बुधवार, ३१ ऑक्टोबर, २०१२

मीठाला जागणार्‍यांचा सत्या-ग्रह किती खरा?


   समाजातला बुद्धीवादी समजला जाणारा पत्रकार वर्ग असा वागत असेल, तर आपल्या देशात अराजक आले असे समजायला हरकत नसावी. पत्रकारांचे स्वातंत्र्य अबाधित आहे, अशी एक समजूत आहे. पण त्यात काडीचेही तथ्य नाही. कारण अशी कोणी खोटी बातमी देत असेल तर त्याला कायद्याने कोर्टात खेचता येते. पण वर्षानुवर्षे खटल्याचे कामकाज चालतच नाही. नुसत्या तारखेवर तारखा पडत असतात. सहाजिकच जो कोणी खटला भरणारा आहे त्यालाही आरोपीच्या सोबत कोर्टात खेटे घालावे लागतात. दरम्यान तोच आरोपी म्हणजे तोच पत्रकार आणखी इतर लोकांच्या अब्रूशी खेळ करायला मोकळाच असतो. मग त्याला मोकाट बघून पुढल्या लोकांना कोर्टात जाण्याची हिंमत कशी होणार? त्यापेक्षा असे प्रतिष्ठीत त्याच्याशी सौदेबाजी करतात. चिरीमिरी देऊन आपली बातमी दाबून घेतात. परवा माझा ब्लॉग वाचून एका वाचकाने दिलेली फ़ेसबुकवरील प्रतिक्रिया त्याचीच साक्ष देते. त्याचा मित्र एका मराठी वाहिनीवर ‘ठाम’ बातम्या देतो आणि तो पत्रकार या मित्राला सांगतो; बातम्या देण्यापेक्षा न दाखवण्याची कमाई अधिक असते. हे आजच्या अविष्कार स्वातंत्र्याचे रूप आहे. अर्थात त्यासाठी मी एकट्याच पत्रकारांना दोष देत नाही. अवघा समाजच बिघडला व भरकटला आहे, तर त्यातलेच कोणी पत्रकार होत असतात. त्यांनाही भ्रष्टाचाराच्या रोगाची बाधा होणारच, असे मान्य करायलाच हवे. पण फ़रक इतकाच, की आम्ही पत्रकार इतरांप्रमाणे परिणाम सोसून गप्प रहात नाही. उलट ज्या पापाचे आम्हीही भागिदार आहोत, त्यावर बेशरमपणे आम्ही बोंबाबोंब करीत असतो. त्यावर माझा आक्षेप आहे. आणि पेशाचे कौतुक कोणाला असेल, तर मग पत्रकारांना भ्रष्ट व्हायची सवलतच मि्ळू शकत नाही. कुठल्याही मान्यवर नेता किंवा मंत्र्याला विचारा की पत्रकार किती सोज्वळ वा पवित्र आहेत ते? मंत्रालयातला सर्वात भ्रष्ट कोनाडा पत्रकार कक्ष आहे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

   प्रेस कौन्सील ही तशी पत्रकारांच्या विरोधातील तक्रारी करण्याची जागा आहे. पण तिला दातच नाहीत. म्हणजे त्या संस्थेला तक्रारी घेता येतात, त्याची शहानिशा करता येते. पण ती कुठल्या पत्रकार व वृत्तपत्रावर कुठलीच कारवाई करू शकत नाही. हल्ली नव्याने त्या संस्थेच्या अध्यक्षपदी नेमणूक झालेले सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी त्याबाबतीत वारंवार आवाज उठवला आहे. पण त्यांच्याच विरोधात पत्रकारांची बोंब आहे. पत्रकार व माध्यमांची मुस्कटदाबी करायला काटजू उतावळे झालेत, अशी त्यांच्यावर उफ़राटी टिका होते. त्यांनी कुठल्याही नियंत्रणाची मागणी केलेली नाही. पण अविष्कार स्वातंत्र्य म्हणून जो बेतालपणा पत्रकार करतात, त्याला पायबंद घालण्यासाठी नियमनाची मागणी केली आहे. नियमन व नियंत्रण यात फ़रक असतो. वाहतुकीचे नियमन होते, त्यामुळेच अपुरे रस्तेही वर्दळीच्या वेळी पुरेसे होत असतात. पण पत्रकार व माध्यमे नेहमीच स्वयंनियमनाची भाषा बोलत असतात. मात्र ते कधीच होत नाही. कारण पत्रकार वा माध्यमांच्या संघटनांकडे कुठलाही शिक्षेचा अधिकार नाही. त्यामुळे त्यांचा कोणाला धाकच नाही. त्यामुळे पत्रकार अधिकच बोकाळले व बेताल झाले आहेत. स्वयंनियंत्रण म्हणजे काय?

   वैद्यक वा कायदेविषयक क्षेत्रामध्ये असेच व्यावसायिक नियंत्रण आहे. त्यात सरकार हस्तक्षेप करत नाही. वैद्यक शिक्षण असेल किंवा व्यवसाय असेल, तर त्याबद्दल त्यांची मेडीकल कौन्सील त्यावरची अंतिम सत्ता आहे. एखादा डॉक्टर वा वैद्यक संस्था मर्यादांचे उल्लंघन करीत असेल, तर त्यांचा परवाना काढून घेण्याचे अधिकार त्या संस्थेला आहेत. वकीलक्षेत्रातही तेच आहे. जो कोणी सदस्य नसेल त्याला वकीली करता येत नाही आणि वकील म्हणुन त्याने मर्यादांचे उल्लंघन केले, तर संस्थाच त्याच्यावर कारवाई करते. त्यामुळे त्यांच्या व्यवसायात सरकारला हस्तक्षेप करण्याची गरज नाही. तसे कोणते स्वयंनियंत्रण वा नियमन पत्रकारीता वा माध्यमांच्या क्षेत्रात आहे? आणि आज माध्यमांवर हुकूमत गाजवणार्‍यांपैकी कितीजण प्रत्यक्षात खरे पत्रकार आहेत? त्यांच्याकडे गुंतवायला किंवा खर्चायला पैसा आहे; म्हणून ते पत्रकार आहेत. त्यांचे नाव कायदेशीर रित्या छापले जात असते. म्हणूनच भांडवलदारांनी माध्यमे काबीज केली आहेत आणि मुठभर लाचार बुद्धीमंतांना हाताशी धरून मिरवण्य़ाच्या बदल्यात माध्यमांवर पैशाची हुकूमत प्रस्थापित केली आहे. सहाजिकच आज अविष्कार स्वातंत्र्य म्हणून जे कोणी ओरडा करत असतात, त्यांना खरेच स्वत: अनुभवता येणारे स्वातंत्र्य किती आहे? आणि असे मीच म्हणतो असे मानायचे कारण नाही. कायबीइन लोकमतवर नियमित दिसणारे ‘लोकमत’चे संपादक अनंत दिक्षित यांचेही तसेच मत आहे. मराठीमध्ये सर्वाधिक खपाचा दावा करणार्‍या दैनिकाचा संपादक हे बोलतो, तेव्हा त्याचा स्वानुभव त्याला असे बोलायला भाग पाडतो, असे मानावेच लागते. ही जर मोठ्या मान्यवर संपादकाची अवस्था असेल, तर त्याला ‘दिक्षित सर’ संबोधणार्‍या निखिलच्या स्वातंत्र्याचा पट्टा कोणाच्या हाती आहे ते आपल्या लक्षात येऊ शकते. मग ज्यांना खरेच कुठले स्वातंत्र्य नाही आहे, किंवा ज्यांचे अविष्कार स्वातंत्र्य मालकाच्या पडवीमध्ये कुत्र्यासारखे गहाण पडले आहे, त्यांनी स्वातंत्र्य अबाधित रहावे म्हणून गळा काढण्यात काय अर्थ आहे?

   आता विचार करा मित्रांनो, ज्यांना स्वत:विषयी खरे बोलता येत नाही किंवा स्वत:च्या स्वातंत्र्याविषयी जे खोटे बोलतात, तेच पत्रकार व संपादक तुमच्या आमच्या सवालावर किती खरा आवाज उठवू शकणार आहेत? मीठाला जागणारी पत्रकारीता स्वतंत्र नसते. स्वयंभू नसते. अशी जर पत्रकारितेची दुर्दशा झालेली असेल, तर त्यांच्याकडुन खर्‍या बातम्या कशा दिल्या जाणार? त्यांच्या वागण्याची व लढण्याची दिशा मालकाच्या इशार्‍याप्रमाणे बदलू शकते. बाजारू अर्थव्यवस्था आपण स्विकारली आहे, त्याचे हे परिणाम आहेत. गरीब गृहिणीला अनुदान विरहित गॅसचा सिलिंडर कसा परवडणार; विचारणर्‍या संपादकाला त्याच्या वर्तमान पत्राच्या दहा वीस पानांची विक्री दोन रुपयात कशी जुळवली जाते, हे सांगता येईल काय? माध्यमाच्या उद्योगातून मोठमोठ्या उद्योगात गुंतवणूक करायला आजच्या माध्यम मालकांकडे इतके पैसे आले कुठून; त्याचा शोध कुठल्याच पत्रकारांना का घ्यावा असे वाटत नाही? ज्या २जी स्पेक्ट्रम घोटाळ्याने वर्षभर धमाल उडवली आहे, त्याची सौदेबाजी करण्याच्या भानगडीत पाचसहा मोठ मोठे पत्रकार गुंतल्याचे राडीया टेपमुळे चव्हाट्यावर आले होते ना? त्यांच्यावर कोणती कारवाई झाली? एक ‘आजतक’ वाहिनीचे प्रभू चावला बाजूला काढण्यात आले. पण हिंदुस्तान टाईम्सचा वीर संघवी किंवा एनडीटीव्ही या वाहिनीची बरखा दत्त बेशरमपणे गडकरींचा राजिनामा घेणार काय; म्हणून प्रश्न विचारते आहेच ना? ज्या व्यवसायात इतका निर्लज्जपण प्रतिष्ठीत झाला आहे, त्याच्याकडून कुठला भ्रष्टाचार मोडून काढायचे काम होऊ शकेल? आजची माध्यमे व त्यांच्यावर अवलंबून असलेले पत्रकार त्याच भ्रष्ट व्यवस्थेचे भागिदार झालेले आहेत. हे आता लपून राहिलेले नाही.

   आपण एकप्रकारच्या अराजकामध्ये जगत आहोत. त्यात अन्न व औषधे जेवढी भेसळ केलेली मिळतात किंवा इंधन व दूध जेवढे भेसळ केलेले आहे, तेवढाच बुद्धीवाद व पत्रकारिताही भेसळयुक्त झालेली आहे. खरे सांगायचे तर आजची माध्यमे चोरांना सोडणार्‍या वा पाठीशी घालणार्‍या पोलिसांसारखी झाली आहेत. पोलिस जसे चोर्‍या होतांना काणाडोळा करतात आणि चोर पकडला जाऊन लोकांकडून धोपटला जातो, तेव्हा त्याला वाचवायला पुढे सरसावतात, तसेच आजच्या माध्यमांचे काम चालते. मग कोणी कॉग्रेसच्या पापावर पांघरूण घालताना दिसेल किंवा कोणी भाजपाच्या भ्रष्टाचाराची झाकपाक करताना दिसेल. कोणी राहूलचे कौतुक करील कोणी सोनियांच्या महान त्यागाचे वर्णन करण्यात घसा कोरडा करताना दिसेल. मीठ कोणाचे यानुसार आजच्या माध्यमांचा सत्याचा आग्रह असतो व दिसतो. आणि त्यामुळेच भ्रष्टाचार इतका चौफ़ेर व चौखुर बोकाळला आहे. कारण आपल्याविरुद्ध राखण करणारा पत्रकारच शिल्लक नाही; याची चोरांना खात्री पटली आहे. आपण आज अराजकाच्या अवस्थेत जगतो आहोत. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही अशी एकूण देशाची व समाजाची अवस्था आहे. ज्याच्यापाशी जेवढी सत्ता वा ताकद आहे, त्याने तेवढ्या प्रमाणात सभोवताली असलेल्यांना ओलिस ठेवावे, अशी स्थिती आहे. अगदी अशीच अवस्था दोनशे वर्षापुर्वी आपल्या देशात होती. मग पुढे काय झाले?     ( क्रमश:)
भाग   ( ६ )    ३१/१०/१२

२ टिप्पण्या:

  1. अतिशय परखड आणि वास्तवीक !!!!!!!!!!! घंटा बांधण्याची हीच योग्य वेळ

    उत्तर द्याहटवा
  2. न्याय व्यवस्था जलद व स्वस्त करायला हवी . त्याबरोबर खोटी तक्रार करणार्यालाही शिक्षा हवी . हे सर्व करण्याची मानसिकता असलेला लोकसभेत बहुमत असलेला नेता हवा . याला उपाय एकच ---- नरेंद्र मोदी . दुखणी अनेक इलाज एक

    उत्तर द्याहटवा