गुरुवार, १० जानेवारी, २०१३

काश्मिरमध्ये मेलेले श्वापद जिवंत कोणी केले?



   आधीच्या लेखात मी एक गोष्ट कथन केली होती. तीन महापंडित व एका गावंढळ अडाण्याची ती गोष्ट होती. सर्वप्रकारचे ज्ञान संपादन करून महाविद्वान झालेल्या त्या तिघांचा एक गावठी मित्र, त्यांच्या ज्ञानाची किमया बघून थक्क होतो. पण ज्ञानावर विसंबून रहाताना वास्तवाचे भान राखण्याचा विवेक त्या तिघांकडे नसतो, म्हणून ते जंगली श्वापद आलेल्या सिंहाला जागवतात, संजीवनी देतात. तो जिवंत झाला तर आपल्यालाच फ़ाडून खाईल, हे वास्तव त्या अडाणी गावंढळाला कळत असते आणि तो व्यवहारी ज्ञानावर विसंबून होणारा आत्मघात थांबवायचा प्रयत्न करतो, पण स्वत:ला शहाणे समजणारे मात्र वस्तूस्थितीचा विवेक गमावलेले असतात. म्हणूनच ते आपल्या बुद्धीच्या व कल्पनाशक्तीच्या आहारी जातात. त्यातून स्वत:चा आत्मनाश ओढवून घेतात. अडाणी माणूस त्याला म्हणतात, जो पुस्तकातून वा दुस‍र्‍यांच्या मत, संकल्पनातून शिकत नसतो, तर व्यक्तीगत वा सामुहिक अनुभवालाच आपला गुरू मानून एकलव्याप्रमाणे शिकत असतो. एकलव्याची गोष्ट आपण अनेकदा ऐकलेली आहे. मग त्याचेही काही शहाण्यांनी विडंबन केले आहे. एकलव्याला शिकायची बंदी होती; याकडे भर देणारेही आहेत. पण मग त्याला गुरूने शिकवले नाही, तरी तो द्रोणाचार्याच्या सर्वोत्तम शिष्यापेक्षा उत्तम धनुर्धारी का झाला? या प्रश्नाचे उत्तर महत्वाचे आहे. सगळा त्या गोष्टीतला बोध त्याच प्रश्नाच्या उत्तरात सामावलेला आहे. ज्याला द्रोणाचार्य लाडका शिष्य म्हणून मन लावून शिकवत होते; त्याला जिवढे शिकून घेता आले नाही; तेवढे न शिकवलेल्या एकलव्याला का साधले? मला नेहमी त्याच प्रश्नाने सतावले होते. कधीतरी विचार करताना तर्काने त्याचे उत्तर मला मिळू शकले. अर्जून जेवढे शिकवले तेवढाच शिकला. कारण त्याला तेवढेच शिकण्याचा निर्बंध होता., गुरूने शिकवले त्यापलिकडे जाऊन स्वत: शिकायची मुभा अर्जुनाला नव्हती. ते स्वातंत्र्य एकलव्याला होते, कारण त्याच्या शिकण्य़ावर द्रोणाचार्याची हुकूमत नव्हती. त्यामुळेच तो बघून म्हणजे स्वत:च्या अनुभवातून शिकत होता. सहाजिकच तो अर्जुनापेक्षा अधिक शिकला, उत्तम शिकला व उत्तम धनुर्धारी होऊ शकला. शिकायचे काय हे त्याचे त्याने ठरवले होते, म्हणूनच तो प्रस्थापित कौशल्य वा ज्ञानाच्या पलिकडली झेप घेऊ शकला. पुस्तकातले, ग्रंथातले ज्ञान नाकारता येणार नाही. पण ते दुसर्‍याचे अनुभव असतात, ती दुसर्‍याची दुसर्‍या परिस्थितीतली मते असतात. आपण त्या काळातले, त्या परिस्थितीतले वा त्या अनुभवातले नसतो. म्हणून आपण ज्या स्थितीत आहोत त्यानुसारच अनुभवातून शिकतो, ते महत्वाचे व निर्णायक असते. 

   त्या महापंडितांना विविध ज्ञान व कौशल्य प्राप्त झाले होते, आणि त्याचा वापर करण्याची क्षमताही त्यांच्यात आलेली होती. पण कुठल्या परिस्थितीमध्ये त्याचा वापर घातक असू शकतो, हे त्यांना शिकवले नव्हते आणि त्यांनी अनुभवातून शिकायचा विचारही केला नव्हता. सहाजिकच सिंहाला जिवंत केल्यास तो समोर दिसलेल्या भक्ष्यावर झडप घालतो, हा अनुभव गाठीशी नसलेले विद्वान त्या श्वापदाची शिकार झाले. बहुतांशी ग्रंथपंडित व पुस्तकपंडित जगभर असेच वागताना दिसतील. त्यामुळेच त्यांची बुद्धी कुशाग्र असली; तरी ते समस्या सोडवण्यापेक्षा अधिक समस्या निर्माण करताना दिसतील. त्यांना सहसा वास्तवाचे बान नसल्याचाच आपल्याला अनुभव येईल. निवडणूकीच्या निकालापासून दंगल वा सामाजिक सामंजस्याच्या कुठल्याही विषयात; विचारवंतांनी आधी केलेली भाकिते खोटी पडलेली शेकडो उदाहरणे इतिहासात सापडतील. गेल्या दोन तीन दशकात जेवढे म्हणुन सामाजिक सामंजस्याचे प्रयास अशा बुद्धीमंतांनी केले आहेत, त्यातून अधिकाधिक सामाजिक दरी वाढत गेल्याचेच दिसेल. त्यांच्याच आक्रस्ताळ्या विधाने, निष्कर्ष वा विवेचनाने दंगलींच्या आगीत तेल ओतलेले दिसेल. अगदी जवळचा अनुभव म्हणजे अमेरिकन लोकशाहीवादी व उदारमतवादी यांनी इराक व अफ़गाणिस्तानमध्ये लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या शांततावादी प्रयत्नांनी अधिक लोकांचा बळी गेला आहे आणि अराजकाची स्थिती मात्र आलेली आहे. आपल्याकडे काश्मिरचे उदाहरण देता येईल. जोपर्यंत तिथे स्वतंत्र काश्मिरची भाषा बोलण्यावर कठोर बंदी होती व तसे बोलणार्‍याला गजाआड ढकलले जात होते; तोवर काश्मिरात शांतता होती. पण वाटेल ते बोलायचे स्वातंत्र्य बहाल करण्यात आले; तेव्हापासून काश्मिर गेल्या तीन दशकात पुरता उध्वस्त होऊन गेला आहे. तिथून हिंदू पंडित परागंदा झाले आहेत आणि तीन लाखाहून अधिक सेना तैनात करूनही शांतता प्रस्थापित होऊ शकलेली नाही. काश्मिर ही पाकिस्तानने निर्माण केलेली समस्या असे आपण म्हणतो, पण त्यात तथ्य नाही. ती इथल्या उदारमतवादी सेक्युलर शहाण्यांच्या मुर्खपणाने निर्माण केलेली समस्या आहे. अगदी कालच्या गोष्टीसारखीच. 

   १९७५पर्यंत स्वतंत्र काश्मिरची भाषा बोलणारे शेख अब्दुल्ला म्हणजे आजच्या मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे आजोबा, तुरुंगत होते. त्यांच्या संघटनेवरही बंदी होती. ती उठवून त्यांनाच मुख्यमंत्री करण्यात आले. कारण त्यांनी आपली मागणी सोडुन दिली होती. पण स्वतंत्र काश्मिरची भाषा बोलणारे नवे गट व नेते उभे राहिले. त्यांना ‘अविष्कार स्वातंत्र्य’ देण्यात आले. त्याचेच परिणाम आपण आज भोगत आहोत. कारण अब्दुल्ला बाजूला पडले आणि निवडणुका न लढवता हिंसक आंदोलने करणारे जमाव आता उभे आहेत. रोजच्या रोज घातपात सुरू आहेत. योगायोग असा, की आपल्या गोष्टीत सिंह आहे आणि शेख अब्दुल्ला यांनाही काश्मिरचा सिंह म्हटले जायचे. त्याला बंदी घालून झोपवला होता; तोवर काश्मिरात शांतता होती. त्याला अविष्कार स्वातंत्र्य व संघटना करायची संजीवनी दिली आणि परिणाम समोर आहेत. त्या सिंहाला म्हणजे स्वतंत्र काश्मिर वा त्यासाठीच्या जिहादी मानसिकतेला संजीवनी कोणी दिली? याच देशातल्या बौद्धिक कसरती करणार्‍या शहाण्यांनी दिली ना? कुणा अपुर्‍या शिक्षण घेतलेल्या पोलिस वा सैनिक, जवानाने ती संजिवनी दिलेली नाही. तेव्हा त्या गोष्टीतला मतितार्थ समजून घेण्याची गरज आहे. कुठल्याही देशातला वा समाजातला बुद्धीमंत; कधीच तिथल्या समस्या सोडवू शकत नाही. त्याचे चिंतन समाजोपयोगी जरूर असते. पण तेच चिंतन घेऊन कोणी व्यवहारी माणूस उपाय योजू लागतो, तेव्हाच त्याचे चांगले परिणाम संभवतात. आज दुर्दैवाने भारत नावाच्या देशाचे बौद्धिक दिवाळे वाजलेले आहे आणि त्याच दिवाळखोरांच्या नादाला लागून राजकीय पक्ष व राजकीय सत्ता निर्णय घेत आहेत. म्हणूनच असे भीषण अनुभव घ्यायची वेळ जनतेवर आली असून लोकांना स्वत:च रस्त्यावर यायचा प्रसंग ओढवला आहे. 

   गुन्हेगार मोकाट झाले आहेत, भ्रष्टाचार पुरता बोकाळला आहे, अन्याय अत्याचाराला पारावार उरलेला नाही, कायद्याच्या राज्याचा पुरत बोजवारा उडालेला आहे. आणि आमचे संपादक व बुद्धीमंत त्यावर गहन चर्चा करीत आहेत. लोक चिडून रस्त्यावर आलेत, तर प्रश्न चर्चेने सुटतात, असा फ़ुकाचा सल्ला देण्याचा आगावूपणा केला जात आहे. जेव्हा जगणेच असह्य होते, आणि कशावरही लोकांचा विश्वासच उरत नाही, तेव्हाच लोक संतप्त होऊन, कामधंदा बाजूला ठेवून रस्त्यावर येतात. अन्यथा पोटापाण्याच्या मागे अखंड धावणार्‍या सामान्य माणसाला निदर्शने वा आंदोलने यासाठी मोकळा वेळ नसतो. पण जगण्यामधली सुरक्षितता संपली, मग कमावणे बाजूला ठेवावे लागते, व सुरक्षेला प्राथम्य द्यावे लागते. हे साधे व्यवहारज्ञान बुद्धीचे बुड्बुडे उडवणार्‍यांना नसेल, तर त्यांना लोकांच्या प्रक्षोभामध्ये अराजक दिसणारच. त्यांना लग्नाची वरात, विजयाची मिरवणूक वा अंत्ययात्रा व प्रक्षोभक जमावाचा मोर्चा; यातला फ़रक कळणारच कसा? कारण त्यांना खरा जिताजागता माणुस असतो, हेच माहित नाही. आपण आगीशी खेळतो, याचेही भान नाही. म्हणूनच सामुहिक बलात्कार धावत्या बसमध्ये हमरस्त्यावर होतो, त्याची दाहकता या शहाण्य़ांना कळलेलीच नाही. मग लोक असे रस्त्यावर का येतात, हे कसे कळायचे? त्यांच्या लेखी सिंहाला संजिवनी देण्यात मोठ्या बौद्धिक संकल्पनेचा प्रयोग होत असतो. त्याच्या परिणामांकडे बघायचे नसते. याच पोरकटपणाने कायदा व पोलिस निकामी झाले व गुन्हेगार समाजकंटक शिरजोर होत गेले आहेत. स्वातंत्र्य व नागरी हक्क नावाची संजिवनी मरगळल्या श्वापदाला देण्याचे हे सर्व भीषण परिणाम आहेत. आता सुद्धा त्यातला एक बलात्कारी अल्पवयीन आहे, अशी चर्चा बेशरमपणे केली आहे. त्याच्या क्रौर्यामध्ये, अमानुषतेमध्ये त्याचे अल्पवय दिसते का? नसेल तर हा कसला पोरकटपणा आहे? त्याच पोरकटपणाला बुद्धीवाद समजून आपण बघत बसलो, तर हे गुन्ह्याचे श्वापद आपली शिकार करणारच ना?     ( क्रमश:)  
भाग   ( ५२)    ११/१/१३

1 टिप्पणी:

  1. "काश्मिर ही पाकिस्तानने निर्माण केलेली समस्या असे आपण म्हणतो, पण त्यात तथ्य नाही. ती इथल्या उदारमतवादी सेक्युलर शहाण्यांच्या मुर्खपणाने निर्माण केलेली समस्या आहे."
    हे वास्तव इतक्या परखडपणे मांडल्या बद्दल धन्यवाद. ह्या स्पष्टवक्तेपणाबद्दल आपले आभार मानावे तितके थोडेच आहेत.

    उत्तर द्याहटवा