मंगळवार, १२ मार्च, २०१३

मोदीपुर्व गुजरातच्या दंगलींचा चार दशकांचा इतिहास


  १९६१ ते १९७१ या कालखंडात गुजरातमध्ये भाजपाला तसे स्थान नव्हते. कॉग्रेस आणि अन्य सेक्युलर पक्षांचेच गुजरातमध्ये प्रभूत्व होते. या दहा वर्षात गुजरातमध्ये किती धार्मिक व जातीय सलोखा होता? समाजात किती शांतता व सामंजस्य नांदत होते? आज ज्याप्रकारे प्रत्येक सेक्युलर शहाणा गुजरातला हिंदूत्वाची प्रयोगशाळा म्हणत असतो, त्याच राज्यात भाजपा किंवा संघाचा कुठे प्रभाव नव्हता, तेव्हा समाज गुण्य़ागोविंदाने नांदत होता असा कुणाचा दावा आहे काय? आणि असेल तर २००२ इतक्याच भीषण हिंदू मुस्लिम दंगली तिथे का व्हायच्या? की सरकार दरबारी नोंदलेल्या घटना व पोलिस दफ़्तरात जमा असलेले चौकशी अहवाल; खोटेच म्हणायचे? १९६० च्या त्या एका दशकात गुजरातच्या विविध भागात ७९९ दंगलीच्या हिंसक घटना घडल्या होत्या. त्यातल्या ६८५ शहरी वस्त्यांमध्ये तार ११४ ग्रामीण भागातल्या होत्या. त्यापैकी ५७८ दंगली एकट्या १९६९ या वर्षातच घडलेल्या आहेत. म्हणजेच मोदींचे मुख्यमंत्री पदावर आगमन होण्यापुर्वी किंवा अगदी भाजपाला गुजरातची सत्ता मिळण्यापुर्वी; गुजरातमध्ये सेक्युलर शांतता नांदत होती, असा जो आभास निर्माण केला जातो, ती निव्वळ दिशाभूल आहे हे लक्षात येऊ शकेल. म्हणजेच मोदी किंवा भाजपा यांचे प्राबल्य गुजरातमध्ये वाढले म्हणून तिथला हिंदू धर्मांध होऊन मुस्लिमांवर हल्ले करू लागला हे खोटे आहे. तीस्ता सेटलवाड, राजदीप सरदेसाई, बरखा दत्त किंवा अन्य कोणीही सेक्युलर जाणकार सांगतात; त्याप्रमाणे संघामुळे तिथे हिंदूत्ववाद किंवा मुस्लिम द्वेष रुजला, हे तद्दन असत्य असल्याचे लक्षात येऊ शकेल. शिवाय मोदी सत्तेत होते, म्हणूनच मुस्लिमांची हत्या होऊ शकली, याही आरोपाचे पितळ उघडे पडते. कारण १९९५ सालात भाजपा तिथे सत्तेत आला. पण त्याच्या दोनतीन दशके आधीच तिथे अनेक हिंदु-मुस्लिम दंगली झालेल्या होत्या आणि त्यातही अगदी टिपून मुस्लिमांना लक्ष्य करण्यात आल्याची सरकारी नोंद आहे. तेव्हा सेक्युलर कॉग्रेस पक्षाची गुजरातमध्ये अबाधित सत्ता होती. त्यामुळेच गुजरातला संघाने वा भाजपा मोदी यांनी हिंदुत्वाच्या वाटेवर नेले, ही शुद्ध फ़सवणूक आहे. पण त्याचीच दुसरी बाजू अशी, की याच हिंदू-मुस्लिम बेबनावाचा भाजपाला तिथे आपले बस्तान बसवायला खुप फ़ायदा नक्कीच झाला. पण तशी पोषक परिस्थिती भाजप किंवा संघ निर्माण करू शकले नव्हते, ती परिस्थिती सेक्युलर पक्ष, त्यांचे राजकारण व कॉग्रेस सरकारने निर्माण केली. ते कारण कुठले होते?

   सेक्युलर वा कॉग्रेसी राजकारण हे मुस्लिमधार्जिणे आहे, अशी एक सार्वत्रिक समजूत निर्माण होईल असा तो पक्ष वागत गेला आणि त्यामुळेच मुस्लिमांची संख्या गुजरातमध्ये कमी असूनही मुस्लिम अत्यंत आक्रमक होत राहिले. इथे जसे गोध्रानंतर हिंसाचक्र सुरू झाले, तसेच गुजरातच्या पुर्वापार चालत आलेल्या दंगलीचे प्रकरण दिसेल. प्रत्येकवेळी मुस्लिमांकडून आगळीक केली गेली व त्यानंतर उसळलेल्या दंगलीच हिंदू जमावाकडून भीषण हिंसाचार झालेला आहे. मात्र २००२ च्या दंगलीनंतर त्याची पुनरावृत्ती होऊ शकलेली नाही. मग त्यापुर्वी दंगलीची पुनरावृत्ती का होत राहिली? तर मुस्लिमांच्या आक्रमकतेला सेक्युलर म्हणून कॉग्रेस चुचकारत बसली होती. जे मुठभर आगळीक करणारे होते, त्यांचा बंदोबस्त कायदा व पोलिसांनी केला असता; तर तेव्हाही दंगलींना आळा घातला गेला असता. पण मुठभर मुस्लिम मस्तीखोरांनी उचापत करायची आणि मग बाकी सगळ्या मुस्लिम समाजाला त्याचे दुष्परणाम भोगावे लागायचे. हेच होत राहिले. पण त्यावर कोणी कधी हिंदू दहशतवाद असा शिक्का मारला नव्हता. उलट अशा रितीने समाजाच्या विविध घटकांमध्ये दुफ़ळी माजवून मतांचे गठ्ठे बनवले जात होते. गुजरातमध्ये लेवा पटेल हा मोठा शेतकरी व सुखवस्तू समाज घटक आहे, त्याला राजकीय सत्तेपासून वंचित ठेवायचे जे जातीय समिकरण कॉग्रेसने १९७५ नंतरच्या काळात मांडले व राबवले; त्यातून मग खरी जातीय राजकीय स्पर्धा उफ़ाळून आली. ह्या पटेल समुदायाने राजकीय पर्याय म्हणून भाजपाची कास धरली. कारण माधवसिंह सोलंकी या कॉग्रेस नेत्याने मुख्यमंत्रीपद मिळताच ‘खाम’ असे एक जातीय समिकरण तयार केलेले होते. त्याचा अर्थ क्षत्रिय, हरिजन, आदीवासी व मुस्लिम यांची गोळाबेरीज. त्यातून पटेलांना राजकीय दृष्टीने बहिष्कृत केले गेले होते. पण मुस्लिम धार्मिक घटक असल्याने तो अशा समिकरणात कमालीचा आक्रमक होत गेला आणि त्याला राजकीय पाठबळ मिळाल्याने त्याच्या आक्रमकतेला धार येत गेली. त्याचे परिणाम मग खाम समिकरणातील घटकांनाही भोगावे लागत होते. असे दुखावलेले घटक क्रमाक्रमाने मुस्लिम आक्रमतेला कंटाळून भाजपाच्या हिंदूत्व भूमिकेच्या प्रवाहात सहभागी होत गेले. तेवढेच नाही, त्याच काळात पारंपारिक जे बिगर कॉग्रेस पक्ष गुजरातमध्ये होते, त्यांनीही कॉग्रेस सोबत चुंबाचुंबी सुरू केली. त्यामुळे कॉग्रेस विरोधी मतदाराला पर्याय म्हणून भाजपाकडे वळावे लागले. म्हणजेच भाजपा सत्तेवर आला वा विस्तारत गेला; त्याला हिंदूत्वापेक्षाही अन्य सेक्युलर पक्षच जबाबदार आहेत. त्यांनी आपल्या भूमिका कुठल्याही धर्माला चुचकारण्यापेक्षा खरोखर सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष ठेवल्या असत्या; तर गुजरातमध्ये भाजपाला तिथे पाय रोवून रहाणेही शक्य झाले नसते. थोडक्यात भाजपा सत्तेत आल्याने गुजरातमध्ये इतक्या मोकाट दंगली होऊ शकल्या किंवा टिपून मुस्लिमांना लक्ष्य करण्यात आले, हे धादांत असत्य आहे. कारण त्यापुर्वीच्या कॉग्रेसच्या राज्यातील दंगलीतती टिपून मुस्लिमांनाच लक्ष्य करण्यात आल्याचे चौकशी अहवाल उपलब्ध आहेत. एका चौकशी अहवालात २० सप्टेंबर १९६९ ची घटना अशी आलेली आहे.

    आपल्या मालमत्तेचे नुकसान बघून प्रक्षुब्ध झालेल्या एका मुस्लिम तरूणाने त्या दंगलखोर जमावाला धमकावले, की आपण सूड घेतल्याशिवाय रहाणार नाही. त्यावर खवळलेल्या हिंदू जमावाने त्याला तिथेच जिवंत जाळण्याची उलट धमकी दिली. त्याला बेदम मारहाण केली आणि जय जगन्नाथ बोलायला सांगितले. पण त्याने नकार दिल्यावर तिथेच लाकडे जमा करून त्याला पेट्रोल ओतून भर चौकात जिवंत पेटवून देण्यात आले होते. त्या १९६९च्या दंगलीत पद्धतशीर व योजनाबद्ध रितीने मुस्लिमांची दुकाने व मालमत्ता जाळण्यात व नासधुस करण्यात आलेल्या होत्या. पण तेव्हा कोणी सेक्युलर पक्ष, विचारवंत मुख्यमंत्री हितेंद्र देसाई यांना त्यासाठी गुन्हेगार मानत नव्हता. सवाल इतकाच, की अशा घटना चार दशकांपुर्वी कॉग्रेसच्या राज्यात घडत होत्या, त्याला मग काय म्हणायचे? की मोदी वा भाजपाचा मुख्यमंत्री वा सरकार असताना मुस्लिमांवर हल्ले झाले; तरच तो गुन्हा असतो आणि कॉग्रेसच्या राज्यात तसेच घडले, तर ते सेक्युलर पुण्यकर्म असते का? ज्यांनी कोणी गेल्या दहा वर्षात मोदी विरोधी ही अखंड आरोपांची मोहिम चालविली आहे, त्यांना मोदीपुर्वीचा गुजरात माहितीच नाही की सगळी बनवेगिरी आहे? ही बनवेगिरी गुजरात बाहेरच्या लोकांना खरी वाटली असेल, म्हणून गुजरातमध्ये मात्र कोणीही अशा अपप्रचाराला दाद दिलेली नाही. म्हणूनच मोदी तिसर्‍यांदा बहुमताने निवडून आलेले आहेत. तेवढेच नाही तर गुजरातच्या बाहेर हळूहळू लोकांना सत्य गवसू लागले आहे. म्हणूनच मोदींची लोकप्रियता वाढत गेली. आज देशाच्या अनेक भागात मोदींबद्दल लोकांचे मत चांगले होत गेले, त्याचे हेच कारण आहे?

   देशात आजवर शेकडो हिंदू मुस्लिम दंगली झालेल्या आहेत आणि गुजरातच्या दंगली त्याला अपवाद नाही. दंगलीमध्ये ज्या समाजाची संख्या अधिक असते; त्याचे नुकसान कमी होते आणि ज्यांचे संख्या कमी असते, त्यांची हानी अधिक होते; ते वास्तव आहे. काश्मिर सारख्या प्रदेशामध्ये हिंदूंना म्हणूनच घरदार सोडुन पळावे लागले आहे. बंगालच्या अनेक मुस्लिमबहूल जिल्ह्यात अलिकडेच उसळलेल्या दंगलीत हिंदूंचेच नुकसान अधिक झालेले आहे. उलट महाराष्ट्र, गुजरात वा तत्सम राज्यांमध्ये मुस्लिम अल्पसंख्य आहेत, तिथे अशा दंगलीत मुस्लिमांनाच अधिक किंमत मोजावी लागली आहे. तेव्हा गुजरातच्या दंगलीचे ढोल पिटले जातात; तेवढे तिथे काही मोठे वा वेगळे घडलेले नाही. उलट अशा दंगलीचे आरोप अंगावर झेलून मोदी ठामपणे उभे राहिले म्हणून देशभरातल्या हिंदू समाजाचे लक्ष्य त्यांनी वेधून घेतले आहे. त्याचेच परिणाम आता दिसू लागले आहेत. मोदींच्या नेतृत्वाचे आकर्षण म्हणूनच त्यांच्या अपप्रचारातून आले आहे. देशाच्या ज्या ज्या भागात मुस्लिम आक्रमक आहेत व म्हणूनच अरेरावी करतात; अशी हिंदू लोकसंख्येची धारणा आहे, तिथल्या हिंदूंना असे वाटते आहे, की मोदी पंतप्रधान झाले तर अशा दंगलखोर आक्रमक मुस्लिमांना आपोआप पायबंद घातला जाईल. दंगलीच्या आरोपामुळे मोदी यांची कडवा हिंदूनेता अशी प्रतिमा तयार झाली वा केली गेली. ती म्हणूनच मोदींच्या पथ्यावर पडली आहे. ते तितके खरेच हिंदूंचे पक्षपाती आहेत किंवा नाहीत; ते अजून सिद्ध व्हायचे आहे. पण सामान्य मतदाराला असे पुरावे लागत नसतात, त्याची आवडनिवड समजूतीवर होत असते आणि सेक्यु्लर राजकीय नेते व माध्यमांनी मोदींचे ते काम परस्पर उरकून दिलेले आहे. आज त्यातूनच मोदी राष्ट्रीय राजकारणात सर्वाधिक लोकप्रिय नेता असल्याचे म्हणूनच चाचण्यातून आढळून येत आहे. म्हणूनच मी म्हणतो, मोदींच्या जनमानसातील आजच्या उजळ प्रतिमेला सर्वाधिक जबाबदार आहेत ती सेक्युलर माध्यमे. त्यातूनच मोदींची लाट निर्माण झालेली आहे, जशी इंदिराजींची झाली होती.     ( क्रमश:)
 भाग   ( ११० )    १३/३/१३

1 टिप्पणी:

  1. ...पाश्चिमात्य पंडितांचे दाखले देत केतकर म्हणाले, भारताच्या अनेक फाळण्या होतील, असे भाष्य परकीय तज्ज्ञांनी केले होत, परंतु तसे पाकिस्तानविषयी केले नव्हते. धर्मनिरपेक्ष राष्ट्रच एकसंघ उभे राहू शकते....कुमार केतकरांनी लातूरला केलेल्या भाषणातून......

    केतकरी विचाकरांना, पाश्चात्य विश्लेषकांना पाकिस्तानची फाळणी होईल असे वाटले नाही कारण त्यांची स्थापना धर्माधिष्ठित होती. पण जिथे अनेक धर्म व जाती-जमाती प्राचीन काळापासून वेगवेगळ्या कारणांनी स्वतंत्र म्हणून अस्तित्वात होत्या त्यांना एकत्र राहायचे ही कल्पनाही मान्य होणे शक्य नाही म्हणून काही ना काही कारणांनी भारताची शकले होणार असे भाकित करायला पाश्चात्य विश्लेषकच काय भारतीय ही म्हणत होते. मात्र झाले उलटे! एक प्रचंड मोठ्ठे कडबोळे असलेले भारतीय संघराज्य अजून ही एका झेंड्याखाली अस्तित्वात आहे. पण धार्मिकतेचा प्रमुख आधार असल्याने मुस्लिम राष्ट्रे अभंग राहून पुढे इस्लामिक राष्ट्रांचे पॅन इस्लाम महाराज्य बनेल असे भाकित करणारे मरून गेले व मुस्लिम राष्ट्रांची परवड आपण पाहतो आहोत. भारत अजुनही एकसंघ राहायला खरे तर भारतीयांची मानसिकता हीच त्याला कारणीभूत आहे. 'धर्मनिरपेक्षता' हे त्या वृत्तीला दिलेले 'नाव' असा आधार आहे. असे म्हणणे जास्त सयुक्तिक वाटते.

    उत्तर द्याहटवा