बुधवार, १३ जून, २०१२

सत्यावरचे आंधळे प्रेम काय करते बघा


    सत्यावर काहीजणांचे इतके उत्कट प्रेम असते की सत्याचा विजय व्हावा, यासाठी कसलेही असत्य सांगण्याचीही त्यांची तयारी असते. - हेनरिक हायने

   हेनरिक हायने हा एक ज्येष्ठ जर्मन कवी आणि विचारवंत म्हणुन ओळखला जातो. त्याचे हे विधान अत्यंत विरोधाभासाचे वाटणारे आहे. जे सत्यावर प्रेम करतात तेच असत्याचा आधार कसे घेऊ शकतात, असाच प्रश्न पडेल. पण अशा थोर विद्वानांची विचारवंताची विधाने काळजीपुर्वक समजून घ्यावी लागतात. हेनरिक काय म्हणतात? ज्यांचे सत्यावर उत्कट प्रेम असते असे लोक, याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही एखादी बाब, मुद्दा किंवा गोष्ट, सत्य वा विचार म्हणून स्विकारता तोवर ठिक असते. पण जेव्हा तुम्ही तेच अंतिम सत्य आहे अशी ठाम समजूत करून घेता, तेव्हा गडबड सुरू होते. मग सत्य बाजूला पडते आणि जे आपले मत आहे, त्याचे आपण आग्रही होऊन जातो. ते तपासण्याची गरज उरत नाही, की त्याचा तपशील समजून घेण्याची आवश्यकता रहात नाही. किंबहूना त्याबद्दल कोणी नुसती शंका व्यक्त केली, तरी तुम्ही अगदी विचलित होऊन जाता. कुठल्याही साधूबाबा, बुवा महाराज किंवा नेत्याचे एकनिष्ठ अनुयायी बघा. त्यांच्या श्रद्धास्थानाबद्द्ल तुम्ही जरा शंका व्यक्त केली वा प्रश्न विचारले तरी ते चिडतात. त्यालाच उत्कट प्रेम म्हणतात. ज्याच्याविषयी आपल्या मनात शंका नसतेच, पण दुसर्‍या कोणाला शंका आली तरी आपल्याला सहन होत नाही. मग अशी श्रद्धावान माणसे आपल्याला भावलेल्या गोष्टी वा व्यक्ती यांच्या थोरवीचे अनेक खोटे किस्से सुद्धा तयार करून सांगू लागतात. कारण त्यांच्या लेखी सत्य दुय्यम होऊन जाते, जे त्यांना सत्य वाटलेले असते, त्यावरची त्यांची श्रद्धा त्यांना वाटेल ते करून समोरच्याला आपली बाजू पटवून देण्यासाठी प्रवृत्त करत असते.

   राहुल गांधी यांचीच गोष्ट घ्या. अचानक आठ वर्षापुर्वी राजकारणात आलेल्या त्या तरूणाबद्दल कॉग्रेस पक्षातील लोकांची श्रद्धा कशी काम करते? त्याच्यामुळे पक्षाला मोठा विजय मिळाला. सोनीया गांधींमुळे पक्षाला यश मिळाले, असेच दावे केले जातात ना? मागल्या लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशात कॉग्रेसच्या जागा वाढल्या तर राहुलच्या कार्यामुळेच वाढल्या, असाच दावा करण्यात आला होता ना? पण परवाच्या विचानसभा निवडणुकीत कॉग्रेससाठी राहुलने सर्व ताकद पणाला लावूनही पक्षाचा पराभव झाला, तेव्हा तेच कॉग्रेसजान काय बोलत होते? पराभव राहुलमुळे नाही कार्यकर्यांमुळे झाला. विजय झाला तर राहुलची किमया आणि पराभव झाला तर अनुयायाची नालायकी. हा कसला विरोधाभास आहे? तर राहुल वा सोनिया चुकत नाहीत, यावरची गाढ श्रद्धा त्याला कारण असते. आणि असे कोणी किरकोळ सामान्य कार्यकर्ता म्हणत नाही. तर दहा वर्षे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्रीपद भुषवलेला दिग्विजय सिंग यांच्यासारखा बुजूर्ग नेता म्हणतो. त्यात ढोंग आहे व खोटेपणाही आहेच. पण आपण सांगतो ते सत्य असल्याचा आव सिंग नेहमी आणतात की नाही? राहुल वा नेहरू परिवारातील कुणाचेही राजकीय कर्तृत्व महान असल्याचे त्यांनाच वाटते असे नाही. कुशाग्र बुद्धीचे संपादक विचारवंत कुमार केतकर सुद्धा त्याच भाषेत पण अधिक युक्तीवादाने बोलतात. पण त्यांच्या त्या श्रद्धेत काडीमात्र फ़रक नसतो. अशा विद्वानांची जर ही अवस्था असेल तर सामान्य माणसाचे काय होत असेल? सत्य आपल्यालाच गवसले आहे, अशी धारणा झाली मग त्या सत्याची एक पक्की अंधश्रद्धा बनुन जात असते. तिच्याबद्दल शंका घेणे, संशय व्यक्त करणे माणसाला प्रक्षुब्ध करते. मग ती श्रद्धा निर्मलबाबा किंवा असारामबापू यांच्याबद्दलची असो, किंवा एखाद्या राजकीय विचार सिद्धांताबद्दलची असो. आपले सत्य सांगणासाठी बेधडक खोटे बोलायलाही माणसे कमी करीत नाहीत.

   थोडक्यात "सत्यमेव जयते" असे नुसते म्हणून भागत नाही, त्या सत्याचा विजय होण्यासाठी कित्येक असत्यांचा आधार घ्यावा लागत असतो. हा जगाचाच न्याय आहे. मग त्यातून आमिरखानला कसा अपवाद करता येईल? त्यानेही आपल्या कार्यक्रमाचे नावच सत्याचा विजय ठेवलेले असेल तर त्याचा विजय घडवून आणणे त्याला भागच आहे. मग जिथे त्याला गवसलेले सत्य पराभूत व्हायची वेळ येईल तेव्हा त्यालाही असत्याची वा अर्धवट सत्याची कास धरणे भागच पडणार ना? आता मागल्या रविवारच्याच त्याच्या कार्यक्रमाचा तपशील बघा. प्रेमाचे संबंध, त्यातून उद्भवलेली भांडणे, वाद वितुष्टे व त्यात समाज म्हणुन होणारा हस्तक्षेप; याचा उहापोह आमिरने केला. त्यात त्याने दुसरी बाजू म्हणुन खाप पंचायतींना बोलावले होते. पण असा हस्तक्षेप करून प्रेमवीर वा विवाहसंबंधात ढवळाढवळ शरीयत पंचायती वा काजी, मौलवी सुद्धा करतात. त्यांचा कुठलाही उल्लेख आमिरच्या त्या चर्चेत नव्हता. इमराना बानू नामक विवाहितेच्या बाबतीत काय झाले होते? तिच्यावर तिच्याच सासर्‍याने बलात्कार केला. तर त्याला शिक्षा देणे राहिले बाजूला. देवबंद या सुन्नी धर्मपीठाने इमराना आता सासर्‍याची पत्नी झाली व तिच्या पतीने तिला आई मानावे; असा निकाल दिला होता. तो शरियतीच्या आधारे केलेला हस्तक्षेप नव्हता काय? खाप पंचायतींना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करून त्यांची घटनात्मकता किंवा कायदेशीरपणा तपासणार्‍या आमिरला शरीयत पंचायतींना कायदेशीर मान्यता आहे, असे म्हणायचे आहे काय? नसेल तर एकट्या खाप पंचायतीच्या सदस्यांना खलनायक म्हणुन रंगवण्याचे कारण काय? ओरिसामध्ये अशीच घटना घडली होती. एका दारूड्या पतीने तीनदा नशेतच रागाने पत्नीला तलाक दिला. नशा उतरल्यावर त्याने पश्चात्ताप व्यक्त केला. पण त्याला पुन्हा पत्नीसोबत संसार करायला कोणी प्रतिबंध घातला होता?

   थोडक्यात जे खाप पंचायतीचे आहे तेच शरीयत पंचायतीही करतात. जातबाह्य, बिरादरीबाह्य विवाहातून हत्या फ़क्त जाट पंजाबी वा राजस्थानी लोकातच होत नाहीत. अगदी अलिकडेच ब्रिटनमध्ये वास्तव्य करणार्‍या दोघा पाकिस्तानी मुस्लिमांना घरच्या मुलीच्या तशाच हत्येप्रकरणी शिक्षा फ़र्मावण्यात आली आहे. त्या मुलीची हत्या ब्रिटनमध्ये झाली. म्हणजेच हा मामला भारतापुरता मर्यादित नाही. तो जाट हिंदुंपुरता मर्यादीत नाही. मग खाप पंचायतीला आरोपी बनवण्यात सत्य किती व अर्धसत्य किती? खाप पंचायती देशाची घटना मानतात की नाही? देशातले कायदे जुमानतात की नाही? असे प्रश्नही त्याने विचारले. पण अशा कार्यक्रमासाठी माहितीचे संशोधन करताना त्याच्या टीमला सर्वोच्च न्यायालयालाही आलेली शंका का सापडली नाही? शहाबानू खटल्याच्या निकालानंतरचे वादळ का आठवले नाही? शहाबानूला देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने न्याय दिला होता. घटना व कायद्याच्या आधारेच न्याय दिला होता. तो मानला गेला होता काय? त्याच्या विरोधात काहुर कोणी माजवले होते? तो न्यायालयाचा निवाडा कोणी फ़िरवून घेतला? कायदा व घटना फ़क्त खाप पंचायतींनीच पाळली पाहिजे आणि शरियत पुढे करून कायद्याला गुंडाळून ठेवणार्‍यांचे काय? त्याचा उल्लेखही आमिर का करत नाही? नसेल तर तो सत्य सांगतो की त्याच्या मनात आहे तेच सत्य ठरवण्यासाठी असत्य व अर्धसत्याचा आधार घेतो? जी गोष्ट प्रेमविवाहाची तिच औषधविषयक गल्लतीची आहे. मेडिकल पेशावर आरोप व संशय व्यक्त करताना किती सावधपणे त्याने मांडणी करायला हवी होती? पण त्याचे भान ठेवले गेले नाही. कोण्या एका अधिकार्‍याला आणून "जेनेरिक दवाईया" असा शब्द लोकांच्या डोक्यात भरवून दिला. किती लोकांना जेनेरिक प्रकरण कळले? जेनेरिक व कॅन्सरसारख्या गंभीर आजाराच्या औषधांबद्दल सराईतपणे गल्लत करण्यात आली.

   आमिरने वैद्यकीय पेशात ज्या गैरप्रवृत्ती बोकाळल्या आहेत त्याबद्दल सत्य सांगण्याचा आव आणत अनेक अर्धसत्ये लोकांच्या गळी मारली आहेत. आरोग्य हा असा विषय आहे की त्यात चुकीचे औषध हे अनेकदा रोगापेक्षा भयंकर धोकादायक असते. त्याचप्रमाणे अशा विषयात अर्धवट व चुकीची माहिती लोकांच्या गळी सत्य म्हणुन उतरवणे धोकादायक आहे. त्यातल्या जेनेरिक व महागड्या औषधांबद्दल मी उद्या वेगळा विषय मांडणार आहे. एखादी कंपनी महाग औषधे विकते, प्रचंड किंमत लावते असे म्हटले मग कोणालाही रागच येणार. पण त्या कंपनीची वा अशा औषध उत्पादकांची काहीच बाजू नाही काय? लाखो लोकांच्या डोळ्यादेखत शेकडो निरपराधांचे बळी घेणार्‍या अजमल कसाबलाही आपली बाजू न्यायलयात मांडण्याची संधी देण्यात आली होती. पण इथे औषध कंपन्यांवर आरोपपत्र ठेवून त्यांना आमिर फ़ासावरही लटकावून मोकळा झाला आहे. त्यांना लूटारू ठरवून झालेले आहे. त्यातले असत्य व अर्धसत्य उद्या तपासूया.    ( क्रमश:)
 भाग  ( २८९ )    ८/६/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा