रविवार, ७ एप्रिल, २०१३

पुरोगाम्यांच्या अट्टल निर्ढावलेपणाचा पुरावा


    अनेकदा माझ्या लेखातून मी सेक्युलर, पुरोगामी व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतल्या लोकांवर झोड उठवतो, म्हणजे मी प्रतिगामी असणार हे गृहितच आहे. पण अशा शेलक्या शब्दांना मी घाबरत नाही आणि कोणाच्या प्रमाणपत्रांची मला गरज नाही. मी निव्वळ पत्रकार आहे आणि सत्याचा शोध घ्यावा असाच माझा प्रयत्न असतो. मध्यंतरी मी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वाभाडे काढले होते. त्यात मी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. कधी हे अनेकांना आठवणार नाही, म्हणून स्मरण करून देतो. जेव्हा दिल्लीतल्या सामुहिक बलात्काराने गदारोळ उठलेला होता, त्या कालखंडामध्ये आणि त्याचे कारण होते, त्याच संदर्भात डॉ, दाभोळकर यांनी विविध बापू व बुवांच्या नावाने अवेळी व अकारण शिमगा व धुळवड केली म्हणून. आता हे धुळवड, शिमगा वा रंगपंचमी हे माझे शब्द नाहीत. तेही पुन्हा पुरोगामी चळवळीचे वयोवृद्ध मार्गदर्शक डॉ. बाबा आढाव यांचे आहेत. सध्या जे लक्ष्मण माने प्रकरण ‘गाजते’ आहे त्याचे वर्णन बाबांनी धुळवड व रंगपंचमी अशा शब्दात केलेले आहे. या संदर्भात आपलाच एक निकटचा सहकारी चोरासारखा तोंड लपवून फ़रारी झाला आहे, त्याची किंचितही शरम न बाळगता (हेच अन्य कुणा संघवाल्याचे वा हिंदूत्ववाद्याचे प्रकरण असते तर आपली मान शरमेने खाली गेल्याचे अगत्याने सांगायला पुरोगामी आघाडीवर असतात. पण खरेच शरमेची वेळ आली, मग मात्र त्यांच्या माना ताठ असतात) बाबांनी सारवासारव आरंभली आहे. या संदर्भात प्रतिक्रिया देताना आढाव म्हणतात,

     'माने हे आमचे जुने सहकारी आहेत व त्यांच्या हातून इतके ​निंदनीय कृत्य घडले असेल, असे वाटत नाही; तरीही ज्या महिलांनी त्यांच्याविषयी तक्रारी नोंदवल्या आहेत त्या तक्रारींची योग्य चौकशी व्हायला हवी. माने यांना मित्र म्हणून आमची विनंती आहे की, त्यांनी कायदा पाळावा, हजर व्हावे आणि चौकशीला सामोरे जावे. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष कोर्ट लावेल. या निमित्ताने माध्यमांतूनही धुळवड झाली, काहींनी रंगपंचमीही साजरी केली. मात्र माझी विनंती अशी की, या गदारोळात भटके-​विमुक्त आणि दलितशोषितांच्या चळवळीला त्यामुळे इजा होऊ नये याचे भान सर्वांनीच राखावे.'  (महाराष्ट्र टाईम्स)

   वरवर पाहिल्यास बाबांची ही भूमिका अत्यंत समतोल वाटेल. पण त्याच भूमिकेला अन्य काही संदर्भ जोडले, मग त्यामागचा खरा चेहरा उघड होतो. आपले सहकारी माने यांच्यावर आरोप झाल्याने बाबा विचलित झाले तर नवल नाही. तो मानवी स्वभावाचा भाग आहे. पण त्यावर ज्या प्रतिक्रिया उमटल्या, त्यांची हेटाळणी करण्याचा हेतू शुद्ध आहे काय? खुद्द बाबा किंवा लक्ष्मण माने यांच्यासह अन्य त्यांचे ‘चळवळीतले सहकारी’ अशीच इतरांची प्रकरणे उघड झाल्यावर काय करतात? होमहवन करतात की मौनव्रत धारण करतात? समजा अशा प्रकरणात कुणी संघवाला किंवा चळवळीच्या बाहेरचा इसम गोवला गेला असता, तर अशीच सारवासारव बाबांनी केली असती काय? की त्यांनीही माध्यमांच्या धुळवडीत शिरून आपली रंगपंचमी व शिमगा साजरा करून घेतला असता? बाबांनी जरा आठवून बघावे. तीनच महिन्यापुर्वी दिल्लीतल्या सामुहिक बलात्काराचे प्रकरण घडल्यावर त्यांचेच जुने सहकारी डॉ. दाभोळकर यांनी अकलेचे तारे तोडत अनेक माध्यमे व वृत्तपत्रातून संघापासून बाबा बापुंवर कुठले रंग उधळले होते? तेव्हा आपल्या त्या जुन्या मित्राला अजून शिमगा वा धुळवडीला वेळ आहे, अशी सुचना द्यायला बाबा कशाला पुढे सरसावले नव्हते? की ती धुळवड आणि तो शिमगा अवेळी जाणीवपुर्वक केला जातो? म्हणजे त्यातून त्या संबंधित व्यक्तींच्या ज्या संघटना व संस्था, चळवळी आहेत, त्यांना इजा पोहोचवणे असाच हेतू नसतो काय? नुसत्या आरोपावरून धुळवड व शिमगा करायचा आणि इतरांच्या संस्था चळवळींना इजा पोहोचवायची हा उद्योग बाबा आढावांच्या सहकार्‍यांनीच मुळात सुरू केलेला नाही काय? आता तोच त्यांच्याच चळवळीवर उलटला मग बोंबा कशाला मारायच्या?

   साधी गोष्ट घ्या, हे बाबांचे ‘जुने सहकारी’ लक्ष्मण माने गेल्या वर्षी कोणते गुण उधळत होते? अण्णा हजारे यांचे जेव्हा दिल्लीच्या रामलिला मैदानावर उपोषण व आंदोलन चालू होते, तो काही संत समागम नव्हता. तिथे देशातला भ्रष्टाचार समूळ नष्ट व्हावा म्हणून लोकपाल कायद्याच्या मागणीसाठी प्रचंड आंदोलन चालू होते. ती चळवळ नव्हती का? त्या चळवळ किंवा त्यातील मुद्दे यांच्या विरोधात वाटेल तसे खोटे आरोप चालू होते. अण्णा व त्यांचे सहकारी संसद व राज्यघटना जुमानत नाहीत, अशी आवई उडवून देण्यात आलेली होती. आणि मग त्याच खोट्या अपप्रचाराचे शेपूट पकडून बाबांचे हे जुने सहकारी लक्ष्मण माने सातार्‍यात धरणे उपोषण करायला बसले होते. त्यातला एक तरी आरोप खरा होता काय? मग ती धुळवड कशासाठी चालली होती? अण्णांच्या नावाने शिमगा करणारे माने व त्यांचे ‘जुने सहकारी’ लोकपाल चळवळीला इजा करण्यासाठीच कंबर कसून मैदानात उतरले होते ना? आणि पाठीशी चार टाळकी नसताना निव्वळ माध्यमातुनच त्यांची धुळफ़ेकीची धुळवड चालू नव्हती का? आपल्या त्या मित्राला व जुन्या सहकार्‍याला ‘चळवळीला इजा पोहोचेल अशी धुळवड करू नये, हा सल्ला द्यायला बाबा तेव्हा आपल्या मठीतून कशाला बाहेर पडलेले नव्हते?

   मठीतून अशा शब्दप्रयोग अनेकांना आवडणारा नाही. पण जे लोक भक्तीभाव व अंधश्रद्ध असतात, त्यांच्यासाठी बाबा व मठ आवश्यकच असतो. आढावांचे नावच बाबा आहे आणि ते सहसा मौनव्रत धारण करून मठीतच असतात. आणि माने प्रकरणात त्यांनी आपल्या अंधश्रद्धेचे स्पष्ट दर्शन घडवलेले आहे. कुणा बाबा, बापूचा भक्त जेवढ्या विश्वासाने वा श्रद्धेने आपल्या प्रेरणास्थानाबद्दल बोलतो, तशीच अंधभक्ती आढावांनी माने यांच्याविषयी व्यक्त केलेली आहे. 'माने हे आमचे जुने सहकारी आहेत व त्यांच्या हातून इतके ​निंदनीय कृत्य घडले असेल, असे वाटत नाही.’ असे आढाव म्हणतात. नेमके असेच कुठल्याही बापू वा महाराजांचा भक्तही बोलतो की नाही? त्याच्या शब्दावर आढाव किंवा त्यांच्या पुरोगामी चळवळीतल्या कोणी कधी विश्वास दाखवला आहे काय? उलट अशी श्रद्धा वा भक्ती दाखवणार्‍यांची त्यांनी नेहमीच खिल्ली उडवलेली आहे. ज्या बापू वा त्यांच्या आश्रमाविषयी नुसते आरोप होतात व तक्रारही नोंदलेली नसते त्यावर यांचा विश्वास बसतो आणि ज्या मानेंच्या विरोधात पाच महिलांनी तक्रारी रितसर नोंदल्या आहेत, त्यावर विश्वास बसत नाही. मग यांच्या विश्वासाचा निकष तरी काय असतो? कुणी बापूभक्त आणि हे पुरोगामी मानेभक्त यांच्यात गुणात्मक फ़रक तो काय? दोघेही निव्वळ आपल्या अंधश्रद्धेचेच बळी नाहीत का? आपला तो बाबा आणि दुसर्‍याचा तो बापू, यापेक्षा असल्या पुरोगामीत्वाचा दुसरा कुठला निकष नियम असू शकतो काय? त्यातून एकच निष्कर्ष काढता येतो. पुरोगामी असो किंवा प्रतिगामी असोत, दोन्ही भामट्यांच्या टोळ्याच आहेत. दोघे एकमेकांना खोटे पाडण्याची लढाई नियमित लढत असतात. त्यात माध्यमांवर ज्यांचा प्रभाव असतो, त्यांची बाजू वाचणार्‍या ऐकणार्‍याला तेवढ्यापुरती खरी वाटते. बाकी वास्तवात सगळाच भंपकपणा असतो. कसोटीची वेळ आली मग त्यातला कोणीच टिकत नाही.

   पुण्यवंत असल्याचे निव्वळ नाटक रंगवले जात असते. तत्वज्ञानाचे मुखवटे लावून मार्केटींगच चालते. अर्थात त्यात काही मोठे नाही. शेवटी आपण त्याच समाजाचे घटक आहोत. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी असे म्हणतात ना? मग प्रतिगामी असोत की पुरोगामी असोत, त्यांच्यात सारखेच भ्रष्ट व पापी असणार. तेवढेच प्रामाणिक व पुण्यवंत असणार. पण भासवले असे जात असते, की तो एक म्हणजे त्यांच्यातले सगळे तसेच आहेत आणि म्हणुन ती चळवळ वा ती संघटना समाजविघातक आहे. तांदळातला खडा काढून त्या भांड्यात सगळेच खडे आहेत असे सांगणे जशी बनवावनवी असते; त्यातलाच प्रकार आहे. जसे चोर भामटे कुणा बापूच्या आश्रमात असू शकतात; तसेच आश्रमशाळेतही असू शकतात. हीच वस्तूस्थिती आहे व असते. पण पुरोगामी किंवा सेक्युलर म्हणवून घेणारे बदमाश ते सत्य लपवतात, म्हणूनच त्यांची अशी तारांबळ उडत असते. आपण सोवळे पुण्यवंत असे भासवण्याचे जे नाटक चालते, त्याची अशी धावपळ होत असते. हा भंपकपणाही लक्षात घेतला पाहिजे. चळवळीतला माणूस असे काही करील हे पटत नाही. पण सत्संगातला कोणीही असे करतो म्हटल्यावर चटकन कसा विश्वास बसतो? तर आम्ही म्हणजे पुण्यवंत, आम्ही पुरोगामी म्हणजे शुद्ध चारित्र्याचे; असे जे ढोंग उभे केलेले असते त्यामुळेच ही तारांबळ उडते. बाबा आढाव किंवा अन्य पुरोगाम्यांनी माने यांच्यावर आरोप झाल्यानंतर ज्याप्रकारे त्या तक्रारीवर आशंका घेतल्या आहेत, त्यातून त्यांच्यातली अंधश्रद्धाच समोर येत नाही काय? विशेषत: इतके पुरोगामी त्या माने यांना काकुळतीला येऊन हजर व्हायला सांगत आहेत. पण त्यापैकीही कोणाशी संपर्क न साधता माने फ़रारी आहेत. त्यातून माने यांनी कायद्यावरचा अविश्वास दाखवला आहेच. पण एखाद्या बनेल गुन्हेगारापेक्षा आपली मानसिकता कमी नाही; याची कृतीतून साक्षच दिलेली आहे. निदान एवढे झाल्यावर तरी पुरोगाम्यांना घडल्या प्रकाराची शरम वाटायला नको काय? पण कोणी तरी मान खाली घालून समाजाची आपल्या आजवरच्या ढोंगबाजीबद्दल माफ़ी मागताना दिसला आहे काय? पुरोगामी असण्यासाठी किती अट्टल निर्ढावलेपणा अंगी बाणवावा लागतो, त्याचाच हा पुरावा नाही काय?    ( क्रमश:)
 भाग   ( १३३ )    ७/४/१३

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/--/articleshow/19352850.cms?

३ टिप्पण्या:

  1. ज्जे ब्बात! सो कॉल्ड 'पुरोगामी' दांभिकतेचा बुरखा टराटरा फाडणारा लेख भाऊ.

    निर्लज्जतेचा कळस म्हणजे काय हेच फक्त दिसुन येते यांच्या या असल्या 'पुरोगामी' वक्तव्यातून. सणसणीत चपराक आहे त्यांच्यासाठी हा लेख म्ह्णजे.

    उत्तर द्याहटवा
  2. हे इतकं रोखठोक तरीही वाजवी लिहिणारा, विवेकवाद्यां/पुरोगाम्यांच्या सगळ्या कुलंगड्या माहिती असलेला नि त्यांची सुसंगत मांडणी करणारा दुसरा कोण आहे भाऊ तुमच्याशिवाय?
    धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा
  3. फार पूर्वी , अगदी काही दशकांपूर्वी , पंढरपूरला श्री अंबाबाई पटांगणात कोणतातरी मोठा यज्ञ चालू होता. यज्ञ करणाऱ्या लोकांचा इतर लोकांना काहीच उपद्रव नव्हता, ना कर्णे, ना पार्किंग ची समस्या, तेंव्हा असले काहीच नव्हते. तेंव्हा हे बाबा आढाव तिथे मोर्चा घेऊन आले. मोर्चा होता पोलीस संरक्षणात. लोकांनी त्यांच्यावर दगडफेक केली. तोंड लपवून पळाले. सहज आठवले म्हणून लिहले. म्हातारे लोक प्रसंग सांगतात तो आठवला. ढोंगी पुरोगामी.

    उत्तर द्याहटवा