बुधवार, १३ जून, २०१२

आमिरखान औषध निर्मिती करणार आहे का?


   दुसर्‍या महायुद्धाच्या कालखंडात डेंग्यु या आजाराचा जगभर प्रादुर्भाव झाला. मच्छर चावल्याने फ़ैलावणार्‍या या आजाराची पहिली ओळख एकोणिसाव्या शतकातच झालेली होती. पण तेव्हा तो आजार दक्षीण आशिया व आसपासच्या भागात मर्यादित होता. मात्र नंतरच्या काळात दोन महायुद्धांमुळे जी सैन्यांची सर्वत्र नेआण झाली, त्यातून हा आजार जगभर सर्व खंडात पसरत गेला. पॅसिफ़िक परिसरात तर जपानी व अमेरिकन फ़ौजेतील कित्येक हजार सैनिकांचा त्या रोगाने बळी घेतला. तेव्हापासून जपान व अमेरिकेने या औषधावर रामबाण उपाय शोधण्याचा अखंड प्रयत्न चालविला आहे. पण सात दशकांच्या काळात तो सापडू शकला नव्हता. फ़क्त याच दोन देशातील नव्हे, तर अनेक पुढारलेल्या देशातील अनेक संस्था व औषध कंपन्या डेंग्यूवर औषध शोधायला कायम धडपडत राहिल्या आहेत. हल्ली तर पावसाळा म्हटला, मग आपल्या देशातही डेंग्यु हजेरी लावत असतो. मुंबई असो की ढाका तिथे डेंग्यु वर्षभर मुक्कामाला असतोच. एका अभ्यासानुसार दरवर्षी जगात दहा कोटी लोकांना या रोगाची बाधा होतेच त्यात सर्वाधिक मुलांचा भरणा असतो. त्यातले वीस हजार रोगी त्याला बळी पडतात. मात्र इतक्या वर्षात अहोरात्र प्रयास करूनही त्यावर हमखास उपाय सापडलेला नाही. त्या रोगाची बाधा न होण्यासाठी उपाय शोधणे अखंड चालू असताना; आता प्रथमच तशी चिन्हे दिसू लागली आहेत. नेमक्या गेल्याच आठवड्यात ती शुभवार्ता आलेली आहे. येत्या दोन महिन्यात त्याची खातरजमा होईल असे सांगितले जात आहे. फ़्रान्सच्या सनोफ़ी या औषध कंपनीने ती लस दृष्टीपथात आणली आहे. त्या कंपनीला त्याच्या परिणामकारकतेची इतकी खात्री आहे, की त्यांनी या औषधाच्या उत्पादनासाठी नवा कारखानाच उभा करण्याचेही काम हाती घेतले आहे.

   सनोफ़ी कंपनी त्या कारखान्याच्या उभारणीवर तब्बल ३५ कोटी युरो किंवा ४४ कोटी डॉलर्स खर्च करीत आहे. त्याचा भारतीय रुपयात हिशोब २५०० कोटी असा होतो. याशिवाय इतकी वर्षे त्या औषधाच्या संशोधनावर झालेला खर्च वेगळाच आहे. तो सगळा हिशोब कितीही कमी करायला गेल्यास सहा आठ हजार कोटी रुपये इतका खर्च होतो. याला गुंतवणूक म्हणतात. एका औषधाच्या शोध, विकास, संशोधन, प्रयोग, प्रमाणीकरण यावर इतकी अफ़ाट रक्कम खर्च होते, तेव्हाच जीवरक्षक म्हणावे असे परिपुर्ण जालीम औषध उपलब्ध होत असते. ते काम एखादी कंपनी कशासाठी करील? त्यातून नफ़ा किंवा लाभ मिळावा हाच त्या कंपनीचा हेतू असणार ना? कुठलीही कंपनी समाजसेवा करत नसते. लोकांची गरज व आवश्यकता असेल तसे उत्पादन बनवून त्यातून नफ़ा कमावण्य़ासाठीच कंपन्या इतकी अफ़ाट गुंतवणूक करत नाहीत का? तसे नसते तर या कंपन्यांनी त्यात इतकी गुंतव्णूक केली असती का? इतकी गुंतवणूक मग, त्या गरजेचा पुरवठा करण्यातून वसूल होणार, याचा आशेवर ही गुंतवणूक केली जात असते. सनोफ़ी ही फ़्रेंच कंपनी त्याला अपवाद नाही. ती कंपनी खुश आहे कारण येत्या दोन वर्षात त्यांची अनेक औषधे पेटंट गमावून बसणार आहेत. तसे झाले तर हे नवे औषध त्या कंपनीला तगवू शकेल अशी त्यांना खात्री वाटते आहे. कारण हे खुप खप होणारे औषध पुढल्या काही वर्षात त्याच कंपनीकडून अवाघ्या जगाला खरेदी करावे लागणार आहे. त्यामुळेच खपाची कंपनीला चिंता नाही. याचे कारण म्हणजे दरवर्षी दहा कोटी लोकांना तरी डेंग्युची लागण होत असते. म्हणजेच त्यापासून उपाय हवा म्हणून किमान वीस कोटी तरी लोकांना याच औषधाचा डोस द्यावा लागणार आहे. म्हणजेच वर्षाला किमान वीस पंचवीस कोटी डोस तरी विकले जाणार याची कंपनीला जणू हमीच मिळालेली आहे.

   आता सवाल आहे तो त्यातून कसे व किती प्रमाणात नफ़ा काढायचा एवढाच. अजून तरी कंपनीने त्या डोसची किंमत ठरवलेली नाही. पण लोकांना परवडतील अशा किंमती ठेवण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला आहे. इथे परवडणे याचा अर्थ गुंतवलेली रक्कम व अन्य खर्च यांना हिशोबात घेऊनच काढावा लागेल. सहा आठ हजार कोटी रुपये नुसती गुंतवणूक धरली आणि प्रतिवर्षी त्यावरचे व्याज धरले तर त्याची भर उत्पादन खर्च, कच्चा माल, वितरण इत्यादींमध्ये जोडूनच किंमत ठरवली जाणार ना? दहा वर्षात शंभर कोटी डोस विकले जाणार धरले, तर त्या कंपनीला तेवढ्या शंभर कोटी डोसांवरच सगळी गुंतवणूक वसूल करायची आहे. कारण साधारण दहा वर्षात त्यांचे पेटंट म्हणजे उत्पादानची मक्तेदारी संपुष्टात येईल. याचा अर्थच असा, की शंभर कोटी डोस मक्तेदारीने बनवले तर प्रत्येक डोसमागे किमान साठ ते ऐंशी रुपये नुसत्या गुंतवणुकीचे चढतात. बाकीचा खर्च बाजूला ठेवा. ज्याचा उत्पादन, वितरण, वाहतुक, विक्रेता कमीशन, इत्यादी खर्चाशी संबंधच येत नाही, अशी ही किंमत त्या प्रत्येक डोसावर चढणार आहे. त्यामुळे प्राथमिक अंदाजानुसार त्या डोसची पहिली किंमत पाचशे ते हजार रुपयाच्या पलिकडे जाईल असे काही लोक सांगतात. याचा अर्थ काही महीन्यातच ते औषध बाजारात येणार आहे असे मानायचे कारण नाही. अजून ते प्रयोगावस्थेत आहे. थायलंडमधील ३००० मुलांवर त्याचे अखेरचे प्रयोग चालू आहेत. प्रारंभिक परिणाम उपयुक्त ठरल्याने कंपनी पुढली पावले उचलत आहे. तरी प्रत्यक्ष ते औषध सर्वांना आणखी तीन वर्षानी उपलब्ध होईल असे म्हटले जाते. जीवरक्षक अशा किंवा जीवनावश्यक औषधांच्या संशोधन, विकास व उत्पादनासाठी किती अफ़ाट प्रयास व गुंतवणुकीची गरज असते, त्याचा सामान्य जनतेला थांगपत्ता नसतो. त्याचा थोडा अंदाज यावा म्हणून ही एका औषध निर्मिती व संशोधनाची तोंडओळख इथे करून दिली.

अकारण औषध कंपन्या किंमती अधिक ठेवतात, गरीबांची लूटमार चालते, अफ़ाट नफ़ा कमावला जातो, असे जे बेछुटपणे सांगितले जाते, त्यातून सर्वच औषध कंपन्या म्हणजे लूटमार करणारे दरोडेखोर आहेत, अशीच एक प्रतिमा "सत्यमेव जयते"मधून उभी करण्यात आली. पण एक जीवरक्षक औषधाचा शोध त्यावरील गुंतवणूक वा त्यातले आर्थिक व्यवहार, तिथे स्पष्ट करण्यात आले नाहीत. त्यामुळे जीवनावश्यक, जीवरक्षक औषधे कवडीमोल किंमतीत तयार होतात आणि उगाच सामान्य जनतेची लूट केली जाते; अशी समजूत तयार करण्याचा प्रयत्न झाला असेच मला वाटते. ती निव्वळ दिशाभुल आहे. येत्या दोन वर्षात पंधरा वीस अशाच औषधांची पेटंट संपुष्टात येणार आहेत. त्यामुळे त्याची मक्तेदारी असलेल्या अनेक युरोपीय औषध कंपन्या डबघाईला जाणार आहेत. कारण पेटंट संपले मग त्यांनी शोधलेल्या औषधांची विनारॉयल्टी निर्मिती अन्य कुठलीही कंपनी करू शकणार आहे. पेटंट असेपर्यंतच गुंतवणूक वसूल करण्याच्या अटीमुळेच नव्या दुर्मिळ व जिवरक्षक औषधांच्या किंमती आभाळाला भिडणार्‍या असतात. एकदा त्यांचे पेटंट संपले तरी त्या कंपन्या किंमत अधिक ठेवू शकतात. पण त्यांचाच फ़ॉर्म्युला वापरून त्याच औषधाचे उत्पादन करणार्‍या अन्य कंपन्या त्याच औषधाची किंमत कमी ठेवु शकतात. त्यामुळेच किंमतीत मोठी तफ़ावत दिसते. फ़ॉर्म्युला एकच असला तरी मुळच्या कंपनीने आधीपासून बाजारात विश्वास संपादन केलेला असतो. म्हणुनच त्यांच्या महाग वाटणार्‍या औषधाचा आग्रह कोणी डॉक्टर धरत असेल, तर त्याला गुन्हेगार म्हणणे सोपे आहे. पण वस्तुस्थितीदर्शक नक्कीच नाही आणि म्हणूनच मी आमिरखान व औषध कंपनीच्या ब्रॅन्डची तुलना केली. दोन्हींना मिळणारी वा मागितली जाणारी अधिक किंमत त्याच्या विश्वासार्हतेशी संबंधित आहे. ज्या कारणास्तव आमिर सत्यमेव जयतेच्या एका भागाचे एक कोटी रुपये मागतो किंवा त्याच्या कुठल्या चित्रपटाच्या ओरिजिनल सीडीसाठी आमिर अधिक किंमत मागतो, त्याच कारणास्तव मुळ कंपनी आपल्या ब्रॅन्डच्या औषधासाठी अधिक किंमत लावत असते.

   आपल्या चित्रपटाच्या पायरेटे्ड म्हणजे डुप्लिकेट सीडी विकत घेऊ नका असा आग्रह धरणारा आमिरखान; इथे औषध क्षेत्रात मात्र कॉपी करणार्‍या व स्वस्त औषध विकणार्‍या कंपन्यांची वकीली करतो, तेव्हा गंमत वाटते. मग त्याही कंपन्या म्हणतील कशाला औषधांच्या धंद्यात राहून पापी ठरायचे? आपणसुद्धा नफ़ा कमवायचा तर चित्रपट काढू, मालिका बनवू, उपग्रह वाहिन्या चालवू. तिथे नफ़ा कसाही कमावण्यात पाप नाही आणि इथे जीवनावश्यक, जीवरक्षक औषधांच्या शोधासाठी करोडो डॉलर्सचा जुगार खेळून गुन्हेगार ठरायचे असेल, तर तिकडे चित्रपट, मालिकेत अफ़ाट नफ़ा कमावून साधू ठरणे कोणाला आवडणार नाही? त्या कंपन्यांचे काहीच बिघडणार नाही. समस्या उभी राहील ती औषध क्षेत्रात संशोधनासाठी अशी अफ़ाट गुंतवणुक संपल्याने उपाय उपचाराअभावी आजारांच्या दाढेत ढकलल्या जाणार्‍या सामान्य मानसाची. कारण औषधांचे संशोधनच ठप्प होऊन जाईल. मग ते काम आमिर वा त्याची टीम हाती घेणार आहे काय? ज्यांना गरीबांच्या दु:ख दैन्यासह वेदना यातनांचाही बाजार मांडून नफ़ा काढायचा आहे, ते गुंतवणूक बुडण्याची शक्यता असलेल्या औषध संशोधनाच्या उद्योगात पैसे घालणार आहेत काय? सगळा मामलाच पिलली लाईव्हसारखा चालू आहे ना? कुणाला आठवतो आमिरखान प्रॉडक्शनचा तो चित्रपट? पिपली लाईव्ह? त्यात कुठलीच भूमिका न करणारा आमिर इथे ते कथानक प्रत्यक्ष जगतो आहे का?   ( क्रमश:)
 भाग  ( २९१ )    १०/६/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा