बुधवार, १३ जून, २०१२

तुमच्याआमच्या अपराधी भावनेवर चालणारा धंदा


   सवाल काय आहे? समस्या काय आहे? ज्या सामाजिक दुखण्यावर अमिरखान याने बोट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, त्याबद्दल कोणाचे दुमत नाही. त्या गोष्टी आज आपल्या समाजाला भेडसावणार्‍या समस्या आहेत काय? त्यावर काहीच उपाय नाहीत काय? समस्या दुखण्याची नसून त्यावर योजायच्या उपायांची आहे. जे उपाय समोर आहेत, पण योजायची इछा व हिंमत आपण गमावून बसलो आहोत, हीच खरी समस्या आहे. आणि आपल्या त्या निष्क्रियता व उदासिनतेने त्या समस्या अधिक जटील व गुंतागुंतीच्या करून ठेवल्या आहेत. प्रत्येक गोष्टीत आज आपल्याला सरकार, पोलिस, न्यायालयाच्या कुबड्या हव्या असतात. जणू आपण काही करूच शकत नाही, अशी आपली मनोवृत्ती झाली आहे. पुर आला तर सरकारने उपाय योजायला हवेत, आग लागली तर अग्नीशमन दलाने धावून यायला हवे आहे. अन्याय होत असेल तर कायद्याने त्यात हस्तक्षेप केला पाहिजे. आणि एक जागरुक नागरिक म्हणून आपण काय करणार आहोत? काहीच नाही?

   काही वर्षापुर्वी ओरिसामध्ये महापूर आला होता. अनेक गावे वस्त्या त्यात जलमय झाल्या. जीव वाचवायला माणसे कुठेही पळत सुटली होती. पुर ओसरल्यावर मदतकार्य सुरू झाले. तेव्हा आपल्या नातलग, कुटुंबीयाचा बुडून मृत्यू झाला असताना व त्याचा पाण्यात तरंगणारा मृतदेह दिसत असताना; लोक लष्कराच्या मदतीची अपेक्षा करीत बसलेले होते. तिथे पोहोचलेल्या संरक्षण मंत्री जॉर्ज फ़र्नांडीस यांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. आपले नातलग, कुटूंबिय, शेजारी, परिचित यांच्या मृतदेहासाठीही गावकरी मदत द्यायला पुढे येत नाहीत, ही भीषण तटस्थता त्यांना प्रक्षुब्ध करून गेली होती. सरकार वा लष्कराने त्याचे काम करायचे आहेच. पण ती यंत्रणा पोहोचत नाही, तोवर आपण आपल्याच प्रेमाच्या, रक्ताच्या नातेवाईकांसाठीसुद्धा काहीच करणार नाही का? याला परावलंबी, लाचार, अगतिक म्हणता येत नाही. त्याला भावनाशून्यता वा निष्क्रियता म्हणायला हवे. मी काहीच करणार नाही. दुसर्‍याने येऊन माझा उद्धार करावा, अशी जी भयावह निष्क्रियता आज समाजात बोकाळली आहे, तीच खरी समस्या बनली आहे. नैसर्गिक आपत्ती असो, कोणा गुन्हेगाराने केलेले अत्याचार असो किंवा कोणा मुजोर मस्तवालाने केलेला अन्याय असो, त्यापेक्षा मोठे संकट सामाजिक निष्क्रिय मनोवृत्तीचे आहे. जेव्हा असे संकट आपल्यावर येते, तेव्हा दुसर्‍या कोणी मदतीला धावून यावे, अशी आपली रास्त अपेक्षा असते. पण अशीच अपेक्षा दुसरा कोणी आपल्याकडून संकटसमयी करत असतो, तेव्हा आपण त्याच्या मदतीला जात नाही. शक्य असूनही जात नाही. त्यापेक्षा पाठ दाखवून पळ काढतो. तिकडे काणाडोळा करतो. त्यातून त्यालाही आपण काय शिकवत असतो? तुझे तू बघ, माझा संबंध नाही. मग तो दुसराही आपलेच अनुकरण करून आपल्या संकटसमयी पाठ फ़िरवत असतो. ज्याला अंबरीश मिश्रा मध्यमवर्गिय व्यवहारी जाणतेपणाचा बोजा म्हणतो.  

   गेल्याच आठवड्यात वृत्तवाहिनीवर एक चक्रावून सोडणारी बातमी अनेकांनी बघितली असेल. सोलापुरच्या एका बसमध्ये कुणा आंधळ्या प्रवाश्याकडे सुट्टे पैसे नाहीत म्हणून कंडक्टरने मारहाण करून त्याला बसमधून खाली उतरवले. त्या बसमध्ये पंचविस तीस इतर प्रवासी होते. तो कंडक्टर अमानुष वागतो आहे, तर त्यात हस्तक्षेप करावा असे त्यापैकी एकाही प्रवाशाला का वाटले नाही? भले तो कंडक्टर नालायक वा मुजोर असेल. पण बाकीच्या प्रवाशांचे काय? त्यांचे असे निष्क्रिय वागणे सभ्य मानता येईल काय? त्यांचे मौन, निष्क्रियता अशा अमानुष वागणार्‍याला बळ देत नाही काय? अशा प्रत्येक बसमध्ये, लोकलमध्ये पोलिस असू शकत नाही. तिथे मानवी सभ्यतेची जपणूक, सभ्य नगरिकांनीच करायची असते. तो आंधळा प्रवासी ओरडत होता ना? तिथल्या तिथे त्याच्यावरचा अन्याय थांबवणे, अन्य नागरिक प्रवाश्यांचे नागरी कर्तव्य नव्हते काय? तो कंडक्टर कोणी सशस्त्र गुन्हेगार वा हल्लेखोर नव्हता. त्याच्याशी साध्या बोलण्यातून, प्रतिवादातून वा हस्तक्षेपातून अत्यंत सोपा प्रतिकार शक्य होता. पण कोणीच पुढे झाला नाही, नंतर त्याबद्दल तक्रार झाली व त्या कंडक्टरला निलंबित करण्यात आले. पण या घटनेने त्या आंधळ्या प्रवाशाला कोणती शिकवण दिली? अन्याय निमुटपणे सोसावा, प्रतिकार करण्याचे धाडस करू नये. कोणीही मदतीला येणार नाही. तोच नव्हे तर ही बातमी ऐकून अन्य अपंग वा दुबळ्या लोकांना काय शिकवण मिळाली? अन्याय सोसावा, त्याबद्दल तक्रार करू नये. केली तर आपण एकटेच आहोत, कोणी मदतीला येणार नाही. अशा दुबळ्या अपंग लोकांचा दुबळेपणा ही समस्या अजिबात नाही. त्यांच्या मदतीसाठी खुप कायदे आहेत, योजना आहेत. समस्या आहे, ती सुदृढ आपल्यासारख्या नागरिकांच्या मानसिक दुर्बलतेची, की जे अन्याय बघून गप्प बसतात. अन्याय होऊ देतात, त्यात हस्तक्षेप करायची हिंमत हरवून बसले आहेत.

   अर्थात कोणीतरी नंतर तक्रार केली म्हणुनच त्या कंडक्टरला शिक्षा झाली आहे. पण सवाल त्याला शिक्षा होण्याचा आहे, की अंध अपंग, दुर्बळांच्या आत्मसन्मानाने जगण्याचा आहे? त्या अंध प्रवाशाच्या सन्मानाचा त्या दिवशी खुन झाला ना? पुढल्या खेपेस तो आत्मविश्वासाने अशा प्रसंगाला सामोरा जाऊ शकेल काय? दुबळ्यांसाठी योजना व कायदे कुबड्यांसारखा आधार देतात. पण शेवटी त्या कुबड्यांचा वापर करून चालायचे, तर कमजोर का असेनात, पण पाय असावेच लागतात ना? ते पाय म्हणजे जागरुक सभ्य समाजाने केलेली पाठराखण असते. त्या दुर्बळांना आधी समाजाच्या सहानुभूतीच्या क्रियाशील पायावरच उभे रहाता येत असते. उभे रहाता आले तर त्या कायदे व योजनांच्या कुबड्या त्यांना पुढली मदत करू शकतात. म्हणजेच समस्या सामाजिक उदसिनता, निष्क्रियता, नकारात्मकता, पलायनवाद ही आहे. आपण आज एकजिनसी समाज म्हणुन आपली सामुहिक जबाबदारी स्विकारायला तयार नाही. त्याकडेच पाठ फ़िरवत असतो. त्यामुळे ह्या गैरप्रवृत्ती सोकावल्या आहेत. मग आपण त्यांनाच समस्या समजून उपाय शोधू बघतो. पण त्या खर्‍या समस्या नाहीतच. समस्या आहे ती सामाजिक, सामुहिक पलायनवादाची. मग त्यावर पांघरूण घालण्यासाठी आपल्याला प्रायश्चित्त घ्यावेसे वाटते. कारण तो पलायनवाद, सत्याकडे पाठ फ़िरवायला उपयुक्त असला, तरी मनातल्या अपराधी भावनेपासून मुक्ती देत नाही. त्यातूनच मग समाजासाठी, दुबळ्यांसाठी काही करण्याचा पर्याय शोधला जातो. कधी गरीब मुलांना वह्यापुस्तके फ़ुकट वाटणे, वृद्धाश्रमाला देणगी, कुठल्या देवस्थानाला मदत द्यायला आपण उत्सुक असतो. ते औदार्य फ़क्त दाखवण्यासाठी असते. प्रत्यक्षात आपल्या मनातल्या अपराधी भावनेपासून सुटकेचा तो केविलवाणा प्रयास असतो.

   मग आपण अशा प्रायश्चित्ताच्या संधी शोधत असतो. त्याचा कोणी देवस्थानसंस्था, कुणी महाराज-बाबा, कोणी समाजसेवी संस्था लाभ उठवतात. सत्यमेव जयते कार्यक्रमानेही अशीच एक छान संधी आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. एक एसएमएस पाठवा, किंवा कुठल्या अमुक संस्थेला थेट देणगी द्या. किती सोपे प्रायश्चित्त आहे ना? जे कर्तव्य पार पाडण्यात नेहमीच्या जीवनात आपण कसूर करत असतो, त्यासाठीच्या पापभावनेतून मुक्ती मिळण्याचा किती स्वस्त आणि सोपा मार्ग आहे ना? निर्मलबाबा किंवा आणखी कुणा बुवा महाराजाच्या भोंदूगिरीवर तुटून पडणारे, या नव्या भोंदूगिरीचे समर्थक असतात. गरीबीच्या समस्या, अल्पसंख्यांकांच्या समस्या, पर्यावरणाच्या समस्या, सामाजिक समस्या, बेघर, बेकार, अनाथांच्या समस्या हा आजकाल समाजसेवा नावाच्या नव्या उद्योगातील कच्चा माल बनला आहे. भिकारी काय करत असतो? तुमच्या मनातील अपराधी भावना किंवा सहानुभूतीला पाझर फ़ोडून रुपया पन्नास पैशाची भिक मिळवत असतो ना? तुमच्या हळवेपणा, भुतदयावाद, कळवळा यांना आवाहन करूनच कमाई करत असतो ना? त्यापेक्षा आजकालच्या समाजसेवी उद्योजकांचा व्यापार वेगळा आहे काय? नर्मदा बचावमधून धरणग्रस्तांच्या प्रेषित झालेल्या मेधा पाटकर, मुस्लिम दंगलग्रस्तांच्या उद्धारकर्त्या तिस्ता सेटलवाड काय करतात? दुबळे, अन्यायगस्त, अत्याचार पिडीत हा कच्चा माल त्यांच्या कमाईचे साधन नाही काय? त्यांची खर्चिक जीवनशैली कुठून येणार्‍या पैशातून चालते? अमिरखानच्या सत्यमेव जयतेचे नेमके बाजारमूल्य किती आहे? आपल्या मनातल्या अपराधी भावनेतून किती करोड रुपयांची उलढाल होते, त्या सत्यावरचा पडदा कधी आणि कोण उचलणार आहे?      (क्रमश:)
भाग  ( २८५ )    ४/६/१२

1 टिप्पणी: