मंगळवार, २७ नोव्हेंबर, २०१२

शिवसेनाप्रमुखांचा दबदबा का असेल बरे?




   गेल्या रविवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेला जमलेल्या गर्दीची जगभर चर्चा झाली. मग चर्चेचेच गुर्‍हाळ चालविणार्‍या वाहिन्यांना मागे राहून कसे चालेल? मी शक्य तेवढ्या वाहिन्यांवरील चर्चा व मतप्रदर्शन ऐकत होतो. त्यातल्या अनेकांची कधी बाळासाहेवांशी साधी भेट झाली नव्हती. अनेकांना त्यांच्या धारदार मराठी भाषेचा गंध नव्हता आणि उरलेल्यांना शिवसेना वर्तमानपत्रात वाचली, तेवढीच ठाऊक होती. त्यातून त्यांचे मतप्रदर्शन चालू होते. त्यानुसारच प्रत्येकजण आपापले विश्लेषण करीत होता. त्यासाठी विवेकबुद्धी किंवा अकलेची गरज नसते. सहाजिकच समोर कॅमेरातून येणार्‍या दृष्यांचा अर्थच अनेकांना लागत नव्हता. ज्याचे वर्णन बहुतेकांनी हुकूमशहा किंवा मुंबईत दहशत माजवणारा, असेच अक्कल येण्याच्या वयापासून वाचले होते व त्यावरच आपले मत बनवले असेल, त्यांना त्या गर्दीचा अर्थ लागायचा कसा? त्यात त्यांचा गुन्हा अजिबात नाही. ती सगळी चर्चा व विश्लेषण ऐकत असताना, मला माझा भाचा व माझी आई यांच्यातला पस्तीस वर्षापुर्वीचा संवाद आठवला.

   माझी बहीण विरारला असायची. तेव्हा विरार आजच्याप्रमाणे विस्तारित उपनगर किंवा महानगर झालेले नव्हते. नुकतीच मुंबईची गर्दी तिकडे सरकत होती. माझा भाचा तीनचार वर्षाचा असेल. त्याला तिथल्या इंग्रजी कॉन्व्हेन्ट शाळेत घातलेले होते. इकडे लालबागला आजीकडे कधी दोनचार दिवस आला, मग आजीचे कौतुक चालायचे. ती त्याला काऊचिऊ दाखवायची. एकदा मी लिहित बसलो असताना, त्यांचा संवाद मला थक्क करून गेला. आजी त्याला खिडकीत बसलेला काऊ दाखवत होती, त्याला मात्र चार पायाची काऊ दूध देते, असे माहित होते. तो आजीला म्हणाला, आमच्याकडे मोठी काऊ आहे. ती उडत नाही, तिला चार पाय असतात, ती दूध देते. आजीला कारटे मुर्ख वाटले होते. अखेरीस मी तिला त्याच्या इंग्रजी भाषेतला काऊ म्हणजे गाय, असल्याचे समजावले, तेव्हाच आजी व नातवातला विवाद संपला होता. कारण काऊ शब्दाचा आपापला अर्थ दोघेही मागे घ्यायला तयार नव्हते. नेमकी तशीच परिस्थिती ठाकरे निधनानंतर दिल्लीपासून अनेक वाहिन्यांच्या स्टूडीओमध्ये बसून चर्चा करणार्‍यांची झाली होती. लाखो लोक एका अंत्ययात्रेला गर्दी करतात, तेव्हा ते निवर्तलेल्या व्यक्तीवर प्रेम करतात, त्याचा आदर करतात, अशीच एक समजूत आहे. पण ज्याला लोक घाबरतात व ज्याची लोकांवर प्रचंड दहशत असते, तेव्हा लोक भयभीत होऊन त्याच्या अंत्ययात्रेला येत नाहीत. जेवढे लोक त्याला जिवंत असताना ऐकायलाही कधी जमले नाहीत, तेवढे लोक अंत्ययात्रेत कसे आले?

   ज्यांची बुद्धी वाचलेल्या वर्णनात व ऐकलेल्या अफ़वांवरच विसंबून होती, त्यांना समोरचे दृष्य पटणे अवघडच होते. जिथे नुसत्या गर्दीचे विश्लेषण करताना इतकी गल्लत होती, तिथे त्या माणसाच्या निर्वाणानंतर त्याच्या राजकीय वारश्याचे काय होईल; याचे विश्लेषण किती अशक्य कोटीतली गोष्ट असेल, त्याची नुसती कल्पनाच केलेली बरी. आता बाळासाहेब या जगात नाहीत. मग त्यांनी स्थापन केलेल्या व जिचा दबदबा आहे अशा राजकीय संघटना शिवसेनेचे काय होणार; याची चर्चा अवघ्या आठवड्याभरातच सुरू झाली. अजून चालूच आहे. आणि ही चर्चासुद्धा अंत्ययात्रेच्या गर्दीवर बकवास झाली; तेवढीच मनोरंजक आहे. कारण ज्यांना बाळासाहेब वा शिवसेनाप्रमुख कळला नाही, ज्यांना त्याची शिवसेनेतील भूमिका वा कार्यशैली कळली नाही, त्यांना त्याच्यानंतर शिवसेना चालवायची म्हणजे काय; त्याचा तरी थांगपत्ता असेल का? मग त्यांनी अशा विषयावर आपले निर्बुद्ध मतप्रदर्शन करण्यात काय अर्थ आहे? अशा तमाम अर्धवटरावांना शिवसेना वा ठाकरे कळले नाहीत, असे मी का म्हणतो, त्याचे उत्तर आठवडाभरातच दोन नामवंत माजी शिवसैनिकांनी मुंबईच्या मंत्रालयात दिले. तिथे मंत्रालय वार्ताहर संघातर्फ़े श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यात उद्योगमंत्री नारायण राणे व बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या आठवणी सांगितल्या. त्या ज्यांना समजून घेता येतील, त्यांनाच शिवसेना व बाळासाहेब समजू शकतील. मगच त्यांच्या मागे शिवसेनेचे काय होईल, याचा अंदाज बांधता येईल.

‘एका रात्री उशीरा आपल्याला बाळासाहेबांनी मातोश्रीवर बोलावले आणि तुला मुख्यमंत्री करतो असे सांगितले. मग दुसर्‍या दिवशी सकाळी मनोहर जोशींना     राज्यपालांकडे राजिनामा देऊनच भेटायला या असे फ़र्मावले. असा मी मुख्यामंत्री झालो’. अशी आठवण राणे यांनी एका वाक्यात सांगितली. बाळासाहेब कसे निर्णय घ्यायचे त्याचा हा नमुना आहे. शिवसेना नसती तर आमची नावे महाराष्ट्राला कधी कळली सुद्धा नसती, अशी त्या दोन्ही मंत्र्यांनी शिवसेनेत आज नसताना दिलेली कबुलीच शिवसेना म्हणजे काय त्याचे उत्तर देतात. अन्य पक्ष किंवा त्यांची कार्यशैली व बाळासाहेबांनी स्थापन केलेली व शेहेचाळिस वर्षे चालवलेली शिवसेना; यातला फ़रक त्या दोघांच्या एका वाक्यात सामावला आहे. शिवसेना नसती तर आम्हाला महाराष्ट्राने कधी ओळखलेच नसते, याचा अर्थ काय? आम्हाला बाळासाहेबांनी घडवले. सामान्य घरातली मुले राजकीय पार्श्वभूमी नाही, की कोणी गॉदफ़ादर नाही, अशा तरूणांना हाताशी धरून त्यांच्या उर्जेला काम देणारा व त्यांच्यातल्या गुणवत्तेला कोंदण देणारा; अशी त्यांची कार्यशैली होती. सरकार, सत्तापदे वा अन्य कशापेक्षाही संघटना व कार्यकर्त्यावर सतत विसंबून राहिलेला नेता; ही त्यांची खरी ओळख होती. पण त्याच हजारो लाखो कार्यकर्त्यांच्या बळावर त्यांनी मुंबईमध्ये जो धाक निर्माण केला होता, त्याचा दबदबा थेट पाकिस्तानपर्यंत होता, याची कबुली अलिकडेच भारताच्या भेटीवर आलेल्या तिथल्या पत्रकारांनीच मुंबईच्या वार्तालापामधून दिली होती. या माणसाची दहशत होती ती मुंबईत; मग तिचा पाकिस्तानात दबदबा कशाला होता, याचे उत्तर ज्यांना शोधावेसे कधी वाटले नाही, ते बाळासाहेब वा शिवसेना यांचे विश्लेषण काय करणार? त्यांना राज ठाकरे संघटनेतून बाहेर पडले व उद्धवमुळे काय झाले; त्याचा थांग कसा लागणार? कारण त्यांना समोर दिसते आहे ते तसेच बघायची इच्छा नाही, की हिंमत नाही. आपापल्या रंगाचे चष्मे लावून तुम्ही बघितले तर समोरचे दृष्य त्याच रंगाचे दिसणार ना? मग गर्दी आली तरी ती भयभीत होऊन आली, असेच तुम्ही म्हणणार. त्यातले रडवेले चेहरे तुम्हाला काहीही सांगू शकत नाहीत. त्यातली अस्वस्थता तुम्हाला काहीही दाखवू शकत नाही. घडलेला फ़रक तुम्हाला जाणवू शकत नाही.
.
   इथे पोलिस आहेत, सरकार आहे, कायदा आहे, सर्वकाही आहे, पण ज्याचा धाक असावा, असे कोणीच राहिलेले नाही. आणि तीच जागा बाळासाहेबांनी व्यापली होती. पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला भारतात खेळू देणार नाही, असे हा माणूस म्हणायचा, त्याची दखल त्या देशातल्या संस्थेला घ्यावीशी वाटली. त्यांनीही त्यांची तब्येत सुधारावी म्हणून शुभेच्छा दिल्या होत्या. भारत सरकार व इथला कायदा त्यांना संरक्षण द्यायला समर्थ असताना, पाक क्रिकेट मंडळाने ठाकरे यांच्या दखल का घ्यावी? तर त्या माणसाच्या शब्दामागे ताकद होती. त्या ताकदीला शिवसेना म्हणतात. या माणसाने विरोध केला तर हजारो लोक रस्त्यावर येतात आणि मग कायदा राखणार्‍यांना तो जमाव आवरता येत नाही, याची खात्रीच पाक खेळाडूंना होती. ती रस्त्यावर उतरणारी गर्दी ही शिवसेनाप्रमुखांची ताकद होती. आणि तिलाच शिवसेना म्हणतात. पावत्या फ़ाडून पक्षाचे सदस्य होणार्‍यांची ती गर्दी नव्हती. ती थेट त्या माणसावर विसंबून मुंबईत निर्धास्त जीवन जगणारी गर्दी होती. कोण आपला वाली आहे, अशी भ्रांत ज्यांना पडलेली असते, अशा लोकांची ती गर्दी होती. सरकार वा कायदा यंत्रणा जे धाडस करू शकत नाही, तेही हा माणुस करू शकतो, असे वाटणार्‍यांची गर्दी तिथे लोटली होती. म्हणूनच त्या गर्दीचे वा त्या माणसाचे विश्लेषण करायचे, तर तो माणूस आधी समजून घ्ययला हवा. त्याची ही प्रतिमा, त्याचा हा वचक व धाक किंवा त्याची ही संघटनाशक्ती कशी निर्माण झाली, ते आधी बारकाईने शोधून, तपासून घ्यावे लागेल. मगच त्याबद्दल बोलता येईल. मगच त्याच्या निर्वाणाने किती व कोणती पोकळी निर्माण झाली व कशी भरून येईल याची चर्चा होऊ शकते. शिवसेना हा नुसता राजकीय पक्ष नाही, ती बाळासाहेबांची शक्ती होती, ज्या शक्तीने ह्या माणसाची मुंबईचा तारणहार अशी प्रतिमा उभी केली होती. हे कसे घडले, कधी घडले व कसकसे घडत गेले; तो एक इतिहास आहे. एका युगाचा इतिहास आहे. तो उलगडत गेले तरच इतकी लक्षावधी माणसे का गोळा झाली, ते लक्षात येऊ शकेल. मी त्यासाठीच प्रयत्न करणार आहे. बधू किती लेख होतात ते.     ( क्रमश:)
भाग   ( ९ )    २८/११/१२

२ टिप्पण्या:

  1. एखाद्या व्यक्तिविशेष विश्लेषणाचा महत्वाचा नियम हा असतो कि विश्लेषकाने संपूर्ण निपक्षपाती असाव .त्या व्यक्तीशी किमान एकदा तरी प्रत्यक्ष भेट घडलेली असावी. मानवाच्या स्वभावाच्या विविध पैलूंचा त्याचा अभ्यास असावा. इतिहासातल्या प्रत्येक विभूतींनी त्या-त्या वेळी स्वीकारलेल्या भूमिकांची पार्श्वभूमी व योग्य-अयोग्य निर्णयांची कारणमीमांसा करण्याची किमान आकलन शक्ती (अवकात) असावी. एखादे फडतूस उत्पादन विकण्यासाठी शब्द, नाट्य, मानसशास्त्रीय डावपेच व हलकट पणा ह्याचा यथेच्छ वापर करून कॉर्पोरेट मार्केटिंग एक्झेक्यूटिव्ह ज्या प्रमाणे आपले सर्वस्व पणाला लावतो तसे आजकाल काही सुपारी बहाद्दर पत्रकार एखादा मुद्दा घेवून दोन-तीन पढत-मूर्ख, अकलेचे दिवाळे निघालेले विद्वान गोळा करून ज्या प्रकारे चर्चा करत असतात ती पाहून तळपायाची आग मस्तकात जाते. हे असले भांड पत्रकार नि षंड विद्वान बाळासाहेबांचे काय विश्लेषण करणार ? त्या साठी तुमच्या सारख्या दिलेर व्यक्तींची आज समाजाला खूप गरज आहे भाऊ....!

    उत्तर द्याहटवा
  2. दिलीप शिंदे यांनी अचूक विवेचन दिले आहे.. अनुमोदन...

    उत्तर द्याहटवा