सोमवार, १७ डिसेंबर, २०१२

शिवसेना शाखाप्रमुखाचा माझ्यावरचा हल्ला


   येत्या ६ जानेवारीला पत्रकारदिन आहे. अनेकांचे मला फ़ोन त्यानिमित्ताने आले. तसे दरवर्षी येतात. त्या दिवशी अनेक पत्रकार संघटनांना पत्रकारितेवर भाषण करू शकेल असा वक्ता हवा असतो. पण मला घरगुती अडचणीमुळे या वर्षी कुठे जाणे शक्य नाही. पण गेल्या काही वर्षात अनेक ठिकाणी पत्रकारदिनाच्या निमित्ताने वा अन्य दिवशी मी या विषयावर व्याख्याने दिलेली आहेत. अशावेळी माझी पत्रकारितेविषयीची भूमिका अनेकांना चकित करून जाते, कारण पत्रकारांवरील हल्ल्याचे समर्थन करणारा बहुतेक मी एकमेव पत्रकार असावा. त्यामुळेच जिथे व्याख्यान, भाषणाला जातो; तिथे मला त्याविषयी अगत्याने प्रश्न विचारला जातोच. मी पत्रकार असून पत्रकारांवरील हल्ल्याचे समर्थन का करतो; असा तो प्रश्न आहे. आणि माझे उत्तर दरवेळी सोपे व साधेसरळ आहे. मी त्रेचाळीस वर्षे पत्रकार आहे आणि एक अपवाद करता माझ्यावर कोणी कधी हल्ला केला नाही, की मला धमक्या दिलेल्या नाहीत. आणि ज्यांच्यावर असे हल्ले झालेत, त्यांनी पत्रकारितेच्या मर्यादा पाळलेल्या नाहीत; असे मला स्पष्टपणे माहित आहे. मग तुम्हाला कशाला संरक्षण पाहिजे असा माझा सरळ साधा सवाल आहे. कोणीही अगदी कोणत्याही कारणास्तव उगाच कोणावर हल्ला करीत नाही, असा माझा अनुभव आहे. गुंडाला गुंड म्हटले किंवा भ्रष्ट असतो त्याला भ्रष्ट म्हटले म्हणून तो तुमच्यावर कधी हल्ला करत नाही. मग पत्रकारावर त्याच्या अविष्कार स्वातंत्र्याची गळचेपी करण्यासाठी कोण कशाला हल्ला करील? याचा दुसरा अर्थ असा, की तुमच्यावर हल्ला झाला आणि तुम्ही पत्रकार आहात; म्हणून तो अविष्कार स्वातंत्र्यावरचा हल्ला होत नाही. तसा तर माझ्यावरही हल्ला झालेला होता आणि एका शिवसेना शाखाप्रमुखाने हल्ला केलेला होता. पण मी त्याच्याविरुद्ध व्यक्तीगत तक्रार केली होती. अगदी पत्रकार संघाने त्यात हस्तक्षेप करायचा प्रयत्न केला; तो मी स्पष्ट शब्दात नाकारला होता. त्याचे कारण माझ्यावर जिथे हल्ला झाला; तिथे मी खाजगी कामासाठी गेलो होतो आणि ज्याने हल्ला केला तो शाखाप्रमुख मला परिचित होता. हल्ला एका बातमीसाठीच त्याने केला होता. तरीही त्याला मी पत्रकारितेवरचा हल्ला मानला नाही. बातमी होती ‘बंडूचे बंड’.

   १९७४ सालात मध्यमुंबईचे खासदार रा. धो. भंडारे यांची बिहारचे राज्यपाल म्हणुन नेमणूक झाली. त्यामुळे तिथे पोटनिवडणूक लागली होती. शिवसेनेचे वर्चस्व असलेला हा बालेकिल्ला. त्यामुळे ती पोटनिवडणूक लढवावी अशी शिवसैनिकांची अपेक्षा होती. पण कॉग्रेसने तिथे रामराव आदिक यांना उमेदवारी दिली आणि शिवसेनेकडून कुठलीच हालचाल नव्हती. दुसरीकडे गिरणी संप जोरात होता. त्याचे नेतृत्व कम्युनिस्ट पक्षाचे वयोवृद्ध नेते कॉम्रेड डांगे करत होते. त्यांनी संपाचा लाभ उठवण्यासाठी तिथे आपली कन्या रोझा देशपांडे यांना उभे केले. तरीही शिवसेनेच्या गोटात शांतता होती. अखेर उमेदवारी अर्ज भरायची मुदत संपण्याचा दिवस जवळ येत गेला; तसा काही शिवसैनिकांचा धीर सुटत गेला. त्यात कम्युनिस्टांशी लालबागमध्ये दोन हात करणार्‍या शाखाप्रमुख बंडू शिंगरे याचा समावेश होता. त्यांनी उमेदवारासाठी अट्टाहास सुरू केला. तेव्हा शिवसेनाप्रमुखांना मौन सोडून स्पष्ट नकार देण्याची वेळ आली. मग कृष्णा देसाई खटल्यातले आरोपी सो्डवण्याचा सौदा झाल्याच्या बातम्या आल्या आणि बदल्यात सेनेने कॉग्रेसच्या रामराव आदिक यांना पाठींबा दिल्याच्या बातम्या होत्या. त्यातून बरीच खळबळ उडाली. तेव्हा शिंगरे याने बंड पुकारून लालबागची शाखा बरखास्त केली आणि हिंदूसभेतर्फ़े विक्रम सावरकर यांची उमेदवारी जाहिर केली. त्याच संदर्भात मी ‘बंडूचे बंड’ अशी बातमी दै. ‘मराठा’मध्ये दिली होती. त्यानंतर दोन दिवसांनी मी नायगाव दादर येथे मित्राला भेटायला गेलो असताना; तिथला शाखाप्रमुख प्रभाकर भूमकर येऊन त्या बातमीवरून माझ्याशी हुज्जत करू लागला. मी त्याला समर्पक उत्तरेही दिली. पण तो कमालीच चिडला होता. त्याने दोन लाफ़ा मारल्या आणि अन्य लोक मध्ये पडल्याने विषय तिथेच थांबला. मी त्याच्या विरोधात भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्याला अटक झाली आणि परिसरात त्याची बोंब झाली. बहुतांशी तिथले शिवसैनिक मला ओळखत होते. त्यांनाही ही बातमी कळली व ते नाराज झाले. त्यांनी आपली नाराजी लपवली नाही. मी त्या शिवसैनिकांना भेटलो नव्हतो किंवा त्यांना माझी बाजू समजावली सुद्धा नव्हती. पण त्यांनीच शाखेत बैठक घेऊन या हल्ल्याचा निषेध केला आणि त्यानंतर शाखाप्रमुख बदलण्याची प्रक्रिया झाली. त्याचा माझ्या तक्रारीशी काही संबंध नव्हता. भूमकरनेही नंतर शरमिंदा होऊन माझी माफ़ी मागितली.

   माझ्या तक्रारीबद्दल मी कोणाला सांगितले नव्हते. पण एक छोटीसी बातमी ‘मराठा’मध्ये छापली होती. त्यावरून पत्रकार संघाने शरद पवार यांची भेट घेण्याबद्दल मला पत्र पाठवले होते. तेव्हा पवार गृहखात्याचे तरूण  राज्यमंत्री होते. माझा मित्र कुमार कदम पत्रकार संघात कार्यरत होता. मी त्याला सांगून तशी भेट घेण्याचे व त्यावरून राजकारण करण्याचे कारण नसल्याच स्पष्ट केले. तो विषय तिथेच संपला होता. डोके शांत झाल्यावर भूमकरनेही माफ़ी मागितली होती. मग मी त्याचे भांडवल करणे हा शुद्ध बनवेगिरीचा प्रकार झाला असता. त्याच्या पक्षनिष्ठेच्या अतिरेकामुळे त्याच्याकडून मुर्खपणा झालेला असेल. पण म्हणून त्याला कायद्याच्या कचाट्यात अडकवणे, ही सूडबुद्धी झाली आणि अशा सूडबुद्धीच्या आहारी जाण्याला मी बुद्धीवाद मानत नाही. शिवाय शिवसैनिकांनीच थेट कारवाई केली होती. इथे एक विषय वा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. चुक करणार्‍याला सुधारण्याची संधी देण्यात बुद्धीवाद असतो आणि चुकला वा कचाट्यात सापडला; म्हणून त्याला गोत्यात घालण्याची सूडबुद्धीला पेटलेली इर्षा कुठल्या नामचिन गुंड गुन्हेगारापेक्षा वेगळी नसते. भावनेच्या भरात भूमकरसारखा शिवसैनिक अतिरेक करतो, तेवढीच संधी घेऊन मी सुद्धा सुडाने वागणार असेन; तर त्याच्या बेभानपणात आणि माझ्या सूडभावनेत काय फ़रक राहिला? तो आपल्या शारिरिक वा मनगटी बळावर गुंडगिरी करतो आणि मी पोलिस व कायद्याच्या बळावर दादागिरीच करत असतो ना? सुडबुद्धी कुठल्याही स्वरूपाची असो, तो बुद्धीवाद नसतो; तर गुंडगिरीच असते. मला ती गुंडगिरी करण्यात रस नव्हता आणि कधीच नसतो. म्हणूनच मी पत्रकारांवर हल्ले होतात वा माझ्यावर हल्ला झाला; त्याने अजिबात विचलित झालेला नव्हतो. कारण तो विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला वगैरे काहीही नसतो. तेवढ्यापुरता चिडलेल्या व्यक्तीची ती संतप्त प्रतिक्रिया असते. ती ओळखून तेवढ्याच प्रगल्भ संयमाने त्याला सामोरे जाण्याची हिंमत व सामंजस्य तुमच्यापाशी असले पाहिजे. अन्यथा बुद्धीवादी वा वैचारिक लढाईची भाषा पोकळ व भंपक असते.

   त्यानंतर वा आजपर्यंत मी अनेकदा शिवसेनेसह कुठल्याही राजकीय पक्ष व नेत्यांवर कडवट टिका केलेली आहे. पण कोणी माझ्यावर हल्ला केलेला नाही, की कुणी धमकी सुद्धा दिलेली नाही. त्याचे कारण वेगळे आहे. मी पक्षांवर किंवा नेत्यांवर अत्यंत कडवट टिका जरूर करतो, पण त्यातून त्याची शिकार करण्याचा माझा दुष्ट हेतू कधीच नसतो. खुनशी भाषा व इजा करण्याचा हेतू, कुणालाही सहज कळतो. त्यामुळेच टिका आणि बदनामी यातला फ़रक ज्यांना कळतो, ते टिका असेल तर तुमच्यावर कधी हल्ला करणार नाहीत. मात्र तुम्ही बदनामीच्या मोहिमा चालवणार असाल, तर तुम्ही दुसर्‍याला इजा करत असता आणि त्याचा कुठल्याही अविष्कार स्वातंत्र्याशी संबंध नसतो. तुम्ही लेखणीची ताकद कोणाच्या राजकीय व्यक्तीमत्वाला इजा करण्यासाठी वापरणार असाल; तर त्यालाही त्याची असेल ती ताकद तुम्हाला इजा करण्यासाठी वापरण्याची मुभा असली पाहिजे; असे माझे स्पष्ट मत आहे. आणि म्हणूनच पत्रकार म्हणून खास कुठले संरक्षण देणे किंवा मागणे मला मान्य नाही. बोचरी टिका आणि डिवचण्याचा किंवा कळ काढण्याचा प्रयास; यात जमीन अस्मानाचा फ़रक असतो. जो कोणी कळ काढायचा उद्योग करील; त्याला कोणी प्रतिक्रिया म्हणून मारहाण केली, तर तो सुद्धा मी अविष्कारच मानतो. आणि ज्याला दुखले आहे, त्याला जे साधन व माध्यम उपलब्ध आहे; त्यातूनच तो अविष्कार करणार ना? मग त्याच्या विरुद्ध बोंब ठोकणारे स्वत:च अविष्कार स्वातंत्र्याने दुष्मन नाहीत का? माझ्या हातात लेखणी आहे म्हणून मी ते साधन खुनशी पद्धतीने वापरत असेन आणि ज्याच्या हातात दगड आहे, त्याने त्याचाही त्याच्या अविष्कारासाठी वापरण्याचे स्वातंत्र्य त्याला का नसावे?      (क्रमश:)
भाग   ( २९ )    १८/१२/१२

५ टिप्पण्या:

  1. खूप्पच मोठ्ठे पत्रकार
    आ.मा.श्री श्री.भाऊजी तोरसेकाराजी ,
    सादर सविनय जय महाराष्ट्र,
    आपण आपल्या आणि माझ्या बापा बद्दलच्या मैत्री बद्दल
    ते वाचून खराच खूप धन्य झालो,
    आणि "अजी म्या ब्रम्ह पहिलेचा"साक्षात्कार झाला .
    भाऊजी ,
    आता मला आपल्याला काही प्रश्न विचारावेसे वाटतात
    १--आपण म्हणालात कि आपण मराठा मध्ये काम करत होतात
    मग मला सांगा मराठा हे वृत्तपत्र कुणाच हो?
    २--त्या मराठाच आणि सेनेच नात काय होत हो ?
    ३--आणि त्या वृत्तपत्राचे वार्ताहर तुम्ही
    त्यांचीच तली उचणार ना?
    ४--ज्या बातमी बद्दल आपण बोलत आहात त्या रामराव आदिक बद्दल
    अशी बातमी खोडसाळ बातमी बद्दल एक शिवसैनिक म्हणून जाब विचाराने
    हे माझ्या बापाचे कामच होते हे चूक कि बरोबर?
    ५--आणि तुम्हाला दोन तीन लाफे मारल्यावर लोक मध्ये पडले म्हणजे नेमके कोण हो ?
    ६--जे कम्युनिस्ट होते ते सेनेच्या विरोधातच होते ना?
    ७--आणि तुम्हाला तेव्हा तरी या चार टाळक्या पलीकडे कोण ओळखत होत?
    ८--आणि आज किती ओळखतात?
    ९--तुम्हाला मारल्यावर काही गोंधळ वैगेरे उडाला नाही
    १०-कोणत्याही प्रकारे शाखेत बैठक घेण्यचा प्रश्नच मुळात येत नाही
    कारण तुम्ही काही सेनेच्या हिताचे पाहणारे नव्हते नाही तुमचे बोलविते धनी
    मग शाखेत बैठक झाली आणि त्याचं शाखाप्रमुख्पद गेल
    हा जावईशोध कसा लावलात?
    ११--आणि आपल्या माहिती साठी सांगतो
    माझा बाप त्यावेळी शिवसेनेचे उपविभागप्रमुख होते
    १२--मग आपल्या ब्लोगवर जे साधुपानाचे विचार टाकले आहेत
    नेमके त्या विरोधात आपण वागला कि नाही ?
    १३--आपण त्यांची रीतसर तक्रार हि केली होती
    -------
    माझ्या अल्पबुद्धी प्रमाणे मी आपल तेराव घालायचा प्रयत्न केला आहे
    जमल्यास त्याची उत्तर द्याल हि अपेक्षा ,,,,?
    हे सार मोठ्या हिमतीने लिहितोय ह्यासाठी कि आपण किती खोटारडे आहात ते सांगण्यासाठी.
    आणि सर्वात मोठ माझा बाप अजूनही जिवंत आहे
    त्यामुळे तुम्ही खोत बोलन आणि त्याला मारे आपण वाघ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करणे
    म्हणजे गाढवाने वाघाची झुल पान्घ्र्ण्यासारख आहे ,
    आता माझ्या बापा बद्दल
    अहो माझ्या बापावर ईतक्या केसेस दाखल आहेत
    कि त्यांची उलट तपसनी घेणाऱ्या वकिलाला जज सांगत असे,
    अहो महाशय ,त्याचं नाव,गाव,वय,पत्ता,शिक्षण विचारण्यात वेळ घालवू नका
    भूमकरांना पाहिल्याबरोबर मी ते सर् लिहील आहे
    तुम्ही पुढची कारवाई करा
    असा माझा बाप त्याने तुमची माफी मागितली ती अगदी खाजगीत
    कुठल्याही पोलिसी कारवाईला घाबरून नव्हे कारण
    त्यांना ज्या हाताने समोरच्या बडवता येत होत तेच
    हात जोडून माफी मागता येत होती कारण ते सुशिक्षित होते आणि आजही आहेत,
    हो
    आणि काय म्हणालात ते नायगाव नाही का जर येत नायगाव मध्ये हो
    नाही तुम्ही किती प्रसिद्ध व्यक्ती आहात ते तरी कळू दे,,,
    काय आहे जे वर्ष सांगितलं त्यावेळीही तुम्हाला कुणी काल कुत्र विचारात नव्हत
    आणि आज काय दिवे लावत आहात ते दिसताच आहे
    हा ते काय पत्रकार असल्याच ओळखपत्र दाखवल्यावर सुद्धा
    आपण नेमक्या कुठल्या वृत्तपत्राचे वार्ताहर आहे ते कळत असेल कदाचित
    याउपर तुमची काय ती ओळख ,,,?
    आणि आज ७४ साला नंतर हि माझ्या बापला कोण ओळखत नाही ते जरा सांगा ?
    या जरा बघू तरी आजही नायागावाततच नव्हेतर तर शिवसेनेच्या कुणाही
    पदाधिकाऱ्याला त्याचं नाव विचारा, कोन्ग्रेस्स्वल्याना विचारा,
    तुमच्या कम्युनिस्टवाल्यांना विचारा,
    अहो सेनेच्या आड येणाया अत्रेना आम्ही सोडलं नाही तुमची पत्रास ती काय ?

    उत्तर द्याहटवा
  2. bHAU DOKA NAKO kHAU.BANDU SHINGRE HEY SENA SANGHATNET AAJ SUDHA AHET FAKST TE PARTYWORKER NAHI SHILEDAAR AHET. RAHILA PRASHNA BHUMKARAN CHA TAR TE SENA PAKSHANT EK NISHTHAVANT SENANI AHET.TO HUKK KONI KADHUN GHEVU SHAKAT NAHI.HA KAYDA AADHI THANA ANI NAVI MUMBAI MADHE LAGU KARAVA ANI MUG SHASNANE ANTIMM PARYAR VAPRAVA CHANNEL VALYAN CHYA....!

    उत्तर द्याहटवा
  3. सुनीलजी, मी कोणी मोठा पत्रकार वगैरे असल्याचा दावा कधीच केलेला नाही. आणि जगाचे सोडून द्या. तुम्ही मला कसे ओळखता ते (माझा सदरचा लेख वाचण्यापुर्वी) तुम्ही स्वत:च फ़ेसबुकवर मला कळवले होते. तो तुमचा संदेश असा.....
    ==============================
    Sunil Prabhakar Bhumkarposted toBhau Torsekar
    Thursday
    धन्यवाद भाऊसाहेब ,मला माहित नाही पण आपण कदाचित माझ्या वडीलांच नाव ऐकल असेल शिवसेनेचे संस्थापक ,कट्टर कार्यकर्ते श्री.प्रभाकर भूमकर याचं नाव ऐकल असेल आम्ही दादर नायगाव मुंबई येथो राहतो तुमच नाव त्यांच्याकडून बरेचदा ऐकल आहे.
    ==============================
    ‘प्रभाकर भूमकर यांचं नाव ऐकल असेल’ असे तुम्हीच त्यात लिहिले आहे आणि आता तुम्हीच म्हणता ‘माझ्या बापला कोण ओळखत नाही ते जरा सांगा?’ बाकी तुमचा उत्साह व आवेश पाहिल्यावर प्रभाकरचा मुलगा असल्याची खात्री पटली. असो, आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद
    आणि राग आवरता आला तर प्रभाकरला नमस्कार सांगा. त्याचा काही मोबाईल नंबर असेल तर जरूर कळवा. वर्षभरापुर्वी पुण्यनगरीतला लेख वाचून त्यानेच फ़ोन केला होता. पण तो नंबर सेव्ह केला तो मोबाईल हरवल्याने माझ्याकडे त्याचा नंबर नाही.

    उत्तर द्याहटवा
  4. हा हा आपल मराठी ईतक कमजोर असेल अस वाटल नव्हत मी लिहल आहे ते नवीन ओळख करताना बोलायची पद्धत आहे मला वाटत आपल्याला हे कला पाहिजे
    असो तुमच्याशी बोलायला माझे वडील नक्कीच उत्सुक आहेत त्यांचा नं ९०२९७१८३८३
    आणि माझा ९८६९८४९०६३ आस आहे
    असो तुम्ही ज्या थाटात लिहिले आहे किंवा लिहता त्यावरून कुणालाही वाटेल किंवा वाटाव कि तुम्ही मोठ्ठे पत्रकार आहात अशी तुमची ईच्छा दिसते
    त्या पद्धतीच तुमच लिखाण आहे
    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  5. Sunil, are mothyanchya vishayat aapan boltana shabd japun vaparave...

    उत्तर द्याहटवा