शनिवार, २ जून, २०१२

अपराधी भावनेपासून मुक्ती देणारा एसएमएसचा धंदा


   13 मे 2012 च्या रविवारी आमिरखाने बालक शोषणाचा विषय सादर केला होता. त्याच्या आरंभीच त्याने प्रेक्षकांना एक सावधानतेची सूचना केली होती. जर तुमच्या सोबत लहान मुले हा कार्यक्रम बघत असतील तर त्यांनी हे बघावे ऐकावे किंवा नाही याचा विचार करून निर्णय घ्या. तुम्हाला योग्य वाटत नसेल, तर मुलांना अन्यत्र गुंतवून ठेवा, टीव्हीपासून दुर ठेवा. मात्र कार्यक्रमाच्या शेवटी जो वर्कशॉप धेतला जाणार आहे, तेव्हा मुलांना अगत्याने बघायला हजर करा, असे आवाहन आमिरने केले होते. वास्तविक कुठल्याही वाहिनीवरचे कार्यक्रम होतात तेव्हा अशी सूचना सांगितली गेली पाहिजे. मुलांपासून सत्य लपवणे हा त्याचा हेतू नसतो, तर त्यांच्या बालबुद्धीला जे समजू शकणार नाही व ज्याचे आकलन होऊ शकणार नाही; त्यापासून त्यांना दुर ठेवण्याचा शुद्ध हेतू त्यामागे असतो. जे समजत नाही पण कुतुहल जागे करते, त्याचा विपरित अर्थ लावून बालकांकडून गैरवर्तन होण्याचा धोका टाळण्यासाठीच अशी काळजी घ्यायची असते. पण तेवढे भान सहसा आपल्या वृत्तपाहिन्याही पाळत नाहीत. त्याबाबतीत आमिरने दाखवलेली संवेदनशीलता कौतुकास्पद मानली पाहिजे.

   सत्यमेव जयतेच्या त्या दुसर्‍या भागात बालकांनी लैंगिक शोषणापासून सावध रहाण्यासाठी काय करावे यासंबंधी त्याने सादर केलेला वर्कशॉप खरेच उत्तम होता. त्याने त्या छोट्या बालकांना अनेक मोक्याच्या गोष्टी अगदी सोप्या करून सांगितल्या. त्यात त्याने गंमत पण आणली. तुम्हाला ओरडता येते काय, असे त्याने विचारले व ओरडून दाखवायला सांगितले; तेव्हा पोरांनी जो कल्लोळ केला, त्याने उपस्थितांमधे मोठीच खसखस पिकली. मलाही तो वर्कशॉप खुप आवडला. पण खरेच असे संकट आले, मग ओरडून सुरक्षा होऊ शकते का? त्याक्षणी ओरडण्याची हिंमत किती लोक दाखवू शकतात? आणि समजा ज्याच्यावर असे संकट आले आहे, त्याने ओरडा केला तर कोण त्याच्या मदतीला धावून जाणार आहे? असे अनेक प्रश्न मला पडले. अर्थात शंकासूरांचे समाधान कोणीच करू शकत नाही, असा आरोप माझ्यावर होऊ शकतो. मी तो नाकारणार नाही. पण मला अशी शंका का येते, त्याचे भीषण उदाहरण मी आता सादर करणार आहे. मगच माझ्या शंका निराधार नाहीत, हे वाचकांच्या लक्षात येईल. संकटसमयी साधने व उपाय महत्वाचे असतातच, पण त्यापेक्षा ते योजण्याची इच्छाशक्ती अधिक महत्वाची असते. अनेकदा साधने, उपाय जवळ असतात. पण त्यांचा वापर करण्याची हिंमतच आपण हरवून बसलेले असतो. त्यामुळेच हल्लेखोर व शत्रूचे दुष्ट हेतू साध्य होत असतात. मी जे प्रकरण सांगणार आहे, त्यात या सर्व बाजू समोर येतात. नुसत्या समोर येत नाहीत, तर अशा सोप्या उपायांवर प्रश्नचिन्ह लावून जातात.

   येत्या स्वातंत्र्यदिनाला दहा वर्षे होतील त्या घटनेला. त्या दिवशी एक बातमी देशातील सर्वात प्रतिष्ठीत मानल्या जाणार्‍या वृत्तपत्रात छापून आली. तशी ती बातमी ठळक नव्हती किंवा हेडलाईन सुद्धा नव्हती. पण पुढल्या काही आठवड्यात त्या बातमीने वृत्तपत्रे, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व प्रशासकीय जगताला ढवळून काढले होते. म्हटले तर ती घटना नाविन्यपुर्ण नव्हती, की अभूतपुर्व सुद्धा नव्हती. कारण तशा घटना अधुनमधून आपल्या देशात कुठेही घडत असतात. अगदी याच आठवड्यात तशी घटना उत्तरप्रदेशची राजधानी लखनौ येथे घडली आहे. एका पोलिस चौकीत तरूणीला घेऊन आलेल्या पोलिसाने दरवाजा लावून तिच्यावर बलात्कार केला. त्याने एकट्यानेच नव्हे, तर त्याच्या अन्य सहकार्‍यांनीही पोलिस चौकीतच लागोपाठ तिच्यावर बलात्कार केले. आणि हे चालू असताना बाहेर त्या मुलीचा आजोबा ताटकळत उभा होता. तिथे आसपास पोलिस वावरत होते. पण काय घडते आहे, त्याची कोणाला फ़िकीर नव्हती. बलात्कार होत असताना ती मुलगी नक्कीच ओरडत असेल, टाहो फ़ोडत असेल. मग तिथल्या सर्वांचे कान बहिरे झाले होते काय? त्यापैकी कुणालाच तिच्या किंकाळ्या व टाहो ऐकूच आला नसेल काय? त्यापैकी कुणीच तिच्या मदतीला का धावले नाही?

   झाले असे, की तो आजोबा आणि ती तरूणी गोंधळल्यासारखे फ़िरत असताना रहिवाश्यांना संशय आला. त्यांनी पालिसांना पाचारण केले. पोलिसांनी त्या दोघांना जवळच्या चौकीत नेले. तिथे त्यांच्याकडे सुटकेसाठी 20 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. ती पुर्ण होत नाही म्हटल्यावर म्हातार्‍याला मारहाण करण्यात आली आणि त्याच वेळी चौकीच्या खोलीत दरवाजा बंद करून त्या तरूणीवर पोलिसांच्या मित्रांनी बलात्कार चालविला होता. सुदैव इतकेच, की ज्यांना त्या दोघांचा संशय आलेला होता; त्याच रहिवाश्यांना पोलिसांच्या वागण्याचा मग संशय आला. चौकीतून मुलीच्या किंकाळ्या ऐकू आल्यावर त्यातल्या काहीजणांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना वर्दी दिली. ते घटनास्थळी आल्यावर पोलिस व त्याचे मित्र रंगेहात पकडले गेले. पण तोवर त्या मुलीला यमयातनांचा अनुभव घ्यावा लागला होता. व्हायचे ते होऊन गेले होते. पुढे त्याचे खुप राजकारण झाले आहे. विधानसभेत विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारला धारेवर धरले आहे. काल सत्ता हाती असताना अशाच घटनांकडे दुर्लक्ष करणार्‍या बहुजन समाज पक्षाचे आमदार, खुप आक्रमक होऊन त्या बलात्काराचा जाब नवा मुख्यमंत्री अखिलेश यादव याला विचारत होते. तर कालपर्यंत विरोधी पक्षात असताना असाच गोंधळ घालणारे समाजवादी पक्षाचे आमदार शांत बसून होते. यातल्या कुणाला तरी त्या मुलीच्या नरकवासाच्या वेदना कधी कळल्या आहेत काय? त्यांच्यासाठी बलात्कार सोसलेली ती दुर्दैवी मुलगी, ही राजकीय पटावरचे एक प्यादे होते व आहे. सत्ता गेलेले टाहो फ़ोडत होते आणि सता मिळालेले शांत बसून होते. ही आजची आपली सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय संवेदनशीलता आहे. बलात्कार वा अत्याचार महत्वाचा नाही. तो कोणावर होतो, कोण करतो, कोणाच्या सत्ताकाळात होतो, त्यात कोण आरोपी आहे, बलात्कार करणार्‍याची वा पिडीताची जात कुठली आहे, यानुसार आपल्या सार्वजनिक प्रतिक्रिया उमटत असतात.

   इथे विधानसभेपर्यंत मामला गेला, कारण त्यात राजकीय लाभ उठवायचा होता. तसे नसते तर ह्या मुलीचे अश्रू पुसायला कोणी फ़िरकला नसता. दुसरी गोष्ट ज्यांना संशय आला, ते कितीही संशयी असले तरी त्यांच्यात माणुसकी जागी होती. म्हणुनच ज्यांचा संशय आला त्यांच्यावर पोलिसांचाच अत्याचार होताना पाहून, त्यांनीच धावपळ केली. शिवाय ती सामान्य माणसे होती म्हणुन त्यांनी इतका पुढाकार घेतला. त्यात्ला कोणीही आमिरचा कार्यक्रम बघणारा नसेल किंवा त्याला एसएमएस पाठवून रुपयाची पदरमोड करणारा नसेल. पण त्यांनी केले ते काम लाखमोलाचे आहे यात शंका नाही. एसएमएस पाठवणारे कोणीही पांढरपेशे तिथे असते तर त्यापैकी कोणी इतके कष्ट घेतले असते काय? शंकाच आहे. संशय आला म्हणुन त्यांनी या दोघांना पोलिसांच्या हवाली जरूर केले. पण ते निर्दोष आहेत आणि पोलिसच त्यांच्यावर अन्याय करतात दिसल्यावर त्याच सामान्य लोकांनी  निदान एक पाऊल तरी उचलले ना? मुंबई, दिल्ली, कोलकाता किंवा तत्सम मोठ्या शहरातील, किती सुशिक्षित व मध्यमवर्गीय तेवढा पुढाकार घेतील? आपला अनुभव काय आहे? कोण असल्या भानगडीत पडतो? त्यापेक्षा आपण काही बघितलेच नाही असा आव आणून आपण पाय काढता घेतो ना? याला शहरी अलिप्तता म्हणतात. रस्त्यावर असो, शेजारी असो, वस्तीत असो, याप्रकारचे अन्याय अत्याचार चालू असल्याचे आपल्याला ठाऊक असतात, आपल्याला दिसत असतात, माहित असतात, आपण त्याचे साक्षीदार असतो. पण कधी आपण त्यात हस्तक्षेप करून, त्यातल्या पिडीताला मदतीचा हात द्यायला पुढे येतो काय?

   आपल्याला आपण काही केले नाही याचे वैषम्य वाटत असते. त्याची एक अपराधी भावना आपल्या मनात बोचत असते. आपल्यातल्या नंपुसकत्वाचा आपल्यालाच संताप येत असतो. पण आपण त्याची वाच्यता कुठे करत नाही. जगासमोर उजळमाथ्याने वावरताना, आपणच आपल्या विवेकबुद्धीपासून तोंड लपवत असतो. आपल्याला शक्य होते, आपण मदत करू शकत होतो, पण काहीच केले नाही, अशी जी अपराधी भावना आपल्याला आतून छळत असते, त्यापासून आपल्याला मुक्ती हवी असते. आमिर खानच्या सत्यमेव जयतेला एक रुपयाचा एसएमएस पाठवला, मग त्या पापातून मुक्ती मिळाल्याचे मानसिक समाधान आपण मिळवत असतो. अशा सामाजिक, अन्यायनिवारण वा गरीबांच्या उद्धाराला पैशाची मदत करण्याला तिच अपराधी भावना आपल्याला भाग पाडत असते. कुठल्या तिर्थस्थानी देवस्थानी चेकने पैसे पाठवून अभिषेक, पुजा करून घेण्यासारखे आता पापमुक्त होण्याचे हे सोपे साधन आमिरने आपल्याला उपलब्ध करून दिले आहे. पण त्यातला पोकळपणा खुप जुना आहे. निदान दहा वर्षापुर्वीच्या त्या स्वातंत्रदिनाच्या बातमी इतका जुना आहे.   (क्रमश:)
भाग  ( २८२ )     १/६/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा