रविवार, २४ मार्च, २०१३

त्सुनामीच्या वादळातला भीषण हाहा:कार आठवतो?


  २००५ सालात इंडोनिशियाच्या किनार्‍यावर आत समूद्रात कुठेतरी मोठा भूकंप झाला होता. त्यातून समुद्रात महाकाय उंच लाटा उसळल्या. त्याला त्सुनामी म्हणतात, हे त्यानंतरच आपल्याकडल्या लोकांना प्रथम कळले. त्या पर्वताएवढ्या उंच लाटांनी इंडोनिशियाच्या अनेक बेटांवर लाखो लोकांना जलामाधी दिली. लाखो संसार उध्वस्त झाले. त्या लाटा इतक्या महाकाय होत्या, की श्रीलंका, भारत या देशांना पार करून त्या लाटा हजारो किलोमिटर्स पश्चिमेला आफ़्रिका खंडापर्यंत जाऊन धडकल्या. त्यातील भीषण मानवी व जीवित मालमत्ता हानीच्या गोष्टी बातम्यातून लोकांपर्यंत पोहोचल्या. परंतू त्याच काळातले काही चमत्कार सर्वांनाच कळू शकलेले नाहीत. जिथे मानवी बुद्धी व तिने विकसित केलेले ज्ञान साधने अपुरी ठरली; तिथे प्राणिमात्रांच्या उपजत ज्ञानाने त्यांना कसे वाचवले होते, त्याचे अनेक किस्से उपलब्ध आहेत. तेव्हा भारतात त्सुनामीचा इशारा देणारी यंत्रणा वा उपकरणे नव्हती. त्यामुळे भारताच्या पुर्व किनार्‍यावरील लाखो लोक अलगद त्सुनामीच्या तावडीत सापडले होते. तामिळनाडूला त्याचा जोरदार फ़टका बसला होता. पण त्याच काळात तिथल्या एका चर्चमध्ये पाळलेल्या जनावरांनी काही तास आधी धुमाकुळ घातला. शेवटी त्यांची दावी सोडून तिथले फ़ादर झोपी गेले होते. दावी सोडताच ती जनावरे जीव घेऊन पळत सुटली होती. तेच इतरत्रही झाले. त्या त्सुनामी महापुराच्या लाटेत माणसे व त्यांचे संसार वाहून जात असताना, जवळपास कुठलेही जनावर बुडून मेले नव्हते. जागोजागी माणसांचे मृतदेह सापडत होते. पण कुठला प्राणी त्सुनामीच्या लाटेत सापडून मेला नव्हता. त्या तमाम प्राण्यांनी उंच भूभागाकडे पळ काढला होता. त्य़ामुळेच त्सुनामीचा पूर त्यांच्य़ापर्यंत पोहोचला नाही, की त्यांना बुडवून मारू शकला नाही. पण हे त्या पशूंना कळले कसे? त्सुनामीची महाकाय लाट चाल करून येत असताना माणसे व त्यांचे आधुनिक सरकार शांत झोपा काढत असताना; या जनावरांना कोणी सावध केले होते? त्यांना धोक्याचा इशारा कित्येक तास आधी कोणी दिला होता? शिवाय उंच भूभागाकडे सुरक्षेसाठी पळावे, असे त्यांना कोणी कधी प्रशिक्षित केले होते? आधुनिक समाज म्हणून माणसे झोपेत त्सुनामीच्या जबड्यात जाताना, हे अजाण पशू स्वत:चा जीव कसे वाचवू शकले?

   चमत्कारिक बाब आहे ना? येऊ घातलेली त्सुनामी प्राणघातक आहे, हे जनावराला कळू शकते आणि सुशिक्षित बुद्धीमान माणसाला त्याचा थांग लागत नाही? याचे कारण शेकडो नव्हेतर हजारो वर्षापुर्वी पशूप्राण्यांना असे उपजत ज्ञान प्राप्त झालेले आहे. त्यात कुठलाही बदल झालेला नाही. पशूप्राण्यांना नवे ज्ञान कोणी दिलेले नाही आणि हे जीव तशाच व तेवढ्याच ज्ञानावर, उपजत जाणीवांच्या भरवशावर जीवन संघर्ष करत असतात. सहाजिकच त्यांचे ते उपजत ज्ञान अजुन शाबूत आहे. पण मानवाने जे आधुनिक शास्त्र व विज्ञान शोधले व विकसित केले, त्यावर विसंबून रहाण्याची सवय लागत गेली; तसतसे माणसाने आपल्या उपजत ज्ञानाकडे पाठ फ़िरवलेली आहे. सहाजिकच त्या जाणीवा बोथट होत जातात. त्यामुळे त्या ऐनवेळी कार्यरत होतातच असे नाही. त्सुनामी आली तेव्हा नेमकी तीच माणसांची अडचण झाली होती. सहाजिकच उपजत शक्ती, आधुनिक ज्ञानाने निकामी केल्याचे परिणाम माणसाला भोगावे लागले व पशूप्राण्यांना त्याचा त्रास होऊ शकला नाही. कित्येक तास आधी त्यांना येणार्‍या धोक्याची चाहूल लागू शकली. अशा उपजत जाणीवांपेक्षा कृत्रिम उपकरणे व सुविधांवर माणूस अवलंबून रहात गेला; तिथे त्या जाणिवा निकामी होत गेल्या. काही पिढ्यांनी त्या मानवी जीवनातून अंतर्धान पावलेल्या असू शकतात. पण त्याचवेळी इंडोनेशीयातही एक चमत्कार घडलेला होता. तो देश अनेक लहानमोठ्या बेटांचा आहे. विखुरलेल्या त्या शेकडो बेटांना त्सुनामीचा तडाखा बसलेला होता. लाखो लोक व अनेक बेटे बुडाली होती. पण त्याही स्थितीत एका बेटावरच्या कुणालाही त्सुनामी मारू शकली नाही. त्यांनाही येऊ घातलेल्या त्सुनामीची चाहुल लागली होती. त्याचे कारण त्यांच्या उपजत जाणीवा नसल्या तरी पुर्वजांच्या दंतकथा त्यांच्या मदतीला धावून आल्या होत्या. त्सुनामी ओसरल्यावर नुकसान व जिवितहानीची माहिती घेतली जात होती तेव्हा हा चमत्कार उघडकीस आला.

   या बेटावरच्या कुणालाच त्सुनामीने मारले नाही वा ते बुडाले नाहीत, कारण अन्य जनावरांप्रमाणेच धोक्याची चाहुल लागताच त्यांनी उंचावरील टेकड्या व डोंगराच्या दिशेने पळ काढला होता. त्सुनामी ओसरल्यावर तिथे पोहोचलेल्यांना माहिती देताना स्थानिकांनी सांगितले, की त्यांच्या जुन्या लोकांनी त्सुनामीच्या कथा व आख्यायिका सांगितल्या होत्या. काही शतकांपुर्वी अशीच त्सुनामी आली तेव्हा उंच उंच लाटा येतात. त्यावेळी  डोंगराच्या दिशेने पळून जायचे असे सांगितलेले होते. या बेटावरच्या त्या आख्यायिका त्यांच्या मदतीला धावून आल्या. तीनचार पिढ्य़ा कोणी खरी त्सुनामी तिथेही बघितलेली नव्हती. पण बापजाद्यांच्या त्या दंतकथा व आख्यायिका मात्र नेहमी सांगितल्या जायच्या. त्यावर विसंबून त्यांनी टेकड्यांकडे धाव घेतली होती. बाकीच्या इंडोनिएशियामध्ये असे काही सांगितले जात नव्हते. थोडक्यात त्याही बेटावर उपजत ज्ञान व जाणिवा बोथटलेल्याच होत्या. पण निदान अख्यायिकाच ज्ञान म्हणून त्यांना उपयोगी पडल्या. ही दोन उदहरणे बोलकी आहेत. आधुनिक ज्ञान चुकीचे वा निरूपयोगी नाही. पण त्यामुळे उपजत जाणीवा किंवा पारंपारिक ज्ञान टाकावू ठरवणे, यातून समस्या निर्माण होतात. जेव्हा आपण आधुनिक उपकरणे वा साधनांच्या आहारी जातो, तेव्हा आपल्यातल्या उपजत जाणिवा व शक्ती निकामी होत असते. असे का होते? तर आधुनिक सोयीसुविधा सोप्या व जीवन आळशी बनवणार्‍या असतात. त्याहीपेक्षा आपल्याला जबाबदारीतून सोडवणार्‍या असतात. म्हणूनच आपल्याला आवडतात. अनेक पाळिव प्राणी बघा. त्यांना माणसाने उपयुक्त म्हणून पाळायला सुरूवात केली आणि हळूहळू ते प्राणी माणसाळले असे आपण म्हणतो. म्हणजे काय झाले? तर त्यांना मानवी समाजावर किंवा त्या मानवी समाजाकडून मिळणार्‍या सुविधा सुरक्षेवर जगायची सवय लागून गेली. हे प्राणी मानवी जमात व वस्तीच्या भोवतीच घुटमळत रहातात. त्यांना अन्य प्राणीमात्रासारखे स्वतंत्र स्वयंभू जगता येत नाही. त्यांच्या स्वयंभू स्वतंत्र जगण्याचा जाणिवाच निकामी होऊन गेलेल्या आहेत. माणुसही त्याला अपवाद नाही.

   पण मानवी समाजाची कहाणी थोडी वेगळी आहे. इथे माणसाला बुद्धीने अनेक निसर्ग नियम शोधता आले व त्याने निसर्गासह अन्य विश्वालाही आपल्या सेवेत जुंपण्य़ाचा उद्योग आरंभला. त्यातून माणसाच्या बुद्धी व शक्तीची युती होऊन परिणामी त्यातल्या काही माणसांनी अन्य माणूसमात्रावरही हुकूमत निर्माण करायचा प्रयास केला. पण तसे करताना प्रत्येकवेळी युद्ध वा रक्तपात करण्यापेक्षा चतुर माणसांनी इतरांना सुरक्षेची हमी देत त्यांना आपली हुकूमत मान्य करायला भाग पाडले. त्यालाच आपणा आधुनिक जमान्यात कायद्याचे राज्य म्हणतो. पुढे तेच राज्य विना हत्यार व बळाचा वापर करता प्रस्थापित ठेवायचा जो मार्ग चोखाळण्यात आला, त्यालाच आधुनिक शिक्षण म्हणतात. ब्रिटिश युरोपियनांच्या आधीच्या राजे वा आक्रमकांनी प्रत्येकवेळी सत्ता मिळवायला आणि टिकवायला रक्तरंजित संघर्ष केले. पण त्यांच्यापेक्षा अधिक सुस्थिर व दिर्घकाळ युरोपियनांनी जगभरात राज्य केलेले आहे. मोठमोठी साम्राज्ये निर्माण केलेली होती. ती शस्त्रापेक्षा आधुनिक शिक्षणाच्या बळावर केलेली दिसतील. आपले साम्राज्य वा सत्ता टिकवण्यासाठी त्यांना शस्त्राचा वारंवार उपयोग करावा लागला नाही. त्यापेक्षा कायद्याचे् राज्य व आधुनिक शिक्षण ही दोनच साधने युरोपियनांनी अधिक प्रभावीपणे वापरलेली दिसतील. याचे कारण असे, की हीच दोन साधने वा हत्यारे शस्त्रालाही बोथट करून टाकतात. कारण ती दोनच साधने अशी आहेत, की ती बुद्धी व शक्तीला गुलाम व परावलंबी बनवून टाकतात. ब्रिटीशांनीच आजचा खंडप्राय भारत देश सर्वप्रथम एकसंघ बांधला असे सांगितले जाते. पण त्यासाठीची साधने कुठली होती?

   आधुनिक शिक्षण व कायद्याचे राज्य अशाच दोन साधनांनी ब्रिटीश साम्राज्याचा इथला पाया भक्कम केला. पण त्यातूनच त्यांचे साम्राज्य शेवटी लयाला देखील गेले हे विसरता कामा नये. कायद्याच्या राज्याने जी हुकूमत प्रस्थापित केली, त्यामुळे देशातल्या करोडो लोकांना सुरक्षेची हमी मिळाली. म्हणूनच त्या जनतेने बंडाचा झेंडा खांद्यावर घेतला नाही. कारण कायद्याने तिला सुरक्षितता मिळाली होती आणि आधुनिक शिक्षणाने तिच्या बुद्धीला धार येत गेलेली होती. त्याच बौद्धिक धारेने मग ब्रिटीश साम्राज्याला त्यांचेच हत्यार वापरून पराभूत केले. पण त्याच साधने व हत्यारांच्या आहारी गेलेल्या स्वतंत्र भारताला आता त्याच साधनांनी समस्येच्या दरीत लोटून दिलेले आहे. कारण कायद्याने राज्य व आधुनिक शिक्षणाच्या आहारी गेलेली लोकसंख्या आपल्या उपजत जाणीवांना व शक्तीला पारखी होऊन गेली आहे. या दोन मुलभूत समस्या बाकीच्या शेकडो समस्यांची जननी कशा आहेत त्याचा उहापोह सविस्तर करण्याची गरज आहे. कारण त्यातूनच त्यावर मात करण्याचा उपाय सापडू शकेल.     ( क्रमश:)
 भाग   ( १२१)    २५/३/१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा