बुधवार, २० जून, २०१२

आस्था आपुलकी नसलेले कोरडे सोहळे


   गेल्या शनिवारी इंग्रजीतला फ़ादर्सडे म्हणजे मराठीत पितृदिन साजरा झाला. भारतीय संस्कृतीमध्ये असले दिवस साजरे करण्याची आपली प्रथा नाही. पण मागल्या दोन दशकात जे जागतिकीकरण वेगाने दौडत सुटले आहे, त्यातून असे काही सणसोहळे परदेशातून आपल्याकडे येऊन प्रतिष्ठीत झाले आहेत. परदेशातून असे म्हणणे खरे तर चुकीचे आहे. अमेरिकेतून असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. कारण ज्या प्रकारचे व्हॅलेंटाईनडे, मदर्सडे किंवा फ़ादर्सडे इथे मध्यमवर्गात साजरे करण्याचे हल्ली पेव फ़ुटले आहे, ते आपल्यावर अमेरिकन व्यापारी आक्रमकतेने लादलेले आहेत. त्यात आस्था किंवा आपुलकी असण्यापेक्षा देखावा अधिक  असतो. सोहळे साजरे होतात, पण त्यामागची प्रेरणा कुठली असते, याचीच शंका येते. ३० जानेवारी रोजी आपल्या देशात हुतात्मा दिवस पुर्वापार चालत आलेला आहे. ज्या दिवशी महात्मा गांधी यांची हत्या झाली, तोच तो दिवस आहे. आजही तो साजरा होतो. पण ज्या शाळेत तो अगत्याने नियम म्हणुन साजरा होतो, तिथल्या शंभर मुलांना त्याबद्दल विचारले, तर दहा मुलांनाही त्याचे निमित्तही सांगता येणार नाही. पण त्याची गरजही नसते. सोहळा साजरा करण्याला महत्व आहे, त्याच्या निमित्ताला नाही. हेतू कुठलाही असो, आपण आपली मजा करायची. सॉरी, आपण आपले एन्जॉय करायचे असते. हल्ली साजरे काही होत नाही, एन्जॉय केले जाते. तसाच शनिवारी फ़ादर्स डे एन्जॉय करण्यात आला. 

   माझ्या बालपणी किंवा अगदी तरूणपणी असा दिवस असल्याचेही आम्हाला ठाऊक नव्हते. कुठल्या वृत्तपत्रातही त्याचा उल्लेख नसायचा किंवा त्याबद्दल लेख वगैरे प्रसि्द्ध झाल्याचे आठवत नाही. पण हल्ली असे दिवस मोठ्या ठाटामाटात साजरे होतात. आई किंवा बाप, ज्या कोणाचा दिवस असेल त्याला मुले शुभचिंतन करणारी छानपैकी कार्डेही देतात. वाहिन्यांपासून वृत्तपत्रात त्यासाठी काही लेखही येतात. अशाच एका लेखात माझाही उल्लेख आला. मराठी दैनिक लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत काही निवडक पित्यांनी आपल्या मुलींसाठी काय केले, त्याची माहिती देणारे लेख प्रसिद्ध झाले. त्यात माझ्यावरही एक लेख प्रसिद्ध झाला. प्रा. नितीन आरेकर यांनी आधी मी व माझी कन्या वसूद हिच्याशी हितगुज करून तो लिहिला होता. त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या. अर्थात चांगल्याच प्रतिक्रिया आल्या. कारण मी पत्रकार म्हणून खुप लोकांना ठाऊक असलो तरी एक चांगला व प्रामाणिक पालक होण्यासाठी मी केलेले प्रयास हा माझ्या आयुष्यातला खाजगी विषय राहिलेला आहे. जवलच्या परिचितांपलिकडे फ़ारशी कोणाला त्याबद्दल कल्पना नव्हती. यावर्षीच्या फ़ादर्सडेमुळे माझा तो चेहरा अनेकांना माहित झाला. अर्थात त्यात लपवण्यासारखे काहीच नव्हते. पण तरीही मी त्याला खाजगी जीवन मानतो. एक पालक म्हणून पार पाडलेल्या जबाबदार्‍या हा सार्वजनिक कौतुकाचा विषय होण्याचे काही कारण असू नये. ती प्रत्येक पालकाची व जन्मदात्याही जबाबदारीच असते. मग त्याचे कौतुक जगाला सांगायचे कशाला? फ़ारतर त्यातले उपयुक्त अनुभव जगाला जरूर सांगावे.

   असो. पण आता ते अनेकांना ठाऊकच झाले आहे, तर त्या निमित्ताने इथे काही उहापोह करायला हरकत नाही. गेले काही दिवस मी आमिर खानच्या सत्यमेव जयते कार्यक्रमाच्या निमित्ताने जे मतप्रदर्शन करतो आहे, तो पोकळ शहाणपणा आहे, असे काही लोकांना वाटले. त्यांनी तशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. मला त्याबद्दल अजिबात खेद नाही. प्रत्येकाचे आपले मत असते आणि त्यात वावगे काहीच नाही. जेव्हा आपल्याला संपुर्ण माहिती नसते आणि आपण मत बनवतो तेव्हा ते परिपुर्ण असण्याची शक्यता कमीच असते. माझ्या लिखाणाबद्दल तसे कोणाचे मत झाले, तर त्यात त्या व्यक्तीची काही चुक आहे असे मला वाटत नाही. कारण आजवर त्यांना भाषणातून वा लिखाणातून शहाणापणा शिकवणारे जसे लोक भेटले असतील, त्यावरच त्यांचे मत बनणार. मग तोच निकष त्यांनी पत्रकार लेखक म्हणुन मला लावला तर त्यात चुक काहीच नाही. आणि आजची स्थिती पाहिल्यास बहुतांशी जे आपण ऐकतो वा वाचतो, ते सांगणारे व लिहिणारेच त्याचा सहसा अवलंब करताना दिसत नाहीत. म्हणजे लोकांना एक उदात्त उपदेश करायचा आणि स्वत:च मात्र त्याकडे साफ़ पाठ फ़िरवायची. जर असेच विचारवंत आपल्या वाट्याला आले आणि वाचकाचे असे मत बनले, तर वाचक दोषी कसा? ज्याच्यावर विश्वास नाही ते केवळ उपचार म्हणुन साजरे करायला लिहायचे, असेच आज चालत असते. म्हणूनच मी जेव्हा बोरिवली ट्रेनमधल्या मुलीवरील बलात्काराचा विषय लिहिल्यावर एका वाचकाने फ़ोन करून विचारले, तुम्ही मध्ये पडला असता काय? मी असा हस्तक्षेप करतो व विकतचे दुखणे वास्तव आयुष्यात घेतो, हे त्या वाचकाला ठाऊकच नसेल, तर त्याने असे विचारणे मला गैर वाटले नाही. कारण आजचे पत्रकार संपादक वा जगाला शहाणपण शिकवणारे, स्वत:वर तसाच प्रसंग आला मग पळ काढतात, हाच त्याचा व अनेकांचा अनुभव आहे.

   माझी कहाणी तशी नाही. मी एका सामान्य घरात जन्मलो व सामान्य मुलासारखा वाढलो. कामगार कष्टकर्‍यात माझे तरूणपण गेले. त्यांच्या दुखण्याखुपण्यातला मी भागिदार होतो व आहे. त्यामुळेच मला गरीबी, त्यामुळे येणार्‍या समस्या, भेडसावणारी महागाई, दरवाढीचे आकडे, यांचे संशोधन करून माहिती गोळा करावी लागत नाही. मी ती जगत असतो, भोगत असतो. विवाहितेचा छळ, हुंडाबळी, मुलींची छेड काढणारी गुंडगिरी, रेशनच्या दुकानात होणारी हेराफ़ेरी अशा शेकडो समस्या मी भोगल्या आहेत व अनुभवत असतो. त्या सांगायला वा समजावून द्यायला आमिरखानच्या सत्यमेव जयतेच्या कुबड्या मला घ्याव्या लागत नाहीत. सभोवताली सोनोग्राफ़ी मशिनची व सेंटरची वाढणारी संख्या व त्यातून होणारा धंदा मी पाहू शकलो, ज्यांना आजच स्त्रीभृणहत्या होत असल्याचा अपुर्व शोध आमिरखानमुळे लागला, त्यांच्या माहितीसाठी सांगतो, की आम्ही हा विषय ३५ वर्षापुर्वी मांडला आहे. तेव्हाच्या "श्री" नामक साप्ताहिकात वसंत सोपारकर हा संपादक होता आणि आमची टीम तिथे लिहिण्याचे काम करत होती, तेव्हा १९७५ च्या सुमारास पुष्पा त्रिलोकेकर यांनी त्यावर प्रदिर्घ लेख तेव्हा लिहिला होता. लाखो लोकांनी तो वाचलाही होता. तो वाचणारे आज पन्नाशी साठीच्या घरात असतील. ज्यांना आज सत्यमेव जयते बघून धक्का बसला त्यांचे वडील किंवा आजोबा त्यावेळच्या श्री साप्ताहिकाचे वाचकही असू शकतील. सांगायचा मुद्दा इतकाच, की आम्ही तरूण पत्रकार होतो तेव्हा असे समाजहिताचे विषय अक्राळविक्राळ राक्षसी रुप धारण करण्यापुर्वीच वाचकांसमोर आणत होतो. आम्हाला कोणा आमिरखान किंवा अन्य अभिनेत्याने तशा समस्या दाखवण्याची कधीच गराज भासली नाही.  

   जेव्हा पुष्पा त्रिलोकेकर यांचा तो स्त्रीभॄणहत्येचा लेख प्रसिद्ध झाला होता, तेव्हा सोनोग्राफ़ीची यंत्रे अशी गावोगाव बोकाळलेली नव्हती. किंवा सहजगत्या कोणाला गर्भलिंग चिकित्सा करून घेण्याची सुविधा उपलब्ध नव्हती. पण तेव्हाही मुलगी असलेला गर्भ केवळ संशय व शंकेच्या आधारे मारण्याचे उद्योग चालू होते. ते आमच्यासारखे पत्रकार व नागरिक साध्या डोळ्याने पाहू शकत होते. त्याकडे जगाचे लक्ष वेधण्याची धडपड करत होते. त्याची कोणीतरी म्हणजे सरकारच नव्हे तर सामान्य समाजाने गंभीर दखल तेव्हाच घेतली असती, तर आज जो स्त्रीभृणहत्येचा अक्राळविक्राळ राक्षस भेडसावतो आहे, तो इतका अवाढव्य आकाराचा झाला तरी असता काय? पण मजेशीर गोष्ट बघा. त्यावेळी हा लेख पसिद्ध झाल्यावर कित्येक नाराज प्रतिक्रिया उमटल्या होत्या. नाराजी कसली असेल? इतक्या उघडपणे गर्भपात व स्त्रीगर्भाच्या हत्येविषयी लिहिणे शोभादायक आहे काय, अशी ती तक्रार वा नाराजी होती. आहे ना गम्मत? सत्य नाकारण्याची आपली मानसिकता किती चेंगट आहे बघा. तेव्हा अशा गोष्टी कशाला लिहायच्या, ही तक्रार होती. आज जे सत्यमेव म्हणून सांगितले जात आहे, त्यातले लपवलेले सत्य समोर आणले तरी तक्रार आहे.

पण बिघडत नाही. इतकी वर्षे पत्रकारिता करताना ज्याच्यावर माझा विश्वास आहे, ते लिहित व सांगत आलो, तसा वागत आलो. मी त्यात एकटाच नव्हतो. पंढरीनाथ सावंत, पुष्पा त्रिलोकेकर, वसंत सोपारकर, श्याम मोकाशी किंवा दिलीप जोशी वा प्रदीप वर्मा अशी आमची टोळी होती. आज त्यातला सोपारकर तेवढा काळाच्या पडद्याआड गेला आहे. पण आम्ही पत्रकारिता अशी केली, की लोकांना शहाणपण शिकवताना आपण जे सांगतो त्याच्यावर आमचा आधी विश्वास होता व आहे. जे स्वत:ला पटणार नाही, वा पटलेले नाही, ते सांगायचा देखावा आम्हाला कधी जमला नाही. आवडणारे सत्य लोकांना सांगणे खुप सोपे असते. पण नावडते सत्य सांगायला हिंमत लागते. त्याची किंमतही मोजावी लागते. आम्ही त्याची कधी पर्वा केली नाही. माझी ही पार्श्वभूमी ज्यांना ठाउकच नाही त्यांना माझे नावडते सत्य आवडणे अशक्यच आहे. म्हणुनच त्यांच्या ना्राजीने मला दु:ख नाही. कारण आजच्या बाजारी संस्क्तीमध्ये फ़ादर्सडे जसा सोहळा झाला आहे, तसाच सत्यमेव हा सुद्धा सोहळाच आहे. एक दिवस बापाला गिफ़्ट किंवा सुंदर कार्ड द्यायचे आणि मग त्याच बापाला आईला विसरून जायचे. तसेच दुसर्‍या दिवशी विसरायचे सत्य अखेरीस जिंकणार कसे तेवढेच मला कळत नाही.  ( क्रमश:)
भाग  ( ३०१ )    २०/६/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा