बुधवार, १३ जून, २०१२

आमिर कृपेनेच ठंडाचा मतलब कळला ना आपल्याला?


   अर्थात आमिरखान याने सत्यमेव जयते मालिकेच्या निमित्ताने जे विषय लोकांसमोर आणले ते नवे नसले तरी त्याकडे मोठ्या प्रमाणात जनतेचे लक्ष वेधले गेले. आमिरच्या लोकप्रियतेमुळे त्या विषयांचा गाजावाजा होतो आणि आपोआपच बड्या सत्ताधारी व प्रशासकीय मंडळींना त्यात लक्ष घालतो असे दाखवणे भाग पडते. सहाजिकच आमिर या मालिकेतून लोकजागृतीचे कार्य करतो असे वाटणे चुकीचे नाही. शेकडो लोक व संस्था अशा गंभीर क्षेत्रात कित्येक वर्षापासून काम करत आहेत. पण त्यांचे काम दुर्लक्षित राहिले आहे. त्यांच्या चांगल्या कामाकडे आमिरच्या या मालिकेमुळे लक्ष वेधले गेले हे तर कोणी नाकारू शकत नाही. म्हणूनच आमिरचे कौतुक होण्यात गैर काहीच नाही, असा दावा होऊ शकतो आणि तो मी चुकीचा म्हणणार नाही. पण म्हणून आमिरचे कौतुक करायचे असेल तर त्याच्या अशाच अनेक महान लोकजागृतीच्या कार्याकडेही माध्यमांनी अक्षम्य दुर्लक्ष केले हेसुद्धा मान्यच करावे लागेल. टाटा उद्योग समुह उत्तम दर्जाची घड्याळे निर्माण करतो. त्याकडे भारतीय समाजाचे अक्षम्य दुर्लक्ष होत राहिले. त्यावरही आमिरमुळेच प्रकाश पडला हे सत्य नाही काय? टायटन ह्या कंपनीची उत्तम दर्जेदार घड्याळे आमिरमुळेच सामान्य माणसाच्या नजरेत भरली. त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे आमिरमुळे खेड्यापाड्यातल्या गरीब सामान्य लोकांना ठंडा म्हणजे काय तेच ठाऊक नव्हते. रंगीत आंबटगोड व थंड पेयाला ठंडा म्हणतात अशा अज्ञानात भारतीय जनता चाचपडत होती. त्यापासून त्या ग्रामीण भारतीय जनतेला कोणी मुक्ती दिली? अमिरनेच नाही का? "ठंडा मतलब कोकाकोला" हे सत्यमेव असल्याचा साक्षात्कार भारतीयांना कोणी घडवला? आमिर नसता तर ते शक्य झाले असते का? आपण भारतीय किती महान असत्याला पारखे राहिलो असतो ना? आमिरच्या लोकजागृतीच्या उदात्त कार्याला तेव्हापासूनच आरंभ झाला. पण आज त्याचे वाहिन्यावरून गोडवे गाणार्‍या पत्रकारांना आमिरने सत्यमेवचा अवतार धारण करण्यापर्यंत त्याचा थांगपत्ताच लागला नव्हता. नाहीतर त्यांनी टायटन वा कोकाकोलाच्या जाहिराती झळकल्या तेव्हाच आमिरचे गुणगान सुरू  केले असते. पण सबसे तेज बातम्या देणार्‍यांना बातमी मोडून पडल्याशिवाय ब्रेकिंग न्यूज देता येत नाही ना? त्यामुळेच आमिरला सत्याची अशी मोडतोड करावी लागली, तेव्हा कुठे त्याच्या लोकजागृती कार्याची वाहिन्यांनी दखल घेतली.

   सत्यमेव जयते कार्यक्रमाचा पहिलाच भाग प्रदर्शित झाल्यावर आमिरने राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना भेटायचे सांगितले होते. त्यांनीही त्याला भेटायला उत्सुक असल्याचे पत्रकारांना सांगुन टाकले. पण राजस्थानचे आरोग्यमंत्री शर्मा म्हणुन आहेत, त्यांनी मात्र आमिरवर आळ घेतला. आमिर साडेतीन कोटी रुपये एका भागाचे घेऊन धंदा करतो आहे, असा आरोप त्यांनी केला. तेव्हा आमिरने पत्रकार परिषद घेऊन त्यांचा दावा खोडून काढला होता. एका भागाची किंमत वाहिनीकडुन साडेतीन कोटी रुपये मिळत असली तरी ते सगळे मला मिळत नाहीत, असे त्याने सांगितले. त्यातूनच निर्मितीचा खर्च होतो. सगळा खर्च वजा जाता आमिरला फ़क्त एक कोटी रुपये मिळतात, असे त्यानेच सांगून टाकले आहे.  तेव्हा त्याबद्द्ल कोणी शंका घेण्याचे कारण नाही. तेवढेच नाही, तर आपल्या या समाजकार्य व लोकजागृती कार्यासाठी किती त्याग करतो, तेही आमिरने जाहिर केले. वर्षाकाठी शंभर कोटी रुपयांची तो जाहिरातीसाठी कंत्राटे करतो, असेही त्यानेच स्पष्ट केले आहे. त्याकडे सध्या पाठ फ़िरवून त्याने सर्व लक्ष सत्यमेव जिंकण्यासाठी केंद्रित केले आहे. इथे सर्व लक्ष केंद्रित करणे म्हणजे समजून घ्यायला हवे. त्याच्या मालिकेचे सर्व भाग तयार आहेत. त्यासाठी आमिरला वेळ देण्याची गरज नाही. मग सर्व लक्ष म्हणजे सर्व वेळ तो कशासाठी खर्च करतो आहे? तर त्या मालिकेला प्रेक्षकांकडून भरपुर प्रतिसाद मिळावा म्हणून वेळ व ताकद खर्च करतो आहे. त्याला व्यापारी भाषेत मार्केटींग वा प्रमोशन म्हणतात. त्यामुळेच रविवारी प्रक्षेपित झालेल्या भागावरील चर्चेत शुक्रवारी हजेरी लावणे, हा मालिकेच्या मार्केटींगचा भाग आहे. बघणार्‍या व ऐकणार्‍या प्रेक्षकाला ती समाजसेवा वाटत असेल, तर तो आमिरचा दोष नाही. ज्या वाहिन्या ते मार्केटींग सेवाभावी कार्य म्हणुन लोकांसमोर पेश करतात, तो त्यांचा दोष आहे, आमिरला त्यासाठी आरोपी म्हणता येणार नाही. थोडक्यात सगळेच तापल्या तव्यावर आपली पोळी भाजून घेत आहेत. पण सेवाभावाचा आव आणत आहेत.  

   आमिर स्वत: आणि त्याचे विविध क्षेत्रातले समर्थक या मालिकेतून त्याला समाजाविषयी अत्यंत संवेदनाशील कलावंत म्हणून लोकांसमोर पेश करीत आहेत. त्यात अर्थातच पत्रकार व माध्यमांचा मोठा समावेश आहे. पण आमिरला पेश करताना त्या पत्रकारांची विवेकबुद्धी, चिकित्सकबुद्धी एकदम निकामी का होते, त्याचे रहस्य मला उलगडत नाही. परवा कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल जिंकली तर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बानर्जी यांनी त्या संघाच्या सर्वच खेळाडूंचा मोठा जाहिर सत्कार घडवून आणला. त्यांना सर्वांना एक तोळ्याची सोनसाखळी बक्षिस म्हणुन दिली. त्या सोहळ्यावर पन्नास लाख सरकारी तिजोरीतून खर्च झाले. त्यावर पत्रकारांना किती शंका सुचल्या, त्याचा हिशोबच नाही. बंगालची बिघडलेली आर्थिक स्थिती सावरण्यासाठी केंद्राकडे २२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज मागणार्‍या ममता, खेळाडूंवर पन्नास लाख खर्च करतात कुठून; हा प्रश्न विचारला गेला. असा रास्त सवाल करणार्‍यांना आमिरला तसेच सवाल विचारण्याची बुद्धी का होत नाही? एक साधी गोष्ट घ्या. पाच एक वर्षापुर्वी आमिरने कोकाकोलाची सुंदर जाहिरात केली होती. कधी गुरखा बनून तर कधी हैद्राबादी बाप्या बनून "ठंडा मतलब कोकाकोला" हा महामंत्र त्याने खेडोपाडी पोहोचवला. त्या कोकाकोलाच्या बाटलीची किंमत किती आहे आणि उत्पादन खर्च किती आहे? ते पेय आरोग्याला किती पोषक वा अपायकारक आहे? पाच रुपये ज्याच्या उत्पादनाचा खर्च नाही ते बाटलीबंद पेय तीस पस्तीस रुपयात सामान्य माणसाला खरेदी करायला प्रवृत्त करण्यासाठी अमिरने करोडो रुपये जाहिरतीमधून कमावले. तेच पेय सामान्य दर्जाची कंपनी दहा रुपयांना सुद्धा विकू शकत असते. पण तिला ग्राहक मिळवताना मारामार असते. इथे करोडो रुपये अमिरखानवर उधळले मग कोकाकोला तेच पाच रुपयांचे पेय तीस पस्तीस रुपयात खेड्यापा्ड्यात घेऊन जाते. त्यातून कोणाची लूट होत असते? त्यापासून होणारे अपाय लपवून कंपनी जाहिरात करते आणि आमिर त्यात आपले खिसे भरण्यासाठी सहभागी होतो. तेव्हा अशा पेयप्राशनाने लोकांच्या आरोग्याला अपाय होतो, याची जाणीव त्याला असते काय?

   कथानकामध्ये कोणीतरी खलनायक आवश्यक असतो. त्याशिवाय कथेला थक्क करून सोडणारे वळण मिळत नाही. आणि कथा रंगवण्यात व परिणामकारक सादरीकरणात आमिर वाकबगार आहे. आपल्या प्रत्येक सिनेमातून त्याने त्याची साक्षच दिलेली आहे. त्यामुळे या मालिकेच्या प्रत्येक भागाचे व त्यात हाताळलेल्या विषयाचे मांडणीनुसार शोधक वृत्तीने विश्लेषण केले; तर त्यात कथा रंगवण्यासाठी कोणाला ना कोणाला तरी खलनायक म्हणून पेश केलेले दिसून येते. कधी तो खलनायक गर्भपात करणारा डॉक्टर असतो, तर कधी औषध उत्पादक कंपन्या असतात, कधी जातपंचायती, तर कधी हुंडा मागणार्‍या वडीलधार्‍यांना खलनायक केलेले असते. अनावश्यक चाचण्य़ा करून रोग्यांची लूटमार करणारे डॉक्टर आणि महागडी अनावश्यक पेये खपवणार्‍या कोकाकोला सारख्या कंपन्या यात नेमका किती फ़रक आहे? कुठले डॉक्टर अनावश्यक चाचण्या करून रोग्याची लूटमार करतात, कुठल्या कंपन्या निरुपद्रवी टॉनिक वा औषधे लोकांच्या गळी मारून पैसे कमावतात, यावर प्रकाश टाकणा‍र्‍या आमिरला बाटलीबंद पेयातून होणारी गरीब भारतीय जनतेची फ़सगत कधी कळलीच नाही काय? दुसर्‍यांकडे आरोपी म्हणून बोट दाखवताना आपण निदान स्वच्छ असावे किंवा भामटेगिरी करणार्‍या कंपन्यांना मदत करू नये; एवढेही आमिरला कळत नाही यावर कोणी विश्वास ठेवायचा? वेदनाशामक गोळ्या विकून लोकांची फ़सगत करणार्‍यांमध्ये आणि खाद्य पेयांच्या बाटल्या विकून खोटी कमाई करणार्‍य़ांच्या कमाईत कुठला फ़रक आहे? की आमिरने जाहिरात केली म्हणून कोकाकोला ही पवित्र पुण्यवंत कंपनी होते आणि बाकी सगळे नफ़ेखोर म्हणायचे? आमच्या माध्यमांची व पत्रकारांची विवेकबुद्धी कुठे शेण खाते आहे?  (क्रमश:)
 भाग  ( २८८ )    ७/६/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा