रविवार, १० मार्च, २०१३

मोदींच्या अगोदर गुजरातमध्ये दंगल झालीच नव्हती?


   नरेंद्र मोदी इतक्या बदनामीनंतरही लोकप्रिय का होऊ शकतात? इतका सार्वत्रिक अपप्रचार केल्यावरही हा माणूस त्यावर मात करून मोठ्या लोकसंख्येला आशेचा किरण वाटण्याची परिस्थिती का यावी? माध्यमातील व डाव्या चळवळीतील अनेक लोक आज डोके खाजवून त्याची उत्तरे शोधत असतील. मला त्याची खात्री आहे. ती उत्तरे त्यांना शोधावीच लागतील. कारण त्यांना मोदीला नामोहरम करायचे आहे. पण मग डाव अगदी यशस्वी झाला, असे भासत असताना तो डाव उलटला कसा, याचे त्यांना आश्चर्य वाटत असेल. तर त्याचे उत्तर एका महापुरूषाने देऊन ठेवलेले आहे. तुम्ही काही लोकांना सर्वकाळ फ़सवू शकता किंवा सर्व लोकांना काहीकाळ फ़सवू शकता. पण सर्वकाळ सर्वांना फ़सवू शकत नाही, असे तो महापुरुष म्हणतो. त्याचा अर्थ इतकाच, की छोट्या संख्येच्या लोकांना सर्वकाळ संभ्रमात ठेवता येते. पण मोठ्या संख्येने असे करता येत नाही. कारण ही मोठी संख्या कायम बंदिस्त ठेवता येत नाही. लोकांचा जगाशी संपर्क तोडता येत नाही. त्यामुळेच जेव्हा माणसे परस्परांना भेटू लागतात, तेव्हा एकमेकांशी विचार व माहितीची देवाणघेवाण होत असते. सहाजिकच त्यातून बरीच माहिती इकडची तिकडे होत असते. त्यामुळे लपवून ठेवलेली माहिती त्या इतर लोकांपर्यंत पोहोचत असते. त्याची खातरजमा त्यांना करून घेता येत असते. सहाजिकच गुजरातच्या दंगली व मोदी यांचे त्या दंगलींना प्रोत्साहन; या आरोपांचा खरेखोटेपणा तपासून घेण्याची सोय उशीरा का होईना शक्य होतीच. आणि दहा वर्षात तोच चमत्कार घडला आहे. ज्या दंगलीचे खापर मोदींच्या डोक्यावर फ़ोडण्यात आले, तशी ती पहिलीच दंगल नसून अशा अनेक शेकडो दंगली आपल्या देशात यापुर्वी झालेल्या आहेत. अगदी गुजरातमध्ये कॉग्रेसची सत्ता असताना यापेक्षा भीषण दंगली उसळलेल्या आहेत. आणि त्यात यापेक्षाही मुस्लिमांचे अधिक नुकसान झालेले आहे. पण अशा कुठल्याही दंगलीत तिथले मुख्यमंत्री वा सरकारलाच दंगलीला चिथावणी देणारे; असा आरोप झालेला नाही. त्या सत्ताधार्‍यांवर कधी निरपराधांच्या कत्तलीचा आरोपी बनवण्याचा प्रयोग झाला नाही. मग मोदी या एकाच माणसाला असे बदनाम का केले जात आहे, असा प्रश्न कधी तरी लोकांच्या मनात येणारच होता. शिवाय इतक्या चौकशी समित्या, इतके आयोग व इतक्या कोर्टाच्या आदेशानंतरही; त्या माणसाच्या विरोधात दहा वर्षात एकही पुरावा कोणी समोर आणू शकत नाही, तेव्हा त्याच्याविषयी रागाच्या जागी सहानूभूती निर्माण होणे अपरिहार्य नाही काय? आज मोदींबद्दल लोकांचे आकर्षण त्याच सहानुभूतीने आणलेले आहे. तेव्हा मोदींच्या लोकप्रियतेचे रहस्य ज्यांना उलगडायचे आहे, त्यांना अनेक अंगांनी विचार करण्याची गरज आहे.

   त्यांनी गुजरातचा खुप विकास केला असेल, म्हणून त्यांच्या क्रौर्याकडे पाठ फ़िरवायची काय; असा सवाल अनेकजण विचारतात. पण ज्या क्रौर्याबद्दल सवाल केले जातात, ते त्या व्यक्तीचे क्रौर्य आहे काय? त्याने ही दंगल मुद्दाम घडवून आणली काय? असेल तर त्याचा कुठला तरी पुरावा समोर येऊ शकला आहे काय? नुसत्या आरोपाच्या पलिकडे को्णीही कुठला चिमुटभर पुरावा समोर आणू शकलेला नाही. केवळ तेव्हा हा माणुस मुख्यमंत्रीपदी होता आणि दंगलीला प्रतिबंध घालण्यात पुरेसा यशस्वी ठरला नाही; म्हणून त्याला दंगलीचा पुरस्कर्ता वा प्रायोजक म्हणायचे असेल; तर देशातल्या आजवरच्या प्रत्येक दंगलीला तेच तर्कशास्त्र व निकष लावायला हवा. नसेल तर जी सूट अन्य मुख्यमंत्र्यांना दिली जाते तीच मोदींना मिळायला हवी. निदान हा माणूस दंगल भडकली असताना बंदोबस्ताचे प्रयास करत होता, केंद्राकडे लष्कर पाठवायची विनंती करीत होता. पण १९८४ च्या दिल्लीतील दंगलीत शिखांच्या सार्वत्रिक कत्तल व घरेदारे जाळण्याचा उद्योग सुरू होता, तेव्हा त्यात लक्ष घालण्यापेक्षा राजीव गांधी पंतप्रधान पदाची शपथ घेण्यात व मंत्रीमंडळ बनवण्यात गर्क होते. तेवढ्या वेळात काही शेकडा निरपराध शीख मारले गेले होते. मोदींचा प्रशासकीया अनुभव किती होता? कधी निवडणुक न लढवलेला व शासनाचे कुठले अधिकारपदही न उपभोगलेला तो नवखा प्रशासक होता. वर्षभरही त्याला सत्ता संभाळून झालेले नव्हते. अशावेळी ही अभूतपुर्व दंगल उसळली होती आणि राज्यभर पसरत गेली होती. आणि जितके त्याच्या आधीच्या मुख्यमंत्र्यांना जमले; त्यापेक्षा मोदींनी अधिक करून दाखवले ही वस्तुस्थिती आहे. पण भासवले असे जाते, की जणू मोदी यांनी मुख्यमंत्री म्हणून काहीच केले नाही, तर दंगलखोरीला आशीर्वादच दिले. वास्तव खुप भीषण आहे. गुजरातच्या हिंदू मुस्लिम दंगलखोरीचा इतिहास खुप जुना आहे. अगदी मोदी यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश करण्यापुर्वीचा तो इतिहास आहे. त्या इतिहासाचे बारकावे तपासले तर आज मोदींचे देशभरातील आकर्षण कशातून आले; त्याचा खरा अंदाज येऊ शकतो. ज्या कारणाने गुजरातला इतक्या टोकाचे हिंदूत्ववादी बनवले, त्याचेच प्रतिबिंब मागल्या दहा वर्षात देशभर पडताना दिसत असेल; तर देशातल्या लोकांना हिंदूत्वाचा आक्रमक चेहरा झालेला मोदी आवडणारच. हवाहवासा वाटणारच. त्याला नुसती बदनामी वा खोट्या अपप्रचारातून रोखता येणार नाही. आजवरच्या सेक्युलर थोतांडामुळे होऊन गेलेल्या चुका सुधारण्यापासून त्याची सुरूवात करावी लागेल. म्हणून मी म्हणतो. मोदींच्या आजच्या लोकप्रियतेला भाजपा, हिंदू परिषद, संघ परिवार किंवा हिंदूत्वाचा जेवढा उपयोग झालेला नाही; तेवढा सेक्युलर थोतांडाने मोदींचे आकर्षण निर्माण केलेले आहे. त्याचे दाखले गुजरातच्या चार दशकांच्या राजकीय इतिहासात सापडतात.

   गुजरातमध्ये हिंदूत्व रुजावे आणि त्याची पाळेमुळे घट्ट व्हावीत व ती हिंदू मुस्लिम वैमनस्यातूनच व्हावीत; अशी पार्श्वभूमी मुळात कॉग्रेसच्या मतविभागणी सिद्धांताने तयार करून दिली. मतांच्या गठ्ठ्यासाठी जी रणनिती १९६०-७०च्या दशकात कॉग्रेसने गुजरातमध्ये राबवायला सुरूवात केली; तिचेच पर्यवसान तिथे हिंदूत्ववाद रुजण्यात होत गेले. तसे पहिल्यास त्या काळापर्यंत गुजरातमध्ये जनसंघाचा (म्हणजे पूर्वाश्रमीच्या भाजपाचा) प्रभाव जवळपास नगण्य होता. समाजवादी हा तिथला पारंपारिक विरोधी पक्ष होता. पण त्याला नामोहरम करताना कॉग्रेसच्या हितेंद्र देसाई, माधवसिंह सोलंकी, चिमणभाई पटेल अशा मुख्यमंत्र्यांनी असे काही जातीय धार्मिक समिकरण जमवण्याचे उद्योग केले, की त्यातून हिंदू-मुस्लिम तेढ वाढत गेली. मुठभर म्हणजे देशात सर्वात नगण्य मुस्लिम लोकसंख्या असलेल्या गुजरातामध्ये हिंदूंच्या मनात मुस्लिम आक्रमकतेचा भयगंड त्या कॉग्रेस नितीने निर्माण केला. त्यातून क्रमाक्रमाने त्या राज्यात हिंदूंमध्ये भाजपा वा हिंदूत्वाचे आकर्षण निर्माण होत गेले. एक उदाहरण पुरेसे ठरावे. मोदी २००१ सालात मुख्यमंत्री झाले तर १९९५ सालात प्रथमच भाजपाने गुजरातमध्ये बहुमत व सत्ता संपादन केली. पण तत्पुर्वी तिथे भाजपा व आधी जनसंघाची राजकीय ताकद किती होती? विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत त्या हिंदूत्ववादी पक्षाला किती यश मिळू शकत होते? कॉग्रेसची अनिर्बंध सत्ता व बहुमत होते. पण दहा टक्क्यपेक्षा कमी लोकसंख्या असूनही मुस्लिमांना झुकते माप देण्यातून कॉग्रेसने बहुसंख्य हिंदूंच्या मनात ज्या आशंका निर्माण केल्या; तिथून फ़रक पडू लागला. १९६९ सालातली दंगल ही गुजरातची सर्वात भीषण हिंदू-मुस्लिम दंगल होती, त्यात ११०० हून अधिक लोकांचे प्राण गेले. लोकसंख्येच्या प्रमाणात पाहिल्यास ती संख्या खुपच मोठी मानावी लागेल. कारण तेव्हाच्या गुजरातची लोकसंख्या साडेतीन चार कोटीसुद्धा नव्हती. आज गुजरातची लोकसंख्या सहा कोटीच्या घरात आहे आणि २००२च्य दंगलीतील मृतांची संख्या जवळपास तेवढीच आहे. मग तेव्हाचे कॉग्रेस मुख्यमंत्री हितेंद्र देसाई यांना कोणी मौत का सौदागर असे का संबोधलेले नाही? त्यातही पुन्हा अधिक मुस्लिमच मारले गेले होते आणि मुस्लिमांचीच मालमत्ता हानी अधिक झाली होती. तेव्हाही लष्कराला पाचारण करण्यात आलेले होते. मग मोदींच्या कारकिर्दीतील दंगलीचेच इतके महत्व काय? त्या काळातल्या वृत्तपत्राचे अंक व चौकशी अहवाल आजही उपलब्ध आहेत. त्यातले तपशील काढून वाचले तर लक्षात येईल, की तुलनेने मोदींच्या काळात झालेल्या दंगलीत सरकारने खुप कठोर कारवाई केलेली आहे. पण हे सांगायचे कोणी व ऐकणार कोण? जेव्हा सत्य ऐकायचेच नसते वा बघायचेच नसते; तेव्हा सांगून काय फ़ायदा? मात्र झाकून ठेवले म्हणून सत्य समोर यायचे व सिद्ध व्हायचे थांबत नाही.

त्याच पुर्वीच्या कॉग्रेसकालीन सेक्युलर राज्यातल्या गुजरातच्या दंगलींनी तिथल्या विस्कळीत हिंदू जातीजमातींना कडव्या हिंदूत्वाकडे आणून सोडले, त्यातून तिथे भाजपाचे राजकीय बळ वाढत गेले. पण तरीही सत्ता हाती घेतलेल्या भाजपाला हिंदूत्वाची प्रतिमा जपता आलेली नव्हती. अगदी मोदींनाही हिदूत्वाचा अजेंडा राबवता आलेला नाही. मात्र त्यांच्यावर जे आरोप अखंड होत राहिले, त्यामुळे त्यांची एक कडवा हिंदू नेता अशी प्रतिमा सेक्युलर अपप्रचाराने उभी केली आहे. आणि आज तीच प्रतिमा उर्वरित भारतातल्या विस्कळीत हिंदू लोकसंख्येला भूल घालते आहे. गुजरातच्या मोदीपुर्व दंगलीचा इतिहास म्हणूनच महत्वाचा आहे. तो समजून घेतला तरच आज देशभर मोदींच्या आक्रमक हिंदू नेतृत्वाचे आकर्षण कशाला आहे, त्याचा उलगडा होऊ शकेल. मतदाराचा ओढा या माणसाकडे कशाला वाढतो आहे, त्याचे उतर मिळू शकेल.    ( क्रमश:)
 भाग   ( १०८ )    ९/३/१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा