सोमवारच्या ‘आजचा सवाल’ कार्यक्रमात कायबीइन लोकमत वाहिनीवरच्या पॅनेलमध्ये निखिलने आपल्या लाडक्या जतीन देसाईला अगत्याने बोलावले होते. अर्थात तिथे त्याचा पुन्हा पुन्हा पत्रकार असा उल्लेख निखिल करत होता. पण खरोखरच निखिल किंवा जतीन हे पत्रकार आहेत काय? ते मुलत: डाव्या चळवळीचे कार्यकर्ते. सहाजिकच त्यांची मते ही कधीच तटस्थ वा अलिप्त असू शकत नाहीत. ते स्वभावत: घडामोडींकडे आपल्ता डाव्या मानसिकतेतूनच बघणार. त्यात भाजपा किंवा शिवसेनेविषयी अढी असणे आपोआपच आले. मग त्यांच्याकडून अशा संघटना पक्षांसंबंधीच्या विषयावर लिहिताना किंवा बोलताना न्याय्य प्रतिक्रिया उमटतील काय? मग त्यांना पत्रकार म्हणून समोर पेश करण्यापेक्षा जतीन देसाई हे डावे पत्रकार आहेत अशीच ओळख करून द्यायला हवी ना? त्याऐवजी जेव्हा निखिल जतीनची ओळख पत्रकार म्हणून करून देतो, तेव्हा मुळातच आपल्या प्रेक्षकांची दिशाभूल व फ़सवणूक करत असतो. तर असा हा जतीन देसाई गुजराती आहे. पण मुंबईत वास्तव्य केल्याने चांगले मराठी बोलू शकतो. त्यामुळे त्याला अशा चर्चेत अगत्याने आमंत्रित केले जात असते. हाच जतीन देसाई तीस्ता सेटलवाडच्या संस्थमध्येही सहभागी आहे, ज्या संस्थेतर्फ़े गेली दहा वर्षे गुजरातच्या दंगलीतील मुस्लिमांना न्याय मिळवून देण्याचे नाटक चालू आहे. वाचकांना बडोदा येथील बेस्ट बेकरी जळीतकांड आठवत असेल तर त्यातील मुख्य साक्षीदार जाहिरा शेख हिला मुंबईत आणून पत्रकार परिषदेत सादर केल्याची घटना आठवत असेल. त्यात तीस्ता सोबत जतीन सुद्धा होता. तेव्हा असा माणूस पत्रकार म्हणून मोदीप्रकरणी तटस्थ मतप्रदर्शन करू शकतो काय? नसेल तर त्याची ओळख पत्रकार म्हणून करून देणे दिशाभूल नाही काय? आणि तशीच ओळख करून द्यायची असेल तर त्याच पॅनेलमध्ये सहभागी असलेले भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांचीही ओळख चार्टर्ड अकाउंटंट अशी करून द्यायची. राजकीय चर्चेत सहभागी होणार्या प्रत्येकाची ओळख त्याच्या राजकीय भूमिकेनुसार करून दिली पाहिजे. तसे न करता एकाची व्यवसायानुसार व दुसर्याची राजकीय भूमिकेनुसार ओळख करून देणे; फ़सवणूक असते ना? हेच नेहमी माध्यमातून चालते. डाव्या विचारांचे लेखक, कलावंत किंवा व्यावसायिक आणायचे आणि त्यांची ओळख व्यवसायानुसार करून द्यायची. पण त्यांच्याकडून डावी भूमिका वदवून घ्यायची; अशी ती दिशाभूल असते. ऐकणार्या व बघणार्याला वाटते, तो एक तटस्थ व्यक्ती असून राजकारण निरपेक्ष बोलत आहे. मग महेश भट्ट, सदाशीव अमरापूरकर, राहुल बोस असे लोक नेमके आणले जातात आणि धुळफ़ेक केली जात असते. असो.
तर मोदींचे अमेरिकन विद्यपिठातील भाषण रद्द होण्याच्या निमित्ताने योजलेला ‘सवाल’मध्ये बोलताना जतीन देसाई व निखिल वागळे यांनी एक नवा शोध लावला. मोदींच्या विरोधात दंगली संबंधाने जो अतिरेकी प्रचार झाला; त्यानेच मोदींची मोठी प्रतिमा तयार झाली. पण तो अतिरेकी प्रचार केला कोणी? माध्यमांनीच केला ना? लोकांना कंटाळा येईपर्यंत हा गुजरातच्या दंगलीचा कोळसा उगाळला कोणी? अगदी कालपर्यंत खुद्द निखिल व त्याच्यासारखे सेक्युलर डावे पत्रकारच तो कोळसा उगाळत नव्हते काय? दर्डाशेठचे हात कोळसा खाणीत काळे झालेले असताना; त्याबद्दल निमूट मौन धारण करणारा निखिलच अगदी त्याच कालखंडात मोदी व दंगलीचा कोळसा उगाळत नव्हता काय? अगदी अलिकडल्या काळात म्हणजे मुंबई हल्ल्यातला आरोपी अजमल कसाबला फ़ाशी दिली; तेव्हा नोव्हेंवर महिन्यात ‘सवाल’मध्ये निखिल तोच कोळसा उगाळत होता. कसाबने शेकडो निष्पाप मुंबईकरांचा जीव घेतला. त्याच्या फ़ाशीच्या दिवशीच गुजरात दंगलीच्या कुठल्या खटल्याचा निकाल लागला होता. तर निखिलने कसाबची फ़ाशी व गुजरात दंगलीतल्या आरोपींची शिक्षा; असा जोड विषय घेऊन कोळसाच उगाळला नव्हता काय? कितीही अतिशयोक्ती करायची म्हटली तरी दंगल आणि दहशतवादी हत्याकांडाची तुलना होऊ शकते काय? पण त्याही चर्चेत निखिल गुजरातची दंगल व कसाबचे जिहादी हत्याकांड यांना एका पंक्तीत बसवायची कसरत करत होता. यातून नरेंद्र मोदी यांना बदनाम करायचा डावच खेळत होता ना? त्यात मग त्याने मदतीला कॉग्रेस वा डाव्या पक्षाच्या लोकांचा वापर करून घेतला असेल; तर पहिल्या क्रमांकाचा आरोपी निखिल असतो. त्याच्यासारखे पत्रकार व माध्यमे असू शकतात. बाकीचे कॉग्रेसवाले वा डावे त्यांचे साथीदार म्हणून दुय्यम आरोपी होऊ शकतात. पण परवा सोमवारच्या चर्चेत निखिल व जतीन हे दोन बदमाश पत्रकार आपल्या पापाचे सगळे खापर कॉग्रेस व डाव्यांच्या डोक्यावर फ़ोडायची लबाडी करीत होते. डाव्यांनी व कॉग्रेसने मोदी यांना खुपच टार्गेट केले; अशी या दोघांची भाषा होती आणि त्यात सहभागी झालेले कॉग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत व अन्य कोणी डाव्या पक्षाचे गावडे म्हणून होते, त्यांनी नंदीबैलासारख्या माना हलवल्या. खरे तर त्यांनी ही मोदीविरोधी मोहिम चालविलेली नाही, सेक्युलर माधयमे व सेक्युलर पत्रकार त्यातले खरे गुन्हेगार आहेत. बाकीचे राजकीय पक्ष त्यातले भागिदार आहेत.
बेस्ट बेकरीचेच उदाहरण घ्या. त्या खटल्याचा निकाल लागून आरोपी सुटले; तर त्यातल्या जाहिरा शेखला मुंबईता आणून माध्यमात गवगवा करणारा कोणी राजकीय पक्ष नव्हता, तर तीस्ताचे सहकारी पत्रकार व कलावंत म्हणून मिरवणारे लोकच होते. त्यात खुद्द जतीन देसाई होता आणि त्याचा डंका पिटण्याचे काम वाहिन्यांवरच्या डाव्यांनी म्हणजे सेक्युलर पत्रकारांनी केलेले आहे. मग त्यात मोदींचा उद्धार वा टिकेचा अतिरेक झाला असेल, तर त्यासाठी कॉग्रेस वा डाव्या पक्षांना कसे जबाबदार धरता येईल? गुजरातच्या दंगली संबंधाने हायकोर्ट वा सुप्रिम कोर्टात कुठलाही निकाल आला; मग त्याचा दिवसरात्र ढोल कोणी वाजवला? सेक्युलर पक्षांनी नव्हे. त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरे दिली, पण गवगवा व अतिरेक माध्यमांनी केलेला आहे. तेव्हा मोदींच्या विरोधी अपप्रचार झाला व त्यात अतिरेक झाला असेल, तर त्याला सेक्युलर पत्रकार वा माध्यमेच अधिक जबाबदार आहेत. पत्रकार वा लेखक कलावंत असे मुखवटे लावून उजळमाथ्याने समाजात वावरणारे त्याला जबाबदार आहेत. कारण त्यांनीच मोदी विरोधी आघाडी उघडली होती. अमेरिकेत मोदीना व्हिसा नाकारण्यात आला, त्याला कॉग्रेस जबाबदार नाही. उलट एका मुख्यमंत्र्याला व्हिसा मिळवून देण्याचे काम परराष्ट्र मंत्रालयाकडून होत असते. तो व्हिसा नाकारला गेला त्याबाबतीत तेव्हाचे परराष्ट्रमंत्री एस एम कृष्णा यांनी संसदेत नाराजी व्यक्त केली होती. म्हणजेच कॉग्रेसने मोदी विरोधात व्यक्तीगत पातळीवर सत्तेचा गैरवापर केला असे म्हणता येणार नाही. पण मग हे झाले कसे? तर स्वत:ला स्वयंसेवी संस्था म्हणवून घेणरे जे मुखवटाधारी जतीन व तीस्ता सारखे डावे आहेत, त्यांच्या कारवायांमुळे तो व्हिसा नाकारला गेला होता. यांचेच जे जगभर पसरलेले असे छुपे डावे भाईबंद आहेत, त्यांच्याच मोहीमेने मोदींना व्हिसा नाकारला गेला आणि अनेक देशातल्या सरकारला मोदी विरोधी निर्णय राजकीय दडपणाखाली घ्यावे लागले. आता देखिल व्हार्टन स्कुलमधील विद्यार्थ्यांना मोदींचे भाषण ऐकायचे आहे. पण ती संस्था ज्या विद्यापिठाच्या अखत्यारीत येते, तिथे बसलेल्या अशा मुखवटेधारी तीन भारतीय डाव्या प्राध्यापकांच्या दबावाने मोदींच्या भाषणाचा कार्यक्रम रद्द करावा लागला आहे. त्याला तर इथला कॉग्रेस पक्ष वा डावे पक्ष जबाबदार नाहीत ना?
म्हणूनच ही बदमाशी लक्षात घेण्याची गरज आहे. हे असे छुपे अन्य व्यवसायाचे मुखवटे धारण करून राजकारण खेळणारे बुद्धीमंत; ही सध्या जगभरची समस्या झालेली आहे. कारण माध्यमे व अन्य मार्गाने असे लोक जनमताला लाथाडायची पाळी सरकारवर आणत असतात. आता देखिल व्हार्टन स्कुलचा कार्यक्रम योजणारे तिथले विद्यार्थी आहेत. त्यात विद्यापिठातील प्राध्यापकांना कुठलाही अधिकार नसताना, त्यांनी वरून दबाव आणून मोदींचे आमंत्रण रद्द करून घेतले आहे. ही लोकशाहीची गळचेपी नाही काय? एकीकडे नित्यनेमाने अविष्कार स्वातंत्र्याचे नाटक करणार्या याच लोकांनी मोदींच्या अविष्कार स्वातंत्र्याची गळचेपी केलेली नाही काय? व्हार्टन स्कुलमधील विद्यार्थ्यांच्या निवड स्वातंत्र्याची मुस्कटदाबी केलेली नाही काय? कशी बदमाशी आहे बघा. जेव्हा निवडून आलेल्या जनतेच्या सत्तेच्या विरोधात म्हणजेच प्रत्यक्षात जनमानसाच्या इच्छेच्या विरोधात बोलायचे असते; तेव्हा यांना स्वातंत्र्य असले पाहिजे. पण जेव्हा त्याच जनतेच्या व बहुसंख्येच्या इच्छेचा विषय येतो, तेव्हा हे लोक आपल्या बळाचा वापर मुस्कटदाबी करायला बेधडक करतात. यांची अविष्कार स्वातंत्र्याची लढाई व आग्रह किती खोटा व फ़सवा असतो, त्याचाच हा पुरावा नाही काय? आणि जेव्हा बाजू उलटते, तेव्हा हेच लोक पुन्हा कॉग्रेस व डाव्या पक्षांच्या डोक्यावर आपल्या पापाचे खापर फ़ोडायला सज्ज असतात. निखिलच्या कार्यक्रमात जतीन देसाई व निखिल त्याच चोराच्या उलट्या बोंबा मारत नव्हते काय? पण मोदींनी यांचे काय घोडे मारले आहे? मोदींना बदनाम करण्यातून या मुखवटेधारी डाव्यांनी नेमके काय मिळवले. कुणाला खरे वाटणार नाही, पण गेल्या दहा वर्षात गुजरातच्या दंगली, तिथले दंगलपिडीत आणि मोदींचे विकृतीकरण हा भारतातल्या सेक्युलर विचारवंतांपासून तीस्तापर्यंत अनेकांचा लाखो, करोडो रुपये कमवायचा धंदा होऊन बसला होता. त्यात न्याय व सामाजिक सामंजस्य हा निव्वळ देखावा होता. ( क्रमश:)
भाग ( १०६ ) ७/३/१३
Good one, very informative, thanks for writting
उत्तर द्याहटवा