रविवार, १७ मार्च, २०१३

वाघ पडलो जाळी आन केल्डा दाखयता नाळी




   गेल्या दोन वर्षात भारत सरकार म्हणजे नेमकी काय चीज आहे; असे विचारायची किंवा शोधायची परिस्थिती आलेली आहे. कारण देशात असो की देशाबाहेर असो, सरकार नावाच्या वस्तूला कोणी कवडीची किंमत देताना दिसत नाही. बाकीचा खंडप्राय देश बाजूला ठेवा. ज्या राजधानी दिल्लीत बसून हे लोक राज्य करतात, तिथेही सरकारचा वचक किंवा धाक उरलेला नाही. धावत्या गाडीत मुलींना पळवून बलात्कार केला जातो. बसमधून प्रवास करणार्‍या तरूणी वा महिलांवर सामुहिक बलात्कार होतात. देशाचा गृहमंत्री विरोधी पक्षावर दहशतवादी संघटना असल्याचा आरोप करून शेजारी शत्रू राष्ट्राच्या हातात कोलीत देतो. इटालीसारख्या देशाचा राजदूत सुप्रिम कोर्टाला खोटेनाटे प्रतिज्ञापत्र सादर करून त्याच्या देशाचे खुनी नागरिक इथून पळून जायला राजरोस मदत करतो. त्याला भारत सरकार आपली गचांडी पकडेल वा आपल्याला किंमत मोजावी लागेल; अशी भितीही वाटत नाही. सीमेवर आपल्याच हद्दीत गस्त करणार्‍या सैनिकांना ठार मारून पाकिस्तान त्यांची मुंडकी पळवून घेऊन जातो, तर त्यांच्या पंतप्रधानाला आपला परराष्ट्रमंत्री मेजवान्या देतो. दक्षिणेला अरबी समुद्रात असलेला बेटवजा देश मालदीव; तिथल्या भारतीय राजदूताला दम भरतो आणि नाक रगडायला परराष्ट्रमंत्री तिकडे धाव घेतो. भारताने खरेदी केलेल्या हेलिकॉप्टरच्या व्यवहारात लाचखोरी झाली म्हणून इटालीमध्ये तिथल्या कंपनीच्या प्रमुखाला अटक होते. पण त्या भ्रष्टाचाराचा थेट सरकारशी संबंध असूनही तिथले कोर्ट सरकारला पुरावे द्यायला नकार देते. उलट त्याच देशाचे सैनिक इथे भारतीय हद्दीत कोळ्यांचे खुन पाडतात, तर त्यांना जामीन देऊन परदेशी जायला भारताचे सरकार मदत करते. अब्रू गेली असताना सुब्रमण्यम स्वामीसारखा एक सामान्य नागरिक कोर्टात जाऊन सरकारला हातपाय हलवायला भाग पाडतो. तोपर्यंत सरकार काहीच करत नाही. हे सर्व काय आहे? सरकार असे चालवले जाते काय? ज्याचा कुणा गुन्हेगार वा कायदा मोडणार्‍याला धाक नाही, त्याला सरकार म्हणतात काय? गेले काही दिवस सरकारच्या निष्क्रियतेचे इतके प्रसंग ओढवले आहेत, की देशात सरकार नावाची वस्तू शिल्लक आहे की नाही; असा प्रश्न लोकांना पडू लागला आहे. कारण कोणीही येऊन टपली मारावी, इतकी भारत सरकारची दयनीय अवस्था झालेली दिसते.

   ह्या सरकारला काय झाले आहे? पंतप्रधान व कॉग्रेस पक्षाला संसदेत बहुमत सिद्ध करणे आणि वेगवेगळ्य़ा खरेदी व्यवहारात घोटाळे करणे; म्हणजे सरकार असे वाटते का? कारण सरकारी अधिकारात झालेल्या खरेदी व परवाने विषयात घोटाळ्यापलिकडे मनमोहन सरकारने अन्य कुठले काम केले, असाच प्रश्न आहे. इतके कमी होते म्हणून की काय आता पाकिस्तानने इथे झालेल्या फ़ाशीबद्दल नाराजी व्यक्त करणारा प्रस्ताव त्यांच्या संसदेत मंजूर करून; आपण भारताच्या अंतर्गत विषयातही हस्तक्षेप करायला मोकळे आहोत, इतकी मजल मारली आहे. यापेक्षा अराजक म्हणजे काय असाच प्रश्न मग शिल्लक उरतो. देशात करोडो रुपयांचे गैरव्यवहार राजरोस चालू आहेत, बलात्कार दरोडे पडत आहेत, भ्रष्टाचार मोकाट आहे. शेजारी देश धमक्या देत आहेत. परकीय हस्तक इथे येऊन बॉम्ब फ़ोडत आहेत. आपल्या जवान व सैनिकांची बेधडक हत्या करीत आहेत. हे असेच चालणार असेल तर सरकार हवेच कशाला? कायदा व सुव्यवस्थेचा मागमूस कुठे दिसत नाही. बस्स सेक्युलर म्हणून हे सत्ताधीश व त्यांच्या नादाला लागलेले राजकारणी जपमाळ ओढत बसले आहेत. अवघ्या काही वर्षापुर्वी एकविसाव्या शतकातली महाशक्ती व्हायच्या वल्गना करणार्‍या भारताची अशी केविलवाणी अवस्था कोणी व का केली? कशामुळे देशाची अशी दुर्दशा झाली आहे? सेक्युलॅरिझम वगळता दुसरे काही कारण कोणी देऊ शकेल का? नऊ वर्षापुर्वी भाजपाच्या आघाडीचे सरकार सत्तेवर असताना भारताचा जगात व शेजारी देशात दबदबा होता. आज तो पुरता रसातळाला गेलेला आहे. ती सत्ता गेली नसती तर इतकी वाईट अवस्था नक्कीच झाली नसती. हे सरकार इतके नालायक कशामुळे झाले आहे? त्याचे कोणी हातपाय बांधून ठेवले आहे? पशूसंग्रहालयातील वाघ जसा त्या बंदिस्त पिंजर्‍यातून नुसता डरकाळ्या फ़ोडतो, तशी भारत सरकारची अवस्था नाही काय?

   त्या पिंजर्‍यातल्या बंदिस्त वाघाला कोणी घाबरत नाही, की त्याच्या डरकाळ्य़ांनी कोणाच्या मनाचा थरकाप उडत नाही, तशी आज मनमोहन सरकारची स्थिती आहे. मग त्या पिंजर्‍या बाहेरच्या उनाड पोरांनी बंदिस्त वाघाला खडे मारून त्याची टवाळी करावी; त्यापेक्षा युपीए सरकारची स्थिती वेगळी आहे काय? मालवणी भाषेत हेच वर्णन करणारी एक म्हण आहे. ‘वाघ पडलो जाळी आन केल्डा दाखयता नाळी’. म्हणजे वाघ बंदिस्त जागेत अडकून पडला, मग माकडही त्याला लिंग दाखवून हिणवते, वाकुल्या दाखवते, असा त्याचा मतितार्थ आहे. या खंडप्राय देशाची कथा नेमकी तशी झाली आहे. पण सवाल आहे, की कुठल्या जाळीत वा पिंजर्‍यात हा वाघ अडकला आहे? कुठल्या दोरांनी त्याला जायबंदी करून टाकले आहे? कुठल्या सापळ्यात सरकार नावाचा वाघ फ़सला आहे? पाठीशी बहूमत असूनही मनमोहन सिंग कुठलेच धाडसी पाऊल का उचलू शकत नाहीत? तर त्यांनी स्वत:ला तथाकथित सेक्युलर सापळ्यात अडकवून घेतले आहे. तो सापळा भेदल्याखेरीज सरकारला धाडसी उपाय योजता येणार नाहीत. सत्ता टिकवायची तर बहूमत हवे आणि बहूमत टिकवायचे तर मुस्लिमांचे लांगुलचालन करतो, असे दाखवणे भाग आहे, अशा दुष्टचक्रात हे सरकार सापडले आहे. म्हणूनच त्याला कसाब किंवा अफ़जल गुरू, हे गुन्हेगार असले तरी त्यांचा धर्म बघूनच न्यायनिवाडा करावा लागत असतो. त्यामुळे मग मुस्लिम गुन्हेगार आपल्या धर्माचा आडोसा घेऊन कायदा ओलीस ठेवत असतात. जिहादी व पाकचे हस्तक असलेले मुस्लिम धर्माचा आडोसा घेऊन घातपाती कारवाया करत असतात. त्याच्या परिणामी देशप्रेमी मुस्लिम अधिक बदनाम होत चालला असून त्या करोडो देशभक्त मुस्लिमांविषयी लोकांच्या मनात शंका निर्माण होत चालल्या आहेत. पण सरकारच परकीय हस्तकांना पाठीशी घालत असल्यावर देशभक्त मुस्लिमांचा आवाज दडपला जातो आहे आणि त्यातून बाहेर पडण्याऐवजी युपीए व कॉग्रेस त्यातच अधिक फ़सत चालली आहे. पण सत्ता त्यांच्याच हातात असल्याने देशाचे गाडे त्यांच्याबरोबर अधिकच गाळात रुतत चालले आहे. जेव्हा वाघ असा जायबंदी वा पिंजर्‍यातला बंदी होतो, तेव्हा त्याला कोणीही खडे मारायला धजावतो.

   सवाल असा आहे की, जे सत्तेवर आहेत, ते मुळात वाघ आहेत का? की वाघाचे कातडे पांघरलेले हे कोल्हे आहेत? निदान त्यांचे वागणे पहिल्यास ते वाघ नाहीत याची खात्री पटते. पण त्यांचे वागणे पाहिल्यास ते धुर्त कोल्हे आहेत असेही लक्षात येते. ‘व्हायब्रंट गुजरात’ या कार्यक्रमासाठी आपणच आमंत्रित केलेल्या पाकिस्तानी शिष्टमंडळाला गुजरातचा मुख्यमंत्री दोन जवानांची मुंडकी कापल्याचे कळल्यावर हाकलून लावतो, तर भारताच्या पंतप्रधानाला थोडीफ़ार कठोर भूमिका का घेता येत नाही? अजमेर शरीफ़ या दर्ग्याला भेट द्यायला पाकिस्तानचा पंतप्रधान आला; तर तिथला दर्ग्याचा प्रमुख दिवाण त्याला भेटही नाकारतो, पण देशाच्या परराष्ट्रमंत्र्याला त्याचे अनुकरण का करता येत नाही? भेदरलेल्या कुत्र्यामांजराने वागावे, तसे भारत सरकार कशाला वागताना दिसते? या सरकारने आत्मविश्वासच गमावलेला आहे. दिल्लीतल्या बलात्कारानंतर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले तर त्यांना सामोरे जाण्याची नैतिक ताकद या सरकारपाशी उरलेली नाहीच. पण सीमेवर किंवा श्रीनगरमध्ये पाक हस्तक भारतीय जवानांचे मुडदे पाडतात, त्याचा जाब विचारायचीही हिंमत हे गमावून बसले आहेत काय? संसदेत वा पत्रकार परिषदेत डरकाळ्या फ़ोडायच्या, पुढे काही करायचे नाही, अशी एकूण स्थिती आहे. अतिरेकी काश्मिरात स्वयंचलित रायफ़ली घेऊन येत आहेत, पाकधार्जिणे फ़ुटीरवादी खुलेआम पाकचे समर्थन करीत आहेत आणि आमचे भारत सरकार काय करते? तर आपल्याच पोलिस व जवानांच्या हातातल्या बंदूका काढून लाठीने लढायला सांगते आहे. शेळपटपणाचा आणखी कुठला पुरावा हवा आहे? दगडफ़ेक करणार्‍या व गोळीबार करणार्‍या जमाव व हल्ल्लेखोरांचा सामना साध्या बेचकीने करण्यापर्यंत भारतीय जवानाची केविलवाणी स्थिती जे सरकार करते, त्याचाच देशाला धोका असतो. अशा वाघाच्या डरकाळीवर विसंबून चालत नाही. त्याला पर्याय शोधणे आवश्यक असते. खंडप्राय भूमी व सव्वाशे कोटी लोकसंख्येचा हा देश वाघासारखा आहे. पण तो युपीए व सेक्युलर राजकरणाच्या जाळीत अडकून पडल्याने माकडेही त्याची टिंगल करू लागली आहेत. यातून सुटायचे तर सेक्युलर सापळ्यातूनच मतदाराने या देशाला बाहेर काढणे आवश्यक आहे. अन्य कुठला मार्ग शिल्लक उरलेला नाही. कारण सेक्युलर याच शब्दाने देशाचा घात केलेला आहे.   ( क्रमश:)
 भाग   ( ११५ )    १८/३/१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा