रविवारी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्ली गाजवली. अर्थात त्यांचे जे कडवे विरोधक आहेत, त्यांना असे शब्द आवडणार नाहीत याची मला खात्री आहे. पण जग आपल्या आवडीनिवडीवर चालत नाही. त्यामुळेच गेली दहा अकरा वर्षे मोदी विरोधकांनी आपले देव पाण्यात बुडवून ठेवले असतानाही मोदी गुजरात विधानसभेत निर्विवाद बहूमत मिळवत राहिले आहेत. अर्थात आपल्याला काय आवडते वा नावडते; ते बोलायला काही हरकत नाही. पण जेव्हा आपण विश्लेषण करत असतो, तेव्हा कधीही वास्तवाचा व सत्याचा आधार घेतला पाहिजे. जी माहिती आहे तिचा तुम्हाला दिसेल वा वाटेल तसा अर्थ जरूर काढा. पण माहिती खरी असायला हवी. पण मोदी विरोधकांची गोची अशी, की त्यांना खरी माहिती सुद्धा नको असते. आवडणारी खोटी माहितीही चालते. त्याचा परिणाम असा होतो, की चुकीच्या वा असत्य माहितीच्या आधारे त्यांनी काढलेले निष्कर्ष फ़सत जातात. कधीकधी तर असे वाटते, की मोदीच अशा आपल्या विरोधकांना मुद्दाम अंधारात ठेवण्यासाठी खुश करणारी अपुरी वा फ़सवी माहिती पुरवतात की काय? कोंबडे झाकले म्हणून सुर्य़ उगवायचा थांबत नाही; अशी आपल्या मराठी भाषेतली उक्ती आहे. सेक्युलर म्हणून मिरवणार्या माध्यमांना असे वाटते, की आपण कोंबडे झाकून सुर्य़ालाही फ़सवू शकतो. आता हीच गोष्ट घ्याना. तीस्ता सेटलवाड नावाची महिला गेल्या दहा वर्षात खुपच प्रसिद्धी पावली. तिच्या प्रसिद्धीचे श्रेय मोदी यांनाच आहे. कारण मोदींनी गुजरातच्या दंगलीत मुस्लिमांची कत्तल केली; असा आरोप घेऊन या महिलेने खुप प्रसिद्धी मिळवली. गुजरातच्या दंगल वा कुठल्या हिंसेचा विषय असला, मग तात्काळ वाहिन्या तीस्ताला आमंत्रित करतात आणि तीच बिचारी एकाकी कशी मुस्लिमांना न्याय मिळवायला गुजरातमध्ये लढते आहे, अशा ड्रामा पेश करतात. त्यामुळे गुजरातचा मुस्लिम तीस्ताचा भक्त असल्याचे चित्र निर्माण होते. पण जेव्हा जेव्हा कोणी तीस्ताबद्दल शंका घेतो किंवा तिच्यावर आरोप करतो, तेव्हा त्या बातमीचे कोंबडे सेक्युलर माध्यमे झाकून ठेवतात.
गेली तीनचार वर्षे सुप्रिम कोर्टाने एका प्रकरणासाठी तीनदा खास चौकशी पथके नेमली. त्याच्या प्रत्येक सुनावणी वा निकालाच्या वेळी तीस्ताच्या बातम्या दाखवल्या गेल्या आणि त्या प्रकरणाची उजळणी नव्याने वाहिन्यांवर व वृत्तपतातून झाली. अहमदाबादच्या गुलमर्ग सोसायटीमध्ये जी जाळपोळ झाली; त्यात कॉग्रेसचे माजी खासदार अहसान जाफ़री यांना जमावाने जिवंत जाळल्याचे ते प्रकरण आहे. त्यासाठी जाफ़री यांच्या पत्नीने न्याय मिळवा म्हणून सतत झुंज दिलेली आहे. तीस्ता त्यात खुप नंतर आल्या. पण तेव्हापासून गुलमर्ग सोसायटी विषयाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. पण या वर्षी त्याच घटनेच्या स्मरणार्थ त्याच गुलमर्ग सोसायटीमध्ये जो समारंभ योजला होता; त्याची बातमी कुठे सहसा झळकली नाही. २८ फ़ेब्रुवारी २००२ रोजी ती जाळपोळ झालेली होती. त्यामुळे त्याच दिवशी तिथे स्मरणसभा व प्रार्थनेचे आयोजन केले जाते. याही वर्षी तिथल्या नागरिकांनी असे आयोजन केले होते. तिथे एक विचित्र घटना घडली. अहसान जाफ़री यांच्या कुटुंबासह तिथे तीस्ता पोहोचली आणि सोसायटीच्या रहिवाश्यांनी वसाहतीत येण्यास त्यांना प्रतिबंध केला. नुसता प्रतिबंध केला नाही, तर अक्षरश: तिथून तीस्ताला हाकलून लावले. पण त्याची चकार बातमी आपल्याला कुठे वाचायला मिळाली का? मुस्लिम आणि ते सुद्धा गुजरातचे मुस्लिम तीस्ता सेटलवाडला हाकलून लावतात; ही मोठी बातमी नाही काय? गेली दहा वर्षे ह्या महिलेला गुजरातच्या दंगलपिडीत मुस्लिमांची तारणहार म्हणून माध्यमे पेश करीत आहेत. तिला तेच दंगलपिडीत मुस्लिम हाकलून लावतात, ही बातमी असू शकत नाहीत काय? त्यांना असे काय झाले, की त्यांनी तीस्ताला हाकलून लावावे? त्यांनी मोदीच्या इशार्यावर असे केले असेल काय?
त्या गुलमर्ग सोसायटीच्या रहिवाश्यांचे म्हणणे असे, की या महिलेने आमच्या दु:ख व वेदनांचा व्यापार करून लाखो रुपये जगभरातून जमवले आणि मस्त मजा केली आहे. तिने दंगलपिडीतांसाठी जमवलेली रक्कम हिशोबासह आणून द्यावी; अन्यथा आमच्याकडे येऊ नये असा त्यांचा आक्षेप आहे. दंगलपिडीतांच्या निधीवर डल्ला मारणे ही बातमी नसते का? जरूर असते. पण सेक्युलर माध्यमांसाठी सेक्युलर नेते, व्यक्तींनी केलेला गुन्हा पाप नसतो. त्यामुळेच त्यावर पांघरूण घालायचे असते. त्यामुळेच गुजरातच्या काही हिंदी व गुजराती प्रादेशिक वृत्तपत्रे वगळता ही बातमी कुठे प्रसिद्ध होऊ शकली नाही. अर्थात त्यामुळेच ती जगात कोणाला कळणार नाही, अशी एक ठाम सेक्युलर अंधश्रद्धा आहे. पण आता सोशल मीडिया नावाचे साधन सामान्य माणसाला उपलब्ध झालेले आहे. त्यामुळेच अशा सेक्युलर लपवाछपवीची लक्तरे लोकांपर्यंत जाऊन पोहोचत असतात आणि लोकांचा हळूहळू त्यावर अधिक विश्वास बसत चालला आहे. अर्थात या सोशल मीडीया वा अन्य मार्गाने येणार्या सर्वच बातम्या विश्वासार्ह असतील असे नाही. पण मुख्य प्रवाहातील माध्यमे सत्य लपवत असतील; तर अफ़वा आणि वावड्यासुद्धा विश्वसनीय बनून जात असतात. तीस्ताला गुलमर्ग सोसायटीतल्या मुस्लिम दंगलपिडीत रहिवाश्यांनी हाकून लावल्याची बातमी खरी आहे. पण म्हणून मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचयविषयी सोशल मीडीया वा अन्य मार्गाने येणारी सगळीच माहिती खरी असेल, असे मानता येणार नाही. विशेषत: मोदी यांच्या विकासकार्याच्या ज्या बातम्या लोकांपर्यंत जातात, त्यातल्या विसंगती अनेकदा वाहिन्या व माध्यमातून दाखवल्या जातात, त्या खोट्या आहेत, असे मानता येणार नाही. पण सेक्युलर माध्यमांनी आपली मोदीविषयक विश्वासार्हता आता इतकी गमावली आहे, की मोदी विरोधातल्या बातम्या आता लोकांना खर्या वाटेनाश्या झाल्या आहेत. त्याचाच लाभ मोदी यांना व्यक्ती व राजकारणी म्हणुन सर्वाधिक मिळाला आहे. आज देशात किंवा परदेशी मोदी यांची जी प्रतिमा उभी राहिली आहे, त्याचे मोठे श्रेय म्हणूनच सेक्युलर माध्यमांना जाते.
परवा रविवारी नरेंद्र मोदी यांचे पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेत भाषण होते, त्याला माध्यमातून मिळालेली अफ़ाट प्रसिद्धी त्याचाच परिणाम आहे. मागल्या दहा वर्षात मोदीविषयी ज्या खोट्यानाट्य़ा बातम्या सेक्युलर माध्यमांनी जगभर पसरवल्या आणि त्याचा विपरित परिणाम साधण्यासाठी सत्य झाकण्याचा उद्योग केला; त्यातून मोदींबद्दल जनमानसात एक कमालीचे औत्सुक्य निर्माण होत गेले आहे. त्यामुळे या माणसाला बघण्याची, समजून घेण्याची व ऐकण्याची एक उस्तुकता लोकांमध्ये वाढतच गेली आहे. परिणाम असा आहे, की माध्यमांना मोदींच्या विरुद्ध का होईना बातम्या द्याव्या लागतात. पण त्याचवेळी मोदींचे भाषण असेल तर त्याचे थेट प्रक्षेपण देशाच्या कानाकोपर्यात ऐकायला उत्सुक असलेला प्रेक्षक मिळतो. मग तो प्रेक्षकाला मिळवण्यासाठी वृत्तवाहिन्यांना नावडत्या मोदीचे भाषण थेट प्रक्षेपणातून दाखवावे लागत असते. मोदींनी केलेल्या कामाबद्दल माध्यमे काय मतप्रदर्शन करतात. त्यामध्ये लोकांना अजिबात रस नसतो. पण थेट भाषण ऐकायची उत्सुकता असते. म्हणूनच थेट प्रक्षेपण करून मोदींना प्रसिद्धी द्यावीच लागते. ही बाब लक्षात आल्यापासुन मोदींनी माध्यमांना मुलाखती द्यायचेच सोडून दिले आहे. सहाजिकच त्यांची भाषणे थेट प्रक्षेपित करण्याखेरीज माध्यमांनाही पर्याय उरलेला नाही. असे का व्हावे? तर माध्यमात बसलेल्या सेक्युलरांना मोदी आवडत नव्हता. म्हणून त्यांनी दहा वर्षे मोदीची यथेच्छ बदनामी करून घेतली. पण त्याच बदनामीतून देशाच्या कानाकोपर्यात मोदींचे नाव जाऊन पोहोचले. गुजरात बाहेरच्या लोकांमध्ये या माणसाविषयी कु्तुहल निर्माण होत गेले. खरेच हा इतका क्रुरकर्मा माणूस असेल तर गुजरातचे लोक त्याला पुन्हा पुन्हा मुख्यमंत्री म्हणून इतक्या प्रचंड बहूमताने कशाला निवडून देतात, असा प्रश्न सेक्युलर नसेल त्याच्या डोक्यात येणारच. मग त्याचे उत्तर शोधतांना मोदींनी गुजरातमध्ये मोठीच आर्थिक औद्योगिक प्रगती व विकास केल्याचा धक्कादायक शोध लोकांना लागला असेल तर काय होईल? दहा वर्षे ज्याचे वर्णन माध्यमे दंगली माजवणारा असेच करीत आहेत, त्याची प्रगती लोकांना चकीत करणारच. कारण तीच माध्यमे ज्या सेक्युलर सरकारांची सतत प्रशंसा करीत असतात, त्यांच्या दिवाळखोर कारभाराचे चटके त्या गुजरात बाहेरच्या जनतेला नित्यनेमाने बसत असतात. अशा रितीने मोदी नावाची जादू निर्माण झाली व पसरत गेलेली आहे. जो मुख्यमंत्री म्हणून माध्यमांनी गेली दहा वर्षे नालायक ठरवला; त्याचेच नाव आता देशाचा भावी पंतप्रधान म्हणून घेण्यापर्यंत वेळ आलेली आहे. तेव्हा माध्यमातील सेक्युलर मुखंड किंवा मोदी विरोधकांनी थोडे आत्मपरिक्षण करणे अगत्याचे झाले आहे. मोदी पंतप्रधान होवो किंवा न होवो. पण ज्याला आपण मुख्यमंत्री म्हणून नालायक ठरवला, तो असा पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत आलाच कसा? येऊच कसा शकला, याचा विचार नको करायला? केवळ माध्यमातील सेक्युलरांनीच नव्हे, तर मोदी ज्यांना नावडते वाटतात, त्या प्रत्येकाने ह्या उफ़राट्या परिणामांचा गंभीरपणे विचार करणे त्याच्याच भल्याचे ठरेल. ज्यांना खरेच मोदी पंतप्रधान होऊ नयेत असे प्रामाणिकपणे वाटते, त्यांनी असा शोध व बोध घेणे अगत्याचे ठरेल. अन्यथा मोदींना रोखणे त्यांना अशक्य होणार आहे. ( क्रमश:)
भाग ( १०४ ) ५/३/१३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा