बुधवार, ६ फेब्रुवारी, २०१३

सेक्युलर शंकराचार्यांची मनोरंजक भाकडकथा


  मला पुराणकथा व भाकडकथा खुप आवडतात, कारण त्या तर्कात बसणार्‍या नसल्या तरी त्यात घेण्यासारखा काही बोध असतो. तो बोध घ्यायचे सोडून त्याचे तर्कशास्त्रीय विच्छेदन केले; मग कथा मरतेच आणि हाती काही लागत नाही. म्हणून मी त्यातले मनोरंजन घेतो आणि सापडला तर बोध शोधत असतो. अशीच एक कधीतरी ऐकलेली वा वाचलेली भाकडकथा आहे. हिंदू धर्माचे मुख्याधिकारी मानल्या जाणार्‍या शंकराचार्यांची ती कथा आहे म्हणतात. ‘ब्रह्म सत्य आणि जगन मिथ्या’ हे तत्वज्ञान सांगणारी अशी ती कथा आहे. कुठल्याशा धार्मिक प्रवचनात शंकराचार्यांनी त्याचे विवेचन केले होते. की आपल्याला जे डोळ्यांना दिसते तो निव्वळ भ्रम म्हणजे माया आहे. नुसता आभास आहे आणि आपण त्याच्या प्रेमात पडून हव्यास धरतो, त्याचाच पाठपुरावा करीत आयुष्य खर्ची घालतो, जीवन निरर्थक करून टाकतो. पण जे आपल्या लौकिक डोळ्यांना दिसत नसते असे महान ब्रह्म आहे; तेच सत्य आहे आणि त्यापर्यंत जाऊन पोहोचणे हे जीवनाचे उद्दीष्ट आहे, असे ते तत्वज्ञान शंकराचार्य कथन करतात. त्यांनी आपल्या अफ़ाट बुद्धीचातुर्याने केलेले  विवेचन निरुपण ऐकून भारावलेल्यांना मग आपले जीवन अगदीच व्यर्थ गेले असे वाटणे स्वाभाविक असते. पण त्या तत्वज्ञानाची झिंग उतरली; मग माणूस माणसात येतो आणि पुन्हा मायेच्या मागे धावू लागतो. त्याला पर्यायच नसतो. कारण डोळ्यांना न दिसणारी, पण जाणवणारी पोटाची भूक त्याच्या बौद्धिक मार्गाने भागत नसते. त्यामुळेच त्याला या मायावी जगात जगण्यासाठी पैसे मिळवावे लागतात. सहाजिकच रात्रीच्या प्रवचनाने भारावलेले भक्तगण सकाळी उठून कामधंद्याला लागतात व मायावी जगात ब्रह्म वगैरे विसरून जातात.

   त्यातल्याच एकाला दुसर्‍या दिवशी सकाळी नदीवर जात असताना तिथून उलट्या दिशेने धावत येणारे शंकराचार्य दिसतात. जीव मुठीत धरून शंकराचार्य पुढे पळत असतात व त्यांच्या मागे एक कुत्रा भुंकत धावत असतो. थोडक्यात कुत्र्याच्या भयाने शंकराचार्य पळत असतात. त्या भक्ताला त्याचे नवल वाटते. जर डोळ्यांना दिसणारे जग हे निव्वळ भासमात्र असेल व त्याच्या मोहात पडायचे नसेल किंवा त्याने भयभीत व्हायचे नसेल; तर तसे सांगणारे शंकराचार्यच कशाला घाबरले आहेत? त्या भुंकणार्‍या कुत्र्याला? कशाला घाबरायचे? अवघे दिसणारे जगच एक आभास असेल, तर मग तो भुंकणारा कुत्रासुद्धा आभासच ना? मग त्याला घाबरून पळायचे कशाला? वाटणारी भिती सुद्धा निव्वळ आभासच नव्हे काय? मग हेच आपल्याला शिकवणारे शंकराचार्य कशापासून पळत अहेत? कोणाला व कशाला घाबरले आहेत? त्या भक्ताला समोरचे दिसणारे दृष्य़ चक्रावून सोडते. आपले शंका निरसन करून घेण्यासाठी तो धावणार्‍या शंकराचार्यांच्या बाजूने धावत त्यांना तोच प्रश्न विचारतो. कुणाला व कशाला घाबरून पळता आहात आचार्य? तुमच्या मागे धावणारा कुत्रा सुद्धा मायाच असेल ना? मग घाबरून पळता कशाला? कुत्रा पाठलाग करतो असे तुम्हाला भासते आहे, ती निव्वळ मायाच आहे, तर घाबरून पळायचे कशाला? कशापासून पळायचे? तो भक्त स्वत:वर भलताच खुश असतो. आचार्यांना कसा निरूत्तर करणारा प्रश्न विचारला, अशा अहंकारी नजरेने तो त्यांच्याकडे बघत असतो. आचार्य हसतात आणि उलट प्रश्न विचारतात,

वत्सा, तुला मी पळताना दिसतो आहे का? माझ्या मागे कुत्रा धावतोय, असा तुला आभास झाला आहे का? दिसते ती नुसती माया आहे. मी पळत नाही की कुत्रा माझ्या मागे लागलेला नाही. हा सगळा निव्वळ भास आहे. ब्रह्म सत्य आहे आणि जग मिथ्या आहे. 

   बिचारा भक्त थबकतो आणि पुढे पळणार्‍या आचार्य व त्यांच्या मागे भुंकणार्‍या कुत्र्याकडे डोळे चोळत बघत रहातो. कशावर विश्वास ठेवावा तेच त्याला कळत नाही. स्वत:चा जीव मुठीत धरून धावणारे शंकराचार्य त्याला दिसत आहेत. पण तेच सांगतात, तोही भास आहे. मग काल प्रवचन देत होते आचार्य तोसुद्धा भासच होता का? त्या सामान्य भक्ताचे डोके चालेनासे होते. त्याचे कशाला आपले डोके तरी किती चालते असे काही बघितले वा ऐकले मग? ही भाकडकथा असेल तर रोजच्या रोज आपण ऐकतो, वाचतो, त्या कसल्या सत्यकथा असतात? महिन्याभरापुर्वी आसाराम बापू किंवा मोहन भागवत अशा लोकांनी काही विधाने केली होती आणि त्यांची कुणा महिलेने दखल सुद्धा घेतली नाही, तरी देशातल्या महिला मुलींचे स्वातंत्र्य कसे धोक्यात आले, त्यावरला गदारोळ आपण आठवडाभर ऐकत होतो ना? प्रत्यक्षात अशा कुणा धर्ममार्तंडने जी विधाने केली; त्यामुळे कुठल्या मुलीमहिलांवर गडांतर आलेले नव्हते. तरीही कल्लोळ असा सुरू होता, की जणू मुलींना घराबाहेर पडायचीच बंदी घालण्यात आली आहे. मग सांगा दिसत नव्हते तेच घडते व सत्य आहे असाच त्या ओरडा करणार्‍यांचा दावा नव्हता का? आणि आज प्रत्यक्षात तशी घराबाहेर पडायची बंदी काश्मीरच्या काही संगीतभक्त मुलींवर आलेली असताना तेच सेक्युलर पोंगा पंडीत चुपचाप आहेत. जणू काही घडलेच नाही, असे मौन त्यांनी धारण केले आहे. म्हणजेच आपला अनुभव काय आहे? जेव्हा काही खरोखरच घडत असते तेव्हा ही मंडळी त्याची दखल सुद्धा घेत नाहीत. पण जेव्हा काही घडतच नसते; तेव्हा मात्र आभाळ कोसळळ्याचा ओरडाआरडा करतात ना? मग ते शंकराचार्यांचेच तत्वज्ञान आपल्याला सांगत नसतात का? दिसणारा आहे तो आभास आहे आणि जे दिसत नाही ते सत्य आहे. ब्रह्म सत्य जगन मिथ्या? मग यांना सेक्युलर शंकराचार्य म्हटले तर चुकीचे होईल काय?

   किती विचित्र गोष्ट आहे ना? जे पोटतिडीकीने हिंदूत्वाचा विरुद्ध अहोरात्र बोलत असतात, लिहित असतात; तेच आपल्याला हिंदूत्वाचा गाभा सांगत पटवत असतात. ‘ब्रह्म सत्य जगन मिथ्या’. आता हेच बघा ना, काश्मिरच्या त्या मुलींच्या संगितसेवेला तिथल्या इस्लामी मुफ़्तीने फ़तवा काढून बंदी घातल्यावर त्यांना घराबहेर पडायची भिती वाटू लागली आहे. कारण त्यांना धमक्या मिळू लागल्या आहेत. म्हणून त्यांनी आपला बॅन्ड गुंडाळला आहे. असे काही असाराम बापू वा अन्य कोणाच्या बडबडीने झाले नव्हते. पण तेव्हा पोपटासारखे बोलणारे सेक्युलर आता गप्प कशाला? घडते आहे, ते घडतच नाही किंवा नुसताच आभास आहे, असेच त्यांना वाटत असेल ना? समोर दिसते आहे, ती माया व आभास असल्याचा दांडगा विश्वासच त्यांना प्रतिक्रिया देण्यापासून रोखत असेल ना? आणि नेहमी असेच होते. जिथे काही गंभीर घडते; तेव्हा सेक्युलर मंडळी काही घडलेच नाही अशी शांत असतात. पण जिथे काही घडलेलेच नसते, तेव्हा मात्र देश व समाज संकटात सापडल्याप्रमाणे आकाशपाताळ एक करताना दिसतील. मालेगाव किंवा अन्य कुठल्या हिंदू दहशतवादाचे आरोप घ्या. अजून त्यातले काही सिद्धच झालेले नाही. पण अगदी ते खरे आहेत असे आपण मानून हिशोब करू. त्यात पकडलेले आरोपी संशयित किती, त्यांनी केलेल्या उचापतीमध्ये मारले गेलेल्यांची संख्या किती? इस्लामी जिहाद वा दहशतवादाच्या तुलनेत पाहिल्यास शंभराला एक असेही प्रमाण आढळुन येणार नाही. पण सेक्युलरांच्या भाषा व चर्चेत सर्वात मोठा धोका हिंदू दहशतवादाचा आहे, असा कंठशोष चालू असलेला आपल्याला दिसेल. एकट्या मुंबईत आतापर्यंत दोन मोठ्या जिहादी बॉम्बस्फ़ोट मालिका व एक हत्याकांड झाले आहे. त्यातल्या मृतांची संख्याच हजारापर्यंत जाऊ शकते. त्याच्या तुलनेत मालेगाव व सगळ्या हिंदू संशयितांची बेरीज मांडून बघितले तर कुठे तुलना होऊ शकते का? मग धोका कुठला मोठा व प्राणघातक आहे? सेक्युलर शंकराचार्य दिसते तो भास व दिसत नाही तेच सत्य असे तत्वज्ञान मांडत असतात ना? मग खरे कडवे हिंदूत्ववादी कोणाला म्हणायचे? दिसते त्यावर विश्वास ठेवून बोलणारे की शंकराचार्यांच्या भाषेत ब्रह्म सत्य म्हणुन वास्तवाला आभास म्हणजे माया ठरवू बघणार्‍या सेक्युलरांना हिंदूत्ववादी म्हणायचे? कास्मिरच्या मुलींना तोंड लपवून घरी बसायची पाळी आल्यावर मुस्लिम मुफ़्तीच्या फ़तव्यावर गप्प बसणारे सेक्युलर सत्य बघू शकत नसतील तर त्यांचे तत्वज्ञान कुठले? नसलेला हिंदू दहशतवाद बघू शकणारे व असलेला जिहादी दहशतवाद न दिसणारे शंकराचार्यच नाहीत का?     ( क्रमश:)
भाग   ( ७८ )    ७/२/१३

1 टिप्पणी: