बुधवार, २७ जून, २०१२

भा्वनाशून्य राज्यकर्त्यांचा कोरडेपणा  मंत्रालयाला लागलेल्या या आगीचे प्रवचन अजून काही दिवस चालणार आहे. पण सत्ताधार्‍यांना त्याची चिंता नाही. चिंतेचे कारणसुद्धा नाही. कारण दुसरी त्यापेक्षा मोठी दुर्घटना घडण्यापर्यंत अशी चर्चा होतच असते. मग दुसर्‍या घटनेच कौतुक सुरू होते आणि पहिली दुर्घटना विसरली जाते. म्हणुनच दुसर्‍या दुर्घटनेची बेगमी करणे, हे सत्ताधार्‍यांना आजच्या घटनेतून सुटण्याचा उत्तम मार्ग वाटू लागला आहे. चार दिवस, पंधरा दिवस किंवा महिनाभर बोंबाबोंब होईल. मग सर्वकाही विसरून जातील लोक आणि माघ्यमेसुद्धा. आणि समजा माध्यमे विसरायला तयार नसतील, तर त्यांचे लक्ष विचलित करायला आरएसएस किंवा सेक्युलर अशा "बायपास"ची सोय आहेच की. देशाला किंवा महाराष्ट्राला अशा महापुर वा आगीच्या संकटांपासून कुठलाही धोका नाही. धोका आहे तो जातियवादाचा. अशी संकटे आपत्ती पचवायची सवय लोकांना आता लागली आहे. कधी अतिवृष्टीमुळे मुंबई बुडून जाते, महापुराने गावेच्यागावे जलमय होतात. दुष्काळाने लाखो लोकांचे संसार उध्वस्त होतात. कर्जाच्या बोज्याखाली शेतकरी आत्महत्या करतो. तुरूंगात कैद्यांच्या हत्या होतात. नक्षलवादी अधिकारी सरपंचाला पळवून नेतात. कुपोषणाने बालके मरतात. त्यातली जिवितहानी कमी झाली तर सरकारी प्रशासनाच्या आशीर्वादाने चाललेले दवाखाने गर्भपातातून महिलांना मारत असतात. अशा घटना चालुच आहेत. त्यांचा गवगवा तेवढ्यापुरता असतो. भ्रष्टाचार, घोटाळे, अफ़रातफ़री चालू आहेत. महागाईने सामान्य माणसाचा जीव मेटाकुटीला आला आहे. पण कुठे काय बिघडले आहे? छानपैकी कॉग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येत आहेतच ना? येणारच, कारण ज्या समस्या अशा तात्कालीन घटना दुर्घटनांमधून गाजवल्या जात असतात, त्या समस्याच नाहीत. खरी समस्या आहे, ती जातियवाद आणि सेक्युलर लढाईची. त्यामुळेच अशा मंत्रालय जळून खाक होण्याची कोणीही चिंता करणार नाही. चार दिवसानंतर लोक विसरून जातील, की मंत्रालय नावाची काही वस्तू किंवा वास्तू अस्तित्वात होती. तिच्याकडे महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणुन बघितले जायचे, याचे कुणाला स्मरणही उरणार नाही. 

   त्याच मंत्रालयावर देशाचा तिरंगा फ़डकतो आहे, तो त्या आगीत भस्मसात होऊ नये म्हणून जे तिथेच धुमसत्या गच्चीवर ठाण मांडून बसतात, ते काही मुर्ख असतात. कुठल्या चॅनेलवर एक मानचिन्ह मिळवण्यासाठी ते जीवाची बाजी लावतात. खरे शहाणे असतात, ते पृथ्वीराज चव्हाण किंवा अजितदादा पवार. मंत्रालयाला आग लागल्यावर तिथून आपला जीव वाचवायला पळ काढतात ते मोठे असतात. कारण आपण जगलो तर अशी शंभर मंत्रालये पुन्हा बांधू शकतो, हे त्यांना ठाऊक असते. बाकी त्या वास्तू वा इमारती व तिच्याशी जोडलेल्या स्मृती. भावना, आठवणींशी आपला स्वाभिमान जोडणारे तुमच्या आमच्यासारखे बेअक्कल करोडो असतात. मग त्याच मंत्रालयात यशवंतरावांनी आणलेला संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश होता, पंडित नेहरूंचा अस्थीकलश होता, असल्या भावनांमध्ये आपण गुरफ़टून पडतो. त्याला व्यवहार म्हणता येत नाही. नाही तर आमच्या आमदार जितेंद्र आव्हाढांचे पितृतुल्य शरदराव पवार बघा. मंत्रालय जळून खाक झाल्यावर शुक्रवारी तिथे आलेल्या पवारांनी त्रयस्थपणे ती इमारत आता पाडून नवी टोलेजंग वास्तू बांधावी असे सांगून टाकले. ज्या मंत्रालयात बसण्याने पवार यांना आज इतके मोठे करून ठेवले आहे, त्या भस्मसात इमारतीकडे पाहून दोन अश्रूही त्यांच्या डोळ्यात ओघळले नाहीत. याला म्हणतात मोठेपणा. याला म्हणतात थोरपणा. ज्याचा लवलेश तुमच्या आमच्यात नसतो. म्हणूनच आपण सामान्य जनता असतो आणि पवार साहेब थोरपुरूष असतात. याचे कारण ते असे भावनाशून्य असू शकतात. त्यांचा मोठेपणा त्यांच्या बेदरकारपणात सामावला आहे. आपल्याला ते कधीच साध्य होत नाही, होणारही नाही. ज्यांनी तो फ़डकता तिरंगा सन्मानाने त्या संकटातही खाली उतरवला त्यांचा गुणगौरव करण्याची पात्रता म्हणूनच पवार साहेबांकडे असते.

   सत्ता राबवणार्‍याला भावनावश होऊन चालत नाही. समोर कोणी जळताना, मरताना पाहिले तर त्याच्या मदतीला धावून जाण्याचा मुर्खपणा करत नाही तर स्वत:ला वाचवणे हे ज्याचे प्राधान्य असते, त्यालाच देशाची राज्याची सत्ता राववता येत असते. इतकी वर्षे पवार किंवा त्यांचे कुटुंबिय का महाराष्ट्राची सत्ता मिळवू शकले, त्याचे कारण हे असे आहे. अजितदादा आग लागली व पसरू लागली तेव्हा मंत्रालयातच होते. त्यांना मोठी आग असल्याचा पत्ता लागण्यापुर्वी खिडक्या उघडण्याचे काम त्यांनीच केले, असे तिथे तेव्हा हजर असलेले राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते सांगतात. पण जेव्हा आग पसरते असे कळले तेव्हा त्यांना तिथेच धुमसणार्‍या आगीत सोडून, दादा मंत्रालयातून बाहेर पडले, याला राजकीय समजदारी म्हणतात. सत्ता मिळवण्यासाठी वा टिकवण्यासाठी ती चतुराई किंवा "समयसूचकता" राज्यकर्त्याच्या अंगी असावी लागते. आज जे आपल्यावर राज्य करतात, त्यांच्या अंगी असे गुण ठासून भरलेले आहेत. म्हणुन तर इतका सुंदर कारभार चालू आहे. काय झाले त्याची कोणाला फ़िकीर आहे काय? आग विझली नाही, तेवढ्यात मुख्यमंत्र्यांनी जीवितहानी टाळली म्हणून स्वत:ची पाठ थोपटून घेतली. त्यांची ती पत्रकार परिषद संपताच दोन मृतदेह अजितदादांच्या केबीनपाशी सापडल्याची बातमी आली. पण असे सामान्य लोक नेहमीच मरत असतात. कधी ते कसाब टोळीकडुन मारले जातात, तर कधी बॉम्बस्फ़ोटात मरतात. कधी विषबाधेने मरतात तर कधी दरोडेखोरांकडुन मारले जातात. त्यांच्यासाठी रड्त बसले तर दादा बाबांना राज्याचा कारभार कसा चालवता येईल? अशा मरणार्‍यांच्या मुडद्यावर लाख दोन लाख फ़ेकले की काम झाले. याला राज्यकारभार म्हणतात. आणि आपले अभ्यासू राजकीय विश्लेषक खुश असतात. कारण राज्यात छानपैकी सेक्युलर कारभार चालू आहे. म्हणजे काहीच होत नाही. फ़क्त घोटाळे,, भ्रष्टाचार, अफ़रातफ़री मस्तपैकी चालू आहेत.

   कुठल्या छोट्या समस्येचा भीषण अविष्कार कसा करावा, ते आपण पहात असतो. साधी सर्दी झालेल्या रोग्याला आणुन या सेक्युलर सरकारच्या हवाली करा, त्याला मलेरिया किंवा स्वाईन फ़्लूपर्यंत नेऊन पुरता पोचवण्याची किमया आजच्या सत्ताधार्‍यांपाशी आहे. त्याचाच दाखला गेल्या गुरूवारी देण्यात आला. साधी किरकोळ आग संपुर्ण मंत्रालयाला भस्मसात करण्यापर्यंत मोठी कशी करावी, याचा वस्तूपाठच त्यानिमित्ताने देण्यात आला ना? चौथ्या मजल्यावर लागलेली छोटी आग, तिथल्या तिथे धावपळ झाली तरी आवरता आली असती. तेवढे धाडस नसेल तर तिथून दोनतीन मिनीटांच्या अंतरावर असलेल्या अग्नीशमन दलाला बोलावून आवरता आली असती. पण राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून सामान्य अधिकारी शिपायापर्यंत कोणालाच अग्नीशमन दल आग विझवण्य़ासाठी असते, त्याचीच आठवण झाली नाही. आग लागली तर ती वेळीच विझवायला हवी ही संवेदनाच कोणापाशी तिथे नव्हती. दुष्काळाची सावली सहा सात महिन्यापासून पडली आहे. पण त्यावर याच राज्यकर्त्यांनी शेवटपर्यंत निर्णय घेतला का? हजारो गावात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य होईपर्यंत कुठली हालचाल सुद्धा केली नाही. नेमके तेच परवा मंत्रालयाच्या आगीच्या वेळी झाले. समस्या व प्रश्नापासून पळ काढायचा हेच धोरण सतत राबवल्याचा तो परिणाम आहे. इथेही त्यांनी आग लागल्यावर प्रथम काही केले नाही. आणि आग हाताबाहेर जाऊ लागल्यावर तिथून पळ काढण्यात धन्यता मानली.

   त्या आगीनंअर पत्रकार व कॅमेरासमोर बोलताना दोन्ही सरकार प्रमुखांच्या चेहर्‍यावर कुठली अपराधी भावना तरी होती काय? दहा लाख फ़ाइल्स म्हणजे कित्येक महत्वाची कागदपत्रे त्या आगीत भस्मसात झाली. त्यासाठी वैषम्याचा लवलेश तरी दोघांपैकी एकाच्या चेहर्‍यावर तरी दिसला काय? त्यांच्यासाठी यात नवे काहीच नव्हते. प्रत्येक परिक्षा नापासच होणार्‍या मुलाला थेट शालांत परिक्षेला बसवले आणि तो तिथेही नापास झाला, तर काय नेमके बिघडले ते त्याला कळत सुद्धा नसते. तशीच मुखयमंत्री व उपमुख्यमंत्री यांची अवस्था होती. मंत्रालय जळून बेचिराख झाल्याची कुठलीही खंत त्यांना वाटत नव्हती. थंड मनाने ते दोघे दुसर्‍या दिवशी पर्यायी जागेतून कारभार चालेल, अशी ग्वाही देत होते. कित्येक लाख लोकांच्या जीवनाशी संबंधित जिव्हाळ्याच्या कागदपत्रांची होळी झाली, याची साधी जाणिव ज्यांना नाही; ते यापेक्षा दुसरा कुठला कारभार करू शकतील?    ( क्रमश:)  
भाग  ( ३०७ )     २६/६/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा