रविवार, १७ जून, २०१२

अच्छा लगना मोलाचे, अच्छा होना दुय्यम


   आमिरच्या सत्यमेव जयतेचे पहिले पाच भाग मी बघितले. पुढचे राहुन गेले आहेत. त्याच्यात आणि माझ्यात एक तफ़ावत आहे. त्याला तासाभरात जे बोलून सांगता येते, तेवढे तपासून लिहायचे तर मला दहा पंधरा लेख लिहावे लागतात. कारण मला चॅनेल उपलब्ध नाही. असो, त्याबद्दल माझी तक्रार नाही. पण दुसरी बाजू अशी, की तो सांगतो ते सत्य आहे की नाही, हे तपासणेसुद्धा आवश्यक आहे. तेव्हा त्याने मांडलेल्या विषयात जाण्यापेक्षा खुद्द आमिरच्याच जीवनातील घडामोडींचे उदाहरण घेऊ. 

क्या खुब लगती हो, बडी सुंदर दिखती हो,
फ़िरसे कहो, कहते रहो, अच्छा लगता है
जीवन का हर सपना अब सच्चा लगता है

   असे एक चित्रपट गीत मुकेशच्या आवाजात रेडीओवर सतत वाजत होते. त्या काळात आमिरसुद्धा तुमच्या माझ्यासारखा सामान्य माणूस होता. चित्रपट अभिनेता झालेला नव्हता. कॉलेजचा विद्यार्थी होता. त्यानेच एका मुलाखतीत ही गोष्ट सांगितली होती. तेव्हा अन्य तरूणांप्रमाणेच तोही प्रेमात पडला होता. त्यांच्या या प्रेमसंबंधांना घरच्यांची मान्यता मिळण्याची शक्यता कमी होती. म्हणुन मग त्य दोघा प्रेमवेड्यांनी चोरून कोर्टात जाऊन लग्न उरकले. पुन्हा आमिर आपल्या घरी आणि ती मुलगी तिच्या घरी गेली. पुढे हे प्रकरण उघडकीस आले आणि दोन्ही घरच्यांनी समजून घेतले. मग तेव्हा आमिर वा त्याच्या प्रेमात पडलेल्या त्या मुलीने आपल्या पालकांना विश्वासात का घेतले नव्हते? तर घरच्यांनी त्यांचे मानले नसते. त्यांच्या विवाहाच्या शाश्वतीबद्द्ल शंका काढल्या असत्या. त्यात असलेले दोष दाखवले असते. पण दोघेही प्रेमात बुडाले होते. अशा वेळी दुसर्‍याचे दिसणारे दोषही बघता येत नसतात. दिसत असले तर पटत नसतात. पण प्रेमात असल्याने एकमेकांशिवाय जगूही शकणार नाही, ही भावना प्रखर प्रभावी असते. तिच्यापुढे कुठलेही सत्य ऐकण्याची मानसिक तयारी नसते, तर समजून घेणे दुरची गोष्ट झाली. मात्र पंधरा सोळा वर्षात परिस्थिती खुप बदलली. त्याच आमिरने केलेल्या प्रेमविवाहातून दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. का अशी वेळ आली? तर जेव्हा वैवाहिक जीवन जगायला सुरूवात केली, तेव्हा दोघांना एकमेकांमधले दोष कळू लागले. जाणवू लागले. ज्यांना एकमेकांशिवाय जगणे अशक्य आहे असे वाटत होते, त्यांनाच एकमेकांसोबत जगणे अशक्य होऊन बसले. मग आजचे दोघांचे एकमेकांविषयीचे मत खरे आहे, की तेव्हा प्रेमात पडले असतानाची परस्पर भावनांची समजूत खरी होती?  

   तेव्हा त्या दोघांना काय वाटत होते तेच वरच्या गाण्यात सांगितलेले आहे. फ़िरसे कहो, कहते रहो अच्छा लगता आहे. जे ऐकायचे असते ते कानावर पडले मग खुप बरे वाटत असते. बरे वाटते म्हणून ते खरे वाटते. जीवनका हर सपना अब सच्चा लगता है. पण प्रत्यक्षात त्याचा व्यवहारी जीवनाशी काडीमात्र संबंध नसतो. जे खरे म्हणजे सच्चा वाटत असते, त्याचा सत्याशी तिळमात्र संबंध नसतो. तो भ्रम असतो. पण सुखावणारा भ्रम असतो. तो हवाहवासा वाटत असतो. जेव्हा त्या भ्रमाचा वास्तवाशी संबंध येतो आणि त्याचे चटके बसू लागतात, तेव्हा भ्रमनिरास होतो. मात्र तोपर्यंत व्हायचे ते नुकसान होऊन गेलेले असते. म्हणूनच आज आमिर सत्यमेव जयते अशी घोषणा करतो, तेव्हा मनाला खुप बरे वाटते. कोणीतरी आपला उद्धार करायला पुढे सरसावला, याचेच ते समाधान असते. मग समस्या सुटो किंवा न सुटो. ती सहजासहजी सुटणार ही कल्पनाच खुप सुखावह असते. चार दशकांपुर्वी इंदिरा गांधींनी आपल्या राजकीय विरोधकांना निकालात काढण्यासाठी अशीच गरीबी हटावची स्वप्ने दाखवली होती. त्यासाठी संस्थानिकांचे तनखे रद्दबातल करून टाकले. प्रमुख चौदा व्यापारी बॅंकांचे राष्ट्रीयीकरण करून टाकले. जणू आपण बॅंका गरीबांच्या हवाली केल्या, असाच त्यांचा थाट होता. आज आमिरवर लोक जेवढे फ़िदा झालेले नाहीत, तेवढे तेव्हा इंदिराजींवर लोक फ़िदा झाले होते. सर्व विरोधकांना पाल्यापाचोळ्य़ासारखे फ़ेकून देऊन लोकांनी इंदिराजींना डोक्यावर घेतले होते. कोणी इंदिरा गांधी यांच्या निर्णयाबद्दल शंका घेऊ लागला, तर सामान्य गरीबांना संताप येत असे. त्याला लगेच भांडवलदारांचा बगलबच्चा ठरवला जात असे. नुसते गरीब सामान्य नागरिकच नव्हेत, तर स्वत:ला बुद्धीमान राजकारणी समजणारे डावे मार्क्सवादी व समाजवादी देखिल इंदिराजींच्या त्या सत्यमेव जयतेवर बेहद्द खुश होते. अवघ्या पाच वर्षात त्यांना त्याचे चटके सोसावे लागले होते. सामान्य गरीबाचे दारिद्र्य अजून जिथल्या तिथे आहे.

   पण म्हणून पुढल्या पिढीतले कुठे धडा घ्यायला तयार आहेत? आम्हाला नवे नवे इंदिरा गांधी आमिरखान, उद्धारक हवेच असतात. कधी ते कुणा बुवा महाराजाच्या स्वरूपात आपल्या समोर येतात, निर्मल बाबा होऊन दरबारात कृपेचा सोपा मार्ग दाखवतात, तर कधी कुणाला तरी खलनायक ठरवून सोपे उपाय सुचीत करतात. निर्मल बाबाच्या दरबारात जाणार्‍याला त्याचे दुखणे ठाऊक नसते, त्याच्यावरची अवकृपा कोण करतो आहे, ते त्याला बाबांनी सांगावे लागते. इथे आपल्या शेजारी, परिसरात स्त्रीभॄणहत्या चालते, सोनोग्राफ़ीच्या सेंटरमध्ये काय चालते, विवाहितेचा हुंड्यासाठी छळ चालतो, मुलांना कोण किती त्रास देतो, डॉक्टर कसे लुबाडतात, चाचण्या उगाच घेतल्या जातात व त्यातून पैसे काढले जातात, हे सोन्याच्या खाणीत गाडलेले गुपीत होते काय? निदान अर्ध्या लोकसंख्येला ठाऊक असलेले ते गुपीत आहे. कदाचित आमिरलाच त्याचा थांगपत्ता नव्हता. त्याला त्यासाठी टीमकरवी संशोधन करून माहिती मिळवावी लागली. त्याने आमचे तिकडे लक्ष वेधावे, मग आम्ही चकीत झाल्याचा आव आणावा, हे सगळे ढोंग नाही काय? सर्वांना सर्वच ठाउक आहे. पण त्यात काहीही करायचे नाही. मग त्याबद्दल आमिरने आवाज उठवला म्हणुन आम्ही खुश आहोत. एका वाचकाने मला फ़ोन करून चांगला प्रश्न विचारला. मग आमिरने काय करायला हवे होते? त्याला दिलेले उत्तरच इथे नमूद करतो.

   तुम्ही आम्ही सोनिया गांधींच्या १० जनपथ निवासस्थानी गेलो तर पोलिस आपल्याला हाकून लावतील. जवळपास फ़िरकू देणार नाहीत. पण आमिरची गोष्ट तशी नाही. त्याचे तिथे स्वागतच होईल. त्याला सन्मानाने आत घेतले जाईल, सोनिया सर्व कामे बाजूला ठेवून त्याला भेट देतील. मग तिथे जाऊन आमिरने एकच आग्रह त्यांच्याकडे धरावा. सदतीस वर्षापुर्वी भारत सरकारला हाथी समितीने जो अहवाल दिला आहे, त्याच्यावरची धुळ जरा झटकावी. सरकारनेच नेमलेल्या त्या समितीच्या अहवालात जेनेरिक व जिवरक्षक औषधांच्या उत्पादन, विक्री व किंमती यांच्या संदर्भात शिफ़ारशी आहेत. क्रमाक्रमाने सर्व अशा औषधांच्या निर्मितीमधून ब्रॅन्ड नावे व उत्पादने बंद करावित; अशीही एक शिफ़ारस त्यात आहे. १९७५ सालातल्या त्या शिफ़ारशी अंमलात आल्या तर औषधांच्या किंमती अधिक वा अवाजवी असण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही. सोनियांपर्यंत जाऊन हे आमिरने केले असते तर? त्याची लोकप्रियता, वजन व प्रतिष्ठा यामुळे त्या विषयाला चालना मिळाली असती. प्रश्न तसा सुटला असता तर मात्र त्याला मालिकेत हा भाग बनवता व सादर करता आला नसता. पण समस्या तर सुटली असती. समजा सोनियांनी त्यात लक्ष घातले नसते तर आमिरला सरकारची धोरणेच कशी जनतेच्या लूटमारीला मोकाट रान देत आहेत, असेही सांगायची मोकळीक राहिली असती. हे तुम्हाला आम्हाला शक्य नाही, पण आमिरला शक्य आहे. पण त्याने केले नाही. हाथी समितीचा उल्लेखही त्याच्या सादरीकरणात नाही. यातला पाहिला व प्रमुख आरोपी सरकार आहे, त्याकडे साधा निर्देशही नाही. मग नुसताच हंगामा खडा करून काय साधले जाणार आहे? की सरकार नावाच्या प्रमुख आरोपीवरून लोकांचे लक्ष उडवण्यासाठीच आमिरने हंगामा खडा केला आहे?

   आपल्याला त्याची कुठे पर्वा आहे? आपण खुश आहोत. आमिरने आवाज उठवला खुप झाले. आपल्याला तरी प्रश्न सुटावा, समस्या उलगडावी अशी कुठे इच्छा आहे? आपल्याला फ़क्त आवाज उठवणरे हवे असतात. आवडणारे सत्य सांगणारे हवे असतात. किती पिढ्या गेल्या अशा? इंदिराजी, राजीव आणि आता राहूल आपल्या गरीबीचा किती मस्त व्यापार करत आहेत ना? पण गरीबीतून संकटातून आजारातून मुक्त कोणाला व्हायचे आहे? सत्याला कोणाला सामोरे जायचे आहे? आपल्याला आवडणारे सत्य हवे असते, ऐकायचे असते. मग कोणाला ऐकू येणार नाही असे आपण मनातल्या मनात गुणगुणत असतो, फ़िरसे कहो, कहते रहो, अच्छा लगता है. जीवनका हर सपना अब सच्चा लगता है. किती पिढ्या अशाच स्वप्नरंजनात गेल्या. स्वप्ने कधीच पुर्ण झाली नाहीत. व्हायची गरजही नाही. अच्छा लगना ही आपली गरज आहे. अच्छा होना नाही.  ( क्रमश:)
 भाग  ( २९७ )    १६/६/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा