बुधवार, १३ जून, २०१२

अन्याय निवारण आणि सहानुभूतीची पळवाट


   आमिरखानने त्या वर्कशॉपमध्ये मुलांना ओरडा करून गाव गोळा करायला शिकवले. चांगले आहे. अन्याय अत्याचार सोसण्यापेक्षा ओरडा करावा, त्याविरुद्ध आवाज उठवावा ही शिकवण चुकीची नाही. पण त्याला दुसरीही बाजू आहे. नुसता ओरडा करणे व आवाज उठ्वणे एवढेच पुरेसे आहे काय? तसे असेल तर दहा वर्षापुर्वीही त्या लोकलमधल्या मतीमंद मुलीने किंकाळ्या फ़ोडल्या्च होत्या आणि त्या ऐकणारे शांतच बसले होते. त्यांनी कुठला हस्तक्षेप केला नव्हता. त्यांनी काय करायला हवे होते? एखादा गुंड हातात चाकू वा पिस्तुल घेऊन उभा असेल तर आपली त्याच्याशी दोन हात करायची हिंमत नसते, हे कोणालाही मान्य करावेच लागेल. कसाबची टोळी मुंबईत बेछूट गोळीबार करत फ़िरत होती, तेव्हा त्यांना निधड्या छातीने कोणी सामोरे गेले नाहीत, म्हणून कोणी पोलिसांची निर्भत्सना केलेली नाही. समोर मृत्यू दिसत असताना त्याला सामोरे जाण्यासाठी मोठे धाडस लागते. पण त्या लोकलमध्ये जो बलात्कार चालू होता, तेव्हा त्या गुंडाला रोखण्यासाठी त्याच्यावर थेट हल्ला करण्यापलिकडे अन्य उपायच नव्हता काय?

   धावत्या गाडीची साखळी ओढली तरी गाडी थांबू शकते. मध्यंतरी दोन स्थानके येऊन गेली, तेव्हा दरवाजापाशी जाऊन किंवा खिडकीतून बोंब ठोकली असती तरी धावाधाव बघून त्या गुंडाने पळ काढला असता ना? नसता तर स्थानकातले पाच दहा लोक तरी मदतीला धावून आले असते ना? त्यातल्या कोणा धाडसी माणसाने त्याला रोखले असते. पण त्या डब्यातल्या कोणालाही हे सोपे व सुरक्षित उपायसुद्धा योजण्याची इच्छा झाली नाही, की ते उपाय सुचले सुद्धा नाहीत. खरी समस्या तीच तर आहे. अन्यायाच्या प्रतिकाराची, तो रोखण्याची इच्छा व हिंमतच आपण गमावून बसलो आहोत. म्हणून तर त्या लोकलमध्ये तो बलात्कार होऊ शकला. परवा उत्तरप्रदेशच्या पोलिस चौकीत बलात्कार होऊ शकला. राजरोस बलात्कार होऊ शकतात. सवाल उपायाचा नसून आपल्या बधीरपणाचा आहे. आणि अंबरीशने त्याच बातमीतून त्याची प्रांजळ कबूली दिली आहे. "आमच्या मध्यमवर्गिय व्यवहारी शहाणपणाने आम्हाला बधीर करून टाकले होते," असे तो म्हणतो. दहा वर्षात नेमके काय बदलले आहे? आपल्यातला तो व्यवहारी जाणतेपणा संपला आहे काय? तो बधीरपणा संपला आहे काय? की तो व्यवहारी शहाणपणा अधिकच वाढला आहे? उपाय खुप आहेत. पण ते करण्यासाठी इच्छा व हिंमत हवी, तीच आज दिसेनाशी झाली आहे. ती वस्तूस्थिती आपण अमान्य केली, म्हणून तिचे परिणाम थांबणारे नाहीत. आपण अवतीभवती बघत व अनुभवत असतो, ते त्याच बधीरपणाचे दुष्परिणाम आहेत. पण कोणी त्या सत्याला हात घालू इच्छीत नाही. सत्य बोलायचे सुद्धा नाही आणि सत्य जिंकले पाहिजे, हे कसे साध्य होणार आहे, तेच मला कळत नाही. आमिरच्या कार्यक्रमाने समस्येकडे लोकांचे लक्ष वेधले गेले हे कोणी नाकारू शकणार नाही. पण ज्या समस्या आमिर मांडतो आहे, त्या आपल्याला चांगल्याच ठाऊक आहेत. त्याबद्दल आपण अनभिज्ञ नाही, की अपरिचित नाही. फ़रक आहे तो इतकाच, की त्याबद्दल कोणी बोलू इच्छीत नाही. आणि अमिरने तो विषय चव्हाट्यावर आणला आहे.

   म्हणजे असे, की ठराविक लोक त्याबद्दल लिहित असतात, बोलत असतात, त्यावर चर्चा रंगवल्या जातात, सेमिनार होतात. सरकारही त्यासाठी आश्वासने देते, कायदे बनवते. पण पुढे काय? इतर अनेक कायदे व योजनांप्रमाणे ते निर्णय धुळ खात पडून रहातात. कारण उपाय महत्वाचे नसून सार्वजनिक सहभाग महत्वाचा आहे. जसे त्या उत्तरप्रदेशातील लोकांनी पोलिस चौकीत चालू असलेल्या बलात्काराबद्दल हालचाल केली, त्यासाठी पुढाकार घेतला, ती जाणीव मोलाची आहे. पण तीच जाणीव आपण आज व्यवहारी शहाणपणाने झाकून टाकली आहे. निष्क्रिय करून टाकली आहे. रस्त्यात कुठेही मुलींची छेड काढणारे टपोरी पोरांचे टोळके दिसते, भोवती शेकडो लोकांची वर्दळ असते. किती लोक त्यात हस्तक्षेप करायला पुढाकार घेतात? त्या गुंडांना भोवतालच्या वर्दळीची भितीच वाटत नाही. समस्या तीच आहे ना? ती समस्या नाकारून पळ काढता येईल, पण तिच्या परिणामांपासून सुटता येत नाही. जे रस्त्यावरच्या त्या गुंडांचे आहे, तेच परळीमधल्या डॉ. मुंडे यांच्याही बाबतीत खरे आहे. तिथे काय चालते हे सर्वांना ठाऊक होते. जगजाहिर होते. त्याच मतदारसंघातुन आमदार झालेल्या पंकजा पालवे "लेक वाचवा" अशी मोहीम चालवतात. पण त्यांनी कधी मुंडे यांच्या कारवायांबद्दल आवाज उठवला होता का? पुणे सातारा भागातल्या वर्षा देशपांडे तिथे जाऊन एकाकी लढत असताना, किती स्थानिकांनी त्यांना साथ दिली? वर्षा देशपांडे यांना एकाकी लढायला सोडून पंकजा पालवे त्याबद्दल काहीच करत नव्हत्या. मग त्यांच्या मुलगी वाचवा मोहीमेचा खरेपणा कितीसा खरा मानायचा?

   इथे मला अमेरिकेतील कृष्णवर्णियांच्या लढ्याचे नेते व काळा गांधी मानले जाणारे डॉ. मार्टीन ल्युथर किंग ज्युनियर यांचे शब्द आठवतात, कधीतरी तिथला वर्णद्वेष, वर्णभेद संपेल हा त्यांचा आशावाद होता. म्हणुनच त्यांनी "हम होंगे कामयाब" या आशयाचे गीत लिहिले होते. पण जेव्हा कामयाब होऊन समानता येईल, यानंत्र लक्षात काय राहिल, तेही त्यांनी सांगितले आहे. ते म्हणतात, " जेव्हा आमच्या लढ्याची यशस्वी सांगता होईल, तेव्हा आमच्या शत्रूचे शब्द लक्षात रहाणार नाहीत. पण आमच्या मित्रांचे मौन व अलिप्तता कायमची आमच्या लक्षात राहिल."

   देशात व जगात समता व शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून आपले प्राण व सर्वस्व पणाला लावणार्‍या त्या थोरपुरूषाचे शब्द समजून घेण्य़ाची गरज आहे. लक्षात काय राहिल म्हणतात ते? शत्रूंचे शब्द नव्हे. ज्या शत्रूच्या शब्दांनी अवहेलना केली, अन्याय केला, अत्याचार केला, वेदना दिल्या, त्यापैकी काहीच लक्षात रहाणार नाही? वेदना, अपमान, यातना विसरून जाता येतात? मग मित्रांचे मौन वा अलिप्तता कशी व का लक्षात रहाते? परस्पर विरोधी वाटते ना हे विधान? पण तो विरोधाभास अजिबात नाही. ते मानवी स्वभावाचे निखळ सत्य आहे. शत्रूने दिलेल्या यातना, केलेला अपमान, अत्याचार, अन्याय यापेक्षाही मित्रांनी त्या कसोटीच्या प्रसंगी पाळलेले मौन, घेतलेली तटस्थ भूमिका किंवा दाखवलेली पाठ, अधिक वेदनादायी असते. मित्राची सहानुभूती व मदत त्या कसोटीच्या प्रसंगी लढण्याची व झुंजण्याची ताकद देत असते. त्यापासून शत्रूने वंचित ठेवलेले नसते तर मित्रानेचे पाठ फ़िरवून वंचित केलेले असते. म्हणुनच संकटप्रसंगी मित्राने पाठ फ़िरवणे, मौन पाळणे वा तटस्थ रहाणे अधिक दु:खद असते. यातनामय असते. त्या दिवशी लोकलमध्ये त्या मतिमंद मुलीसाठी ते सामान्य प्रवासी सहानुभूतीदार म्हणून तिचे मित्र होते. जेव्हा केव्हा बाजूच्या घरात विवाहितेचा छळ होत असतो, तरूणीवर कुठे अत्याचार, बलात्कार होत असतो, कुणा गरीबावर कोणी अन्याय करत असतो, तेव्हा त्याच्या बद्दल सहानुभूती असलेले आपण सगळेच त्यांचे मित्र असतो. पण त्यांच्या मदतीला जात नाही. म्हणजे त्याच्याकडे पाठच फ़िरवत असतो. आपले मौन वा त्रयस्थवृत्तीच त्याच्यावरच्या अन्यायाला बळ देत असते. त्याच्यावर अन्याय करतो, अत्याचार करतो, त्याच्यापेक्षा आपण गुन्हेगार असतो, कारण हस्तक्षेप करून ते पापकर्म थांबवणे आपल्याला शक्य असते. मात्र आपण पुढाकारच घ्यायला तयार नसतो. मग नुसत्या कोरड्या सहानुभूतीने काय साध्य होणार?

   आपणही हिंमत नाही म्हणुन मागे रहातो, मौन धारण करतो, तेव्हा प्रत्यक्षात आपण त्या अन्यायाला, अत्याचाराला व गुन्ह्याला मान्यताच देत असतो. आपल्याला रोखणारा कोणीही नाही, हे गुन्हेगाराचे, अन्यायकर्त्याचे सर्वात मोठे बळ असते. तुकाराम ओंबळेपाशी कुठले हत्यार नव्हते. पण हिंमत होती आणि ज्या कसाबला शस्त्रधारी वरिष्ठ अधिकारी रोखू शकले नाहीत त्याला ओंबळे रोखू शकला. पकडू शकला. कारण अवजार, हत्यार यापेक्षा त्याच्याकडली इच्छाशक्ती प्रबळ होती. उलट त्या लोकलमध्ये बलात्कार बघणार्‍या पाच प्रवाश्यांकडे अनेक उपाय होते, पण इच्छा नव्हती, की हिंमत नव्हती. सगळा फ़रक तिथेच पडतो. आमिरच्या वर्कशॉपमुळे सावध झालेली मुले मदतीसाठी ओरडतील, मदतीसाठी आपल्यापर्यंत एखादी तरूणी धावत सुद्धा घेईल. पण पुढले काम कोणी करायचे आहे? ते करायला आमिर नसेल. ते तुमचे आमचे काम आहे. ते आपल्या पुढाकारावर अवलंबून आहे. ती इच्छा वा हिंमत सत्यमेव जयते निर्माण करू शकला आहे काय? ती हिंमत एसएमएस पाठवून निर्माण झाली आहे काय? कुठल्या संस्थेला किती देणगी या कार्यक्रमातून मिळाली, म्हणून तुमच्यामाझ्यात ती कठीण समयी पुढाकार घेण्याची हिंमत व इच्छा जागली आहे काय? सहानुभूतीचे रुपांतर प्रतिकाराला सिद्ध करण्यात आमिर यशस्वी झाला आहे काय? की त्याच्या या कार्यक्रमाने तुमच्या माझ्यातल्या पळपुटेपणाला एक नवी पळवाट शोधून दिली आहे?      (क्रमश:)
भाग  ( २८४ )    ३/६/१२  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा