रविवार, २४ मार्च, २०१३

अवघ्या जगाला भेडसावणार्‍या दोन समस्या


   आज अवघ्या पुढारलेल्या जगाला कुठली ना कुठली समस्या भेड्सावत असल्याचे बातम्या वाचल्या, ऐकल्यावर आपल्या लक्षात येते. कुठे ती मंदीच्या आर्थिक संकटाची समस्या असेल, कुठे दहशतवाद वा भ्रष्टाचाराची समस्या असेल. शेकडो समस्या सांगता येतील. त्यावरचे हजारो उपाय सुचवले जात असतात व त्यातले काही शेकडा उपाय योजले जात असतात. पण या उपायांनी समस्या सुटायचे दूर राहिले. उलट तीच समस्या आणखी भीषण व रौद्र स्वरूप धारण करून समोर उभीच असते. आणि त्याचे प्रमुख कारण त्या त्या समस्येच्या मूळापर्यंत जाण्याचा कधी प्रयत्न होत नाही. समस्या उदभवली, मग त्यावरचे तात्पुरते उपाय शोधले जातात. सगळा घोटाळा तिथेच होत असतो. आईन्स्टाईन सारखा जाणता वैज्ञानिकही म्हणतो, ‘तेच तेच करीत रहायचे आणि वेगळा काही परिणाम साधेल अशी अपेक्षा बाळगत रहायचे, हा निव्वळ मुर्खपणा असतो.’ आज आपण जगाच्या व्यवहाराकडे बघितले तर जे शहाणे वा जाणकार म्हणून समाजाच्या वतीने निर्णय घेऊन अंमलाता आणत असतात; ते याच व्याख्येत बसणारे आहेत. त्यांच्याकडून उपाय बदलत नाहीत वा समस्या व परिणामांचा अभ्यास करून उपाय शोधले जात नाहीत. उलट हरलेला जुगारी चिडून जसा आणखी मोठा जुगार खेळत जातो; तशी जगभरच्या नेत्यांची अवस्था झालेली दिसते. भ्रष्टाचार वा दहशतवाद ह्या आज जगाला भेडसावणार्‍या दोन सर्वात मोठ्या समस्या आहेत. पण गेल्या दोनतीन दशकात त्यावर योजलेल्या व फ़सलेल्या उपायांमध्ये कुठला तरी फ़रक पडला आहे काय? मात्र परिणाम सतत विपरित आलेले आहेत आणि समस्या अधिकच बिकट होत गेलेली आहे. म्हणूनच जगाला आज भेडसावणार्‍या दोन मोठ्या प्राथमिक समस्यांचा उहापोह करणे मला अगत्याचे वाटते. त्या समजून घेतल्या तर लक्षात येईल, की बाकीच्या शेकडो समस्या त्यातूनच उदभवल्या आहेत.

   या दोन जागतिक समस्या नुसत्या सांगितल्या तरी अनेकांच्या भुवया उंचावणार आहेत, याची मला संपुर्ण कल्पना आहे. कारण ज्याला जगभरचे शहाणे सर्वच समस्यांवरचे हमखास उपाय म्हणतात, त्यांनाच मी समस्या म्हणतो आहे. मानव जातीला सर्वाधिक भेडसावणार्‍या त्या दोन प्रमुख समस्या; कायद्याचे राज्य व आधुनिक शिक्षण अशा आहेत. आश्चर्य वाटले की नाही? कायद्याचे राज्य म्हणजे सुरक्षिततेची हमी आणि आधुनिक शिक्षण म्हणजे मानवाला प्रगत करण्याचा सर्वात उत्तम मार्ग; अशीच आपली समजूत असते. मग त्यांनाच मी समस्या म्हणू लागलो, तर कोणालाही आश्चर्य वाटणारच. कदाचित काहींना राग येईल, तर काहींना हा निव्वळ मुर्खपणाच वाटू शकेल. पण तो मुर्खपणा वाटत असला तरी ते मत बाजूला ठेवून माझे म्हणणे ऐकून घ्यावे; अशी माझी आग्रहाची विनंती आहे. याच दोन समस्या कशाला, अशीही शंका कोणाच्या मनात येऊ शकेल. मग जे काही आधुनिक आहे, त्या सगळ्याच समस्या आहेत, असेच म्हणा की, असेही उपहासाने म्हटले जाईल. पण त्या वादात पडायचे आताच कारण नाही. जरा त्या दोन समस्या नेमक्या ऐकून घ्यायला काय हरकत आहे? यातली पहिली समस्या आहे ती आधुनिक शिक्षण व दुसरी आहे कायद्याचे राज्य. त्या समस्या कशाला आहेत? तर त्यांनीच आपले आजचे मानवी जीवन सगळ्या बाजूंनी व्यापलेले आहे. कारण आधुनिक शिक्षणाने आजचा समाज घडवला जात असून त्याने कायद्याच्या चौकटीतच जगावे, अशी सार्वत्रिक अपेक्षा असते. नुसती अपेक्षाच नाही तर सक्ती आहे. म्हणजे्च आधुनिक मानव समाजात जगायचे असेल तर तुम्हाला या दोन गोष्टीपासून सुटका नाही. कारण तेच नव्या युगातील मानवी जीवन सुटसुटीत व सुरळीत करणारे उपाय असल्याचे सर्वमान्य गृहीत आहे. सहाजिकच माणुसही कमीअधिक प्रमाणात त्याच्याच आहारी गेलेला आहे. त्याच्या पलिकडे जाऊन विचार करणेही पाप मानले जाते वा गुन्हाही समजला जातो. पण म्हणून त्याच दोन गोष्टींनी मानवी जीवन सुकर बनवले आहे का? सुरक्षित केले आहे काय? तसे थोरामोठ्यांनी व जाणकारांनी सांगितले आहे, राज्यकर्त्यांनी मानले व राबवले आहे. पण परिणाम काय सांगतो? तो अपेक्षित परिणाम आहे काय?

   असो, दोन्ही उपायांच्या यशापयशाची तपासणी नंतर बघू. आधी या दोन उपायांचे प्राथमिक परिणाम काय आहेत ते तर बघू. आधुनिक शिक्षण म्हणजे ज्ञानात भर घालून घेणे असते. विविध विषय व सामाजिक जाणीवा या शिक्षणातून मानवाच्या मनावर ठसवल्या जात असतात. म्हणजे जन्मत: माणसाला जे ज्ञान वा जाणीवा मिळालेल्या असतात, त्या शिकाव्या लागत नाहीत. पिढीजात ज्या गोष्टी वा गुणकौशल्ये समाज आत्मसात करत असतो, ते स्वाभाविक म्हणून कायमचे अंगभूत गुणमुल्ये म्हणून स्विकारली जात असतात. निसर्गाच्या व्यवहाराप्रमाणे ते काही पिढ्यांनंतर आपोआपाच पुढल्या पिढ्य़ांना जन्मत: मिळत असतात. त्यालाच जन्मजात वा उपजत गुण म्हणतात. कुठल्याही प्राण्यामध्ये हाच निसर्ग नियम असतो. माणूस त्याला अपवाद नाही. आपोआपच, जन्मलेला प्राणी त्याच गुणांच्या व जाणिवांच्या आधारे जीवनसंघर्ष सुरू करत असतो. पण त्या जाणिवा किंवा ते उपजत ज्ञान अपुरे असल्याचे मानवाला वाटू लागले आणि त्याने अधिक ज्ञान आत्मसात करण्याचा मार्ग पत्करला; तेच आधुनिक शिक्षण होय. त्यासाठी शाळा वा  शिक्षणपद्धती विकसित केली. अन्य कुठल्या प्राणिमात्रामध्ये अशी अधिक शिकण्याची व्यवस्था नसते. ते प्राणी उपजत ज्ञानावर जीवनयात्रा पार पाडतात. माणसाला अधिक बुद्धीक्षमता असल्याने, त्याने स्वत:च अधिक शिकण्याची व्यवस्था उभी केलेली आहे आणि त्यात गैर काहीच नाही. पण जेव्हा आपण असे अधिक ज्ञान अनुभव आत्मसात करतो तोपर्यंत ठिक असते. पण त्याच्यावरच विसंबून रहाताना आपल्या उपजत ज्ञानाकडे पाठ फ़िरवतो; तिथे उपलब्ध असलेल्या सोयीसुविधेला नाकारत असतो. एक प्रकारे आपण परावलंबी होत असतो. मन एक सांगते आणि बुद्धी म्हणजे कमावलेले ज्ञान दुसरे सांगते; अशी आपली द्विधा मनस्थिती होऊन जाते. कशी त्याची अनेक उदाहरणे आहेत, ती नंतर तपासता  येतील. पण उपजत जन्मत: मिळालेले ज्ञान व नंतर शिकून आत्मसात केलेले ज्ञान; यातला संघर्ष होतो हे मान्य झाले तरी सध्या पुरे आहे.

   दुसरी समस्या आहे कायद्याचे राज्य. कायद्याचे राज्य म्हणजे काय असते? तुम्हाला स्वत: काहीही करायला बंदी असते. प्रत्येक गोष्ट तुम्ही कायद्याच्या मर्जीने करायची असते. तुमच्या जीवावर बेतले, तरी त्याबद्दलचा बचावाचा निर्णय वा उपाय सुद्धा कायद्याच्या मर्जीनेच घेतला पाहिजे असा दंडक तुमच्यावर असतो. अन्य प्राणीमात्रांना तेवढे गुलाम वा परावलंबी असायचे कारण नसते. साधे घरात घुसलेले उंदिर वा तुम्हीच पाळलेले मांजर, कुत्रा घ्या. त्यांच्यावर हल्ला झाल्यास ते थेट प्रतिहल्ला चढवू शकतात. पण कायद्याच्या राज्यात जगणार्‍या माणसाला असे आपल्यावरचे संकट स्वेच्छेने टाळायची सोय नसते. तर त्यासाठी कायद्याची मंजुरी आवश्यक असते. कोणी तुम्हाला मारण्याची धमकी दिली, तर आपल्या बचावासाठी हत्यार बाळगायची मुभा तुम्हाला नाही. पण तुमच्यावर हल्ला करणार्‍याला मात्र वाटेल ते करायची मुभा व मोकळीक आहे. शासन व्यवस्था म्हणते आम्ही तुमच्याच सुरक्षेसाठी सज्ज आहोत, म्हणूनच तुम्हाला स्वसंरक्षणार्थ सज्ज असायचे काही कारण नाही. तशी सज्जता म्हणून तुम्ही हत्यार बाळगले, तर त्यालाच गुन्हा ठरवून सरकार व त्याचा कायदा तुम्हाला शिक्षा देतो. पण जर अकस्मात वा पुर्वसूचना देऊन तुमच्यावर कोणी हल्ला केला वा तुमचे नुकसान केले, तर सरकार त्याची भरपाई करतेच असे नाही. म्हणजेच कायद्याचे राज्य तुम्हाला पांगळे करून टाकते. दुर्बळ करून टाकते. आधुनिक शिक्षणाने तुम्हाला कायद्याच्या राज्याची व अनेकविध सुरक्षा उपायांची इतकी भुरळ घातलेली आहे, की उपजत बचावाची प्रतिकारशक्ती आपण गमावूनच बसलो आहोत. विसरूनच गेलो आहोत. किंचित जरी धोका जाणवला तर सामान्य पशू-प्राणी जसा प्रतिहल्ला चढवतात, तसा माणुस सहसा वागताना दिसणार नाही. समोरून संकट चाल करून येताना दिसते आहे. तर आपण कायदे व सुविधांचा विचार करू लागतो.

   बारकाईने बघितले तर सर्व मोठमोठ्या व सातत्याने भेडसावणार्‍या समस्या नेमक्या याच दोन प्राथमिक समस्यातून निपजलेल्या दिसतील. तुम्हा आम्हाला ज्या प्रश्न समस्यांनी पिडलेले, गांजलेले आहे, त्याचे जनक याच दोन प्रमुख समस्या दिसतील. कायद्याच्या राज्याने लावलेले लगाम व आधुनिक शिक्षणाने निकामी केलेले उपजत ज्ञान; यामुळे आपल्याला प्रत्येक समस्येसमोर हैराण व्हावे लागते, शरण जावे लागते, असेच आढळून येईल. त्याचा विस्तारित उहापोह पुढल्या काही लेखांमधून मी करणार आहे. मग आपल्या लक्षात येऊ शकेल, की पुढारलेल्या पाश्चात्य देश व अमेरिकेपासून विकसनशील श्रीलंकेपर्यंत कुठलाही देश वा समाज घ्या, त्यांना सतावणारे प्रश्न व समस्या याच दोन प्राथमिक समस्यांचा पसारा आहे. उलट या दोन समस्यांपासून संपुर्णपणे वा काहीअंशी अलिप्त राहिलेले समाज व देश, आपल्यापेक्षा अधिक सुखी, समाधानी व सुखरूप जीवन जगत आहेत. याचा अर्थ आधुनिक शिक्षण वा कायद्याचे राज्य ह्याच समस्या नाहीत, त्यांच्यावर आंधळेपणाने अवलंबून रहाण्याने ते उपायच समस्या बनून गेल्या आहेत.     ( क्रमश:)
 भाग   ( १२०  )    २४/३/१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा