गुरुवार, ११ ऑक्टोबर, २०१२

अशा मित्रांना गमावून मुस्लिमांना काय मिळणार आहे?


    माझ्यात आणि नितीन प्रधान यांच्यात एक फ़रक आहे. त्यांना जसा मुस्लिम आरोपींची बाजू मांडून पश्चात्ताप झाला, तसे माझे काहीही झालेले नाही. कारण मी तसा या विषयाचा विचार केला नव्हता. पण २००६ च्या मुंबईतील पश्चिम रेल्वे लोकलच्या बॉम्बस्फ़ोट मालिकेनंतर प्रधान वकिलांचा भ्रमनिरास झाला; तर मी मुस्लिम समाजाच्या वर्तनाचा अभ्यास करू लागलो. त्या संबंधातील जगभरच्या घडामोडींचा आढावा घेऊ लागलो. त्यातून जे उलटसुलट गोंधळ माझ्या मनात होऊ लागले, तेव्हा थेट इस्लामचा इतिहास व धर्मग्रंथ यांचा अभ्यास केला. प्रामुख्याने ज्यांनी इस्लाम व मुस्लिमांविषयीच्या तक्रारींना उत्तरे वा स्पष्टीकरणे दिली आहेत, त्या संदर्भाने मी अभ्यास करत गेलो. त्यामुळेच जशी प्रधान वकिलांची टोकाची प्रतिक्रिया आहे, तशी माझी नाही. मी अजूनही हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि जितका शोध घेत जावा तितके रहस्य वाढतच जाते. प्रधानांचेच घ्या, एकेकाळी मुस्लिमांच्या विषयी कमालीची आपुलकी असलेला हा माणूस; एका घटनेने किती आमुलाग्र बदलून गेला. एका बॉम्बस्फ़ोटातील आरोपींची वकीली करणार्‍या या वकिलाने दुसर्‍या तशाच स्फ़ोटानंतर दुसर्‍या टोकाची भूमिका घेतली. तेव्हा त्यांनी तडकाफ़डकी त्या १८ आरोपींना पत्र लिहून यांचे वकिलपत्र सोडत असल्याचे सांगून टाकले. त्यात त्यांनी एकूण मुस्लिम समाजाविषयी घेतलेले आक्षेपही एका मुलाखतीमध्ये सविस्तर कथन केले आहेत. रेडीफ़ या वेबसाईटवर त्यांची ती मुलाखत अजून उपलब्ध आहे. मला वाटते शांत मनाने मुस्लिमांनी प्रधान यांचे आक्षेप समजून घेतले पाहिजेत. आपण स्फ़ोटातील आरोपींची बाजू का मांडायला पुढे झाले, त्यापासून वकिलपत्र सोडण्यापर्यंत कसे बदलले, ते त्यांनी सविस्तर सांगितले आहे. त्या मुलाखतीमध्ये प्रधान म्हणतात,

   ज्यांच्यावर स्फ़ोटाचे गंभीर आरोप आहेत त्यांच्या बचावाना मुस्लिम समाजाने कशाला उभे रहावे? तर देशद्रोहाचा कलंक मुस्लिमांवर नको म्हणून त्या संघटना पुढे आल्या होत्या, ही बाजू प्रधानांना पटली होती. पण त्या संघटना कुठून वकिलांची फ़ी देणार होत्या? दर शुक्रवारी नमाज झाल्यावर जकात म्हणून देणगी गोळा करून वकिलाची फ़ी दिली जाणार होती. पण इतकी वर्षे स्फ़ोटातील मुस्लिम आरोपींची वकिली केल्यावर २००६ च्या स्फ़ोटाने प्रधान विचलित झाले. त्याचे कारण काय होते? या दुसर्‍या स्फ़ोट मालिकेत पुन्हा मुस्लिम आरोपीच होते आणि त्यावेळी कोणी मुस्लिम संघटना किंवा मान्यवर नेता त्या घटनेचा निषेधही करायला तात्काळ पुढे आला नाही. असे वर्तन व कृत्य इस्लामला मान्य नाही; असेही सांगायला कोणी पुढे सरसावला नाही, त्याने प्रधान विचलित झाले, असा त्यांचा दावा आहे. ज्यांनी त्यांना त्या १८ आरोपींचे वकिलपत्र घेण्याची विनंती केली होती, त्यापैकी कोणी २००६ च्या स्फ़ोटाचे निषेध करायला पुढे आला नाही, त्याने प्रधान गडबडून गेले. आपण चुकीच्या बाजूने खटल्यात उभे राहिलो, अशी अपराधी भावना त्यांना सतावू लागली आणि प्रधानांनी वकिलपत्र सोडायचा निर्णय घेतला. पण तेवढेही ठिक होते. त्याच्या पुढे जाऊन त्यांनी आपल्या त्या मुलाखतीमध्ये मुस्लिम समाजावर शिवसेनेसारखे केलेले आरोप अत्यंत धक्कादायक आहेत. त्या एका घटनेने त्यांना आपल्या मुस्लिम नसण्याचा धोका जाणवला, हे महत्वाचे आहे. त्यांना त्या घटनेने हिंदू बनवले, ही बाब महत्वाची आहे. त्यांच्याच शब्दात ते इथे उधृत करणे योग्य होईल. प्रधान म्हणतात,

‘मला आता खात्री झाली आहे, की हे सर्व घातपाती प्रकार व बॉम्बस्फ़ोट हिंदूंच्या विरोधातच योजलेले आहेत. हे लोक हिंदूंना सरसकट व जितके जास्त मारता येतील तेवढे मारण्यासाठीच हे सर्व करीत आहेत. माझ्या (हिंदू) समाज व देशावर मुस्लिमांनी हजारो वर्षे राज्य केले आणि अनेक अत्याचार केल्यावरही आम्ही मुस्लिमांना बंधूभावाने वागवले. त्याचे हे फ़ळ आहे काय?’

   असे प्रधान केवळ मुलाखतीमध्येच सांगत नाहीत. वकिलपत्र सोडण्याबद्दल त्यांनी ज्या आरोपींना पत्र लिहिले त्यातही हेच म्हटल्याचे ते मुलाखतीमध्ये सांगतात. आणि जेव्हा माणुस विचलित होतो, तेव्हा जुन्या अस्वस्थ करणार्‍या घटना त्याला कशा पटापट आठवतात, त्याचा प्रधानांची मुलाखत हा एक उत्तम नमुना आहे. शहारुख खान, शबाना आझमी किंवा फ़िरोजखान यांच्या आठवणीही त्यांनी या मुलाखतीमध्ये सांगितल्या आहेत. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने फ़िरोजखान पाकिस्तानात गेला होता, तेव्हा त्याने स्पष्टपणे धर्माधिष्ठीत पाकिस्तान कसा उध्वस्त राष्ट्र झाला आहे, असे ठणकावून सांगितले होते. पण इथला एकही मुस्लिम कलावंत, विचारवंत त्याच्या मागे ठामपणे उभा राहिला नाही, अशीही आठवण प्रधान करून देतात. बारा वर्षे स्फ़ोटातील आरोपींची बाजू मांडणारा व मुस्लिमांविषयी सहानुभूती असणारा एक यशस्वी वकिल, आपल्या समाजाकडे असा संशयाने का बघू लागला; याचा विचारही मुस्लिमांना करण्याची गरज वा्टत नाही काय? इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की प्रधान यांनी आपल्या परीने मुस्लिमांवरील देशद्रोहाचा कलंक पुसला जावा, म्हणुन कायदेशीर बाजू मांडताना आपली बुद्धी पणाला लावली होती. त्यांचा भ्रमनिरास झालेला आहे. त्यातूनच तो माणुस असा बोलू व वागू लागला आहे. तर मुस्लिमांनी आपले कुठे चुकले याचा विचारच करायचा नाही काय? किती मुस्लिम विचारवंत किंवा धुरीणांनी प्रधान यांची समजुत काढायचा प्रयत्न केला? उलट काही लोकांनी शेवटी प्रधानही हिंदूच आहेत, अशी शेलकी टिका केली होती. म्हणजे तुम्ही जोवर मुस्लिमांच्या बाजूने उभे असता तोवर तुम्ही ठिक असता आणि जेव्हा त्यांच्या चुका दाखवू लागता तेव्हा तुम्ही शत्रू असता, असाच सिद्धांत म्हणायचा काय?

   २००६ च्या वेळी मी गंभीर नव्हतो. पण मी या विषयाकडे गंभीरपणे बघू लागलो होतो. म्हणूनच त्याचा विचार व अभ्यास सुरू केला होता. आणि ११ ऑगस्ट २०१२ नंतर त्या विषयावर सविस्तर उहापोह सुरू केला. कारण जे आक्षेप प्रधानांनी सहा वर्षापुर्वी घेतले, त्याचीच पुनरावृत्ती मुंबईत घडली होती. भारताबाहेर म्यानमार किंवा मुंबईपासून दुर आसाममध्ये काही घडले, म्हणुन इथल्या लोकांना मुस्लिम जमाव बेधडक शिक्षा देण्याच्या तयारीने रस्त्यावर उतरतो, असेच चित्र पुन्हा दिसले. काही मुठभर दंगेखोर असतात, आणि असे कुठल्याही समाजात, धर्मात असू शकते. पण जेव्हा असे काही घडते तेव्हा अन्य समाजातील लोक मोठ्या संख्येने आपल्यातल्या नालायकांचा निषेध करायला रस्त्यावर उतरत असतात. गुजरातमध्ये ज्या दांगली झाल्या आणि मुस्लिमांना त्यामध्ये जसे लक्ष्य करण्यात आले, त्याचा निषेध आजही मोठ्या आवेशात करणार्‍यात हिंदूंचाच भरणा आधिक दिसतो. तसा प्रकार मुस्लिम संघटना किंवा पुढारी, विचारवंतामध्ये किती दिसतो? आपल्या मुलाखतीमध्ये प्रधान यांनी नेमका तोच प्रश्न विचारला आहे. "अन्य घटनांनद्दल अगत्याने बोलणार्‍या कुठल्या मुस्लिम पुढार्‍याने, विचारवंताने एकदा तरी कित्येक वर्षे निर्वासित होऊन पडलेल्या काश्मिरी हिंदूंबद्दल सहानुभूती दाखवली आहे काय?" पण दुसरीकडे गुजरातबद्दल संपुर्ण दहा वर्षे मोदींना टोचून बोलणारे बहुतांश हिंदूच दिसतील. हा फ़रक डोळ्यात भरणारा आहे. काश्मिरमध्ये जे पाचसहा लाख हिंदू आज आपल्याच मातृभूमीमध्ये परागंदा झालेले आहेत, त्यांचा नेमका गुन्हा काय आहे? ते मुस्लिम नाहीत, यापेक्षा दुसरा कुठला त्यांचा अपराध कोणी दाखवू शकेल काय? आणि इथेच एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. जे मुस्लिम नाहीत यांच्याशी मुस्लिम समाज असा का वागतो?

   मुस्लिम असणे आणि मुस्लिम नसणे, याने नेमका काय फ़रक पडत असतो? आणि हा आजचा प्रश्न नाही. शेकडो वर्षे हा प्रश्न वारंवार उपस्थित झाला आहे. स्वातंत्र्य काळापुर्वी किंवा स्वातंत्र्योत्तर काळातही तो पुन्हा पुन्हा समोर आलेला आहे. मुस्लिमांच्या वागण्यात अन्य धर्मिय वा मुस्लिमेतरांविषयी इतका तिटकारा का आहे? कोणी मुस्लिम आहे किंवा अन्य कुठल्या धर्माचा आहे याच्याशी मुस्लिमेतरांना फ़ारसे कर्तव्य नसते. पण मुस्लिमांच्या बाबतीत तसे म्हणता येईल काय? धर्म, त्याची शिकवण, त्याचे धर्मग्रंथ ह्या गोष्टी बाजूला ठेवा. जिथे जिथे म्हणुन जगाच्या पाठीवर मुस्लिम आहेत व संघटित आहेत, त्यांचे तिथल्या मुस्लिमेतरांशी संघर्ष कशाला चालू आहेत? हा केवळ भारतातला विषय नाही. म्हणुनच त्यासंबंधाने बोलताना संघ किंवा हिंदूत्ववाद्यांबद्दल बोलून पळवाट काढता येते. पण मग जिथे हिंदूच नाहीत, तिथे काय समस्या आहे? रागाच्या भरात नितीन प्रधान या वकिलांनी हिंदू म्हणुन प्रतिक्रिया देताना सर्वच हिंदूंना सरसकट मारायचे आहे असा आरोप केला असेल. त्याला फ़ारसा अर्थ नाही. कारण तो खरा असता, तर जिथे हिंदूच नाहीत तिथे मुस्लिम समाज मुस्लिमेतरांशी गुण्यगोविंदाने वागताना व जगताना दिसायला हवे होते. पण आजच्या जगाचे चित्र व वर्तमान तसेही घडताना दाखवत नाही. त्याचे उत्तर दोन मुस्लिम विचारवंतांच्या विवेचनातून आपल्याला सापडू शकते. कोण हे दोन मुस्लिम विचारवंत आणि त्यांचे म्हणणे काय ते उद्या बघू.  ( क्रमश:)
भाग  ( ५७ )   १२/१०/१२

४ टिप्पण्या:

  1. धर्मनिरपेक्ष विचारांची झापडे बांधून मुस्लिमांचा संग केल्यावर असेच होणार

    उत्तर द्याहटवा
  2. शेवट अतिशय चांगला आहे. हिन्दूच नाहीत तिथेसुद्धा जर अडचणी असतील, तर मग याचा विचार मुस्लिमांनी नक्कीच करायला हवा.

    उत्तर द्याहटवा
  3. भाऊ, जी गोष्ट बुद्धिमंतांना कळायला इतकी वर्ष लागली,तेच तर सामान्य माणूस इतकी वर्ष बोंबलून सांगतोय.मग यात शहाणे कोण?

    उत्तर द्याहटवा
  4. I am agreed on your thought but role of Muslims intellectual is always suspicious , they always confused about there religious faith and national faith ..

    उत्तर द्याहटवा