‘संजय दत्त मला अधिक नितीमान वाटतो’, अशा शिर्षकाचा माझा कालचा लेख वाचून अनेकांना वाटले, की मी सुद्धा संजय दत्तच्या समर्थनाला उभा ठाकलो आहे काय? चटकन लेखातले बारकावे लक्षात आले नाहीत तर निव्वळ शिर्षकामुळे तसा गैरसमज होऊ शकतो. त्यासाठी मी सामान्य वाचकाला दोष देणार नाही. आजकाल इतके उथळ व उनाड लिखाण होत असते, की गंभीरपणे वाचण्याची लोकांची सवय कमी होत चालली आहे. छापील मजकुरावरून वरवर नजर फ़िरवून लोक हातातले वर्तमानपत्र बाजूला ठेवतात. मुळात लोक वर्तमानपत्रातील मजकूर गंभीरपणे घ्यायचे विसरू लागले आहेत. पानांचा मोठा भडीमार, पण वाचण्यासारखे पानभरही लिखाण नसेल; तर वाचकाची सवय बिघडणे स्वाभाविक आहे. पण ज्यांनी काळजीपुर्वक वाचले, त्यांच्या लक्षात येऊ शकेलम की मी त्या लेखातून संजयचे समर्थन केलेले नाही. तर दोन उजळमाथ्याने वावरणार्या गुन्हेगारी प्रवृत्तीची तुलना केलेली आहे. त्या दोन प्रवृत्तीमध्ये कोण उजवा डावा, अशी ती तुलना आहे. संजय दत्त याने गुन्हा कबूल केला आहे. पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे तो मान्यवर उच्चभ्रू वर्गातला अभिनेता असला तरी सहसा सार्वजनिक जीवनात लोकांना नितीमत्तेचे धडे शिकवणारा नाही. त्यामुळेच त्याचे वागणे त्याच संदर्भात तपासणे भाग आहे. त्याला श्रीमंत वा पैसेवाला म्हणून मिळणार्या खास वागणुकीचा विरोध झालाच पाहिजे. पण जे उठताबसता कायद्याचे राज्य किंवा नैतिकतेचे डोस समाजाला पाजतात, त्या पत्रकार व अन्य प्रतिष्ठीतांनी आपल्या कृतीतून कायद्याचा आदर निर्माण केला पाहिजे. म्हणजे त्यांच्या वागणुकीमध्ये कायद्याचा सन्मान ते करतात हे दिसले पाहिजे. नेमका त्याचाच अभाव नव्हे तर दुष्काळ पडलेला आहे.
संजय दत्त प्रकरण गाजत असतानाच महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीला सुरुंग लावणारी एक गोष्ट घडली. ‘उपरा’ या आत्मकथनाने प्रसिद्धी पावलेले लक्ष्मण माने, या लेखक व समाजसेवकाच्या विरोधात त्याच्या संस्थेतील पाच महिलांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आधी सातारा येथील महिलांनी व त्यानंतर आणखी दोन इतरत्रच्या महिलांनी अशा तक्रारी दाखल केल्या. त्यानंतर पहिली धक्कादायक गोष्ट घडली, ती म्हणजे लक्ष्मण माने फ़रारी झाले. म्हणजे पोलिस पथके बनवून म्हणे त्यांचा शोध सुरू झाला. कुठल्याही समाजसेवी चळवळीला ही अत्यंत शरमेची गोष्ट होती. कारण समाजसेवी चळवळ ही कायदे व प्रस्थापिताला आव्हान देणारे आंदोलन असते आणि त्यात अनेकदा निदर्शने व सत्याग्रहामुळे कार्यकर्त्यांना अटक होत असते. तो कार्यकर्ता अटक होण्याला घाबरत नाही, तर हसत हसत सामोरा जात असतो. अशा चळवळीत दिर्घकाळ कार्यरत असलेले लक्ष्मण माने पोलिसांचा ससेमिरा मागे लागण्यापुर्वीच फ़रारी झाले; याची खरे तर त्यांच्या परिचित मित्रांना शरम वाटायला हवी. कारण कुठलाही कार्यकर्ता असा गुन्हेगाराप्रमाणे फ़रारी होत नसतो. कुठलाही व कितीही गंभीर आरोप असला तरी कायद्याशी सहकार्य असेच चळवळीचे स्वरूप असते. मात्र माने यांनी परागंदा होऊन आपण चळवळीचे सच्चे पाईक नाही, याचीच साक्ष दिलेली आहे. पण असे असूनही त्यांचे अनेक परिचित व समर्थक त्यांच्यावरील आरोपांचा इन्कार करायला पुढे सरसावलेले दिसले. असा आरोप कुणा मंत्री वा आमदार पुढार्यावर झाला असता, तर हेच लोक ‘त्या बिचार्या दुर्दैवी महिला पिडीता’ असा टाहो फ़ोडत माध्यमांतून काहूर माजवताना दिसले असते. पण आरोपाच्या जाळ्यात त्यांचाच एक सवंगडी अडकल्यावर मात्र त्यांची भाषा एकदम तांत्रिक व कायदेशीर होऊन गेलेली होती.
आठवून बघा. रमेश किणी प्रकरणात साधा एफ़ आय आरही राज ठाकरे यांच्या विरोधात लिहिला जाऊ शकला नव्हता आणि सीआयडीपसून सीबीआयपर्यंत तपास होऊनही काही सापडू शकले नाही तरी, जणू प्रत्यक्षदर्शी असल्याप्रमाणे राज ठाकरे हाच रमेश किणीचा खुनी असल्याची भाषा माध्यमातून सरसकट वापरली जात होती. आणि त्यात कोण पुढे होते? एबीपी माझा वाहिनीवर शुक्रवारी ‘तपास होईपर्यंत संयम राखायला हवा, अन्यथा चळवळीची बदनामी व नुकसान होईल’ असे इशारे युवराज मोहिते नावाचा पत्रकार देत होता. मग त्यांनीच रमेश किणी प्रकरणी साधी तक्रार नसताना दिलेल्या बातम्या शिवसेनेला बदनाम करायची मोहीम होती काय? नसेल तर तपास होईपर्यंत थांबायचे शहाणपण कधी सुचले? टोलनाका प्रकरण किंवा विधीमंडळ मारहाण प्रकरणात ज्या आमदारांवर आरोप आहेत, त्यांचा तपास पुर्ण झालेला आहे काय? नसेल तर मग माने प्रकरणी जी सावधानता बाळगण्याचे इशारे दिले जातात, त्याचा त्या बाबतीत कसा विसर पडतो? की आमदारांना बदनाम करून त्यांच्या राजकीय चळवळीचे नुकसान करण्य़ासाठीच माध्यमे कार्यरत असतात? लक्ष्मण माने व ते आमदार वा अन्य राजकारणी यांच्या बाबतीत भेदभाव कशाला? आणि म्हणूनच मला माध्यमातील अशा सफ़ेदपोश विद्वानांची झाडाझडती घ्यायला लागत असते. संजय दत्त किंवा ते आमदार यांना जशी वागणूक माध्यमे देतात आणि ज्याप्रकारे आक्रमक भाषा असते, तशीच माने प्रकरणात का नाही? दोघांमधला फ़रकही लक्षणिय आहे. त्या आमदारांना विधान भवनातच अटक का झाली नाही; म्हणून पत्रकार मुख्यमंत्र्यांसह सरकारला जाब विचारत होती. त्या आमदारांना पळून जाण्याची संधी दिल्याचे आक्षेप घेतले जात होते. पण वास्तवात हे आमदार पळून गेले नाहीत; तर दुसर्याच दिवशी पोलिस ठाण्यात हजर झाले व त्यांनी पोलिसांच्या कामात सहकार्य दिलेले आहे. लक्ष्मण माने तेवढे तरी सौजन्य वा सभ्यता दाखवू शकले आहेत काय?
संजय दत्तची गोष्ट आठवा. जेव्हा त्याचे नाव बॉम्बस्फ़ोट प्रकरणात गोवले गेल्याच्या बातम्या आल्या, तेव्हा तो मॉरिशसमध्ये चित्रीकरण करत होता. परदेशी होता. तिथूनही फ़रारी होऊ शकला असता. पण त्यानेच तात्कालीन पोलिस आयुक्त अमरजित सिंग सामरा यांना फ़ोन करून विचारणा केली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे तो मायदेशी परतला होता. त्याला इथे विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. म्हणजेच शक्य असूनही तो फ़रारी झालेला नव्हता. हे आमदारही स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाले. तेवढा सभ्यपणा समाजसुधारक लक्ष्मण माने दाखवू शकले आहेत काय? मग हे वाहिन्यावरून पोपटपंची करणारे त्या आमदार वा संजय दत्तवर दुगाण्या कशाला झाडत असतात? आणि तेच पत्रकार सराईत गुन्हेगाराप्रमाणे फ़रारी झालेल्या मानेंच्या अब्रुची इतकी चिंता कशाला करीत असतात? हा निव्वळ भेदभाव नाही काय? नुसता भेदभाव आणि पक्षपातच नाही; तर त्यात मोठी बदमाशी सुद्धा आहे. जे लोक आमदारांना तिथल्या तिथेच अटक होण्याविषयी इतके आग्रहाने दोन दिवस बोलत व लिहित होते; त्यांना लक्ष्मण माने फ़रारी झाल्यानंतर एक प्रश्न पडलेला नाही? त्यापैकी एकानेही अशा चर्चेत एक प्रश्न का विचारलेला नाही? माने फ़रारी झालेत, की त्यांना पद्धतशीर रितीने फ़रारी व्हायला सत्ताधार्यांकडून मदत झालेली आहे? आपल्या विरोधात अशी बलात्काराची तक्रार नोंदली आहे वा नोंदली जाते आहे; याचा सुगावा माने यांना लागलाच कसा, हा प्रामाणिक पत्रकाराला पहिला प्रश्न पडायला हवा. कारण त्या महिलांनी वाजतगाजत मिरवणूक काढून निवडणुक अर्ज भरावा; तशी ही तक्रार नोंदलेली नाही. ती तक्रार नोंदल्यानंतर पोलिस तपासाला निघण्यापर्यंत ही बातमी माने यांना कोणीतरी पुरवलेली असणार आणि त्यामुळेच त्यांना फ़रारी व्हायला मदत केलेली असणार. हे काम स्थानिक पोलिसांनी केले, की अन्य कोणी केले? त्याबद्दल खर्या पत्रकाराला शंका यायला हवी. विधान भवनात आमदारांना अटक होऊ दिली नाही यामागे मुख्यमंत्री व गृहमंत्री असल्याचे ज्यांना कळते वा ओळखता येते, त्यांची बुद्धी तीच शंका मानेंच्या बाबतीत घेताना कुठे शेण खायला जाते? ही त्या पत्रकारांनी आपल्या पेशाशीच केलेली बेईमानी नाही काय?
ज्यांनी हे प्रश्न उपस्थित करायचे, तेच अगतिक भाषेत लक्ष्मण माने यांनी पोलिसांसमोर येऊन हजर व्हावे अशी विनंती कशाला करतात? यातून ते पत्रकार आणि संजय दत्तच्या शिक्षेच्या माफ़ीसाठी घसा कोरडा करणारे अमरसिंग; यांच्यात फ़रक नसल्याचे लक्षात येते. अमरसिंग किंवा तत्सम भंपक सहानुभूतीदारांना बाजूला ठेवून संजय दत्त कोर्टाला व निवाड्याला शरण जात असेल, तर तो लक्ष्मण माने यांच्यापेक्षा नितीमान नाही काय? अशा पक्षपाती पत्रकारांच्या लबाडी व बदमाशीपेक्षा संजय दत्त अधिक सभ्य नाही काय? निदान झाल्या प्रकाराबद्दल तो खाली मान घालून बोलत होता, त्याच्या मनातली अपराधी भावना तो लपवू शकत नव्हता. पण इथे कॅमेरा समोर हक्कभंगाच्या अधिकाराला आव्हान देणारे संपादक आहेत आणि आपल्यातला एक कायद्याला टांग मारून फ़रारी झाला, तरी त्याच्या अनैतिकतेचे युक्तीवादाच्या आडोशाने समर्थन करीत आहेत. अशा दोन वर्गात तुलना करायची तर संजय दत्त अधिक परवडला म्हणावे लागते. कारण निदान गुन्हा झाला व शिक्षा झाल्यावर तरी तो कायद्याचा सन्मान राखतो आहे. इथे गुन्हा असल्याचा संशय घेतला व तक्रार झाली, तर लगेच कायद्याला टांग मारण्याचे समर्थन चालले आहे. या दुटप्पीपणाचे काय करायचे? तिथे बॉलिवूडवाल्यांना चित्रपटात गुंतलेल्या पैशासाठी कायदा व न्यायाची महता किरकोळ वाटते आणि इथे या प्रतिष्ठीतांना चळवळीच्या प्रतिष्ठेपुढे पाच महिलांची अब्रू व अत्याचार नगण्य वाटतात. ( क्रमश:)
भाग ( १२६ ) ३१/३/१३
भाऊ, आपला लेख पटला. जे तौलनिक विवेचन केलं आहे त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. फक्त एक गोष्ट मनात आली. ती म्हणजे लक्ष्मण माने ज्या समाजातून वर आले त्या समाजात आजही पोलिसांचे नाव काढताच फरारी व्हायची रीत आहे. असा काहीसा प्रकार मान्यांच्या बाबतीत तर घडला नसेल...? फरारी होणे ही प्रतिक्षिप्त क्रिया मानून मान्यांना संशयाचा फायदा दिला जावा असं माझं प्रथमदर्शी मत आहे. खरं काय ते कळेलंच.
उत्तर द्याहटवात्यांनी जरूर फ़रार व्हावे, पण मग आजवर जी चळवळीची भाषा केली ती फ़सवी होती असेही सांगून मोकळे व्हावे. पण मला जी माहिती आहे, त्यानुसार अटक झाल्यावर अशा तक्रारींचा पाऊस पडण्याची भिती अधिक आहे.
उत्तर द्याहटवाहे प्रकरण एका संस्था वा तत्सम एका समाजसुधारकाच्या पुरते मर्यादित आहे. आणि अशा शेकडो संस्था आहेत हे विसरू नका.
उत्तर द्याहटवाभाऊ,
उत्तर द्याहटवा१.
>> मला जी माहिती आहे, त्यानुसार अटक झाल्यावर अशा तक्रारींचा पाऊस पडण्याची भिती अधिक आहे.
असं असल्यास मान्यांना संशयाचा फायदा देणं बरोबर नाही.
२.
>> अशा शेकडो संस्था आहेत हे विसरू नका.
शोषण करणार्या संस्था शेकडो आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे का? तसं असल्यास भारतीय महिलांचं शोषण हे आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे, असा अर्थ निघतो. कारण की खूपश्या संस्थांना विदेशातून मदत येते.
आ.न.,
-गा.पै.
गा पै आपल्या वरील विचारणेत भाबडेपणा आहे असे मानले तर ---
उत्तर द्याहटवाविदेशी पैशाची मदत करताना त्या संस्था अनेक निकष लाऊनच मग मदतीचा हात पुढे करतात असे मानले तरीही अशा प्रकारे मिळणाऱ्या मदतीतील पैसा विविध गैरप्रकारे वापरला जात असतो. ज्यांच्यासाठी ती संस्था काम करते त्यांच्या मुळावर उठलेले त्यातील लोक ही कामे करत असतात किंवा नाही ते मदत करणाऱ्या संस्थांना अजिबात कळत नसावे किंवा नाही असे मानणे फारच भाबडेपणाचे ठरेल. पण सुरवातीच्या कळकळीच्या कार्यकर्त्या लोकांनंतर संस्थाचालक व सेवक वर्ग बदलला किंवा त्यांची नियत बदलली तर पैशांच्या रुपाने मदत करणाऱ्या त्या संस्थांना अंगठा दाखवायला कितीसा वेळ लागतोय? शिवाय विदेशी लोक मदतीचे पैसे गोळा करायला - मिळवायला काय हातखंडे वापरत असावेत याचे ज्ञान पैसे मिळालेल्या भारतीय संस्थांना कुठे असते.कारण दोन्हीकडचे पट्टीचे हिशोबनीस विविध क्लुप्तांनी आलेला पैसा कसा जिरवायचा हे सांगायला आपले बौद्धिकबळ लावायला दोन्ही पायावर तयार असतात. ज्या ज्या लोकांचे विदेशातील बॅंकात दोन नंबरचे अब्जावधी रुपये किंवा तेथील करन्सीमधे गुंतवले गेलेत त्यांना अशा बुद्धिवंत हिशोबनीस व आंतरराष्ट्रीय कायदे कानूनात पारंगत काळा कोटवाल्यांच्या बुद्धिमत्तेच्या कर्तृत्वावर भिस्त ठेवावी लागत असते. जो आपल्या पदाचा गैरवापर करून पैसे वा संपत्ती जमा करतात असे महाभाग खाते उघडायच्या अर्जावर कुठे फक्त सह्या करायच्या ते व बॅंकअकाऊंटचा कोड नंबर कसा जपून ठेवायचा यापेक्षा फार जाणून घ्यायच्या मागे नसतात. अनेकजण विमा किंवा अन्य किचकट फॉर्म न वाचताच फुली केल्या जागी सही करून मोकळे होतात. तसाच तो खाक्या असतो. एका चॅनेलवरील चर्चेत यावर बरीच माहिती दिली गेली होती त्याआधारे माझ्या माहितीत भर पडली. असो.
त्यामुळे मान्यांसारखे आपल्यावरील झालेल्या चरित्रहननाचा कांगावाकरून केलेल्या दुष्कृत्यांना काही कांगावखोर अश्या बुद्धिवादी लोकांकडून शाब्दिक नैतिकतेच्या बुरख्यात लपवायला सोय होते.