बुधवार, १६ जानेवारी, २०१३

हनुमंत आणि बुद्धीमंत यांच्यात फ़रक किती?


    असे म्हणतात, की एकदा हनुमंत म्हणजे रामभक्त मारुतीच्या हाती मोत्यांचा कंठहार लागला होता. त्यातले एक एक मोती अत्यंत मूल्यवान होते. पण त्याला त्यात ‘राम’ सापडला नाही. त्याने एक एक मोती हारातून मोकळा केला व दाताने चावून, तुकडे पाडून आत राम दिसतो का ते तपासले. पण कुठल्याच मोत्यामध्ये त्याला राम आढळला नाही. तेव्हा त्याने ते नासाडी केलेले मोती फ़ेकून दिले. आता जे देवभक्त व श्रद्धाळू आहेत, ते कौतुकाने अशा गोष्टी भक्तीभावाने ऐकत असतात. त्यांना त्यातले तर्कशास्त्र शोधण्याची गरज वाटत नाही. पण ज्यांची बुद्धी मोठी कुशाग्र असते, असे लोक शेवटी हनुमंत म्हणजे काय माकडच ना, असे म्हणून त्या कथेची टवाळी करतात. त्यांना मग आपली बुद्धी किती तर्कशुद्ध व शाबूत आहे; त्याचा मोठाच आनंद मिळत असतो. तेवढेच नाही. अशा बुद्धीमंतांना आपण जे कोणी धर्म देव करणारे आहोत, त्यांची खिल्ली उडवल्याचेही बौद्धिक समाधान आपोआपच मिळत असते. कारण आपण माणूस आहोत आणि आपल्याला विकसित मेंदू मिळालेला आहे; तर त्याचा वापर करण्याऐवजी माकडावर श्रद्धा ठेवणे, त्यांना आपल्या माणूस असण्याचा कमीपणा वाटत असतो. मग अशा देवभक्तांची खिल्ली उडवली तर आपला मेंदू जागच्या आगी शाबूत असल्याचा हवालाही स्वत:च घेता येत असतो. मग त्यांनी का खुश होऊ नये? पण असे जे कोणी महान कुशाग्र बुद्धीमत्तेचे लोक असतात. त्यांची लायकी तरी त्या माकडापेक्षा वेगळी असते का? सामान्य जे भक्त असतात, ते भक्तीभावाने गोष्ट ऐकतात आणि आपल्या नित्यनेमाच्या कामाला लागतात. हनुमंताला देव मानत असले तरी त्याचे अनुकरण त्याचे कोणी भक्त करीत नाहीत. कारण ते अजब काम देवाला शक्य आहे, आपण सामान्य माणसे आहोत, म्हणूनच देवाचे अनुकरण करू नये इतकी व्यवहारी विवेकबुद्धी त्या सामान्य भक्ताकडे असते. मात्र त्याच पुराणकथेची टिंगल उडवणारे असतात, त्यांना त्याच माकडाचे अनुकरण करताना आपली बुद्धी लयास जाते आहे; याचे भान रहात नाही. मग त्यांची अवस्था भक्त, श्रद्धाळू माणसापेक्षाही दयनीय होऊन जाते. कारण हनुमंताला माकड ठरवतांना असे काही बुद्धीमंत स्वत:च त्याच्यासारख्या मर्कटलिला कधी करू लागतात, त्याचे त्यांनाच स्मरण उरत नाही.

   आता या भाकडकथेकडे थोडे बघू. त्यातला तो हनूमंत काय करतो? पक्का रामभक्त असल्याने प्रत्येक गोष्टीत राम असलाच पाहिजे असा त्याचा अट्टाहास असतो. आणि ज्यात राम नाही त्या गोष्टी कितीही मुल्यवान असल्या; तरी तो मोडूनतोडून टाकतो. जी काही गोष्ट असेल त्यात राम असला तरच त्याला काही अर्थ व उपयुक्तता आहे, हेच त्या हनुमंताचे तर्कशास्त्र आहे ना? मग आजच्या विद्वानांचे तर्कशास्त्र तरी कुठे वेगळे आहे? काही हिंदूत्ववादी, काही सेक्युलर, कोणी इस्लामवादी, असे अनेक विचारवंताचे गट व घटक आहेत. त्यांचे आपले आपले तत्वज्ञान आहे आणि जे काही जग आहे व चालले आहे, ते त्याच तत्वज्ञानानुसार चालले पाहिजे असा त्यांचा कायम आग्रह असतो. तसे नसेल तर मग अशी माणसे त्यात अडथळे निर्माण करू आगतात, त्यात व्यत्यय आणतात, मोडतोड सुरू करतात. मग तो कार्यक्रम, ती संस्था, ती संघटना वा योजना; किती का चांगली वा उपयुक्त असेना. त्यात या बुद्धीमंतांना त्यांचा ‘राम’ दिसावा लागतो. नसेल तर त्यांनी त्या मूल्यवान मोत्याचे चावून तुकडे केलेच म्हणून समजा. गेल्या काही वर्षात अखील भारतिय साहित्य संमेलनाचा बोजवारा अत्यंत इमानेइतबारे उडवणारे; कोणी गुंड दंगलबाज आहेत का? त्यात एकाहून एक बुद्धीमान व तर्कशुद्ध युक्तिवाद करणार्‍यांचा भरणा दिसेल. अमूकतमूक नाही, मग साहित्य संमेलन उधळून लावू; अशा धमक्यांनीच सामान्य माणसाला साहित्य संमेलन जवळ आल्याची चाहूल लागत असते. कधी त्यात राजकारणी नकोत असा आग्रह असतो, कधी त्यात अमूकतमुक जातीचे वर्चस्व नको अशी मागणी असते तर कधी आमंत्रण पत्रिकेवर कोणाचे चित्र वा नाव आहे, त्यावरूनही खडाजंगी उडते. एकूण काय, अशा प्रत्येक शहाण्याला त्याचा त्याचा ‘राम’ त्या संमेलनात दिसावा असा आग्रह असतो. अर्थात अशी स्थिती फ़क्त साहित्य संमेलनापुरती मर्यादित नाही. ती कुठल्या सिनेमातल्या गाण्यासाठी, त्यातल्या कुठल्या वाक्यासाठी, प्रसंग वा पात्राच्या रूप वा वस्त्रासाठी असू शकते. कधी कोणाला आपला ‘राम’ त्या समारंभ, आयोजन वा कलाकृतीमध्ये दिसायची उबळ येईल; त्याचा कुठला भरवसा देता येणार नाही, इतके हनुमंती विद्वान आता आपल्या देशात निर्माण झालेले आहेत. मग बिचारा खराखुरा हनुमंत त्यांच्याकडे अचंबित होऊन आपले राम शोधण्याचे कामही विसरून गेला तर नवल कुठले?

  ही गंमत नाही. तुम्ही आज सगळ्या क्षेत्रातल्या विद्वान बुद्धीमंतांकडे बघा. त्यातल्या बहुतेकांना वास्तवाचे वर्तमानाचे भान उरलेले नाही. मग दिल्लीतल्या सामुहिक बलात्काराचा विषय असो, सीमेवरील जवानाचे मुंडके कापुन नेण्याचा गंभीर मामला असो किंवा साहित्य संमेलनाचा सांस्कृतिक विषय असो, त्यात परिस्थितीची गरज विसरून हे लोक भलत्याच दिशेने बकवास करताना दिसतील. देशाला भेडसावणार्‍या अनेक प्रश्नांसाठी लाखो हजारो लोक कामधंदा सोडून रस्त्यावर उतरत आहेत, कारण त्यांच्या जगण्यातली शाश्वती संपली आहे. त्यांचा कायदा व्यवस्था व सुरक्षित जीवनावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे एकूणच देशातील राज्यव्यवस्था व लोकशाही यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पण हे विविध गटात विभागलेले हनुमंती विद्वान; त्यात आपले तत्वज्ञान वा भूमिका शोधत बसलेले दिसतील. बलात्काराचा गंभीर मामला असताना, त्यासाठी रस्त्यावर आलेल्यांमध्ये कुठल्या पक्षाचे वा जातीचे लोक होते? भ्रष्टाचार निर्मूलन वा लोकपाल आंदोलनात कोणत्या संघटनेचा संबंध आहे, यावर तावातावाने बोलले जात होते. मूळ ज्या विषयावरून लोक अस्वस्थ आहेत, त्याची कोणाला फ़िकीरच नाही. साहित्य संमेलन कशासाठी असते; त्याचा थांगपत्ता नाही. आमचा परशूराम हवा किंवा तुमचा परशूराम नको, यावरून हमरातुमरी. पण साहित्य जीवनाला संमृद्ध करणारे उरले आहे, काय त्याची जाणिव कुठेच नाही. मोत्याचा कंठा किंमती असतो आणि शोभा वाढवण्यासाठी असतो, त्यात राम दिसायची गरज नाही, हे माकडाला कळत नसेल, म्हणून त्याची टिंगल करणार्‍यांना; बाकीच्या आयुष्यातल्या प्रत्येक घटनांमध्ये आपापले तत्वज्ञान शोधायचा ध्यास काय वेगळा आहे? निदर्शकांमध्ये केजरिवाल वा भाजपाचे लोक आल्याने बलात्काराच्या वेदना, यातना क्षुल्लक होतात काय? अशा आंदोलनात लोकभावना व मागणी काय आहे, त्याकडे बघायचे असते आणि आपल्या तत्वज्ञानाचा शोध घ्यायचा नसतो, याचे भान किती विद्वान दाखवतात?

   संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचे आंदोलन उभारण्याचे प्रयत्न चालू होते; तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रबोधनकारांना दिले्ला सल्ला बहूमोलाचा होता. सर्वच पक्षात बेदिली आहे, त्यांच्यातून विस्तव जात नाही. त्यांना खरेच महाराष्ट्र हवा असेल तर सर्वांनी आपापल्या विचार व भूमिकांचे गाठोडे बांधून मराठी राज्य मिळेपर्यंत खुंटीला टांगून ठेवावे; असेच बाबासाहेबांनी सांगितले होते. तसे सर्व कॉग्रेसेतर पक्ष वागले, म्हणूनच तो लढा यशस्वी झाला व संयुक्त महाराष्ट्राचे राज्य पदरात पडू शकले होते. मग तसा सल्ला देणारे व त्यात आपल्या पक्षाला सहभागी व्हायला सांगणारे बाबासाहेब; विचाराला तिलांजली देणारे होते काय? अजिबात नाही. ती वेळ व ती मागणी, पक्षीय व वैचारिक तत्वज्ञानापलिकडची आहे, याचे भान त्यांनाच होते. त्यांच्या सल्ल्याने बाकीचे पक्ष भानावर आले म्हणून महाराष्ट्र मिळू शकला होता. मग तेव्हा एकत्र येण्यासाठी एका पक्षाने दुसर्‍याला त्याचे तत्वज्ञान वा विचारसरणी सोडून द्यायला अटी घातल्या नव्हत्या. किमान समान कार्यक्रमावर विविध पक्षांनी एकत्र येण्याचा तो पहिला प्रयोग होता. म्हणजे बाबासाहेबांनी कोणता सल्ला दिलेला होता? तर प्रत्येक गोष्टीत व घटनेत, परिस्थितीत आपापल्या भूमिका व तत्वज्ञानाचा ‘राम’ शोधणारे हनूमान होऊ नका. जरा भानावर या आणि व्यवहारी माणसे व्हा. आणि तो सल्लाच लाभदायक ठरला होता. त्यांच्यापेक्षा आजचा कुठला संपादक, पत्रकार विश्लेषक, नेता किंवा बुद्धीमंत अधिक व्यवहारी विचारवंत असू शकतो? आज देशाला भेडसावणार्‍या डझनावारी प्रश्न व समस्यांवर उपाययोजना करायची असेल; तर आपापल्या तत्वज्ञानाची गाठोडी बांधून खुंटीला टांगायची वेळ आलेली आहे. एकजुटीने त्या समस्यांवर लढायची व उपाय अंमलात आणायची गरज आहे. पण दुर्दैव इतकेच की आज नेमका या वैचारिक हनुमंतांचा कान पकडू शकणारे बाबासाहेबांसारखे उत्तुंग व्यक्तीमत्व आपल्यात नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत आपापला ‘राम’ शोधणार्‍यांची झुंबडगर्दी झालेली असून त्यात मूल्यवान म्हणावा अशा देशाची नासाडी मात्र खुलेआम चालू आहे.  ( क्रमश:)
भाग   ( ५८)    १७/१/१३

1 टिप्पणी: