बुधवार, १३ मार्च, २०१३

अडाण्यांच्या परिसंवादात थापाड्य़ा शिरजोर



   रविवारच्या ‘पुण्यनगरी’मध्ये ‘प्रवाह’ पुरवणी प्रसिद्ध होते. त्यासाठीचा लेख मी गेल्या शुक्रवारी लिहिला. त्याची सुरूवातच आजच्या पत्रकार व विश्लेषकांच्या अज्ञानाबद्दलची होती. आजकाल जे राजकीय विश्लेषण वाहिन्या किंवा वृत्तपत्रातून चालते; ते करणारे बहुतांश लोक चाळीशी पन्नाशीच्या आतले आहेत आणि म्हणूनच त्यांचा राजकीय अनुभव १९९० नंतरचा आहे. त्यापुर्वीच्या निवडणुका व तात्कालीन परिस्थितीचा थेट अनुभव आजच्या बहुतांश पत्रकारांना नाही. काहीजणांनी जुनी माहिती वाचलेली वा ऐकलेली आहे; पण त्यांनीही ती किती समजून घेण्याचा प्रयास केला, याबद्दल मला शंकाच आहे. सहाजिकच १९९० पुर्वीच्या निवडणुकांचे संदर्भच माहित नसलेल्यांकडून मतदारांच्या वर्तनशैलीचे नेमके आकलन होणे अशक्य आहे, असे मत मी त्या लेखात मांडले होते. त्याचे महत्व असे, की नेमक्या त्यापुर्वीच्या निवडणूका व नंतरच्या निवडणूका; यात एक मूलभूत फ़रक आहे. १९८९ च्या नवव्या लोकसभा निवडणूकीपासून कुठल्याच पक्षाला संसदेत बहुमत मिळवता आलेले नाही आणि त्याच निवडणुकीपासून मतचाचण्यांचा जमाना सुरू झाला. म्हणजे मतचाचण्यांना महत्व दिले जाऊ लागले. त्यापुर्वीच्या चार लोकसभा निवडणूका या लाटेच्या आहेत. म्हणजे कुठल्या तरी एका बाजूची लाट आल्याने मतदार तिकडेच वहावत गेलेला आहे. पण त्याचा गंधच आजच्या विश्लेषक, संपादक, पत्रकारांना नसेल, तर त्यांच्याकडून नेमके राजकीय विश्लेषण होऊ शकणार नाही. असे मी लिहिले होते. अजून तो लेख प्रसिद्ध व्हायला तीन दिवसांचा अवधी होता. पण लिहून संपल्यावर अवघ्या साडेतीन तासातच माझ्या त्या आक्षेपाला एबीपी माझा वाहिनीवरील चर्चेने साक्षात पुरावा घरात आणून दिला. 

   त्याच दिवशी मराठी वृत्तपत्रात सेना, भाजपा व मनसे मुंबईतील सहा लोकसभा जागा समान वाटून लढवणार असल्याची बातमी आलेली होती. तसे झाल्यास त्या सर्व जागा कोण जिंकणार व मतविभागणी टाळली जाईल का; अशा प्रश्नावर प्रसन्ना जोशीने चर्चा योजली होती. त्यात त्यांचे नेहमीचेच यशस्वी कलावंत सहभागी झाले होते. संपादक राजीव खांडेकर व ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रताप आसबे. मला सगळी चर्चा बघता आली नाही. पण योगायोगाने रिमोट त्या वाहिनीवर घेऊन गेला, तेव्हा पाहुणे कलाकार कुमार केतकर बोलत होते. त्यांनी मतविभागणी टाळली म्हणून एकत्र येणार्‍या पक्षांना अगोदरच्या निवडणुकीत मिळालेल्या मतांची बेरीज होतेच असे नाही; असे सुयोग्य विश्लेषण केले. पण त्यासाठी दाखले देण्याच्या वा तेच खरे असल्याचे पटवण्याच्या नादात, वहावत गेलेल्या केतकरांनी शुद्ध लोणकढी थापही ठोकली. केतकर ऐतिहासिक दाखला देण्यासाठी चक्क बेचाळिस वर्षे मागे गेले. त्या कालखंडात प्रसन्नाचा जन्मही झालेला नसावा आणि संपादक खांडेकर व विश्लेषक आसब्यांचा जन्म झालेला असला, तरी ते अर्ध्या चड्डीत लॉलीपॉप चघळत असावेत. म्हणूनच केतकरांच्या लोणकढ्या थापेचे ओघळणारे साजूक तुप त्यांना ओळखता आलेले नसावे. तेव्हा म्हणजे १९७१ साली देशातली पहिलीच मध्यावधी संसदीय निवडणुक झाली होती. तत्पुर्वी इंदिरा गांधींनी कॉग्रेस पक्षात फ़ुट पाडली होती. खरे पक्षश्रेष्ठी असलेले निजनिंगप्पा, मोरारजी देसाई, अतुल्य घोष, चंद्रभान गुप्ता, स. का. पाटिल यांना झुगारून इंदिराजींनी काही महिने अल्पमताचे सरकार चालवले आणि समाजवादी म्हणता येतील असे काही धाडसी निर्णय अंमलात आणले होते. चौदा बॅन्कांचे राष्ट्रीयीकरण, नागरी जमीनीचे सिलिंग व संस्थानिकांचे तनखे कायमचे बंद करण्याच्या निर्णयांनी हुरळून गेलेले डावे इंदिराजींच्या झटपट समाजवादाने भारावून त्यांच्या कौतुकात रममाण झालेले होते. तीच वेळ साधून इंदिरा गांधींनी लोकसभा बरखास्त करून मध्यावधी निवडणुका घेतल्या होत्या. तेव्हा सर्वांचीच तारांबळ उडाली होती. त्या गाफ़ील विरोधकांचा मग निवडणुकीत धुव्वा उडाला होता. पारंपारिक विरोधी डावे दोन वर्षे इंदिरा गांधींच्या समाजवादी पावलांचे कौतुक करून फ़सलेले होते आणि उजव्या विरोधकांमध्ये लढायची क्षमता नव्हती. सहाजिकच स्वपक्षात दुफ़ळी माजवूनही इंदिरा गांधी यांनी लोकसभेत दोन तृतियांश बहुमत मिळवले होते. त्यात जागावाटप वा अन्य तडजोडी करून लढलेल्या विविध पक्षांना बडी आघाडी असे नाव देण्यात आलेले होते. पण त्यांनी केलेला मतविभागणी टाळण्याचा तो प्रयोग फ़सला होता. कारण सामान्य जनता इंदिराजींच्या प्रेमात पडलेली होती. देशभर इंदिरा लाट आलेली होती. त्यात सगळेच पक्ष वाहून गेले होते. 

   एबीपी माझाच्या चर्चेत केतकरांनी हा संदर्भ बरोबर दिला. पण तो समोरच्यांच्या गळी मारण्यासाठी बिलंदर सेल्समन जसा खोटे कौतुक आपल्या मालाचे करतो, तशी एक थाप मारली. सगळे पक्ष व राजकीय विश्लेषक खोटे पडले हे सत्य सांगताना केतकर म्हणाले, ‘अगदी तेव्हाचे ओपिनियन पोल’ही इंदिरा लाटेत वाहून गेले. हा त्यांचा दावा तद्दन खोटा होता. कारण १९७१ सालात भारतातील पत्रकारांनाही ओपिनियन पोल म्हणझे मतचाचण्यांचे अंदाज हे शब्द ऐकूनही माहित नव्हते. पोलिस खात्याचा म्हणजे त्यांच्या गुप्तचर विभागाचा अंदाज हाच ओपिनियन पोल मानायची तेव्हाची पद्धत होती. जनमत इंदिराजींच्याच बाजूचे असल्याचा अहवाल गुप्तचर खात्याने १९७७ सालात दिला म्हणून इंदिराजींनी आणिबाणी उठवून निवडणूका घेण्याचे धाडस केलेले होते. ओपिनियन पोल ही कल्पना त्याच्या पुढल्या म्हणजे १९८० च्या मध्यावधी निवडणुकीत ‘इंडीयाटूडे’ पाक्षिक व प्रणय रॉय यांनी प्रथम वापरली. त्यांनी इंदिराजींना दोन तृतियांश बहूमत मिळण्याचे शास्त्रोक्त भाकित केले होते. तो भारतातला पहिला ओपिनियन पोल. पण कोणी त्याला फ़ारशी किंमत दिली नव्हती. त्याच्या पुढल्या म्हणजे इंदिरा हत्येनंतर १९८४ सालातल्या निवडणुकीत पुन्हा त्यांनीच ओपिनियन पोल घेऊन राजीव गांधींना चारशेहून अधिक जागा मि्ळतील असे भाकीत केले, त्याची तर टवाळी झाली होती. पण तेच खरे ठरले, त्यानंतर माध्यमे, वृत्तपत्रे व पत्रकार अशा मतचाचण्यांची गंभीर दखल घेऊ लागले. पुढे १९८७ सालात अमिताभने बोफ़ोर्स भानगडीला कंटाळून खासदारकीचा राजिनामा दिला, तेव्हा बोफ़ोर्समुळेच कॉग्रेसमधून हाकललेले व्ही. पी. सिंग यांनी अलाहाबादची पोटनिवडणुक लढवली, त्याचा एक्झिट पोल घेऊन प्रणय रॉय यांनी दुरदर्शनवरून त्याचे थेट प्रक्षेपण केले आणि मतचाचण्यांना भारतामध्ये प्रतिष्ठा प्राप्त झाली. पुढे खाजगी वाहिन्यांचा जमाना आला आणि आता कोणीही मतचाचण्या घेतो, शेकडो त्यातले जाणकार तयार झाले, अगदी महापालिका निवडणूकीच्याही मतचाचण्या होऊ लागल्या आहेत आणि त्यात आजच्या पत्रकारांची पिढी आकंठ बुडालेली आहे. पण त्यांना लाटेच्या राजकारण व निवडणूकांचा गंधही नाही. म्हणूनच खांडेकर-आसबे यांना केतकर हातोहात उल्लू बनवू शकले. 

   ज्या देशात १९७१ सालात मतचाचण्या वा ओपिनियन पोल हे शब्दच कुणाला ठाऊक नव्हते, त्यावेळी झालेल्या निवडणुकीमध्ये इंदिरा लाटेने ओपिनियन पोलही खोटे ठरवल्याची लोणकढी थाप केतकरांनी ठोकून घेतली. जो मतचाचण्यांचा खेळ भारतात १९८० सालात आला; तो दहा वर्षे आधीच खोटा पडल्याचा दावा करणे धाडसाचे नाही काय? तो चमत्कारच नाही काय? पण असे चमत्कार हल्ली वाहिन्या व माध्यमातून नित्यनेमाने घडतच असतात. ज्यामधले आपल्याला काडीमात्र काही कळत नाही, अशा विषयावर हे पत्रकार वा समालोचक बिनधास्त बडबडत असतात. ज्यांनी संसदेतील एकपक्षिय बहूमत बघितले नाही, ते मग आघाडीच्या राजकारणाचे युग आहे. मतविभागणी, एन्टी इंक्युंबन्सी, व्होटर्स स्विंग असली पोपटपंची करतात. पण त्यांना जनमताची लाट कशी येते व कशामुळे येते, ती सुप्त लाट कशी असते, कोणत्या कारणाने येते व तिची लक्षणे कशी ओळखावी; याचा श्रीगणेशाही माहित नाही, त्यांच्याकडून मग कुठल्या राजकीय विश्लेषणाची अपेक्षा आपण बाळगू शकतो? तामिळनाडू वा बंगालमधील सत्ताधारी पक्षाचा पुरता बोजवारा उडणार; हे मतचाचणी घेऊन कोणी सांगू शकला होता काय? राहुलच्या कौतुकात रमलेल्या माध्यमांना उत्तरप्रदेशात असलेली समाजवादी पक्षाची सुप्त लाट जाणवली तरी होती काय? का अशी माध्यमे व पत्रकार जनमताच्या लाटेविषयी अनभिज्ञ आहेत? तर त्यांना लाटेच्या निवडणुका माहितच नाहीत वा त्यांनी त्या बघितल्या वा अभ्यासलेल्या नाहीत. सहाजिकच सुप्त लाट असणे सोडा, समोर जनमताची लाट दिसत असली व भिजवत असली; तरी यांना त्याचा अंदाजही येऊ शकत नाही. मग त्यांनी त्यात बुडून घुसमटल्याशिवाय त्याचे विश्लेषण करणे शक्य आहे काय? ज्यांना तेव्हा इंदिरा गांधींच्या बाजूची वा विरुद्धची किंवा त्यांच्याच हत्येनंतरची राजीव लाट बघायला मिळाली नाही व समजून घेण्याशी गरज वाटलेली नाही. त्यांच्याकडून आजघडीला मतदाराच्या मनात सुप्तावस्थेत कोणती लाट दौडते आहे, त्याची कल्पनाही येणे अशक्यच नाही काय? मग होते काय? वासरात लंगडी गाय शहाणी म्हणतात, तशी ही हूंदडणारी मोकाट वासरे केतकरांच्या वांझोट्या पान्ह्यावर जगू बघतात.      ( क्रमश:)  
 भाग   ( १११ )    १४/३/१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा