बुधवार, १३ जून, २०१२

गरीबांचे दु:ख दारिद्र्य सुद्धा विकावू माल असतो ना?


   27 मे 2012 च्या रविवारी प्रक्षेपित झालेल्या सत्यमेव जयतेच्या भागामध्ये वैद्यकीय व्यवसाय व औषध धंद्यावर आमिरचा रोख होता. त्यातल्या गैरप्रवृत्तीवर त्याने बोट ठेवले. कॅन्सरच्या कुठल्या औषधासाठी एक कंपनी सव्वा लाख रुपये घेते, तर त्याच गुणवत्तेच्या औषधासाठी दुसरी कंपनी पस्तिस हजार तर तिसरी कंपनी साडेसहा हजार रुपये किंमत घेते, असा गौप्यस्फ़ोट आमिरने केला. अगदी त्या धंद्याची जाण असलेल्या डॉक्टर वा जाणकारांची साक्ष काढून हा गौप्यस्फ़ोट केला. या कंपन्या नफ़्यासा्ठी लोकांच्या जीवाशी खेळतात, असेच ऐकणारा व बघणार्‍याला वाटणार. नव्हे तसे वाटलेच पाहिजे हा त्यामागचा हेतू होता. आमिर हा उत्तम अभिनेता आहे, त्याने आपल्या प्रत्येक चित्रपटात अभिनय व कथेने प्रेक्षकाला भारावून सोडले आहे. जे लोकांना सांगायचे ते त्यांच्या काळजाला जावून भिडले पाहिजे यावर त्याचा कटाक्ष असतो. "दिलपे लगेगी, तोही बात बनेगी", असेच तो सत्यमेवच्या जाहिरातीमध्येही म्हणतोच ना? त्यामुळे अशा कार्यक्रमातून त्याने जो खलनायक लोकांसमोर आणुन उभा केला, त्याबद्द्ल बघणार्‍याला कमालीची चीड आली, तर ते आमिरच्या अभिनयाचे यश मानायला हवे. पण म्हणुन त्याने जे पेश केले ते संपुर्ण सत्य आहे, असा जो आभास निर्माण केला जातो, तो कितपत खरा आहे? त्याची तपासणी कोणी करायची?

   जे औषध साडेसहा हजार रुपयात उपलब्ध आहे, तेच सव्वा लाखात का विकले जाते? वीसपट किंमत वाढलेली दिसली मग आपण चकीत होणारच. पण तोच सवाल थेट आमिरखान यालाही विचारता येईल. आणि याच त्याच्या समाज परिवर्तन मोहिमेच्या कार्यक्रमविषयी विचारता येईल. असे कार्यक्रम अनेक वाहिन्यावर चालूच असतात. समाजहित वा सामाजिक समस्यांवर अभ्यासपुर्ण कार्यक्रम अनेक वाहिन्या सातत्याने दाखवत असतात. काही त्यांनी स्वत:च निर्माण केलेले आहेत, तर काही बाहेरच्या निर्मात्यांनी त्यांना पुरवलेले असतात. त्यांना किती मोबदला मिळतो? आमिरच्या मालिकेतील एका भागाला साडे तीन कोटी रुपये मोबदला दिला जातो. तेवढी किंमत अशा कुठल्या कार्यक्रमाला आजवर देण्यात आली आहे? का दिलेली नाही? ज्याला टॉकशो, माहितीपट म्हणतात, तशाच स्वरूपाचा आमिरचा हा कार्यक्रम आहे ना? मग तशा अन्य कार्यक्रम मालिकांच्या एका भागाला इतकी प्रचंड किंमत का दिली गेली नाही? त्यांनीही समाजहिताचे व जनतेला भेडसावणारे विषय मांडले आहेत. पण त्यांच्या वाट्याला पाच दहा लाखापेक्षा जास्त मोबदला आला नाही. पण तशाच कार्यक्रमासाठी आमिर मात्र साडे तीन कोटी रुपये घेतो आहे. हा फ़रक कशाला?

   दोन्हीकडे विषय म्हणजे कच्चा माल तोच आहे, मांडणी तशीच समाजहिताची आहे. दोन्हीकडे समाजाच्या शोषणावरच बोट ठेवलेले आहे. मग मोबदल्यात इतकी प्रचंड तफ़ावत कशाला? तर सत्यमेव जयते आमिरखान सादर करतो आहे आणि आमिर हा ब्रॅंड आहे. आमिरचे नाव व त्याचा सहभाग त्या कार्यक्रमाची विश्वासार्हता वाढवतो, त्याचे "विकावू मुल्य वाढवतो". म्हणुनच पाच दहा लाखाचा माल एकदम आमिरच्या नुसत्या स्पर्शाने साडेतीन कोटी रुपयांचा होऊन जातो. जे किमतीचे प्रश्न विचारून, त्यातली तफ़ावत दाखवून आमिर आपल्या भुवया उंचावल्याचा अभिनय करतो, त्याच त्याच्या भुवया त्याच्याच मालिकेची किंमत मागताना का उंचावल्या नाहीत? मग त्या प्रचंड किंमत लावून औषधे विकणार्‍या कंपन्या आणि आमिरखान यांच्यात नेमका गुणात्मक फ़रक काय आहे? वर्षा देशपांडे यांच्यासारखी महिला कार्यकर्ती गेले कित्येक वर्षे स्त्रीगर्भ हत्येच्या विरोधात अविश्रांत लढते आहे. जीवावरचा धोका पत्करून पुरावे गोळा कर, गुन्हे नोंदव, साक्षीदार शोध, तक्रारदारांना हिंमत दे, खटले उभे कर; असे कष्ट उपसते आहे. तिच्याही मुलाखती व तपशील अनेक वाहिन्यांवर आले आहेत. त्यांना कुठल्या वाहिनीने किती मोबदला दिला? का नाही दिला? आयुष्य त्या विषयात घालवून, त्याच कार्यक्रमासाठी अशा धडपड्या कार्यकर्त्याना कधी कोणी हजार, लाख रुपये दिले नसतील. पण त्याचीच कलात्मक आकर्षक मांडणी केली म्हणून आमिर व्यक्तीगत एक कोटी रुपये घेणार. हा कुठला न्याय आहे? जे वर्षा देशपांडे तासाभरात तोंडपाठ सांगू शकतील आणि मोफ़त सांगू शकतील, त्याच्यासाठी आमिर एक कोटी रुपये का घेतो वा मागतो आहे? देणारेही त्याला का देत आहेत? त्यावर आणखी समाजसेवेचे सामाजिक बांधिलकीचे ढोल का पिटले जात आहेत? आयुष्य घालवून वर्षा देशपांडे यांचे जेवढे कौतूक झाले नाही, त्यापेक्षा आमिरवर अभिनंदनाचा वर्षाव का चालू आहे?

   यातला फ़रक थोडासा तेवढाच प्रचंड आहे. वर्षा देशपांडे हे काम व्रत म्हणून करतात. सामाजिक बांधीलकी म्हणून करतात, कर्तव्य म्हणुन करतात. आमिरची गोष्ट वेगळी आहे. आमिर त्याचा धंदा करतो आहे. म्हणून तर कुठल्याही वाहिनीवर जाऊन मानधनाची अपेक्षा न करता, वर्षाताई घसा कोरडा होईपर्यंत पोटतिडकीने बोलतात. त्यांना कोणी मोबदला देत नाही. पण "सत्यमेव जयते"मध्ये अधूनमधून ओलावलेले डोळे पुसण्यासाठी आमिरला एक कोटी रुपये मेहनताना मिळतो. हाच तो फ़रक आहे. तो कोणी सांगत नाही. त्याच्या कार्यक्रमानंतर आलेले एसएमएस, त्यातून जमलेली रक्कम यांचे कौतुक जोरात चालू आहे. पण मुख्य प्रश्न आहे, तो मी इथे कथन केलेल्या दोन व्यक्तींना मिळणार्‍या मोबदल्याचा. दोघांच्या मोबदल्यात इतकी प्रचंड तफ़ावत कशाला? त्याचे जे कारण आहे तेच दोन भिन्न किंमत मागणार्‍या औषध कंपन्यांच्या मालाच्या किंमतीतील तफ़ावतीचे आहे. आणि तोच नियम अगदी आमिरच्या मुख्य पोटापाण्याच्या उद्योगाला सुद्धा लागू पडतो. एखाद्या चित्रपटात काम करण्यासाठी आमिर किती मोबदला मागतो? त्याला एका भूमिकेसाठी जेवढा मोबदला दिला जातो, तेवढाच अन्य कुणा होतकरू अभिनेत्याला दिला जाईल काय? शाहिद कपुर, किंवा अतुल कुलकर्णी यांना एका चित्रपटात भूमिका करण्यासाठी जी रक्कम दिली जाते, तेवढीच आमिर घेतो का? त्यापेक्षा जास्त घेतो ना? आमिर व अतुल कुलकर्णी यांना एकाच भूमिकेसाठी द्यायच्या किंमतीत अशी तफ़ावत का असते? ती तफ़ावत आमिरच भरून काढू शकतो. जेवढे पैसे अतुल किंवा शहीदला देता, तेवढेच मला द्या, अधिक नको; असे आमिर म्हणेल काय? का नाही म्हणणार? औषधाच्या किंमतीत जर अवास्तव तफ़ावत नसली पाहिजे, तर तशीच तफ़ावत चित्रपटाच्या व्यवहारात का असावी?

   आहे ना गल्लत? जिथे आपली किंमत लावायची वेळ येते, तिथे सामाजिक बांधिलकी वा औदार्य रसातळाला जाते. तिथे आपण ब्रॅंड आहोत, म्हणून आपली किंमत वाढवून घ्यायची आणि तसेच जर औषधाच्या धंद्यात कोणी करत असेल तर ते पापकर्म आहे. ब्रॅंड म्हणजे तरी काय असते? त्या नावाची किंवा कंपनीची विश्वासार्हता असते. आमिर असला म्हणजे चित्रपट धंदा करणारच याची हमी असते. म्हणून घेणारा त्याला मागेल ती किंमत द्यायला राजी असतो. मग तो चित्रपटाचा निर्माता असो की वाहिनीवरचा व्यवस्थापक असो. आमिरसाठी गर्दी होणार याची खात्री त्याची किंमत ठरवत असते. विषय तोच असला तरी वर्षा देशपांडे याच्या नावाने प्रेक्षक वाहिनीवर गर्दी करणार नाहीत, म्हणून त्यांचे काम खरे असूनही त्यांना कोणी मोबदला देणार नाही. पण तेच विषय आमिर देखावा करून मांडत असेल तर एक कोटी रुपये देतात. तीच कथा नामवंत कंपन्यांची असते. ते ब्रॅंड म्हणून औषधे विकत असतात. तो ब्रॅंड प्रस्थापित करण्यात त्यांनी करोडो रुपये आधीच उधळलेले असतात. त्याची एकत्रित किंमत मालातून वसूल केली जात असते. आमिरने अशी आपल्या कलेची किंमत मिळवावी किंवा छानपैकी धंदा करावा याबद्दल माझा काहीही आक्षेप नाही. मुद्दा इतकाच आहे, की त्यासाठी त्याने त्याच्यासारख्याच अन्य धंदेवाईकांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न करू नये. ते काम वर्षा देशपांडे यांनी केले तर हरकत नाही. तत्सम लोकहितासाठी आयुष्य वाहून टाकलेल्यांना तो जरूर अधिकार आहे. पण आमिर तर धंदा करतो आहे. अगदी समाजहिताचा आणि लोकांच्या हालअपेष्टांचाही कसा धंदा होऊ शकतो, त्याचा त्याने उत्तम परिपाठच घालून दिला आहे. सर्वच माध्यमे आज आमिरचा प्रेषित म्हणून उदोउदो करत सुटली आहेत. पण प्रत्यक्षात त्याने एक छान लाभदायक धंदा करून दाखवला आहे. गरीबी दारिद्र्य, अन्याय, अत्याचार हा सुद्धा खपणारा विकावू माल आहेत. गरज आहे ती उत्तम सेल्समनची, हेच आमिरने या कार्यक्रमातून सिद्ध केले आहे. त्याची व्यावसायिक आकडेवारी उद्या तपासून बघुया.   ( क्रमश:)
 भाग  ( २८६ )    ५/६/१२

1 टिप्पणी:

  1. टि.व्ही.मेडिया आणि एडव्हर्टायझिंग इंडस्ट्री 30 ते 50 बिलियन डॉलर्स इतकी मोठी आहे. इथे दाखवल्या जाणार्या जाहिरातींद्वारे कंपन्यांचे उत्पन्न सुमारे 10% इतके वाढते म्हणजेच 300 बिलियन डॉलर्स एवढे ! अर्थात ही वाढ बचत करणारी सामान्य लोक आणि असंघटीत उत्पादक यांच्या खिशातून आलेली असते. तसेच वार्षिक GDP विकासात सुद्धा टि.व्ही. चा हातभार आहेच. काही दिवसांनी प्रेक्षकांना कार्यक्रम पहाण्यासाठी पैसे मोजले गेल्यास आश्चर्य वाटू नये.

    उत्तर द्याहटवा