मंगळवार, २३ एप्रिल, २०१३

गुजरात दंगलीनंतरचे सर्वात विदारक सत्य




  जाफ़रभाई सरेशवाला हा गुजरातचा सुन्नी बोहरा मुस्लिम आहे. अडिचशे वर्षापुर्वी ह्या पंथाचे लोक सौदी अरेबियातून भारतात आले व स्थायिक झाले. त्यांनी प्रामुख्याने गुजरातमध्ये आपले बस्तान मांडले. गुजरातच्या विविध भागात किरकोळ वा मध्यम व्यवसाय, व्यापारात त्यांचे प्रस्थ फ़ार दिसते. दाऊदी बोहरा वेगळे आणि सुन्नी बोहरा वेगळे. हे सुन्नी कडवे धर्मप्रेमी मुस्लिम मानले जातात. काटेकोर धर्मपालन करणारी ही जमात आहे. आपल्या देशात उत्तरप्रदेशात देवबंद येथील मुस्लिम धर्मशिक्षण देणारा सर्वात जुना मदरसा म्हणून ओळखला जात असला, तरी तेवढाच जुना सुन्नी मदरसा दाभेल गुजरातमध्ये आहे आणि तो सुन्नी बोहरा जमातीचा आहे. दोन वर्षापुर्वी याच मदरशाचे इस्लामी विद्वान मौलाना गुलाम वस्तानवी यांची देवबंदच्या दारूल उलूमचे मुख्य प्राचार्य म्हणून निवड झाली होती. पण गुजरात दंगलफ़ेम सेक्युलरांनी त्यांचा बळी घेतला. असो, तो विषय नंतर लिहिता येईल. सध्या आपण जाफ़रभाईची ओळख करून घेऊ. हे सुन्नी बोहरा सौदी अरेबियाच्या सुन्नी पंथीय चालीरिती अत्यंत काटेकोरपणे पाळतात. अगदी वेशभूषेपासून दैनंदीन जीवनपद्धतीतही धर्माचरण काटेकोर असते. महिला बुरख्यात बंद असतात आणि दिवसात पाच वेळा नमाज पठण चालते. पण दुसरीकडे या मुस्लिम समाजात उच्चशिक्षितांचाही भरणा आहे. जाफ़रभाईच नव्हेतर त्यांच्या निकटवर्तियांनी दिर्घकाळ मुस्लिम समाजात आधुनिक शिक्षण प्रसाराचे काम चालविलेले आहे. आणि म्हणूनच गुजरातच्या मुस्लिम समस्यांची जाण जाफ़रभाईला अगदी कोवळ्या वयातच झालेली आहे. मुस्लिमांच्या उत्थानासाठी शक्य तेवढे काम करीत रहाण्याचे बाळकडू जाफ़रला त्याच्या बालपणीच मिळाले, तसेच गुजरातमधल्या हिंदू-मुस्लिम दंगलीचे चटकेही बालपणीच त्याला सोसावे लागलेले आहेत. आज सेक्युलर म्हणून मुस्लिमांच्या वेदनांवर पुस्तकी पांडित्य सांगणार्‍यापैकी जाफ़रभाई एक नव्हेत. हा दंगलीत होरपळून टिकलेला मुस्लिम कार्यकर्ताही आहे. अहमदाबादेत १९६९ सालात झालेली दंगल आणि त्यात त्याच्या कुटुंबाचे भस्मसात झालेले सर्वस्व, त्याला आजही चांगले आठवते. कोवळ्या वयात बघितलेली त्या दंगलीची आठवण जाफ़रभाई आजही सांगतो.

   तेव्हा आजच्यासारख्या चोविस तास बातम्या सांगणार्‍या वाहिन्या नव्हत्या, की टिव्ही नव्हते. त्यामुळे त्या दंगलीची बित्तंबातमी अहमदाबाद वा गुजरातबाहेर फ़ारशी कुठे पोहोचली नव्हती. तिचा गवगवा झालेला नव्हता. पण स्वातंत्र्योत्तर काळात गुजरातमध्ये अर्धशतकात सातत्याने झालेल्या दंगलीत तीच १९६९ सालची दंगल सर्वात भीषण होती. आणि ती सुद्धा गोध्रासारख्या भयंकर घटनेमुळे उसळली नव्हती. तुलनेने अत्यंत किरकोळ कारणाने १९६९ सालात गुजरात पेटला होता. गाय कापल्याच्या बातमीने ती दंगल सुरू झाली व तिने इतके रौद्ररूप धारण केले, की पाच हजाराहून अधिक मुस्लिमांचा त्यामध्ये बळी पडला होता. इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान होत्या आणि हितेंद्रभाई देसाई गुजरातचे मुख्यमंत्री होते. दोन्हीकडे कॉग्रेसचीच सत्ता व सरकारे होती. त्यात जाफ़रभाईच्या कुटुंबाचा कारखाना, कार्यालये जाळून भस्मसात करण्यात आलेली होती. काळूपूर नावाचा एक परिसर अहमदाबाद शहरात आहे. मुस्लिम वस्तीचे ते मध्यवर्ती स्थान आहे. तिथे रिलीफ़ रोडवर पोलिस ठाण्याच्या समोरच एक मोठी मशीद व तिच्या आसपास दुकानांची रांग होती. वस्ती व दुकाने मुस्लिमांची हे वेगळे सांगायला नको. पोलिस ठाण्याच्या नेमक्या समोर असलेल्या त्या मशिद व दुकानांची राखरांगोळी करण्यात आलेली होती. त्या दंगलीनंतर पंतप्रधान इंदिरा गांधी दंगलग्रस्त भागाला भेट देण्याकरता आल्या, तेव्हा जमलेल्या दंगलपिडीत मुस्लिमांच्या गर्दीत, आपल्या आजोबाचा हात घट्ट धरलेला अवघा पाच वर्षाचा एक मुलगा होता. तोच हा जाफ़रभाई. त्याला दंगलीची कारणे वा पंतप्रधान वगैरे गोष्टी कळत नव्हत्या. पण दंगलीची ती दाहकता नेमकी जाणवत होती. मनाचा थरकाप उडवणारी ती अनुभूती आजही त्याच्या मनात ताजी आहे. त्या पोलिस ठाण्यासमोरच इंदिराजी आपल्या गाडीतून उतरल्या आणि समोरचे दृष्य पाहून म्हणाल्या, ‘पोलिस ठाण्यासमोर चाळीस मिटर्सवर मशीद व दुकाने आहेत आणि तरीही त्यांची अशी राखरांगोळी झाली?’ कारण स्पष्ट होते, तेव्हा पद्धतशीर मुस्लिमांचे शिरकाण झाले होते आणि गुजरातमध्ये कॉग्रेसचे राज्य होते व कॉग्रेसचाच मुख्यमंत्री होता. त्यावेळची दंगल व हिंसाचार यासाठी कोणाला जबाबदार धरले गेले? किती लोकांवर खटले भरले गेले? सरकारवर कोणते आरोप झाले? मुख्यमंत्र्याकडे कोणी संशयाने तरी बघितले का? की तेव्हा सेक्युलॅरिझमचाच शोध लागला नव्हता?

   त्या १९६९ च्या दंगलीत पाच हजार मुस्लिमांचे शिरकाण झाले, हजारो मुस्लिमांची घरदारे जाळून राखरांगोळी करण्यात आली. त्यासंबंधाने चौकशी आयोग सुद्धा नेमला होता. त्याचा अहवाल (जगमोहन रिपोर्ट) धुळ खात पडला आहे चार दशके. कोणी त्यावरची धुळ तरी झटकली आहे काय? २००२ च्या दंगलीसाठी ऊर बडवणार्‍या कोणी तरी १९६९ च्या त्या सर्वात भयंकर दंगलीचे नाव तरी घेतले आहे काय? किती गुन्हे त्यावेळी नोंदले गेले? किती गुन्ह्यांचा तपास झाला? कितीजणावर आरोपपत्रे दाखल करण्यात आली? किती खटले चालले आणि किती दंगलखोर शिक्षा भोगायला गेले? आज मुस्लिमांच्या न्यायासाठी सेक्युलर पोपटपंची करणारा कोणीतरी जाफ़रभाईच्या या प्रश्नांचे उत्तर देऊ शकेल काय? की गुजरातमध्ये १९६९ ची दंगल झालेलीच नाही? की गुजरात नावाचे राज्य २००२ची दंगल होण्यापुर्वी अस्तित्वातच नव्हते? की गुजरातमध्ये २००२ च्या दंगली होण्यापुर्वी मुस्लिमांचे वास्तव्यच नव्हते? मोदींच्या नावाने अखंड शिव्याशाप देणार्‍या कोणाकडे तरी या प्रश्नांची उत्तरे आहेत काय? अर्थात १९६९ ही एकच मोठी दंगल नाही. दर दोनचार वर्षांनी गुजरातमध्ये हिंदू मुस्लिम दंगल हा परिपाठच होता आणि त्यात अत्यल्प लोकसंख्या असल्याने सर्वात जास्त मुस्लिमच भरडला जाणार, हे सुद्धा ठरलेले समीकरण होते. प्रत्येक दंगलीत मुस्लिमांनी उध्वस्त व्हायचे आणि पुढल्या दोनचार वर्षात नव्याने आपली घरे वसवायची; असाच गुजरातच्या मुस्लिमांचा कॉग्रेसच्या सेक्युलर सत्ता काळातील इतिहास राहिला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाल्यावर तीनच महिन्यात उसळलेली गोध्रानंतरची दंगल वगळता मागल्या दहा वर्षात पुन्हा एकही दंगल होऊ शकलेली नाही. पण हाच इतका मोठा सलग अकरा वर्षाचा कालखंड असा आहे, की मुस्लिमांना दंगलीपासून खरी मुक्तता मिळाली आहे. जाफ़रभाईने ओरडून सांगितलेले हे सर्वात विदारक सत्य आहे. सलग दहा अकरा वषे गुजरातमध्ये मुस्लिमांना दंगलीचे चटके बसले नाहीत, असा दुसरा कुठला कालखंड वा कुठल्या मुख्यमंत्र्याची कारकिर्द आहे, ते दाखवण्याचे आव्हान जाफ़रभाई म्हणूनच देतो. त्याचे तरी कुणा मोदीविरोधी सेक्युलर पोपटाकडे उत्तर आहे काय?

   कुत्रा माणसाला चावला तर ती बातमी नसते. कारण कुत्रा हा चावणराच प्राणी आहे. आणि तो पाळीव असल्याने माणसाच्या वस्तीतच असणारा पशू आहे. तेव्हा कुत्रा चावला ह्यात काही वेगळे नसते. पण एखादा माणूस कुत्र्याला चावला, तर ती बातमी असते. कारण त्यात वेगळेपणा व वैचित्र्य असते.  माणूस कुत्र्याला फ़ार तर लाथ मारील, दगड मारील. पण चावणे हे माणसाचे लक्षण नसते. बातमीची अशी प्राथमिक व्याख्या आहे. पण आजची सेक्युलर झालेली माध्यमे ती व्याख्याच विसरून गेली आहेत. म्हणूनच त्यांना बातमी कुठे व कशात आहे, त्याचा थांगपत्ता लागत नाही, किंवा त्यांना बातमीपेक्षा अफ़वा पसरवण्यातच धन्यता वाटत असावी. अन्यथा गेले काही दिवस मी इथे ‘उलटतपासणी’ सदरातून जी माहिती देतो आहे, त्याच्या अक्षरश: शेकडो ब्रेकिंग न्युज होऊ शकल्या असत्या. पण त्या झाल्या नाहीत किंवा अशी सर्व माहिती लपवली वा दडपून ठेवली गेली आहे. कारण यातली सगळी माहिती सहज उपलब्ध आहे आणि ती जाफ़रभाईने सांगण्याची गरज नाही. कुठल्याही प्रामाणिक पत्रकार व वार्ताहराला ती शोधता येऊ शकते, सापडू शकते किंवा मिळू शकते. आणि ती इतकी धक्कादायक आहे, की गेल्या दहा अकरा वर्षात जी माहिती वा बातम्या जगभर गुजरातच्या दंगलीच्या निमित्ताने पसरवल्या गेल्या, त्यांना जमीनदोसत करणारे असेच हे सगळे वास्तव आहे. मग ही माहिती लपवली का जाते? अशा बातम्या दडपल्या का जातात? तर आपल्याकडे पत्रकार वा माध्यमातून जे लोक घुसले आहेत, ते पत्रकार नसून आपापला राजकीय अजेंडा घेऊन लोकांमध्ये एकप्रकारची भूमिका वा मानसिकता तयार करण्याचे राजकीय कार्य करण्यासाठी माध्यमांना राबवले जात असते. त्या बातम्या किंवा त्यातील चर्चेत सहभागी करून घेतलेले लोक बघितले तरी लक्षात येते, की ही माणसे एका विशिष्ठ राजकीय विचारांची असून जनमानसात आपल्या भूमिका रुजवण्याच्या दिशेनेच माहिती् देण्याचे वा लपवण्याचे काम करत असतात. त्यामुळेच मग लोकांमध्ये किती भ्रम निर्माण होतात, त्याचा जाफ़रभाई वा त्याच्यासारखे गुजराती मुस्लिम पुरावे आहेत. कारण गुजरातमध्येच हयात घालवल्यानंतरही त्यांची माध्यमांकडून किती सहजगत्या दिशाभूल झाली आहे ना? आज जाफ़रभाई जे सांगत आहेत, ते माध्यमांनी पसरवलेल्या भ्रमाच्या सापळ्यातून बाहेर पडल्यानेच त्यांना शोधता, बघता व मांडता आलेले आहे. त्यांनी ते कष्ट घेतले नसते, तर त्यांनाही सेक्युलर माध्यमांनी निर्माण केलेल्या भ्रमात व देखाव्यात भरकटत रहाणे भाग झाले असते.    ( क्रमश:)
 भाग   ( १५१ )    २४/४/१३

३ टिप्पण्या:

  1. Dear Bhausaheb...Thanks a lot. I am more than happy to see this article. With warmest regards - K R Vaishampayan, Nagpur

    उत्तर द्याहटवा
  2. bhau saheb he tar kahich nahi, 1947 chya rashtr vikhandanat ek lakh ainshi hajar lok marlya gelya che sarkari akde ahet fakt Javaharasur nehru la rajgadi var basvnya karta. 2/3 kashmir pakistan la daan kelet tari ha nirlajj nehru rajgadi varach shirjor. china la lakho mile bhartiy jaminicha kabje dila tari ya javaharasura la kavdi matr sharam ali nahi, kargil chya nava var baralnare ithe chup rahtat. hi sarv jamin bharatmatehi kotyavadhi bhartiy janatechi ahe, nehru chya bapachi navhati, midia ithe gapp ka asto.

    उत्तर द्याहटवा
  3. ha lekh Godhra cha navane bomba marnarya Congress ani IBN Lokmat sarkya channel valyana vachayla dya....

    उत्तर द्याहटवा