गुरुवार, १४ जून, २०१२

पावसाळ्यासोबत लेप्टोस्पायरोसिस येतोच कसा?


   साधारण पंचवीस तीस वर्षापुर्वीची गोष्ट आहे. तेव्हा मी श्री, लोकप्रभा अशा साप्ताहिकातून मुक्त पत्रकार म्हणुन लिखाण करत होतो. वसुंधरा पेंडसे नाईक तेव्हा लोकप्रभाच्या संपादक हो्त्या. माझा "मराठा" दैनिकातला जुना सहकारी प्रदीप वर्माही इथेच काम करत होता. आमच्या बरोबरच डॉ. सुखठणकर नावाचे एक स्तंभलेखक नियमित लिहित असत. एकदा अंधेरीला प्रदीपच्या घरी आम्ही मित्र गेलो असताना जवळच वास्तव्य असल्याने आम्ही डॉ. सुखठणकर यांना भेटायला व गप्पा मारायला गेलो. गप्पा छानच रंगल्या. आपल्या वैद्यकीय शिक्षण कालातील एक किस्सा त्यांनी सांगितला, तो मी कधीच विसरणार नाही. साधारण साठच्या दशकात ते वैद्यकीय विद्यार्थी होते. एकदा उशीरा डय़ूटी करत असतांना त्यांना लेप्टोस्पायरोसिस झालेला एक रोगी तपासण्याची अपुर्व संधी मिळाली. ती आठवण सांगतानाही ते खुप उत्तेजित झाले होते. त्याचे कारण असे, की त्या काळात त्या आजाराचा रोगी बघायलाही मिळत नसे. सहाजिकच त्या रोगाचा अभ्यास व निदाने विना प्रात्यक्षिक करावे लागत असे. जी माहिती पुस्कतातून उपलब्ध होती त्यावरच अवलंबून रहावे लागत असे. कारण मुंबईत तरी तो आजार दुर्मिळच होता. त्याची बाधा होऊ शकणारी माणसेच मुंबईत मर्यादित होती. सामान्य नागरिकाला तो आजार होऊच शकत नव्हता.

   मुंबईत जी भुयारी गटारे आहेत त्यात उतरून आतली घाण काढणारी जी मुले असतात, त्यांनाच तो आजार होण्याची शक्यता असायची. शिवाय ते काम अत्यंत धोक्याचे असल्याने सहसा ते काम अत्यावश्यक झाल्याशिवाय हाती घेतले जात नसे. अशा खोल भुयारी गटारात उंदराचे साम्राज्य असते. त्यातल्या कुणा उंदराला त्या आजाराची बाधा झालेली असेल व त्याची लघवी माणसाच्या जखमेत गेली; तर लेप्टोस्पायरोसिस होऊ शकतो. सहाजिकच अशी शक्यता खुपच दुर्मिळ असे. त्यामुळेच असा रुग्ण बघायलाच मिळत नसेल तर अभ्यासाला मिळणार कुठून. सुखठणकर यांना ती संधी मिळाली म्हणून अन्य सहकारी विद्यार्थ्यांना त्यांचा हेवा वाटला होता. आजच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना त्यांचा असा हेवा करायची गरज उरलेली नाही. कारण प्रत्येक पावसाळ्यात मुंबईत, ठाण्यात, कल्याण वा मुंबईशेजारच्या परिसरात काही हजार लोकांना लेप्टोस्पायरोसिसची बाधा होत असते. आणखी दहा पंधरा दिवस थांबा मुंबईत पाऊस कोसळू लागला, मग या आजाराची बाधा किती लोकांना झाली त्याच्या बातम्या तुम्हाला वाचायला मिळणारच आहेत. याला आजच्या पिढीतल्या नव्या वैद्यकीय विद्यार्थ्यांचे नशीब म्हणायचे की मुंबईकरांच्या दुर्दैवाचे दशावतार म्हणायचे?

   जेव्हा डॉ. सुखठणकर यांनी हा किस्सा सांगितला तेव्हाही म्हणजे १९८० च्या दशकातही मुंबईत लेप्टोस्पायरोसिस हा आजार दुर्मिळच होता. मग आज तो इतका का फ़ैलावला आहे? ज्या आजाराची बाधा होण्यासाठी खोल भुयारी गटारात उतरावे लागत होते, तो आता मुंबईच्या जमीनीवर व वस्तीत येऊन पोहोचला आहे. याचा साधा अर्थ इतकाच, की आता संपुर्ण मुंबईच आता एक गटार होऊन गेले आहे. जे सांडपाणी खोल भूयारी गटारातून जात होते ते पावसाळ्यात अतिवृष्टीने तुंबते आणि पृष्ठभागावर येते. त्याच्यासोबत लेप्टोस्पायरोसिस पृष्ठभागावर आला आहे. मग आम्ही त्या रोगाची बाधा झाली तर डॉक्टरकडे धावतो. त्याने आम्हाला स्वस्तात उपचार दिले पाहिजेत, कंपन्यांनी स्वस्तात औषधे दिली पाहिजेत. पण आम्ही निरोगी रहावे यासाठी कोणीच काही करणार नाही. मुंबईची सांडपाणी व्यवस्था चोख असेल, कचरा वे्ळच्या वेळी उचलला जाणार असेल, पिण्याचा पाणीपुरवठा शुद्ध होत असेल; तर आम्ही आजारी पडू काय? नाही ना? मग समस्या कुठे सुरू होते? आम्ही आजारी पडण्यापासून समस्या सुरू होते. पुर्वी ती समस्या मर्यादित होती आणि ती समोर आली तर आम्हाला कुठल्या डॉक्टरकडे दवाखान्यात धावावे लागत नव्हते.

   माझे सगळे बालपण, तरूणपण लालबाग या गिरण गावात गेले. कोणीही आजारी पडाला, काही गंभीर झाले तर आम्ही परळला केईएम किंवा आर्थर रोडच्या कस्तुरबा हॉस्पीटलमध्ये धावत जायचो. अर्धा अधिक परळ, लालबाग, नायगाव, शिवडी, वरळी पोयबावडीच्या वाडिया इस्पितळात जन्माला आलेला आहे. जेव्हा एखाद्या घरात खुपच हाताबाहेरची परिस्थिती निर्माण झाली तर डॉक्टर आणला जात होता. परिसरातही मोजकेच डॉक्टर होते. खाजगी दवाखाने व शुश्रुषालये तर मैल दिड मैलावरसुद्धा सापडत नसत. इतकी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था भक्कम व सुसज्ज होती. त्यामुळे कोणी डॉक्टर रोग्याला लुबाडण्याचा विषयच नव्हता. कारण आधी लोक खाजगी डॉक्टरकडे जाण्याचाच विषय येत नव्हता. जे यायचे त्यांना डॉक्टर विश्वास संपादन करण्यासाठी उत्तम व स्वस्त उपचार देत होते. सगळा गोंधळ सार्वजनिक आरोग्य व्यवस्था रसातळाला गेल्यामुळे निर्माण झाला आहे. ती व्यवस्था आम्ही तीस पस्तीस वर्षापुर्वी अनुभवत होतो, तेवढी जरी चोख राहिली असती, तरी आज आमिरला डॉक्टर नावाचा खलनायक रंगवता आला नसता. कारण लोकच ज्याच्याकडे जात नाहीत, तो त्यांना लुटण्याच्या योजना बनवणार कसा आणि लूटणार तरी कसा? सरकारने तुम्हा आम्हाला आरोग्याच्या बाबतीत वार्‍यावर सोडून दिले तिथून ही दुर्दशा निर्माण झाली आहे. पण या संबंधातल्या दोन्ही भागामध्ये आमिरने, त्याच आरोपी नंबर एक असलेल्या सार्वजनिक आरोग्य खाते वा सरकारबद्दल शब्दही उच्चारलेला नाही. की त्या आरोपीला सहीसलामत सोडवण्यासाठी आमिरने भलत्या दिशेने लोकांचे लक्ष वेधणारा असा मनोरंजक कार्यक्रम तयार केला?

   आजचे अनेक आजार वा रोग हे सरकारी बेशिस्त वा गैरकारभार व भ्रष्टाचार यातून आलेले आहेत. सार्वजनिक आरोग्य ही सरकरची जबाबदारी असते. त्याकडे पद्धतशीरपणे पाठ फ़िरवली गेली. मग जी माणसे रडत कुढत उपचारासाठी औषधांसाठी फ़िरू लागली, त्यांची शिकार धंदेवाईक श्वापदाने चालवली आहे. गिधाडांच्या, श्वापदांच्या तोंडी ज्याने आपल्याला दिले आहे, त्याचे नाव तरी आमिरने एकदा तरी घेतले आहे काय? आम्ही सरकारला करोडो रुपयांचा अप्रत्यक्ष कर भरतो, त्यातून शेकडो आरोग्यविषयक योजना राबवल्या जातात. त्याचे उपचार व औषधे आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत; याला खाजगी डॉक्टर वा औषध कंपन्या जबाबदार नाहीत. हक्काची आरोग्यसेवा नाकारून आपल्याला लाचार केलेल्या सरकारने आम्हाला त्या कसायांच्या कत्तलखान्यात धाडले आहे. त्याबद्दल कोणी बोलायचे? १९७० च्या दशकापर्यंत जशी उत्तम, विश्वासार्ह व सुसज्ज सार्वजनिक आरोग्य सेवा उपलब्ध होती, तशी असती तर कोण मरायला या महागड्या डॉक्टरकडे गेला असता? यात गुन्हेगार असेल तर ज्याने आम्हाला तिकडे जायला लाचार केले व भाग पाडले, तोच खरा आरोपी नाही काय? आमिर त्याबद्दल एक अक्षर तरी अजून बोलला आहे काय? का नाही बोलला? आपल्या टीमने संशोधन करून काढलेल्या माहितीनुसार, असे तो नेहमी सांगतो. त्या संशोधकांना देशात सत्तरच्या दशकांपर्यंत चांगली सार्वजनिक आरोग्यसेवा उपलब्ध होती, हे शोधूनही सापडले नाही काय, की सापडले पण त्याच भ्रष्ट सरकार, प्रशासन, आरोग्य खाते व तिथल्या भ्रष्टाचारावर पांघरुण घालण्यासाठी आमिरने हा हंगामा खडा केला आहे?

   ज्यांनी भ्रष्टाचार व गैरकारभारातून सार्वजनिक आरोग्याचा पुरता बट्ट्य़ाबोळ केला, त्यांनीच जर आमच्या हक्काच्या आरोग्यसेवेचा बोजवारा उडवला. तेच खरे गुन्हेगार आहेत. कारण ती हक्काची सेवा उपलब्ध असती, तर सामान्य माणसाला लाचार होऊन खाजगी आरोग्य सेवांकडे का जावे लागले असते? लक्षात घ्या मित्रांनो, ही सार्वजनिक आरोग्यसेवा म्हणजे सरकारची भीक नाही, तो कल्याणकारी लोकशाहीत आपला हक्क आहे. त्यासाठीच तर आपण प्रत्येक बारिकसारिक गोष्टीवर अप्रत्यक्ष कर भरत असतो. ते पैसे सरकारचे अधिकारी व भ्रष्ट मंत्री खाऊन फ़स्त करतात. मग आपण अगतिक होऊन खाजगी सोयीकडे वळतो. त्याने स्वस्त उपचार द्यावे, औषधे स्वस्त द्यावी, असा आग्रह धरणार्‍या आमिरने खर्‍या चोराबद्दल एकही शब्द का बोलू नये? तेच तर आजच्या आपल्या आरोग्यविषयक दुर्दशेचे ढळढळित सत्य आहे. आणि सत्यमेव जयते सादर करताना नेमके तेच सत्य लपवले किंवा दडपले गेले आहे. गटारातल्या लेप्टोस्पायरोसिसची परिकथा रंगवताना तो आपल्या दारापर्यंत येऊन पोहोचला आहे. पण सत्यमेव जयते असे मुठ आवळून सांगणारा आमचा सत्यवादी आमिर नेमक्या त्याच सत्याबद्दल मुग गिळून गप्प बसला आहे.  (क्रमश:)
भाग  ( २९६ )    १५/६/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा