गुरुवार, १४ मार्च, २०१३

आकडयातून जनतेची कशी फ़सवणूक करावी?



   तुम्ही कुठल्या महागाच्या वस्तू घ्यायला दुकानात गेलात किंवा कोणी तत्सम सेवा घ्यायचा आग्रह करायला तुमच्या घरी आला; तर तिथे वस्तू वा सेवेचे कौतुक सांगणारा असतो, त्याला सेल्समन म्हणजे विक्रेता म्हणतात. पण तोच विक्रेता जरा अपटूडेट असला, म्हणजे टाय वगैरे लावून तुमच्या गळ्यात माल मारायला बघणारा असतो, त्याला मार्केटींग एक्झेक्युटीव्ह असे भारदस्त नाव आहे. अलिकडे बाजारी अर्थव्यवस्था स्विकारून देशाने समाजवादाला तिलांजली दिल्यापासून हे बाजारी मार्केटींग घराघरात आणि सर्वच क्षेत्रात येऊन पोहोचले आहे. तुमच्या मोबाईलवर अनावश्यक व अनोळखी लोकांचे फ़ोन येतात. कोणी कर्ज घ्यायचा आग्रह धरत असतो. कोणी वॉशिंग मशीन वा मोटार वगैरे घेण्य़ासाठी आर्जवे करत असतो. तेव्हा ते अतिशयोक्त असे वर्णन करतात. तुम्ही त्यांच्याकडुन विकवू माल किंवा सेवा घ्यावी, म्हणून ते अशा भाषेत बोलत असतात, की जणू तुम्हाला तुमच्या भल्याची काही पर्वाच नाही. जे काही तुमचे कल्याण व्हायचे असेल; ते त्यालाच कळत असावे अशा थाटात ही मंडळी बोलत असतात. थोडा काळ त्यांचे ते सेल्समनचे रूप विसरून जा आणि त्यांच्याच रुपात पत्रकार वा वाहिन्यांवरचे बोलणारे पोपट आहेत; अशी कल्पना करून बघा. मग लक्षात येईल, की आपण आजकाल बातम्या वाचतो किंवा वाहिन्यांवर बघतो, ऐकतो; ते सुद्धा मार्केटींग होऊन बसले आहे. छापणारा किंवा वाहिनीवर बोलणारा आपल्याला काही घडले असे सांगत नसतो; तर कुठली तरी माहिती माल गळ्य़ात मारावा तशाच थाटात बोलत, सांगत वा लिहित असतो. तुम्ही विचारही न करता, विक्रेत्याकडून माल खरेदी करावा, अशी त्याची अपेक्षा असते, तशीच या पत्रकारांची अपेक्षा असते. निदान त्यांच्या वागण्याचा थाट तसाच असतो. अवघा महाराष्ट्र तुमच्याकडून उत्तर मागतो आहे. देशाच्या जनतेला हे कळलेच पाहिजे. जनतेसमोर स्पष्ट खरे काय ते सांगा; अशीच भाषा नसते का? पण यांना आपण आपले वकील वा प्रतिनिधी म्हणून नेमलेले आहे काय? नसेल तर ही मंडळी आपल्या वतीने अशी फ़ुकटात कशाला राबत असतात? तो विक्रेता वा सेल्समन जसा आपल्याकडून कुठला पगार मि्ळत नसताना आणि त्याच्या मालकाचा पगार घेत असताना, आपल्या भल्यासाठी बोलण्याचा आव आणतो, ते औदार्य कशासाठी व कुठवर खरे असते? जोपर्यंत आपण ती वस्तू वा सेवा खरेदी करीत नाही, तोपर्यंतच ते औदार्य असते. एकदा का ती खरेदी संपली, की दुसर्‍या दिवशी त्यात गफ़लत आढळली मग त्याच्याशीच संपर्क साधून बघा. तो तुमच्यासाठी क्षणाचाही वेळ देत नसतो. ‘सर्व्हिस डिपार्टमेंटकडे जा’ अशी कोरडी भाषा सुरू होत असते ना? मग बातम्या देणारे वा सांगणार्‍यांची भाषा तरी कुठे वेगळी असते. बातमी संपली, की यांची माया पातळ होते. 

   दोन महिन्यांपुर्वी दिल्लीतल्या सामुहिक बलात्काराने यांच्या माना शरमेने खाली गेल्या होत्या. आज त्या कुठल्या कारणाने वर आलेल्या आहेत? त्या मुलीला न्याय मिळाला आहे, की त्यातल्या गुन्हेगारांना शिक्षा झाली आहे? मग माना वर यायचे कारण काय? तर सगळेच नाटक असते. अभिनय असतो. आवेश असतो. तुम्हाला भारावून टाकून आपल्या भूमिका तुमच्या गळ्य़ात मारायचा सगळा बनाव असतो. म्हणूनच अशावेळी अनेकदा सेल्समन जसा अतिशयोक्ती करतो, तशीच हे पत्रकार मार्केटींग करतानाही थापा मारत असतात. ग्राहकाप्रमाणे तुमचीआमची दिशाभूल करीत असतात. त्या दिवशी शुक्रवारी कुमार केतकर यांच्यासारखा व्यासंगी संपादकही तेच करत होता. कसलेल्या सेल्समनप्रमाणे केतकर कॉग्रेसची राजकीय भूमिका ‘एबीपी माझा’वर प्रेक्षकांच्या गळ्यात मारत होते. त्यासाठी आकड्यांची व वर्ष निवडणुकांची गल्लत करत होते. मार्क ट्वेन हा जगप्रसिद्ध लेखक विचारवंत खोटे तीन प्रकारचे असते असे म्हणतो. पहिले खोटे नुसतेच साधेसरळ खोटे. दुसरे असते ते धडधडीत खोटे. पण त्यापेक्षाही धोकेबाज खोटे म्हणजे आकडेशास्त्र असे मार्क कशाला म्हणतो? तर आकड्यांचा खेळ करून तुम्ही जिंकणार्‍याला पराभूत म्हणून पेश करू शकता आणि पराभूताला जिंकलेला म्हणून सिद्ध करू शकता. माझा वाहिनीच्या त्या कार्यक्रमात केतकर सराईतपणे तीच भामटेगिरी करीत होते आणि स्वत:ला चिकित्सक समजणार्‍या प्रसन्ना जोशी व राजीव खांडेकर यांच्या ते लक्षातही येऊ शकत नव्हते. मग सामान्य प्रेक्षकाच्या नजरेस कसे यावे? आकडे कसे फ़सवू शकतात? केतकरांचा दावा असा होता, की १९९५ सालातही सेना भाजपा युतीला बहुमत मिळालेले नव्हते. त्यांना अपक्षांनी पाठींबा दिला नसता, तर त्यांची सत्ता येऊच शकली नसती. तसे असते तर शरद पवारांनी युतीला सत्तेवर बसू दिले असते काय? पण असा दावा करताना केतकरांनी सत्य असत्याची सराईतपणे सरमिसळ केलेली होती. कशी? तर अपक्षांचा पाठींबा युतीला घ्यावा लागला हे सत्य होते. सर्वात मोठा निवडून आलेला पक्षा कॉग्रेस हे कागदोपत्री सत्य होते. पण अपक्षांच्या पाठींब्याशिवाय युतीला सत्ता संपादन करणेच अशक्य, हे त्यातले धडधडीत असत्य होते. आणि तेच धडधडीत असत्य लोकांच्या गळी मारण्यासाठी केतकरांनी आकडेशास्त्राची मदत घेतली होती. 

   महाराष्ट्राच्या विधानसभेत २८८ जागा आहेत. त्यामुळे त्यात १४५ आमदारांचे बहूमत होते. तेवढ्या जागा युतीला मिळाल्या नव्हत्या हे खरे. पण युतीकडे तेव्हा सेना ७४, भाजपा ६४ आणि त्यांचे बंडखोर तीन असे एकूण १४१ आमदार होते. म्हणजेच बहूमताचा पल्ला गाठायला आणखी केवळ चार आमदारांची कमतरता होती. दुसर्‍या बाजूला कॉग्रेसचे ८० आमदार निवडून आलेले होते. बाकी लहानसहान पक्ष व अपक्षांची सगळी मोट बांधली तरी आमदारसंख्या १४७ झाली असती. ते शरद पवारांनाही अशक्य होते. म्हणूनच त्यांनी पराभव मान्य केला होता. दुसरी गोष्ट युती निवडणूकपुर्व असल्याने दोन्ही पक्षांचे निवडून आलेल्या आमदारांची संख्या एक गट म्हणून तोच सर्वात मोठा पक्ष होता. सेनाभाजपानी मिळून २८८ व कॉग्रेसने २८८ जागा लढवल्या होत्या. त्यामुळे आमदार संख्या सांगताना सेनेचे व भाजपाचे आमदार वेगळे सांगणे; ही निव्वळ बदमाशी आहे व होती. ही चलाखी लक्षात घ्यायला हवी. १९९९ सालात निकाल लागले तेव्हा कॉग्रेस, राष्ट्रवादी व अन्य पक्ष एकमेकांच्या विरोधात लढलेले होते. पण युतीला १२५ तर उरलेल्यांना १६३ आमदार असल्याने सेक्युलर बहूमत असल्याचे हेच केतकर प्रभृती सांगत होते. म्हणजे एका बाजूला एकत्र लढलेल्यांचे आमदार वेगवेगळे सांगायचे आणि दुसरीकडे एकमेकांच्या विरुद्ध लढलेल्यांचे आकडेही बेरीज करून सांगायचे. ही शुद्ध बनवेगिरी नाही काय? यालाच मा्र्क ट्वेन सर्वात खरतनाक खोटे म्हणतो. आणि शुक्रवारच्या कार्यक्रमात एबीपी माझावर बोलताना केतकर तीच बेदमाशी करत होते. हे तपशील नवख्या व अर्धवट अकलेच्या पत्रकारांना कळतही नाहीत. मग प्रेक्षकांना कुठून कळायचे? खरे तर ती मतदाराची फ़सवणूक असते. ज्या राष्ट्रवादी व कॉग्रेसने एकमेकांच्या विरोधात जनतेचा कौल घेतला होता, त्यांनी निकाल लागल्यावर एकत्र येऊन सत्ता बळाकवणे, ही मतदाराची फ़सवणूक होती. म्हणजे सामना संपल्यावर गांगुली व द्रविडने धावांची बेरीज दाखवून सचिनपेक्षा जास्त धावा म्हणून संयुक्त सामनावीर असल्याचा बनाव करावा, त्यातलाच प्रकार नाही काय?  

   केतकरांचा दावा व निकष तोच असेल, तर मग २००४ आणि २००९ अशा दोन्ही निवडणूकीत सोनियांच्या कॉग्रेसला बहूमत मिळू शकले नव्हते. त्यांनाही अन्य पक्ष वा स्वतंत्र खासदारांचा पाठींबा घेऊनच सरकार बनवावे लागले होते, असे एकदा तरी त्यांनी कुठे सांगितले वा लिहिले आहे काय? उलट त्यात पुन्हा आकड्यांच्या कोलांट्या उड्या मारून तोच सोनियांच्या लोकप्रियतेचा उच्चांक व विक्रम असल्याचे दावे हेच केतकर नेहमी लिखाणातून करत असतात. म्हणून मी यांना पत्रकार-संपादक समजण्यापेक्षा मार्केटींग करणारे सेल्समन म्हणतो. ज्या कंपनीचा माल ग्राहकाच्या गळ्य़ात मारायचा असतो, त्याची तोंड फ़ातेस्तवर स्तुती करायची आणि दुसर्‍या कंपनीच्या मालातले किरकोळ दोषही ठळक म्हणून सांगायचे. हा बुद्धीवाद वा युक्तीवाद नसतो, तर दुकानदारी असते. हे आजच्या माध्यमांचे व पत्रकारितेचे स्वरूप झालेले आहे. मग त्यांना नको असलेल्या नरेंद्र मोदीच्या यशाचे खरे चमकणारे पैलू ही मंडळी दाखवतील काय? शक्यच नाही. त्यामुळेच उद्या हेच केतकर मोदी यांच्या लोकप्रियतेची लाट आहे म्हटल्यावर १९७१ च्या इंदिरा लाटेचा संदर्भही घेणार नाहीत. मग ते चाळीस वर्षे पुढे येऊन २००९ सालच्या मागल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा किती व मते किती, असे संदर्भ देऊ लागतील. कारण त्यांना सत्य सांगायचे नसते तर दडपायचे असते आणि त्याच्या जागी आपले असत्य खपवायचे असते. मग त्यासाठी एनडीएमध्ये मोदींना पाठींबा नाही, भाजपात मतभेद आहेत, अशा त्रुटी काढून दाखवतील. कारण त्यांना मोदी हरताना दाखवायचा असतो आणि हरणारी कॉग्रेस हरणार नाही असे सिद्ध करायचे असते. थोडक्यात हा सगळा भुलभुलैया असतो. माहिती देतो व सत्य सांगतो म्हणून लोकांच्या डोळ्यात धुळफ़ेक करण्याचा प्रकार चालतो.  ( क्रमश:)  
 भाग   ( ११२ )    १५/३/१३

1 टिप्पणी:

  1. sar, tumche lekh mala khup aavadtat. satya ani rokhthok lekh asatat tumche.mi purvi punyanagari madhe tumche lekh vachayacho pan delhi la alyanantar te band zale.mala jenvha tumchya blog baddal kalale tenvha mi archieve madhil sare lekh vachun kadhale.baki sarv news channel,paper madhil sampadak patrakar nasun fakt ekhadya pakshyache salesman ahet.sar asech lihit raha. thanks dr chandrakant poulkar,New Delhi

    उत्तर द्याहटवा