गुरुवार, ७ मार्च, २०१३

मोदी यांच्या बदनामीचा किफ़ायतशीर व्यापारधंदा




   त्याच सोमवारच्या ‘आजचा सवाल’ कार्यक्रमात निखिलने सेक्युलर बदनामीच्या मोहिमेने मोदींची प्रतिमा कशी देशाच्या कानाकोपर्‍यात गेली याची चर्चा केली. त्यासंबंधात जतीन देसाई यांना सवाल केला असताना हे तीस्ता सेटलवाडचे सहकारी जतीनभाई काय म्हणाले? हे कॉग्रेस व डाव्यांनी केलेले पाप आहे. त्यांनी गुजरातच्या अनेक समस्या व प्रश्नावर बोलायला हवे होते. सौराष्ट्रमध्ये पाण्याचा प्रश्न गहन आहे. शेतीचे गंभीर प्रश्न आहेत. शेतकर्‍यांच्या समस्या आहेत. त्यावर मोदी विरोधक व डाव्यांनी भर द्यायला हवा होता. ते काम एनजीओ (स्वयंसेवी संस्था) करणार नाहीत. त्या संस्था फ़क्त कम्युनल म्हणजे जातीयवाद म्हणूनच ओरडत बसणार. या संस्था म्हणजे तीस्ता वगैरे मंडळी मोदी आणि दंगल यांचाच डंका अखंड का पिटणार वा पिटतात, त्याचेही रहस्य अनवधानाने जतीनभाई बोलून गेले. एनजीओला मिळणारे परदेशी निधी कम्युनल म्हणजे जातीय दंगली व प्रश्न यांच्यासाठीच मिळतात. तेव्हा त्यांच्याकडून गुजरातच्या अन्य प्रश्नांची दखल घेतली जाणे शक्य नाही. याचा अर्थ काय होतो? आता जतीनभाईच्या याच विधानाशी अहमदाबादच्या गुलमर्ग सोसायटीमधून यंदा २८ फ़ेब्रुवारीला तिथल्या रहिवाश्यांनी तीस्ताला हाकलून लावल्याची बातमीची सांगड घालून बघा. त्या रहिवाश्यांचे तीस्ताने असे काय बिघडवले आहे, की त्यांनी आपल्याला न्याय मिळावा म्हणून झगडणार्‍या तीस्ताला हाकलून लावावे? तर त्यांचा दावा असा आहे, की तीस्ताने ७५ लाख रुपये त्यांच्या कल्याणासाठी मिळवले, गोळा केले आणि त्या खर्‍या दंगलपिडीतांच्या वाट्याला त्यातली दमडीसुद्धा आलेली नाही. योगायोग बघा. नेमका असाच आरोप काही वर्षापुर्वी बेस्ट बेकरी खटल्यातील प्रमुख साक्षिदार जाहिरा शेख हिनेसुद्धा तीस्ता सेटलवाड यांच्यावर केलेला आहे. पण स्वत:ला सेक्युलर मानणार्‍या कुठल्या माध्यमांनी त्याची बातमीही द्यायची टाळलेली आहे आणि आजही गुलमर्ग सोसायटीच्या रहिवाश्यांनी तीस्ताला हाकलून लावल्याची बातमी तुम्ही इथल्या कुठल्या माध्यमात वाचली काय? निखिलने तरी ती बातमी दिली काय?

   ज्या महिलेला इथली माध्यमे गेली दहा वर्षे गुजरातच्या दंगलीतील पिडीत मुस्लिमांची तारणहार किंवा त्यांच्या न्यायासाठी लढणारी म्हणून पेश करीत आहेत; त्यांनी त्याच दंगलपिडीतांनी त्याच तीस्ताला हाकलून लावल्याची बातमी का लपवून ठेवावी? गुजरातच्या कुठल्याही दंगल खटल्यातला निकाल अगत्याने सांगणर्‍यांनी अशी बातमी का लपवावी? दंगलपिडीतांसाठी जमवलेला निधी हडपण्य़ाचा आरोप ही गंभीर बाब नाही काय? त्यांच्या पिडांचे भांडवल करून जमवलेल्या पैशाचा अपहार ही बातमी होत नाही काय? आणि एका बाजूला ते गुलमर्ग सोसायटीचे रहिवासी तीस्तावर असा गंभीर आरोप करीत आहेत आणि दुसरीकडे त्याच दरम्यान तीस्ताचे निकटवर्तिय जतीनभाई ‘आजचा सवाल’मध्ये येऊन काय ग्वाही देतात? एनजीओ म्हणजे तीस्तासारखे समाजसेवक परदेशी निधी मिळावा म्हणून दंगलीचे व जातियवादाचे भांडवल करतात. बाकीच्या गुजरातमधल्या समस्यांशी त्या एनजीओंना कर्तव्य नसते. मग एनजीओ याचा अर्थ काय होतो? त्यांनी चालविलेल्या गुजरात दंगलीचा गवगवा कशासाठी असतो? गुजरात दंगलीचे जितके भांडवल मानवाधिकार व स्वयंसेवी संस्थांनी केले तेवढे यापुर्वीच्या कुठल्याही दंगलीचे झालेले नाही. प्रत्येकवेळी हा सवाल अनेकांनी उपस्थित केलेला आहे. गुजरातची दंगल ही अशाप्रकारची देशातील पहिलीच दंगल नाही. शेकडो अशा दंगली यापुर्वी कॉग्रेसच्या राज्यात झालेल्या आहेत आणि यापेक्षा अधिक मुस्लिम त्यात मारले वा पिडले गेलेले आहेत. मग गुजरातच्या दंगलीचे भांडवल इतके कशाला केले जाते? त्याचे गुपित निखिलच्या कार्यक्रमात जतीनभाईने अनवधानाने उलगडून दाखवले. अर्थात ते उघड गुपित आहे. गुजरातपुर्वीच्या दंगली कितीही भीषण असल्या, तरी त्यावेळी अशा दंगल निवारण वा न्याय मिळवण्याच्या कामासाठी परदेशी संस्थांकडून मोठ्या रकमा मिळत नव्हत्या. म्हणूनच यापैकी कोणी मुंबई वा दिल्लीच्या दंगलग्रस्तांसाठी न्यायाचे लढे दिले नाहीत. विसाव्या शतकाच्या अखेरीस परदेशी निधी अशा कामासाठी मिळण्याची सोय उपलब्ध झाली आणि देशात दंगलग्रस्तांसाठी लढणार्‍या व त्यांना न्याय मिळवून देणार्‍या संस्थांचे भरघोस पीक आलेले आहे. तीस्तासारखी मंडळी तोच धंदा करीत असतात. त्यासाठीच त्यांना मोदी नावाचा राक्षस उभा करावा लागला आहे. तो राक्षसच नसेल तर यांचा धंदा एका दिवसात दिवाळखोरीत जाऊ शकतो. त्यासाठीच मग आजवरच्या अनेक जातीय दंगलींपेक्षा कमी दाहक असूनही गुजरातच्या दंगलीचे असे अवडंबर माजवण्यात आले. त्याचा भाजपाच्या एनडीए सरकारला शह देण्यासाठी उपयोग होतो, म्हणून डाव्या पक्षांसह कॉग्रेसने अशा एनजीओंची पाठराखण केलेली आहे. पण मुळात त्याचा मुस्लिमांना न्याय देण्याशी, सामाजिक सौहार्दाशी काडीमात्र संबंध नाही. त्यातून अशा व्यापारी स्वयंसेवी संस्थांनी तुफ़ान गल्लाभरू धंदा करून घेतला आणि इतकी वर्षे लोटल्यावर गुलमर्ग सोसायटीच्या रहिवाश्यांना त्यातले रहस्य उलगडू लागले आहे.

   जाहिरा शेख मुंबईच्या वास्तव्यामध्ये तीस्ता सोबत तिच्याच घरी रहात होती. त्यामुळे आपल्या दु:ख व यातनांचा तीस्ता कसा कौशल्याने धंदा करते आणि कमाई करते, याचा लौकर साक्षात्कार झाला. म्हणूनच त्यातला पुरेसा हिस्सा आपल्याला मिळत नाही असे दिसल्यावर जाहिराने बंड केले. अर्थात जाहिरा असे बंड करणारी एकटी नाही. ज्याने जाहिराला तीस्ताच्या सापळ्यात आणून सोडले, तो रशीद खान नावाचा तीस्ताचा जुना सहकारी सुद्धा अनेकदा हेच बोलला आहे. पण आपली सेक्युलर माध्यमे त्या गुपितावरचा पडदा उचलायला तयारच नाहीत. त्यामुळे मोदी बदनामीचा हा धंदा दिर्घकाल बिनबोभाट चालू शकला आहे. थोडक्यात सांगायचे तर दंगलीत मेलेल्यांच्या टाळुवरचे लोणी खाण्याचा धंदा; त्यांच्या न्यायाचे लढे लढवायचे नाटक रंगवणार्‍यांनी केला आहे. परदेशातून अशा समाजसेवेसाठी मिळणार्‍या निधीवर चैनबाज ऐषारामी जीवन जगणार्‍या अनेक एनजीओ आज आपल्या देशात प्रतिष्ठीत झालेल्या असुन त्यांचे व सेक्युलर माध्यमांचे साटेलोटे चालू असते. म्हणूनच मग अशा स्वयंसेवी संस्थांच्या धंदेवाईक नाटकाला उदात्त कार्य म्हणून लोकांसमोर पेश करायचे काम सेक्युलर माध्यमे पार पाडत असतात. कोणीतरी किरण बेदी यांनी विमानाच्या भाड्यातले पैसे संस्थेच्या खात्यात फ़िरवल्याचा आरोप केला तर त्याच्या कित्येक दिवस गाजावाजा चालू होता ना? पण त्याच माध्यमांनी गुलमर्ग सोसायटीच्या रहिवाश्यांनी ७५ लाख रुपयांच्या निधीचा तीस्ताने घोटाळा केल्याचे सांगत तिला प्रवेशद्वारातून हाकलुन लावल्यावर चार ओळीची बातमीही माध्यमे देत नाहीत; याला चोरांचे भागीदार नाहीतर काय म्हणायचे? जतीनभाईने त्या कार्यक्रमात परदेशी पैशासाठीच एनजीओ फ़क्त जातीय विषयाचा गवगवा करतात, असे म्हटल्यावर खर्‍या पत्रकाराने त्याची अधिक उकल करायला नको का? मग त्याकडे साफ़ दुर्लक्ष करणारा निखिल खरा पत्रकार आहे काय? परदेशी पैसा जातीयवादी विषयांसाठी मिळतो, म्हणून फ़क्त दंगलीचाच विषय एनजीओनी दहा वर्षे रेटून चालविला आहे, म्हणजे काय केले आहे? त्यात मोदींना बदनाम करण्यातून पैसा मिळवण्याचा हेतू नाही काय?

   इथे एक गोष्त लक्षात येऊ शकते, की गुजरातच्या दंगलीचा इतका गदारोळ हा न्यायासाठी वा जातीय सलोख्यासाठी कधीच झाला नाही. तो करणार्‍यांना त्यातून परदेशी निधी उकळायचा होता आणि तो प्रचार आपल्याला राजकारणात उपयोगी पडतो, म्हणून डाव्यांनी व कॉग्रेसने त्यांची पाठराखण केलेली आहे. पण त्या तात्पुरत्या लाभासा्ठी वहावत गेलेल्या याच राजकारणी नेते व पक्षांनी आपले स्वत:चे दूरगामी नुकसान मात्र करून घेतले आहे. कारण मध्यंतरीच्या काळात मोदी यांनी गुजरातसाठी जे विकासाचे भरघोस काम केले, त्याचे कोंबडे तीस्तासारख्यांचे भागीदार झालेल्या माध्यमांनी झाकून ठेवले. पण जेव्हा त्या विकासकार्याच सूर्य उगवला तेव्हा राजकीय पक्षाचे डोळे पांढरे व्हायची वेळ आलेली आहे. कारण त्या विकासाच्या बातम्या झिरपून गुजरात बाहेर गेल्यावर देशाच्या अन्य प्रांतातील लोकांना आपल्यालाही असाच मुख्यमंत्री मिळावा असे वाटू लागले तर नवल नव्हते. पण एकच व्यक्ती अनेक प्रांताची एकाच वेळ मुख्यमंत्री असू शकत नाही वा होऊ शकत नाही. पण तीच विकास करू शकणारी व्यक्ती सर्व देशवासियांना एकाचवेळी हवी असेल; तर त्याला पंतप्रधान होऊन सर्वांची सेवा करणे शक्य आहे. तिथूनच मग नरेंद्र मोदी देशाचा पंतप्रधान होण्याची व लोकांना तसे वाटण्याची कल्पना मूळ धरू लागली. म्हणजे ज्याच्यावर दंगलीचा आरोप करून या धंदेवाईक समाजसेवकांनी आपल्या तुंबड्या भरल्या; तेव्हा त्या बदनामीत भाजपाला नामोहरम करण्य़ाच्या हंगामी लाभ शोधणार्‍या पक्षांची आता तारांबळ उडाली आहे. कारण आता तोच बदनाम केलेला माणूस त्याच नामोहरम भाजपासाठी तारणहार बनून गेलेला आहे. आणि हे पाप करणारे मात्र त्याचे खापर कॉग्रेस व डाव्या पक्षांच्या माथ्यावर फ़ोडत आहेत. खरे तर त्याच पक्षांनी पुढे येऊन ह्या पापाचे खापर त्याच स्वयंसेवेचे दुकान थाटून बसलेल्यांच्या डोक्यावर फ़ोडायला हवे आहे. तेवढेच नाही तर राजकारणात लुडबुडणार्‍या अशा स्वयंसेवी संस्था व व्यक्तींना जगासमोर उघडे पाडण्याची गरज आहे. कारण यांनी लोकांच्या भावनांचा धंदा करताना एका व्यक्तीला बदनाम करण्याचे कारस्थान शिजवले आहे. आज जे लोक याप्रकारे दंगलपिडीतांचे दु:ख यातना विकून चैन करतात, ते उद्या देशही विकायला मागेपुढे बघणार नाहीत.     ( क्रमश:)
 भाग   ( १०७ )    ८/३/१३

1 टिप्पणी:

  1. Nikhil Vagale ha saccha patrakaar vatat nahi, to fakt eka gatachyach batamya prasarit karato. kolasa ghotaala zala tevha ha baba ekahi avkshar bolala nahi, karan tyacha maalak hota na tyamadhe. Congress virodhat ekahi shabd bolayachi yachi iccha nasate. Karan aapala to babya ani dysaryacha te kart he mhantat te kharach...

    उत्तर द्याहटवा