बुधवार, ३० जानेवारी, २०१३

दाभोळच्या नरेंद्र बापूभक्तांसाठी स्पष्टीकरण


   अनेक लेखातून नरेंद्र दाभोळकर यांच्यावर जे तोंडसुख घेतलेले आढळते ती काय भानगड आहे? ज्या अंधश्रद्धेची उदाहरणे दिली जातात बरीचशी राजकारणातील त्यांचा व दाभोळकर यांचा काडीचा देखील संबंध नसतो. 'अंनिस'चे कार्य ज्यांना ठाऊक आहे ते लोक गप्प बसून हे कसे काय सहन करतात? (बालमोहन, अमेरिका)

   हे काय चालवले आहे तोरसेकर? तुम्हाला लिहिता येते किंवा हा स्तंभ चालवत आहात म्हणून वाटेल ते लिहिले तरी ते लोकांना पटेल असे तुम्हाला वाटते का? इतके लोकांना गृहीत धरणे तुमच्यासारख्या पत्रकारांना शोभते का? तुम्हाला श्रद्धा किंवा काय ठेवायची आहे ती ठेवा ना! पण तुमच्या लेखांवर विश्वास ठेवणे हा काय दोष असेल का? बालमोहन यांनी जे लिहिले याला माझी पूर्ण सहमती आहे. (भाऊ नावाचे कुणी वाचक)

   नरेंद्र दाभोळकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाला मी बुवाबाजी का म्हणतो, त्याचे उत्तर या दोन प्रतिक्रियातून मिळू शकते. त्यांच्या या दोघा चहात्यांना आपल्या पूजनीय बापूंची टिंगल आवडलेली नाही. त्यातले एक म्हणतात, माझ्या लेखातून दाभोळकरांवर तोंडसुख घेतलेले आढळते. मग खुद्द दाभोळकरांच्या मूळ लेखामध्ये तरी दुसरे काय आहे? त्यांनी अन्य बुवाबापूंवर तोंडसुख घेतलेले नाही काय? पण जे तोंडसुख आपला पूजनीय बुवाबापू घेतो, ये न्याय्य आणि अन्य कुणी त्याच्याबद्दल शंका घेतली, तरी ब्रह्महत्येचे पाप, असाच आशय या प्रतिक्रियांमध्ये दिसून येत नाही काय? त्यातले बालमोहन तर दाभोळकरांना त्यांच्याच व्याख्येतलेच बुवा बनवून टाकतात व स्वत: त्यांचे अनन्य भक्त असल्याची साक्षही देतात. ते म्हणतात, 'अंनिस'चे कार्य ज्यांना ठाऊक आहे ते लोक गप्प बसून हे कसे काय सहन करतात?’ ही दाभोळकर भक्तीच नाही काय? कारण आपल्या मूळ लेखात तेच दाभोळकर लिहितात, ‘बाबांचा शब्द हीच त्याच्या साम्राज्याची घटना असते. बाबांचा शब्द हे ब्रह्मवाक्य व नैतिकता असते. विरोधी ‘ब्र’ उच्चारणार्‍याला धमकावण्यापासून ते ठोकण्यापर्यंत सर्व मार्ग वापरले जातात.’ बाबा बुवांचे भक्त विरोधी बोलणार्‍याचे सहन करत नाहीत, ही माझी व्याख्या नाही, दाभोळकर बापूंची आहे आणि बालमोहन यांचे वाक्य त्यांच्या भक्तीभावाचाच प्रत्यय आणून देणारे नाही काय? तोच तर माझा मुद्दा आहे. बुवाबाजी व तिच्या नादाला लागणार्‍या अंधश्रद्धेच्या ज्या व्याख्या खुद्द दाभोळकरांनी केल्या आहेत, नेमक्या त्याचेच अनुकरण त्यांच्यासह त्यांच्या संप्रदायाकडून होत असते.

कशी गंमत आहे बघा. ज्यांची दाभोळकरांवर इतकी भक्ती आहे व त्यांच्या कार्यावर इतकी श्रद्धा आहे, त्यांनी तरी दाभोळकरांना किती समजून घेतले आहे? बालमोहन यांच्या मते मी उपस्थित केलेले प्रश्न वा अंधश्रद्धेची उदाहरणे बरीचशी राजकारणातील असून त्याच्याशी दाभोळकरांचा काडीमात्र संबंध नाही. परंतू स्वत: दाभोळकर त्याच मूळ लेखात काय म्हणतात?

१) खरे तर प्रश्न प्रामुख्याने जोडलेले असतात समाजाच्या जडणघडणीशी. ते सोडविण्यासाठी व्यवस्था परिवर्तनाच्या लढय़ात उतरावे लागते.
 २) कोणताही बाबा व्यवस्था परिवर्तनाबद्दल चकार शब्द काढत नाही. स्वत:ला शरण येण्याचे फर्मान काढतो, त्यातच मुक्ती असल्याचा पुकारा करतो.
 ३) व्यक्तिगत कर्तृत्वाने समाजव्यवस्था बदलू अशी आशा बहुसंख्य जनसामान्यांना राहिलेली नाही. त्यासाठी त्यांना कोणी तरी स्वामी, महाराज, बापू, संत-महंत लागतो.
 ४)ही बाबा मंडळी स्वत:मध्ये विलक्षण गुंतलेली असतात. त्यांची सर्व आखणी व्यक्तिमहात्म्य वाढवणार्‍या तंत्राची असते.

   खुद्द दाभोळकरच बहुतांश समस्या राजकारण व व्यवस्थेशी संबंधित व त्यातूनच आल्याचे सांगतात. तेवढेच नाही तर ते प्रश्न चुटकीसरशी सुटण्याच्या आमिषाने लोक बुवांच्या आहारी जाऊन अंधश्रद्ध होतात, असेही म्हणतात. म्हणजेच अंधश्रद्धेचे मुळ राजकारण व त्याची सर्वव्यापी व्यवस्था, हेच असल्याचे खुद्द दाभोळलरच सांगतात. मग अंधश्रद्धा निर्मूलन तिथूनच सुरू व्हायला नको का? पण त्यांचेच भक्त किंवा चहाते बालमोहन म्हणतात, ‘ज्या अंधश्रद्धेची उदाहरणे दिली जातात ती बरीचशी राजकारणातील त्यांचा व दाभोळकर यांचा काडीचा देखील संबंध नसतो.’ मग प्रश्न असा पडतो, की बालमोहन दाभोळकरांच्या व्यक्तीमहात्म्याच्या आहारी गेलेत काय? कारण त्यांच्या विवेकबुद्धीचा वापर करून त्यांनी दाभोळकरांची विधाने व दावेही तपासलेले दिसत नाहीत. आपल्या पूज्य व्यक्तीवर टिकेचे आसुड ओढले गेल्याने ते कमालीचे व्यथित झालेले आहेत. हे विवेकबुद्धीचे लक्षण असे त्यांना वाटत असेल तर त्याबद्दल माझी तक्रार नाही. उलट त्यातूनच ते माझ्या आक्षेपाला दुजोरा देत आहेत. दाभोळकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली दुसर्‍या पद्धतीची बुवाबाजी चालवली असून आपला एक अंधभक्त संप्रदाय निर्माण केला आहे, असाच तर माझा दावा आहे.

   बुवा बापू व त्यांचा संप्रदाय यांची हीच तर गंमत असते. त्यांना नावडत्यावर टिका झाली व तोंडसुख घेतलेले ऐकायला मिळाले, मग गुदगुल्या होतात. पण उलट आपल्या आराध्य दैवत वा पूजनीय संकल्पनेला धक्का लागला; मग चीड, संताप येत असतो. पण दोन्हीतला नीरक्षीर विवेक करायची इच्छा निकामी झालेली असते. वैज्ञानिक भूमिका नेहमी कठोर परिक्षणाची व सत्यशोधनाची असते. ती कुणाला विनापरिक्षा स्विकारत नाही की पूजनीय मानत नाही. माझी भूमिका तशीच आहे व असते. अंधश्रद्धा निर्मूलन या शब्दासह त्यानिमित्ताने होणार्‍या कृती व त्यातील व्यक्ती; यांचीही छाननी मला महत्वाची व अत्यावश्यक वाटते. विज्ञानाच्या नावावर कोणी आपण सांगतो तेच ब्रह्मवाक्य मानावे, अशी सक्ती मी मान्य करत नाही. आणि दाभोळकरांच्या अवैज्ञानिकतेचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे त्यांनी डॉ. श्रीराम लागू यांना दिलेली प्रतिष्ठा होय.

   वैद्यकीय पदवीधर असलेल्या लागूंनी अभिनय क्षेत्रामध्ये हयात घालवली. त्यापैकी त्यांच्या एका जाहिरातीवर भारताच्या मेडीकल कौन्सिलने आक्षेप घेतला होता. एनासिन वेदनाशामकाच्या जाहिरातीमध्ये त्यांनी मॉडेल म्हणून भूमिका केली. एक डॉक्टर असून सामान्य ग्राहकाची वैद्यकीय दिशाभूल करणारी अशीच ती जाहिरात आहे, म्हणून लागूंना ताकीद देण्यात आली होती. कारण ते लोकांमध्ये वैद्यकीय अंधश्रद्धाच त्या जाहिरातीमधून निर्माण करत होते. अखेरीस त्यांची वैद्यकीय पदवी कौन्सिलने रद्दबातल केली. तर लागूंचा दावा असा, की अभिनय हा माझा व्यवसाय व पेशा आहे. मग बुवाबापूंचा पेशाही तोच तसाच नाही का? एकाच्या पोटभरू दिशाभूलीला पेशा म्हणून स्विकारायचे आणि दुसर्‍याच्या तशाच वर्तनाला गुन्हा म्हणून डंका पिटत फ़िरणे; ही कुठली विवेकबुद्धी असते? कारण त्याच डॉ. लागूंना दाभोळकर आपल्या मंचकावर बोलावतात व लागू तिथे अंधश्रद्धा व देवाला निवृत्त करायच्या वल्गना करतात. हा विरोधाभास ज्यांना दिसू शकत नाही, त्यांच्या बुद्धीला वैज्ञानिक म्हणायचे, की अंधश्रद्धा म्हणायचे? असेच तार्किक व विवेकबुद्धीचे सवाल अन्य बुवाबापूंना दाभोळकर विचारणार, मग त्यांना तसेच प्रश्न विचारून त्यांची विवेकबुद्धी कोणी तपासायची? त्यांच्यावर अगाध श्रद्धा असणारे तसे कार्य करण्याची शक्यता नसेल; तर दाभोळकरांचे शब्द आणि कुठल्या बापूबुवाचे शब्द सारखेच पोकळ व निरर्थक नाहीत काय?

   यातले दुसरे वाचक आहेत ते म्हणतात; मी जे लिहितो ते लोकांना पटेल असे मला का वाटते? त्यांच्यासाठी खुलासा इतकाच, की माझ्यावर डोळे झाकून कोणी दाभोळकरांप्रमाणे विश्वास ठेवावा ही अपेक्षा मी कधीच केलेली नाही. कारण तो वैज्ञानिक दृष्टीकोन होऊ शकत नाही. तशी दाभोळकरांच्या चहात्यांना सवय असेल तर ती त्यांना लखलाभ होवो. मी दुसर्‍या कुणाच्या विधान वा दाव्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत नाही आणि अन्य कुणी माझ्या लिखाणावर तसा आंधळा विश्वास ठेवावा; हेसुद्धा मला आवडणारे नाही. त्याला आपली विवेकबुद्धी कुणाच्या पायी शरण ठेवणे वा गहाण टाकणे म्हणतात. माझा वाचक असा असू नये; हीच माझी अपेक्षा असते. पण दाभोळकर भक्तीमुळे माझ्या चौकसपणाला आक्षेप घेणार्‍यांचे डोळे उघडे आहेत, हे कसे समजावे? कारण या दोघांनीही दाभोळकरांवर मी घेतलेल्या आक्षेपांची उत्तरे द्यायची टाळली आहेत. उलट मी शंका काढतो, याचा त्यांना राग आलेला आहे. आणि तो माझ्यासाठी नवा नाही. कुठल्याही राजकीय नेत्याचे निष्ठावान पाठीराखे वा बुवाबापूचे भक्तही असेच; त्यांच्या पूजनीय व्यक्तीमहात्म्यावर शंका घेतल्या तर व्यथित होतात. तेव्हा अशा भक्तीभावाशी विवेकबुद्धी व विज्ञाननिष्ठा टक्कर घेऊ शकत नसते. कारण या दाभोळकर भक्तांना त्यांच्याप्रमाणेच मी देखील त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या व्यक्तीची छाननी कऊ नये असे वाटते. त्यांना माझी चिकित्सा विचलीत करते. जेव्हा अशी अढळ निष्ठा तयार होते; तेव्हा तिला बुद्धी नव्हे भक्ती म्हणतात. आणि भक्ती वा श्रद्धेला विवेकी उत्तर नसते. खलील जिब्रान म्हणतो, ‘श्रद्धा हे हृदयातील असे मृगजळ आहे, की विचारांचे कारवान घेऊन चर्चेचे कितीही वाळवंट तुडवले, तरी त्याच्यापर्यंत पोहोचता येत नसते.’ हे जर विज्ञानाची भाषा बोलणार्‍या दाभोळकरांच्या बाबतीत अनुभवास येत असेल, तर निव्वळ भक्तीभाव व श्रद्धेवरच आपला पसारा उभा करणार्‍या बुवाबापूंच्या भक्तांना विवेक व विज्ञानाच्या चिकित्सक मार्गावर आणणे किती अवघड काम असेल? विज्ञानाचा आरंभच चिकित्सेतून होत असतो, त्याची चीड किंवा त्यालाच नकार; हे भक्तीचे व अंधश्रद्धेचे लक्षण असते. दाभोळकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाने भारावलेल्यांना ते कसे समजवणार? कारण भारावून गेले की विवेकबुद्धी आपोआप निकामी व निष्क्रीय होत असते. आणि त्याची व्याख्या परत मी माझी सांगत नाही, दाभोळकर त्याच लेखात म्हणतात,

     ‘स्वतंत्र बुद्धीने विचार करून त्यासाठी संघर्ष करणे या बाबी भक्तगणांना क्षुल्लक वाटतात. बाबांचे विचार, पारायणे, गुरुभक्ती यातच जीवनाचा आधार व कृतार्थता वाटते. त्यामधून मग अव्वल दर्जाची मानसिक गुलामगिरी निर्माण होते.’?     ( क्रमश:)
भाग   ( ७१ )    ३१/१/१३

१० टिप्पण्या:

  1. भाऊ मला वाटते "अंधश्रध्दा निर्मूलन" हा शब्दप्रयोगच चुकीचा आहे. कारण श्रद्धा ही डोळसच असते पण विश्वास अंध असू शकतो त्यामुळे ज्यांना स्वत:च्या संघटनेचे नाव नीट देता येत नाही त्यांच्या बद्दल काय बोलणार? इतकी वर्षे त्या समितीचे काम चालू आहे पण बापुखेरीज इतर कोणी त्यात आहेत हे ही महाराष्ट्राला माहीत नाही. त्यामुळे अव्वल दर्जाचे मानसिक गुलाम ज्यांनी स्वत: बनवले त्यांनी इतर बाबा,बुवांना दोष का द्यावा?

    उत्तर द्याहटवा
  2. अनुयायी मिळाले की झाला बुवा हा निकष लावला तर आज प्रत्येक क्षेत्रात बुवाबाजी आहे. दोन चार टक्के लोक प्रस्थापित नेते असतात दोनचार ट्क्के हे बंडखोर असतात.उरलेले लोक या किंवा त्या बाजूचे अनुयायी असतात. कुठलाही मनुष्य,नेता, चळवळ,विचार सर्वकाळ आदर्श असू शकत नाहीत. दाभोलकर अंधश्रद्धांची वा अंधश्रद्ध लोकांची टिंगल करत नाहित,द्वेष करत नाही. आता श्रद्धा अंधश्रद्धा या संकल्पनांबाबत मतभेत असू शकतात. प्राधान्याची क्रमवारीही वेगळी असू शकते. अंधश्रद्धेचे बळी हेच अंधश्रद्धेचे वाहक असतात त्यामुळे हे काम अवघड आहे. आपण मांडा अंधश्रद्धा निर्मूलनाची दिशा कशी असावी? आपलही स्वागतच होइल.प्रत्येकानी आपापल्या पद्धतीने ही व्यापक समाजपरिवर्तनाची चळवळ चालवावी.

    उत्तर द्याहटवा
  3. Prakash Ghatpande>>> मी डॉ. लागू हा मुद्दा अनेकदा उपस्थित केला आहे. त्याचे उत्तर आपण वा दाभोळकरांनी का देऊ नये? की मेडीकल कौन्सिलपेक्षा दाभोळकर खरे आणि ती संस्थाही खोटी व भंपक मानायची?

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Narendra Dabholkaranna Bapu Mhanun Hinavnarya bhau torsekar Yachya Buddhichi Kiv Karavishi Vatate. Tumche Guru Jyana Tumhi Bapu Athava Baba Mhanta Te Lokkanna Fasun Kase Karodpati Abjapati Bantat Te Pahilay Aamhi. Jadu-Karnichya Navakhali kase Bali Dile Jatat Tehi Pahilay Aamhi. Jamin Hadapne, Balatkar Karne sarva Sopa aahe ho tumchya Bapunna- tumchya babbana. Tyat Nuksan Kunache Zhale tumchyasarkhya Vachal- Kartavya shunya Mansanche Nahi tar Anpad sarva Samannya Mansanche. Je tumchya sarkhya lokanchya batavnila bali padtat. Narendra Dabholkar Swata sathi Navhe tar Sarva Samannya Mansansathich Andha Shraddha Nirmulanche Kam Kartat te Doctor hote. Doctorkicha Vevsay Karu shakle
      Aste va Bharpur Paisa Kamau Shakale Aste. Pan Tase Tyani Kele nahi. Tumhala Kay Samajnar? Tumhi Swatala Patrakar Samajata Jase Ya jagat Aalat Tase Janar. Dr.Dabholkar Ya jagat Aale Tase Te Gele Nahit. Aaple Kartrutva Samajaphudhe Thevun gele. Jadu-Tona Billane Sarva Samajache Bhale Hoil tumche Dekhil.

      हटवा
    2. नरुभाऊ फार चाणाक्ष होते. आमच्या चळवळीचे ते चाणक्यच होते. अत्यंत धोरणी आणि हिशेबी. १४ वर्षांपूर्वी राज्यातल्या एका बड्या मुत्सद्दी आणि धूर्त नेत्याच्या सांगण्यावरून त्यांनी सार्वत्रिक निवडणुकांच्या काळात भल्याभल्यांना कामाला लावलं होतं. ‘लोकशाही प्रबोधन व्यासपीठ’ची उभारणी करून लोकशाही, पुरोगामी, धर्मनिरपेक्ष शक्तिंना मतदान करा असं सांगण्यासाठी हा दौरा आखण्यात आला होता. नरुभाऊ आमचे सारथी होते. डॉ. लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर या बड्या ग्लॅमरवाल्या लोकांसोबत एक लिंबूटिंबू म्हणून मीही असायचो. राज्याच्या सर्व प्रमुख शहरातील या सभा फार गाजल्या. पुढे अनेक वर्षं आम्हाला या सभांचा खरा सूत्रधार माहीतच नव्हता. बर्याच वर्षांनी आपल्याला कोणी कामाला लावलं याची निळूभाऊंना कुणकुण लागली. डॉक्टरांचे सगळ्या राजकारण्यांशी मधुर संबंध असत. कोणाला भेटायला जाताना कोणाचा उपयोग करून घ्यायचा याचं त्यांचं गणित अचूक असे. ते राजकारण्यांच्या सोबत असत आणि तरीही त्यांच्यापासून सुरक्षित अंतर राखून त्यांच्यावर ते तुटूनही पडत.

      मध्यंतरी मी संभाजी ब्रिगेडचे सर्वेसर्वा पुरुषोत्तम खेडेकर यांच्या जातिद्वेष पसरवणार्या पुस्तिकांचा साधार पंचनामा करणारे लेख लिहिले. सर्व ब्राह्मण पुरुष जातीय दंगली घडवून, जाळून किंवा कापून मारण्याच्या खेडेकरांच्या भूमिकेचा पर्दाफाश केला. ते लेख मी साधनाकडे पाठवले. मात्र मराठा संघटनांच्या दहशतीमुळे हे लेख प्रसिद्ध झाले नाहीत.

      http://kalamnaama.com/maharashtrachya-vivekvaadacha-awaj/

      हटवा
  4. भाऊ,
    ...कुठलाही मनुष्य,नेता, चळवळ,विचार सर्वकाळ आदर्श असू शकत नाहीत. दाभोलकर अंधश्रद्धांची वा अंधश्रद्ध लोकांची टिंगल करत नाहित,द्वेष करत नाही. ...
    प्रकाश घाटपांडे याचे वरील कथन दोन्ही डगरीवर हात ठेवणारे म्हणून फसवे आहे. याचा अर्थ एक तर दाभो ही त्यांच्या विचारकांसाठी आदर्श उरलेले नाहीत. दाभोनी अं नि. ची दिशा स्वतः ठरवली आहे. बक्षिसाचे आमिष दाखवून ते लोकांच्या अंनि करू इच्छितात. दाभो त्यांच्या विरोधकांची निंदा वा नालस्ती करत नाही असे म्हणणे साहसाचे ठरेल. अंनि कसे असावे असे मत त्यांनी कोणाला मागितले आहे? काय तर भाऊंनी ते द्यावे.

    उत्तर द्याहटवा
  5. शब्दाची दुधारी तलवार हातात स्थानापन्न जाह्ली म्हणजे ती कोणावरही चालवू शकतो याचा लिहीणार्‍याला यथास्थित माज चढत जातो.

    उत्तर द्याहटवा
  6. khedekaranchya pustakancha panchnama karnare lekh kuthe vachayla miltil?

    उत्तर द्याहटवा
  7. malhi lekh vachache ahet. apaly blogvar ka tumhi lekh takat nahi.

    उत्तर द्याहटवा
  8. One of my friend recommended this blog; but when I have read lots of Bhu's articles I felt that he's biased towards one type of IDEOLOGY.When he's blaming other journalists about not being neutral,he's doing the same thing. there is no difference between him and other. Bhau I'll recommend you one blog as below even he's novice but he's good enough than others

    http://www.sahyadribana.com/

    उत्तर द्याहटवा