बुधवार, १३ जून, २०१२

महागडे मांजर विकत घेतल्यास घोडा फ़ुकट


   एका गावात एक अत्यंत कंजुष सावकार रहात असतो. लोकांना कर्ज द्यायचे त्यावर दामदुप्पट व्याज वसून करायचे, हा त्याचा धंदा असतो. त्यात तो कुठल्याही भावना किंवा दयामाया मध्ये येऊ देत नाही. असा तो सावकार म्हातारा होतो आणि त्याला मरणाचे वेध लागतात. तेव्हा त्याला पापपुण्य आठवते. मेल्यावर चित्रगुप्ताने पापपुण्याचा हिशोब विचारला तर काय, म्हणून तो कमालीचा व्यथित होतो आणि त्यावर एक उपाय शोधून काढतो. आपल्या तरूण मुलाला जवळ बोलावून अखेरची इच्छा प्रदर्शित करतो. मरणोत्तर आपल्या खात्यात एक तरी पुण्य जमा व्हावे म्हणून तो मुलाला सांगतो, की मरणानंतर आपला घोडा विकून त्याचे येतील ते पैसे एका ब्राह्मणाला दान करून टाक. म्हणजे दानाचे पुण्य आपल्या खात्यात जमा होईल. मुलगा मान्य करतो. मग निश्चिंत मनाने सावकार प्राण सोडतो. एव्हाना त्याच्या अखेरच्या इच्छेचा गावात गवगवा झालेला असतो. त्यामुळे ब्राह्मण खुश असतो. त्या कंजुषाकडुन मरणोत्तर का होइना, दक्षिणा मिळणार यासाठी ब्राह्मण खुश असतो. गावकरीही मनोमन म्हणत असतात, अखेर मृत्यू समोर पाहिला तेव्हाच शहाणपण सुचले. अशी कुजबुज अंत्ययात्रेत चालू असते. सर्वांना घोडा विकला जाण्याची व दानधर्म होण्याबद्दल उत्सुकता असते. यथावकाश अंत्यविधी व अन्य क्रियाकर्म पार पाडल्यावर सावकारपुत्र गाव गोळा करतो आणि लोकांना आपल्या बापाची अंतिम इच्छा कथन करतो व त्याप्रमाणे घोड्याच्या लिलावाची घोषणा करतो. विषय दान धर्माचा असल्याने सढळ हस्ते लिलावात सहभागी होण्याचेही आवाहन सावकारपुत्र करतो. मात्र या लिलावाच्या पद्धतीने लोक अचंबित झालेले असतात.

   बाजार चौकात त्याने बापाचा घोडा आणुन उभा केलेला असतो. त्या घोड्याच्या पाठीवर एक मांजर बसवलेली असते. ज्याला खरेदी करायची आहे लिलाव घ्यायचा आहे, त्याने मांजरासहीत घोडा एकत्र घेण्याची अट असते. लिलाव घोड्याचा नव्हेतर मांजराचा होणार असतो. कारण मयत बापाने घोडा विकायला सांगितलेले असते , लिलाव करायला सांगितलेले नसते. तेव्हा पुत्राने मांजराचा लिलाव पुकारलेला असतो. जो मांजर सर्वात अधिक किंमतीला खरेदी करील, त्याला फ़क्त एक रुपयात घोडा मिळणार विकत मिळणार असतो. मग लिलावाच्या बोली सुरू होतात. मांजराची किंमत हजारापासून पंचविस हजारापर्यंत जाते आणि लिलाव संपतो. खरेदीदाराकडून रोख पंचविस हजार एक रुपये तिथेच घेऊन सावकारपुत्र घोडा व मांजर त्याच्या हवाली करतो. नवा मालक मांजर सोडून देतो आणि घोड्यावर बसून निघून जातो. मग संपुर्ण गावाच्या साक्षीने सावकाराचा पुत्र घोड्याची मिळालेली किंमत म्हणून, तो एक रुपया ब्राह्मणाला दान करून टाकतो. बिचारा हुरळलेला ब्राह्मण रडवेला होतो. तर गाव सावकार पुत्राच्या चलाखीने अचंबित होऊन जातो. त्याने बापाला दिलेला शब्द पाळलेला असतो. घोडा विकून आलेली सर्व रक्कम दान केलेली असते. कोणी त्याबद्दल तक्रार करू शकत नसतो, की आक्षेप घेऊ शकत नाही. काटेकोर शब्दांचाच अर्थ लावायचा, तर पुत्राने बापाला दिलेला शब्द "अक्षरश:" पाळलेला असतो. पण खरोखरच बापाला हे अपेक्षित होते काय? घोड्याची किंमत बापाने ठरवून दिलेली नसते. पण घोड्याची किंमत एक रुपया असू शकते का? पण पुत्र अशी चलाखी करतो, की घोड्याची पुर्ण किंमत मिळते, पण ती दान द्यावी लागत नाही. व्यवहार चोख व स्पष्ट असतो, पारदर्शी असतो, पण म्हणून तेच सत्य असते का? "सत्यमेव" असते का? की तो सत्याचा फ़क्त आभास असतो?  

   अमिरखानच्या सत्यमेव जयते विषयात हा सावकार मध्येच कुठून आला, असे काही वाचकांना वाटू शकते. तर आमिरच्या व्यवहारी चातुर्याचा बारकावा समजून देण्यास ही गोष्ट मदतीची ठरेल, असे मला वाटले म्हणून ती इथे सांगितली. तिचा खरेपणा तपासण्याची गरज नाही. ते गाव कुठले किंवा असे कधी घडले, हे प्रश्न विचारू नयेत. ते गाव आणि तो सावकार पुत्र तुमच्या समोरच असतो. फ़क्त आपल्यासमोर इतका गोधळ माजवला जातो, की आपण त्याची चलाखी ओळखू शकत नसतो. ही गोष्ट व त्यातली व्यवहारी चलाखी नेमकी समजून घ्या, मग "सत्यमेव जयते"मधले सत्य ओळखायला अवघड उरणार नाही. रविवारी आमिरच्या सत्यमेव जयतेचा भाग प्रदर्शित केला जातो. त्यातून बघणार्‍याना हळवे करून सोडले जाते. त्यांना पुढाकार घ्यायला प्रोत्साहित केले जाते. एसएमएस किंवा देणगी द्यायला उत्तेजित केले जाते. त्यातून किती पैसे जमा होतात? परवा चौथ्या भागाच्या प्रक्षेपणानंतर पाच दिवसात जमा झालेली आठ लाख रुपयांची रक्कम, अधिक तेवढीच रिलायन्स फ़ाउंडेशनने दिलेली रक्कम मिळून सोळा लाख रुपयांचे चेक आमिरच्याच हस्ते शुक्रवारी स्टार माझा वाहिनीच्या कार्यक्रमात कुठल्यातरी संस्थेच्या प्रतिनिधीला सोपवण्यात आले.

   ( माफ़ करा, एबीपी माझा म्हणायला हवे. कारण जेव्हा चौथा भाग दाखवला तेव्हा जी वाहिनी स्टारमाझा होती ती पुढल्या चार दिवसात एबीपी माझा होऊन गेली. तिलाच नामांतरानंतर इतक्या दिवसांनी स्टारमाझा असे म्हणालो, तर प्रसन्ना जोशी किंवा राजीव खांडेकर मंडळी कान पिळतील आणि म्हणतील, भले आम्ही काय म्हणतो ते ऐकू नका, पण आधी उघडा डो्ळे, बघा नी्ट. बदलले काहीच नाही, सर्व काही तेच आहे. बदलले आहे फ़क्त नाव. तेव्हा चटकन स्टार माझा असे लिहून गेलो त्याबद्दल आधी त्यांची एबीपी माफ़ी मागतो.)

   अर्थात ही रक्कम पहिल्या पाच दिवसातली आहे. त्यानंतर देखील आणखी देणगीदार सहानुभूतीदार पुढे येतच असतील. तेव्हा ही रक्कम वाढत असणार यावर शंका काढण्याचे कारण नाही. पण अगदी पहिल्या भागाचे प्रक्षेपण झाल्यावर आतापर्यंत त्या पहिल्या संस्थेला निदान एक कोटी रुपये तरी मिळू शकले आहेत काय, याची शंका आहे. तसे असते तर त्याची एव्हाना मोठी जाहिरात "आमिरका असर" म्हणून नक्कीच झाली असती. ती झालेली नाही, म्हणजेच अजून एकाही भागाच्या प्रक्षेपणातून आमिरच्या उदात्त कार्याला एक कोटी रुपये दे्णगी रुपाने मिळू शकलेले नाहीत किंवा तो ज्या संस्थेला लाभार्थी ठरवतो त्यांनाही एक कोटी रुपयांचा लाभ झालेला नाही. पण तरी जो लाभ झाला तो त्यांच्यासाठी लॉटरीसारखा आहे यातही शंका नाही. इतक्या सोप्या मार्गाने वा सहज त्यांना इतक्या मोठ्या रकमेची देणगी मिळाली नसती, ती मिळाली आहे. शिवाय इतक्या प्रचंड प्रमाणात त्यांच्या कामाविषयी लोकांना माहितीही झाली नसती. त्यामुळेच आमिरने लोकजागृतीचे कार्य केले हे कोणी नाकारू शकणार नाही. पण ही जागृती करताना त्याच्या पदरात काय पडले आणि ज्या संस्थांचा मदतीसाठी आमिर आवाहन करतो त्यांच्या वाट्य़ाला काय आले?

   आमिर एका भागासाठी साडेतीन कोटी रुपये घेतो. त्यातले त्याला व्यक्तीगत एक कोटी रुपये मि्ळतात असे त्यानेच जाहिरपणे सांगितले आहे. पण तेवढीही रक्कम संबंधीत संस्थांच्या वाट्याला आलेली नाही. त्याच्या टिमने संशोधन करून जी माहिती मिळवली, ती आमिर सांगत असतो, पाहुण्यांच्या बोलण्यातून मुद्दे उघड करत असतो, त्या क्षेत्रात अभ्यास व काम करणार्‍यांच्या मुलाखतीतून तपशील समोर आणत असतो, त्यातल्या पिडीतांनी भोगलेल्या यातना वेदना चित्रीत करून प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणत असतो. त्या बाकीच्या लोकांना, त्यांच्या मेहनत कष्टाला, यातना, अनुभवांना घोडा म्हणतात. आणि आमिरची त्यातली भूमिका मांजराइतकी नगण्य आहे. पण किंमत मांजराची द्यायची आणि घोडा फ़क्त एक रुपयात घेतोय आपण, सामान्य प्रेक्षक. आणि पुन्हा त्या सावकार पुत्राप्रमाणे आमिर मात्र घोड्याची किंमत दान केल्याचे पुण्य पदरात पाडून घेत असतो. तमाम माध्यमे व वाहिन्या त्याच्या त्याच पुण्यकर्माचे दिवसरात्र ढोल वाजवत असतात. सगळा व्यवहार नेमका त्या गोष्टीतल्या सारखाच नाही काय? मांजर घ्यावेच लागेल. मांजर घेतले, की घोडा रुपयात मिळतो. मोठमोठ्या बाजार काबीज करणार्‍या कंपन्या तरी काय वेगळे करत असतात? पन्नास लाखाचा फ़्लॅट विकत घेतल्यास मोटरबाईक फ़ुकट देण्याच्या योजना नाहीत? आमिरच्या या मालिकेचे कौतुक कोण करतो आहे? ज्या वाहिन्यांवर तो हजेरी लावतो त्यांनाच त्याचे कौतुक आहे. कारण आमिर तिथे हजेरी लावतो आणि त्यासाठी त्यांच्या वाहिनीची टीआरपी वाढते, मग जाहिरातीचे उत्पन्न वाढते. हा सगळा प्रकार त्या घोडा मांजर लिलावासारखाच मामला नाही काय? आमिरचे त्यातले योगदान काय? स्वामी रामदेव, आसाराम बापू यांच्या धर्मकार्य समाजेसेवा यातल्या आर्थिक व्यवहाराकडे भिंगातून बघणार्‍या पत्रकार वाहिन्यांना आमिरच्या सेवाभावातला धंदा दिसतच नाही? की त्यांच्या कॅमेरात तसे काही भिंगच नाही?    (क्रमश:)
 भाग  ( २८७ )    ६/६/१२

२ टिप्पण्या:

  1. भाऊ नमस्कार. तुमचे बरेच लेख मी वाचलेत. काही पटतात तर काही पटत नाहीत.पटलेत त्यावर कमेंट मी करत नाही. पण हा लेख नक्किच पटला नाही.
    आमिर खान एक कोटी मिळवो वा दहा कोटी मिळवो गरजवंताना काय फरक पडतो. त्याच्या शो मुळे काही गरजेच्या मुद्द्यांवर अगदी वरच्या थरापर्यंत विचार होतो. काहींना मानसिक बळ मिलते तर काहींना आर्थिक. समाजप्रबोधनाचे खुप मोठे कार्य घडते. अर्थात संशयाच्या चष्म्याने पहाल तर ते तुम्हाला दिसणार नाही. आणि मझ्यासरख्या लोकांना तर अश्या शो मुळे च कितीतरी समाजसेवकांची माहिती होते. तुम्हीच विचार करा ना. हल्ली समाजसेवक कितिजनांना माहित असतात? खरे हीरो हे लोक असतात पन आम्हाला शाहरुख़ ह्रितिक आमिर हीरो वटतात.
    आमिर करतोय ते स्तुत्य आहे. अपल्यासरख्या ज्येष्ठ पत्रकारकडून समाजहितास योग्य गोष्टींची पाठराखन अपेक्षित आहे पण तसे होताना दिसत नाही. दुर्दैव! बाकी अमिरला पैसा च कमवायचा असेल तर तो कसाहि कमवु शकतो ते ही सत्यमेव जयते च्या कित्येक पट. आणि एखादी कोटीभर रुपयांची देणगी आणि पेड आर्टिकल्स हीरो बनवायच काम करून टाकतील पण त्याने तो मार्ग स्वीकारलेला नाहिये. कृपया खुल्या मनाने विचार करावा.

    प्रत्युत्तर द्याहटवा