सोमवार, २५ जून, २०१२

या अग्निकांडातला मारुती कोण?


   मला पुराणातल्या भाकडकथा खुप आवडतात, असे मी अनेकदा सांगत असतो. विशेषत: एखादी अशी पुराणकथा समोर घडताना दिसली, तर मला तिचे विश्लेषण करायचा मोह आवरता येत नाही. म्हणूनच सध्याचे शिक्षण विषयक लेखन तात्पुरते बाजूला ठेवून, मंत्रालयाच्या आगीकडे वळणे मला भाग आहे. खरे तर त्याबद्दल लोकांच्या ज्ञानात भर घालायला सगळा मिडियाच पुढे सरसावलेला आहे. तेव्हा मी तिकडे वळण्याचे काही कारण नाही, असेच कोणी म्हणेल. ते खरेही आहे. पण जेव्हा आग विझवण्यापेक्षा त्यात तेल ओतणारे पुढे सरसावता्त तेव्हा तिकडे दुर्लक्ष करता येत नाही. हातातली कामे बाजूला ठेवून तिकडे धाव घ्यावी्च लागते. मंत्रालयाची राखरांगोळी करणारा जो आगडोंब उसळला, त्यानंतरच्या बातम्या मी वृत्तपत्रातुन वाचतो आहे व वाहिन्यांवर त्याचे वर्णन ऐकतो आहे. त्यात लंका जाणणार्‍या मारूतीचेच वंशज मला अधिक दिसले म्हणुन तिकडे वळणे मला भाग पडले आहे. आग परवडली म्हणावे अशी बातमीदारी व चर्चा वाहिन्यांवर ऐकायला मिळत आहेत. एकच उदाहरण पुरेसे ठरावे.

   हल्ली काही दिवस कायबीइन लोकमत वाहिनीचे संपादक निखिल वागळे गांधींनंतरचा महान भारतीय शोधण्यात गर्क आहेत. त्या शोधापेक्षा त्यांना मंत्रालयाला लागलेली आग मोठी वाटली नाही. म्हणून की काय, त्यांनी आजचा सवाल अलका धुपकर नामक मुलीकडे सोपवला आहे. ती मुलगी पाचवीपर्यंत तरी शिकली आहे काय याचीच मला शंका येते. कारण शुक्रवारी सवाल विचारून चर्चा करताना तिने मंत्रालयाचे क्षेत्रफ़ळ चाळीस लाखाहुन अधिक "घनफ़ूट" असल्याचे ज्ञानामृत उपस्थित पाहुणे व प्रेक्षकांना पाजले. बघणार्‍यांना तिला थांबवता येत नाही, कारण ते बिचार आपालया घरात फ़क्त ऐकत असतात. पण त्या चर्चेत भाग घेणार्‍या कोणालाही तिला दुरुस्त करावेसे वाटले नाही, यातून चर्चा किती गंभीरपणे चालते, त्याचा अंदाज येऊ शकतो. भरीव वस्तूचे मोजमाप घनफ़ळात तर सपाट पृष्ठभागाचे मोजमाप क्षेत्रफ़ळात होते. हे पाचवी सहावीच्या भूमितीमध्ये शिकवले जात असते. पण धुपकर हिला बोलणार्‍याला "गलका चुप कर"ण्याचेच धडे बालपणापासून दिलेले असावेत. बाकी कुठला विषय शिकवण्य़ाचे कष्ट पालक वा शिक्षकांनी घेतलेले नसावेत. मुलांचे (म्हणजे त्यात मुली आल्याच) पाय पाळण्यात दिसतात, तसेच हिचे पाय पाळण्यात बघूनच ती पुढे कायबीइन लोकमत वाहिनीवर जाणार, हे पालक शिक्षकांनी ओळखलेले असावे. मग तिला भूमिती, गणित, अक्कल वगैरे शिकवण्याची गरज नाही, हे त्यांच्या लक्षात आलेले असावे. मग तिला बिचारीला क्षेत्रफ़ळ घनफ़ूटात नसते तर चौरस फ़ुटात असते, हे कसे आठवणार. तिने मंत्रालयाचे क्षेत्रफ़ळ किती लाख धनफ़ूट आहे ते सांगून मंत्रालयाला लागलेल्या आगीचा फ़ूफ़ाटा करून टाकला.

   भाई जगताप. शिवतारे असे अभ्यासू आमदार त्या चर्चेत होते. त्यांना हा मुर्खपणा कळतही असेल. पण "चुप कर" मॅडम समोर असताना त्यांनी बोलण्याची हिंमत कशी करावी? आणि कमीअधिक प्रमाणात सर्वच वाहिन्यांवरचा अनुभव असाच होता. होळीच्या भोवती जमलेली लहान मुले जसा उत्तेजीत गलका व कल्लोळ करतात, तसाच सगळा प्रकार चालू होता. त्यात सवाल चर्चेची सुत्रे गलका चुपकर यांच्या हाती असली, मग दुसरे काय व्हायचे? काही तरी महान घडते आहे व आपण त्याचे ऐतिहासिक साक्षिदार आहोत, अशा अभिमानाने ही मंडळी बातमीदारी करत होती. तेवढेच नाही, तर सर्वात आधी "आमच्याच चॅनेलवर" असे सांगायचा उत्साह मंत्रालयाच्या आगीच्या ज्वाळांनाही लाजवणारा होता. तिथे प्रत्येक ज्वाळेला आधी वरच्या मजल्यावर पोहोचण्याची घाई झाली होती. तर इथे प्रत्येक बातमीदाराला आधी त्या ज्वाळा आपल्य चॅनेलवर दाखवण्याची घाई झाली होती. मात्र त्या उतावळेपणात समोर दिसते आहे व आपण प्रेक्षकांना थेट प्रक्षेपणातून जे दाखवतो आहोत, त्याचा अर्थ तिथे घटनास्थळी उभे असलेल्यांना लागत नव्हता किंवा स्टुडिओत बसून चित्रणाचे विश्लेषण करण्याचा आव आणणार्‍यांना डोळ्यांना दिसते ते बघता येत नव्हते. फ़ार कशाला, तिथे लक्ष वेधले असतानाही काही शहाणे संपादक सत्य बघू शकत नव्हते.

   ज्यांनी आग पसरताना टीव्हीवर थेट प्रक्षेपण पाहिले, त्यांना एक गोष्ट नक्की आठवेल. तिथे पोहोचलेले अग्नीशमन दलाचे जवान चार पाच मजले उंच पाण्याचा फ़वारा मारून आग विझवायला धडपडत होते. ज्या अग्नीशमन दलापाशी दहा पंधरा मजले उंच पोहोचणारी शिडी असते, ते चौथ्या पाचव्या मजल्यावर लागलेली आग जमीनीवरून का विझवू पहात होते? आपल्या गाड्यांवर असलेल्या शिड्या वापरून त्यांनी थेट त्याच उंचीवरून पाण्याचा फ़वारा का मारू नये? ही साधीसरळ शंका होती. अशा प्रसंगी आगडोंब उसळलेल्या इमारतीमध्ये शिरता येत नाही, तेव्हा बाहेरून त्याच उंचीवर पोहोचता यावे म्हणुन त्यांच्या गाड्यांवर शिड्या असतात ना? मग हे इतके प्रशिक्षित जवान शिड्या का वापरता नव्हते? घरी बसून बघणार्‍या माझ्यासारख्या सामान्य प्रेक्षकाला हा प्रश्न पडला. मग ते चित्रण थेट दाखवणार्‍या व घटनास्थळी उपस्थित असलेल्या बातमीदारांना का पडला नाही. त्यांनी त्याची कारणे शोधून बातमी का दिली नाही. झी २४ तास वाहिनीवर नवे संपादक उदय निरगुडकर जातीनिशी निरुपण करायला बसले होते. त्यांनी एक अत्यंत अनुभवी अग्नीशमन अधिकार्‍याला त्यात सहभागी करून घेतले होते. पण तो काय सांगतो त्याकडे त्यांनी गंभीरपणे लक्षच दिले नाही. देशमुख नावाचे ते जाणकार ९/११ च्या न्यूयॉर्कमधील दुर्घटनेत काम केलेले अनुभवी. त्यांनी चार मजले उंच पाण्याचे फ़वारे कशाला मारत बसले आहेत, असा सवाल तात्काळ उपस्थित केला होता. पण त्याचे उत्तर आठ नऊ तास जाईपर्यंत कोणीच देऊ शकला नाही.

   आधीच अग्नीशमन दलाला उशीरा आमंत्रण मिळाले. तेसुद्धा कोणा जबाबदार अधिकारी मंत्र्याकडून मिळाले नाही. मुंबई अग्नीशमन दलाचे प्रमुख आहेत, त्यांचे कोणी आप्तस्वकीय मंतालयात काम करतात. त्यांनी सहज सावधानतेचा उपाय म्हणुन आपल्या साडूला सुचना दिल्या. ती अग्नीशमन दलाला मिळालेली आगीची पहिली सुचना होती. मग त्यांचा ताफ़ा मंत्रालयात पोहोचला, तेव्हा त्यांच्या बंबांना आत शिरायला जागाच नव्हती. तिथे मंत्री व अन्य पुढारी, अधिकार्‍यांच्या सरकारी गाड्यांनी मधला चौक व्यापला होता. त्यांचे ड्रायव्हर बेपत्ता होते. त्या गाड्या टोईंग करून किंवा काचा फ़ोडून बाहेर काढल्या तेव्हा कुठे बंबाच्या गाड्या आत येणासाठी जागा झाली. मग शिड्यांच्या वापर सुरू झाला. तोवर आग पसरू नये म्हणुन बिचारे अग्नीशमन दलाचे जवान मंत्रालयाच्या बाहेर आपल्या गाड्या थांबवून आगडोंबावर पाण्याचे फ़वारे जमेल तसे मारत होते. म्हणजे चौथ्या मजल्यावरची आग तिथेच रोखण्याची एक संधी जागेवर पोहोचलेल्या बंबवाल्यांना मिळालीच नव्हती. तिथे मधल्या चौकातली जागा व्यापून बसलेल्या सरकारी गाड्यांनी त्यांना ती संधी नाकारली होती. म्हणून बिचारे जवान प्रतिकुल परिस्थितीत मिळेल तिथून आग आटोक्यात आणायला धडपडत होते. त्यांच्यापाशी उंच शिड्या होत्या, पण त्या उभ्या करायलाच जागा नव्हती. मग त्यांना जमीनीवरून किंवा तळमजल्यावरून जमेल तेवढा उंच फ़वारा मारण्याखेरीज पर्यायच नव्हता. मग तो फ़वारा आगीपर्यंत पोहोचला नाही तरी बेहत्तर.

   पहिली बातमी हिच होती आणि घटनास्थळी असलेल्या बातमीदारांच्या डोळ्य़ांना ती दिसतही होती. पण तिचा अर्थच त्यांना लागला नाही. त्याचे आकलन झाले नाही. किंबहूना जे दिसत होते ते बघण्याची ’नजर’ हे बातमीदार गमावून बसल्याचा तो परिणाम होता. बातमी म्हणजे खळबळ किंवा पुढार्‍यांनी एकमेकांवर केलेले आरोप. अशाच बातमीदारीची सवय लागली, मग भयंकर घटना समोर घडत असली तरी तिचे गांभिर्य कळणार कसे? म्हणुनच शिड्या असूनही अग्नीशमन दल त्याचा वापर न करता चार मजले उंच पाण्याचे फ़वारे का मारते आहे, ही विसंगती तिथून बातमीदारी करणार्‍यांना दिसत असूनही लक्षात आली नाही. त्यांनाच नव्हेतर स्टुडिओत बसून त्याचे निरूपण करणार्‍यांनाही कॅमेरा दाखवतो आहे, त्यातला विरोधाभास कळू शकला नाही, की खटकला नाही. एवढ्याशा एका नि्ष्काळजीपणाबद्दल मी त्यांना फ़ाशी देतोय, असेच कोणाला वाटेल. पण मुद्दा त्या एका निष्काळजीपणाचा नसून वास्तविक पत्रकारितेचा आहे. बातमी म्हणजे काय त्याचा विसर पडल्याचा मुद्दा आहे. माणसाला कुत्रा चावला तर बातमी होत नाही. पण माणुस कुत्र्याला चावतो तेव्हा बातमी होते, अशी बातमीची जगभरची व्याख्या आहे. त्याचा अर्थ इतकाच, की जे नेहमी घडते त्यात बातमी नसते, तर जे अकल्पित वा चमत्कारिक व विसंगतीपुर्ण घडत असते, त्याला बातमी म्हणतात. इथे शिड्या असतानाही जवान चारपाच मजले खालून आगीवर फ़वारे मारतात ही भीषण विसंगती होती. म्हणूनच तीच बातमी होती. पण तिथे एकाही बातमीदार वा स्टुडिओतील ऍन्करचे लक्षही गेले नाही. ही त्या भीषण आगी इतकीच शोकांतिका नाही काय? सगळे नुसते लंका जाळणार्‍या व शेपटी पेटलेल्या मारुतीसारखे टणाटणा उड्या मारत, नाचत, धावतपळत होते ना?   ( क्रमश:)
 भाग  ( ३०६ )    २५/६/१२

1 टिप्पणी: