बुधवार, २४ ऑक्टोबर, २०१२

धर्माच्या नावाने वितंडवाद मला नकोत


   ‘तुमच्यासारख्या अनेक ब्राम्हणवादी लेखकांचा गैरसमज होण्याचे एक कारण म्हणजे भाषा होय. सर्वच समाजात कमी अधिक प्रमाणात वाईट लोक असतांना त्यांचे खंडन, निषेध हे त्या त्या सर्वच समाजातील लोक करत असतात. फरक एवढाच कि उत्तर भारतीय मुस्लीम हे उर्दू भाषेत निषेध करत असतात, तर इतर ब्राम्हणवादी लेखक हे प्रादेशिक भाषेत निषेध नोंदवत असतात. उत्तर भारतीय मुस्लिमांनी प्रादेशिक भाषा न स्वीकारण्याचा हा परिणाम असू शकतो. म्हणून उर्दू भाषिक मुस्लीम समाज धुरिणांना मराठीत समजाऊन सांगण्याचा लेखकांचा प्रयत्न कुचकामी ठरतो. लेखकांनी उर्दू भाषेत भाषांतर करून उलट तपासणी केली तर आम्ही आभारी राहू. कारण चार- दोन उदारवादी मराठी मुस्लीम लेखकांना फार जास्त समजाऊन सांगण्याची गरजच नाही. म्हणून नुसत्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी उलट तपासणी मराठीत करत असल्याचा आरोप करण्यासाठी उगीच लोकांना जागा देऊ नका. आझाद मैदानाबाहेर अनेक मुस्लीम लोक हे दंगलखोर 'राजकीय भाडोत्री गुंडांना' रोखण्याचे प्रयत्न करत असतांनाच्या चित्रफिती फेसबुकवर उपलब्ध आहेत. कोंबड्या झुंजावणर्‍या मिडीयाने ते जाणीवपूर्वक लपवले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ब्राम्हणवादी (ब्राम्हण नव्हे) समाजात नगण्य अतिरेकी आहेत, हा गैरसमज कृपया दूर करावा. संसदेत चक्क गृहमंत्रालयाने सादर केलेल्या भारतात सक्रीय अतिरेकी टोळ्यांच्या यादीतील १७५ पैकी ११२ टोळ्या मुस्लिमेतर असल्याचे निष्पन्न झाले आहे. विस्तारभयास्तव त्यांची यादी इथे देणे शक्य नाही. जागतिक पातळीवर देखील सर्वात जास्त अतिरेकी टोळ्या मुस्लीमेतारांच्याच आहेत, पण 'अतिरेकी' या शब्दाचा अर्थ अनेक देशात बदलत जातो. आपल्या देशातल्या स्वतःला 'राष्ट्रीय स्वयंसेवक' म्हणवून घेणार्‍या अनेक टोळ्या या विदेशात अतिरेकी ठरत असतात. त्याच टोळ्या त्या देशात सत्तेवर आल्यावर क्रांतिकारी ठरवल्या जातात. नेपालमधील माओवादी, पेलेस्टीनच्या अल फतेह, हमास, इजिप्तची मुस्लीम ब्रदरहूड यांच्या निवडणुकीतील यशाबद्दल आता अमेरिकादेखील अभिनंदन करत असते. रशियाविरुद्ध लढणार्‍यांचा ''मुजाहिदीन (धर्मयोद्धे/ क्रांतिकारी) असा उल्लेख करणारा बीबीसी आता त्याच लोकांना अतिरेकी संबोधतो. म्हणून जागतिक पातळीवर दहशतवादावर चर्चा करणे अवघड होऊन बसते. पण गुन्हेगार कोणत्या जातीतले, धर्माचे किती आहेत आहेत, अशी शिरगणती करण्यापेक्षा गुन्हेगारी नष्ट करण्यासाठी धर्मग्रंथांचीच खरी शिकवण त्यांना देण्याची आणि ईशभय दाखवण्याची गरज आहे. हे काम मीडियापासून दूर ठेवलेले अनेक लोक करत आहेत, त्याना तुमचा सारख्या लेखकांच्या सहकार्याची गरज आहे, उलट तपासणीची नव्हे!’  (आता तरी पूर्ण पत्र प्रसिद्ध कराल या आशेने हा पत्र प्रपंच करतोय. पूर्ण पत्र प्रसिद्ध करत असाल तर नाव घेऊन प्रतिवाद केला तरी चालेल.) -नौशाद उस्मान  

   नौशाद यांचा हट्ट असल्याने त्यांचे पत्र आहे तसेच प्रसिद्ध केले आहे. त्याचा प्रतिवाद करण्याची मला गरज वाटत नाही. कारण आजवर त्यांनी अनेक पत्रे पाठवली, तरी माझे मुद्दे व मी उपस्थित केलेले प्रश्न; यांना उत्तर देण्याचे टाळले आहे. मुस्लिमांच्या वर्तन या विषयाचा मी उहापोह करीत असतांना त्याना हिंदू वा अन्य धर्माचे वा त्यातील कर्मकांडाचे दोष दाखवण्यात आनंद मिळत असेल तर माझी त्याला हरकत नाही. मला त्यात पडायचे नाही. हे पत्र छापल्याने त्यांचे समाधान होईल; अशी अपेक्षा आहे. मुद्दे वा प्रश्नांना बगल देऊन आपले मत पुढे दामटण्य़ाच्या त्यांच्या अशा शैलीमुळेच अन्य माध्यमे कदाचित त्यांची दखल घेत नसतील, तर त्यांनी आपल्या वर्तनात बदल करण्याची गरज आहे. त्या माध्यमांवर ब्राह्मणवादी असा शिक्का मारून काहीही साध्य होणार नाही. उदाहरणार्थ ‘चित्रकार हुसेन यांना भारत सरकारने देशातून हाकलून लावले’ असा बिनबुडाचा दावा त्यांनी केला होता. त्यातला तार्किक व कायदेशीर पोकळपणा मी दाखवून दिला, त्याचा प्रतिवाद त्यांनी इतकी पत्रे लिहूनही केलेला नाही. तेव्हा ते कशाला प्रतिवाद म्हणतात, ते त्यांनाच ठाऊक. उलट माझ्या लिखाणात त्यांच्या पत्रातला एक शब्द गाळला गेला, त्याबद्दल लेखातूनच माफ़ी मी मागितली होती. त्याला माझा मोठेपणा ठरवताना खुद्द नौशाद यांनी मात्र आपल्या युक्तीवादातील चुकीबद्दल मौन पाळण्यातला, त्यांचा ‘मोठेपणा’ मला अजून कळलेला नाही. पण त्यात मला पडायचे नाही. कारण ही लेखमाला असो, किंवा अन्य लिखाण करताना असो; माझी भूमिका सार्वजनिक हिताची असते. निदान सार्वजनिक हिताला बाधा येऊ नये अशी असते. नौशाद किंवा तत्सम मंडळींना आपापले धर्म वा विचारसरणीचे मोठेपण सांगण्याची, हुज्जत करण्यात स्वारस्य असावे. त्यांना इस्लामचे अभ्यासक समजून मी त्यांचा उल्लेख माझ्या मुळ लिखाणात केला, ही माझी गंभीर चुक मी खुल्या दिलाने मान्य करतो. आणि त्यांचा विषय इथेच संपवतो.

पण मला उत्सुकता आहे ती इफ़्तिकार अहमद सय्यद यांच्या प्रतिक्रियेची. त्यांनीही त्यांचे मत कळवले आहे. पण यांत्रिक अडचणीमुळे मला ते वाचणे शक्य झालेले नाही. त्यांच्याकडून कागदी स्वरूपात त्यांची प्रतिक्रिया लौकरच मिळेल व एका मुस्लिम विचारवंताचे परखड अभ्यासू मत वाचकासमोर येईल अशी अपेक्षा आहे. मला कुठला धर्म श्रेष्ठ वा दुय्यम; अशा चर्चेत अजिबात रस नाही. किंबहूना धर्म हा माझा विषयच नाही. मुस्लिमांचे जसे वर्तन अन्य मुस्लिमेतरांच्या वाट्याला येते; त्यासंबंधाने उहापोह एवढीच माझी मर्यादा होती. त्यात कुठल्या संघटना वा संस्था यांच्यावर दोषारोप करणे, कुणाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणे, असा माझा अजिबात हेतू नव्हता. खरे तर जे धर्मनिष्ठ वा धर्माभिमानी असतात, त्यांनी माझ्या असल्या लिखाणाकडे साफ़ दुर्लक्ष करणे योग्य असते. कारण मी श्रद्धाळू नाही, की श्रद्धावंतांचा विरोधक नाही. कुठलाही धर्मसमुह जेव्हा त्याच्या धर्मनिष्ठेच्या आहारी जाऊन इतरांच्या जीवनात हस्तक्षेप करू बघतो तेवढ्यापुरता माझा संबंध होता. तेवढीच माझी लेखन मर्यादा होती. तेवढ्यापुरते संदर्भ मी सोबत घेतले होते. त्याला पुरक ठरणारे अन्य संदर्भ कोणी समोर आणले तर बिघडत नव्हते. धर्मविषयक वर्तनाचा एकूण समाजजीवनावर होणारा परिणाम, इतकाच विषय होता. माझी ती मर्यादा मी जाणिवपुर्वक पाळली. ज्यांना त्यातही धर्मनिंदा दिसत असेल, तर त्यांनी आपल्या निष्ठा व विश्वास तपासून घ्यावा. कारण कोणाच्या निष्टा अन्य कुणाच्या बोलण्याने वा वागण्याने कधी कमकुवत होतात असे अला वाटत नाही. धर्मश्रद्धेपासून मी समज आल्यापासून अलिप्त आहे, तर अन्य कुणाच्या धर्मनिष्ठेचा मी कधी त्रास करून घेतला नाही किंवा माझ्या नास्तिकतेला कोणी शिव्याशाप दिल्यानेही मी विचलित होत नाही.

   सर्वसामान्य माणूस तेवढा बारकाईने धर्म किंवा श्रद्धांची चिकित्सेने तपासणी करतोच असे नाही. त्यामुळेच जाहिरपणे धर्मश्रद्धा व धर्माचे तत्वज्ञान यांची चिकित्सा करणे मला योग्य वाटत नाही. श्रद्धा व निष्ठांना कसोटीला लावता येत नसते. त्या व्यक्तीगत असतात आणि कुणासमोर सिद्ध करायची गरज नसते. हे मी आधीच मान्य केलेले आहे. एखाद्याची गणपतीवर किंवा नवसाच्या देवावर जशी श्रद्धा असते, तशीच कुणाची नसतेही. सवाल त्यांनी आपल्या श्रद्धा किंवा निष्ठेला दुसर्‍यावर लादण्याचा येतो. तिथून समस्या सुरू होते. तेवढ्यापुरता माझा लेखनप्रपंच होता. कारण अशा प्रवृत्तीचा अतिरेक झाला, मग अनावस्था प्रसंग ओढवत असतो. त्याचे गांभिर्य लक्षात आणून देण्याचा प्रयास समजून घेण्यापेक्षा; अमुक त्या धर्माचे किंवा तमूक त्या धर्माचे वा संप्रदायाचे असा युक्तीवाद फ़सवा असतो. कारण मग विषय दोन्हीकडल्या संख्येशी आणि बळाशी निगडीत होतो आणि संख्या जिथली अधिक त्यांच्या बळाचा प्रयोग यशस्वी होतो. त्यातून सत्य प्रतित होत नाही तर बळाची किमया सिद्ध होते. म्हणूनच संयम व विवेक महत्वाचा असतो. ज्यांना ते समजून घ्यायचे असेल त्यांनी समजून घ्यावे किंवा इतरांनी न घ्यावे. त्यासाठी पुन्हा कोणावर मी सक्ती करू शकत नाही. शद्बांची भाषा समजून घेणार्‍यांसाठी असते आणि नसेल त्यांना त्यांच्या त्यांच्या भाषा व माध्यमे असतातच. तो प्रांत माझा नाही. त्यामुळे त्यात मी कशाला पडणार?

1 टिप्पणी:

  1. जावूदे भाऊ , काही उपयोग होणार नाही . प्रत्येक मुद्दा कुराण व हदीस च्या दृष्टीकोनातून योग्य कि अयोग्य इतकीच यांची विचार करण्याची सीमा .

    उत्तर द्याहटवा