसह मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांचा समावेश होता. संजय देशमुख यांनी खिडकीच्या बाहेर असलेला पाईप पकडून पाचव्या मजल्यावर उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला. खिडकीच्या छतावर थांबून त्यांनी विशाल ढगे, किशोर गांगुर्डे यांना खाली येण्याची विनंती केली. पाचव्या मजल्यावर सुरू असलेला हा जीवघेणा थरार अजित पवार यांच्यासह सर्व जण पाहत होते. दादा फायर ब्रिगेडला बोलावण्याचे आदेश देत होते. शिडी शोधा, असे सांगत होते. मदतीसाठी स्वत: धावत होते. आगीच्या डोंबाकडे हताशपणे पाहत कर्मचार्‍यांचे जीव वाचविण्यासाठी बेचैन झाले होते. अखेर सव्वातीन वाजण्याच्या सुमारास फायर ब्रिगेडच्या शिडीने या अधिकाऱ्यांची सुटका केली. गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे जनसंपर्क अधिकारी किशोर गांगुर्डे यांचा सहाव्या मजल्यावरून पाईपला धरून उतरताना पाय मोडला. संजय देशमुख यांनी पाचव्या मजल्यावर पाईपला धरून उतरण्याचा आग्रह केल्यावर नाही-होय म्हणत धाडस करून किशोर गांगुर्डे पाईपवरून उतरले खरे; पण त्यांना तोल आवरता आला नाही. जोराने घसरत आलेल्या गांगुर्डे यांना देशमुख यांनी मोठ्या धाडसाने भिंतीला दाबून धरले; मात्र या गडबडीत गांगुर्डेंचा पाय मोडला. मित्राच्या सहकार्यामुळेच जीव वाचल्याचे समाधान व्यक्‍त करताना मृत्यूच्या दाढेतून परतल्याची धास्ती गांगुर्डे यांच्या चेहर्‍यावर दिसत होती. ( दै. सकाळ, मंगळवार २६ जुन २०१२)   ( क्रमश:)
 भाग  ( ३०९ )     २८/६/१२

1 टिप्पणी:

  1. कालची आग शरमेची गोष्टच आहे...परंतु "सरकारला राज्य करायची अक्कल नाही" म्हणून अकलेचे तारे तोडणाऱ्या दाम्भीक मंडळींना आघाडी सरकारातील भ्रष्ट लोकांनी पोट फुटेस्तोवर पैसे खाऊन फायली नष्ट करण्यासाठी मंत्रालयाला लावलेली आग विसरली असे वाटते... चोराच्या उलट्या बोंबा दुसरं काय?

    उत्तर द्याहटवा