कधीकधी माणूस खोटे बोलून कंटाळतो, तर कधीकधी आधीचे खोटे झाकण्यासाठी अधिक खोटे बोलत जातो. मग एक वेळ अशी येते, की आधीचे खोटे चुकीचे ठरवण्याच्या नादात नवे खोटे बोलताना; जुने लपवलेले सत्य अनवधानाने बोलून जातो. हिंदीत त्याला ‘अब आया उँट पहाड के नीचे’ असे म्हणतात. सोमवारी नेमकी तशीच गोष्ट घडली. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अमेरिकेतल्या व्हार्टन शिक्षण संस्थेमध्ये एका परिसंवादाचे बीजभाषण करण्याचे दिलेले आमंत्रण मागे घेण्यात आल्याची बातमी गाजत होती आणि निखिल वागळेने तोच ‘आजचा सवाल’ बनवला होता. मोदींना भाषणाची संधी नाकारणे योग्य आहे काय; या सवालाचे नकारार्थी उत्तर ऐंशी टक्क्याहून अधिक प्रेक्षकांनी दिलेच होते. पण चर्चेत भाग घेणार्यांची जी तारांबळ उडाली होती; ते चित्र खुप मनोरंजक होते. कारण गेली निदान दोन वर्षे मी जे सुत्र मांडतो आहे, त्याची कबुली या सेक्युलर बदमाशांना त्यात द्यावी लागत होती. एक वर्षापुर्वीची गोष्ट आहे. महाराष्ट्रातल्या दहा महापालिकांच्या निवडणूका चालू होत्या आणि त्यासाठीच्या मतचाचण्या व नंतरचे निकाल असा कार्यक्रम निखिलने सादर केला होता. तेव्हा उदय निरगुडकर (झी २४तासचे संपादक) पत्रकार झाले नव्हते. ते सेफ़ॉलॉजिस्ट म्हणून कायबीइन लोकमत वाहिनीवर मुर्खपणा करण्यात दंगले होते. त्याचे तपशील मी तेव्हाच्या लेखातून दिलेलेच होते. (आजही कोणाला हवे तर माझ्या ब्लॉगवर वाचू शकतात.) तर तेव्हा पुणे व पिंपरीचिंचवड पालिकेत राष्ट्रवादीला बहुमत मिळाले तर अजितदादा महाराष्ट्राचे नरेंद्र मोदी होतील काय अशी चर्चा हे दोन शहाणे करीत होते. पण नरेंद्र मोदी होणे म्हणजे काय, त्याचा खुलासा काही नव्हता. कारण निदान गुजरात बाहेरच्या जनता व लोकांसमोर गेल्या दहा वर्षात मोदी म्हणजे दंगल माजवून मुस्लिमांना मारणारा कर्दनकाळ; अशी त्यांची प्रतिमा रंगवण्यात आलेली होती. आणि त्यात कडवा सेक्युलर असल्याने निखिलने महत्वाची भूमिका पार पाडलेली होती. मग जेव्हा तोच म्हणतो, की अजितदादा महाराष्ट्राचे मोदी होतील, याचा अर्थ काय घ्यायचा, असा सवाल मी उपस्थित केला होता.
अजितदादांनी महाराष्ट्रात दंगली माजवाव्यात आणि मुस्लिमांची हानी करावी; अशी वागळे, निरगुडकरांची अपेक्षा होती काय? नसेल तर त्यांनी मोदीप्रमाणेच महाराष्ट्राचा विकास व प्रगती करावी अशी अपेक्षा आहे काय? असेल तर मोदी हा प्रगती व विकास साधणारा मुख्यमंत्री आहे; असे याच लोकांनी आजवर का सांगितलेले नाही, असाही प्रश्न मी विचारलेला होता. पण त्याचे उत्तर कुणीच कधी दिले नाही. कधीतरी मोदींच्या विकास कामाचा ओझरता उल्लेख आणायचा. बाकी मोदी म्हणजे २००२ च्या दंगली, असेच चित्र कायम रंगवले गेले. आता तेच दिडशहाणे मोदी देशाचे प्रधानमंत्री होतील काय, अशी चर्चा करीत आहेत. आपण ज्याची दहा वर्षे अखंड बदनामी केली व ज्याला दंगलखोर म्हणूनच लोकांपुढे पेश केले; तर लोकांना तोच माणूस आवडण्याचे कारण काय? लोकांना हा दंगलखोर विकासपुरुष वाटण्याचे कारण काय? अशा प्रश्नांची उत्तरे निखिलसारख्या दिवाळखोर सेक्युलरांनी शोधायला हवीत. त्यांना अगदी नरेंद्र मोदीला हरवायचे असेल, तरी आधी त्याला व त्याच्या डावपेचांना समजून घ्यावेच लागेल, असे तर मी गेल्या तीन महिन्यापासून सलग सांगतो आहे. पण दिल्लीतल्या मोदींच्या ताज्या भाषणानंतर अनेक सेक्युलरांची झोप उडाली आहे. कारण खरेच आता मोदी पंतप्रधान पदाचा उमेदवार होऊ घातल्याचे वास्तव त्यांच्या समोर येऊन उभे ठाकले आहे. महिनाभर आधी दिल्लीच्या श्रीराम कॉलेजमध्ये केलेल्या भाषणातून मोदींनी आपली तरूणातील लोकप्रियता दाखवून दिली होती आणि आता पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेत त्यांनी पक्षाचा तळागाळातल्या कार्यकर्त्यावरही आपलाच प्रभाव असल्याचे सिद्ध केल्याने, निदान भाजपात त्यांना कोणी रोखू शकत नाही हे स्पष्ट झाले. थोडक्यात मागल्या दहा वर्षातले सेक्युलर कारस्थान आपण उध्वस्त करून टाकल्याचे पुरावेच मोदींनी समोर ठेवल्यावर या सेक्युलर रणनितीकारांची झोप उडाली आहे. मोदीचा व त्यांच्या कारकिर्दीच्या आरंभ काळातील दंगलीचा आडोसा घेऊन भाजपाला नामोहरम करण्याचा डावपेच सुरूवातीला कमलीचा यशस्वी झाला. पण आता तोच डाव उलटू लागला असून तोच सेक्युलर डाव सेक्युलरांनाच पेच झाला आहे. कारण ज्या रणनितीने मोदीला बदनाम केले; त्याच रणनितीने त्याच मोदीला गुजरात बाहेर सामान्य भारतीयांपर्यंत व जगाच्या कानाकोपर्याते नेऊन सोडले आहे. आणि त्यातूनच आजचा राष्ट्रीय नेता म्हणून मोदी उभा राहिला आहे. किंबहूना स्वत: मोदी वा त्यांच्या पक्षाला मोदींची जेवढी मोठी व भव्य प्रतिमा उभारणे आयुष्यभरात शक्य झाले नसते. ते काम सेक्युलर कारस्थानाने यशस्वी करून दाखवले आहे.
थोडक्यात ज्याला भाजपाचा कलंक म्हणून रंगवण्याची रणनिती यशस्वीरित्या दहा वर्षे राबवली गेली, तोच आता त्या पक्षासाठी जनमानसात जमेची बाजू होऊन बसला आहे. ज्याच्यामुळे भाजपा रसातळाला जाणार असे भाकित सेक्युलर ज्योतिर्विदांनी छातीठोकपणे सांगितले होते, तोच मोदी निराश भाजपाचा आशेचा किरण बनून गेला आहे. पण हे झाले कसे व कोणामुळे? तर ज्यांनी सेक्युलर म्हणून मोदीला धर्मांध व जातीयवादी ठरवण्यात आपली शक्ती खर्च केली; त्यांनीच निदान मोदीला देशाच्या कानाकोपर्यात नेऊन पोहोचवला. देशातला दुसरा कुठला मुख्यमंत्री इतका आपल्या राज्याबाहेर ओळखला सुद्धा जात नसेल. चांगले काम करणारे कित्येक मुख्यमंत्री आहेत. वाईटही खुप आहेत. पण मोदी हा एकच अपवाद असा, की त्याचे नाव प्रत्येक राज्यात व देशात सर्वत्र पोहोचले आहे. सचिन तेंडूलकर वा धोनी किंवा लादेनला जसे लोक ओळखतात; तसे देशातले लोक मोदीला गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून ओळखतात. मात्र तो दंगलखोर अशी त्याची ओळख करून देण्यात आल्याने प्रतिमा विकृत होती. पण हळूहळू लोकांपर्यंत या माणसाने गुजरातमध्ये काय काम केले, ती माहिती पोहोचत गेली. मग त्यांना असाच मुख्यमंत्री आपल्या राज्यातही असावा असे वाटणे स्वाभाविक होते. उदाहरणार्थ मागल्या म्हणजे २००७ सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ‘टाईम्स नाऊ’ या वाहिनीने एक मतचाचणी गुजरातमध्ये घेतली होती. पण तेव्हाच त्यांनी चेन्नई, मुंबई, बंगलोर, दिल्ली आणि कोलकाता अशा महानगरातही मोदी संबंधाने मत आजमावून पाहिले. तर एक कोलकाता वगळता उर्वरित सर्व महानगरात पन्नास ते ७५ टक्के लोकांनी आपल्याला मोदीसारखा मुख्यमंत्री हवा असा कौल दिला होता. एकट्या कोलकात्यामध्ये मोदींना ४५ टक्के कौल मिळाला होता. ती झलक होती. पाच वर्षात जग खुप पुढे निघून आलेले आहे आणि आता तर तिसर्यांदा मोदींनी गुजरात विधानसभेची निवडणुक जिंकली आहे. मागल्या दोन वर्षापासून पंतप्रधानाच्या जागेसाठी त्यांचे नाव घेतले जाऊ लागले आहे. या पाच सहा वर्षाच्या काळात सेक्युलर विचारवंत अभ्यासकांनी खरे तर जागे व्हायला हवे होते. आपण ज्याची इतकी भ्रष्ट व विकृत प्रतिमा रंगवतो आहोत, त्याला आपलाच प्रेक्षक व वाचक पसंती कशाला दाखवतो आहे; त्याचा विचार तेव्हाच सुरू व्हायला हवा होता. मला त्याच टाईम्सच्या मतचाचणीने जागे केले. तिथून मी मोदी विरोधी अपप्रचाराचे काय परिणाम संभवतात, त्यावर अनेक लेखातून मतप्रदर्शन केले होते. आता त्याची प्रचिती येते आहे आणि निखिलसारखे मुर्ख आता त्याची दखल घेऊ लागले आहेत. सोमवारची निखिलच्या सवालाची चर्चा नेमक्या त्याच विषयाभोवती घोटाळत होती.
मजेची गोष्ट म्हणजे त्यात सहभागी झालेला जतीन देसाई नावाचा पत्रकार नामानिराळा रहाण्याची जी कसरत करत होता, ती मनोरंजक होती. कॉग्रेस व डाव्यांनी मोदींवर नुसती दंगलीची टिका सोडून गुजरातच्या कामातल्या तुटीवर आघात करायला हवे होते; असे आता जतीन देसाई पांडित्य सांगतात तेव्हा हसू येते. कॉग्रेस व डाव्या पक्षांनी मोदींबद्दल काय भूमिका वा धोरणे घ्यायला हवी होती, तो त्यांचा राजकारणातला विषय आहे. कारण त्यामुळे मोदींचा तसा मोठा लाभ होऊ शकलेला नाही. कारण कॉग्रेस वा डाव्या पक्षांनी आपापल्या राजकीय भूमिकात मोदी आणलेला नाही आणि गुजरातपुरताच मोदीविरोध मर्यादित ठेवलेला होता. त्याचा परिणाम अन्य राज्यात व्हायची कुठलीच शक्यता नव्हती. ते पाप संपुर्णत: सेक्युलर माध्यमे व पत्रकारितेचा मुखवटा चढवून माध्यमात वावरणार्या डाव्या सेक्युलरांचे आहे. त्यांनीच मोदीविरोधी जी अखंड अपप्रचाराची मोहीम चालविली; त्यामुळे मोदी देशाच्या कानाकोपर्यात जाऊन पोहोचले आहेत. तेव्हा मोदींच्या आजच्या लोकप्रियतेला सेक्युलर माध्यमे व माध्यमातले सेक्युलर खरे जबाबदार आहेत. त्याचे दुष्परिणाम बिचार्या सेक्युलर पक्षांना व राजकारण्यांना भोगावे लागणार आहेत. आणि आपली पापे आता निखिल व जतीनसारखे बदमाश कॉग्रेस व डाव्यांच्या डोक्यावर फ़ोडू बघत आहेत. तेवढेच नाहीतर त्यातून ज्यांनी मोदीची बदनामी व दंगलीचा व्यापार केला, त्या स्वयंसेवी संस्थांच्या पापावरही पांघरूण घालायची लबाडी करू बघत आहेत. मोदींविरुद्धचा अपप्रचार ही नुसती राजकीय सेक्युलर खेळी नव्हती. तो करोडो रुपयांची उलाढाल करणारा व्यापार कसा होता व त्यात प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा सेक्युलर धंदा कसा तेजीत चालवला गेला, त्याची कबुली जतीन देसाई अनवधानाने निखिल समोर देऊन बसले. ही कुठली व कसल्या गुन्ह्याची कबुली होती?
"मोदी म्हणजे २००२ च्या दंगली, असेच चित्र कायम रंगवले गेले. आता तेच दिडशहाणे मोदी देशाचे प्रधानमंत्री होतील काय, अशी चर्चा करीत आहेत. आपण ज्याची दहा वर्षे अखंड बदनामी केली व ज्याला दंगलखोर म्हणूनच लोकांपुढे पेश केले; तर लोकांना तोच माणूस आवडण्याचे कारण काय? लोकांना हा दंगलखोर विकासपुरुष वाटण्याचे कारण काय? अशा प्रश्नांची उत्तरे निखिलसारख्या दिवाळखोर सेक्युलरांनी शोधायला हवीत."
उत्तर द्याहटवाअगदी मर्मावर बोट ठेवलेत भाऊ...