शनिवार, २० एप्रिल, २०१३

सलमानखानचे पिता सलीमखान यांचे काही सवाल



   तीस वर्षापेक्षा अधिक काळ होऊन गेला त्याला, जेव्हा अमिताभ बच्चन लोकप्रियतेच्या शिखरावर होता. त्याला खरी लोकप्रियता मिळवून दिली, ती ‘दीवार’ चित्रपटाने. त्याच चित्रपटाने हिंदी चित्रसृष्टीमध्ये दोन नवी नावे ख्यातनाम झाली. त्याच्या आधी हिंदी सिनेमात संगीतकारांची जोडी असायची. पण ‘दीवार’ चित्रपटाने पटकथाकारांची जोडगोळी प्रथमच नावारूपाला आली. शंकर जयकिशन वा लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याप्रमाणे या नव्या जोडीला चित्रसृष्टीमध्ये खुप मान मिळू लागला. सलीम-जावेद असे त्या जोडीचे नाव होते. मात्र अधिक काळ ती जोडी एकत्र नांदली नाही. त्यातला जावेद नेहमी आपण वाहिन्यांच्या चर्चेत बघत असतो. आपल्या सामाजिक कार्यासाठी तो अधिक ओळखीचा चेहरा झालेला आहे. शबाना आझमीचा पती म्हणूनही त्याला ओळखले जाते. पण त्या मानाने त्याचा तरूणपणीचा जोडीदार सलीम प्रसिद्धीपासून दूर असतो. त्याचीही काही राजकीय सामाजिक मते व भूमिका आहेत. पण सलीम खान उठसूट क्रांतीचे झेंडे खांद्यावर घेऊन रस्त्यावर येणारा माणूस नाही. त्यामुळेच त्याच्या मतांचा गवगवा सहसा होत नसावा. कदाचित त्याची मते सेक्युलर माध्यमांना सोयीची व हवी तशी नसल्याने, त्याला प्रसिद्धी माध्यमे टाळतही असावीत. कारण तो स्पष्टवक्ता आहे तसाच आपले मत मांडताना कोणाची पर्वा करीत नाही. योगायोगाने तो लोकपिय अभिनेता सलमान खानचा पितासुद्धा आहे. मात्र आपली ठाम मते सांगायला तो कुणा सेक्युलराला किंवा मुल्ला मौलवीलाही घाबरत नाही. अशा सलीम खान यांची एक मुलाखत धक्कादायक आहे आणि अर्थातच ती धक्कादायक असली, तरी सेक्युलर माध्यमांचा खोटेपणा उघडा करणारी असल्याने त्याची ब्रेकींग न्युज होऊ शकत नाही. असो, तर अशा सलीम खान यांनी काही मूलभूत प्रश्न उपस्थित केलेले आहेत. पण कोणीही सेक्युलर शहाणा त्यांची उत्तरे द्यायला पुढे सरसावलेला नाही. कोणते प्रश्न सलीम खान यांनी उपस्थित केले आहेत?

  १९९२ सालात बाबरी मशीद पाडली गेल्यावर मुंबईत ज्या भीषंण दंगली उसळल्या, त्यावेळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होता? कोणाला त्याचे नाव आठवते का? त्यानंतर दहा वर्षांनी गुजरातमध्ये झालेल्या दंगली इतकीच मुंबईची दंगल हिंसक होती. मग त्यावेळचा मुख्यमंत्री कोणालाच कशाला आठवत नाही? उत्तर प्रदेशात मलियाणा व मीरत येथे १९८० नंतरच्या काळात भीषण दंगली झाल्या. त्यात काही शेकडा मुस्लिम मारले गेले होते. त्याच कालखंडात बिहारमध्ये भागलपूर व जमशेदपूर येथे दंगलीत मुस्लिमांची हत्याकांडे झाली. त्या दोन्ही राज्यांचे त्या दंगल काळात कोण मुख्यमंत्री होते? कोणाला ती नावे आठवतात काय? तेव्हा त्या त्या राज्यात कोणत्या पक्षाचे राज्य वा सरकार होते? काही आठवते कोणाला? त्याही दंगली गुजरातच्या २००२ इतक्याच भीषण व हिंसक होत्या. मग त्याचे वा त्यावेळच्या तिथल्या मुख्यमंत्र्याचे नाव कोणालाच कसे आठवत नाही? गुजरातची दंगल जर मुख्यमंत्र्याने घडवली असेल आणि मुस्लिमांचे बळी पडले, म्हणून मुख्यमंत्री निकामी असतो, तर त्या प्रत्येक दंगलीतला मुख्यमंत्री निकामी व मुस्लिमांच्या कत्तलीला तेवढाच जबाबदार असला पाहिजे. पण मग एकदाही त्या दंगल काळात वा नंतर त्या त्या मुख्यमंत्र्याचा उल्लेख कशाला झालेला नाही? फ़ार कशाला गुजरातमध्ये गेल्या दहा वर्षात एकही दंगल झालेली नाही. अन्यथा दोनतीन वर्षात हिंदू-मुस्लिम दंगल हा गुजरातचा परिपाठ होता. आणि प्रत्येक दंगली तेवढ्याच हिंसक होत्या. किंबहूना २००२ पेक्षा १९६९ सालातील गुजरातची दंगल अधिक भीषण होती. कारण त्यात पाच हजाराहून अधिक मुस्लिम मारले गेले होते. पण कोणा सेक्युलराला तेव्हाचा मुख्यमंत्री वा त्याचा पक्ष आठवतो का? कशाला आठवत नाही? कुठल्याही दंगलीत मुस्लिम मारले गेले; म्हणून ती जबाबदारी मुख्यमंत्र्याची असेल तर मग हे सगळे मुख्यमंत्री दोषी असल्याचे कधीच का बोलले गेले नाही? आज जे कोणी गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांना गुन्हेगार ठरवायला अहोरात्र कष्ट उपसत असतात, त्यांना आधी झालेल्या दंगलीतले मुख्यमंत्री निर्दोष का वाटतात? जणू २००२ च्या दंगलीत प्रत्येक मारला गेलेला मुस्लिम मोदीनेच मारलेला असावा किंवा त्यासाठी मोदीनेच कारस्थान केलेले आहे, असा दावा करणार्‍यांनी पुर्वीच्या दंगलीचे कारस्थान कोणाचे व त्यात मुख्यमंत्र्यांनी किती कर्तव्यदक्षतेने मुस्लिमांचे प्राण वाचवले होते, ते तरी सांगावे.

   हे कुणा संघवाल्याचे वा हिंदूत्ववाद्याचे प्रश्न नाहीत; तर सलीम खान नावाच्या प्रतिष्ठीत मुस्लिम लेखकाचे प्रश्न आहेत व अजून अनुत्तरित राहिलेले आहेत. कारण त्याची उत्तरे नाहीत व ती उत्तरे द्यायला गेल्यास समोर येणारे सत्य मोदी विरोधी सेक्युलर व गोबेल्स तंत्रानुसार केलेल्या खोट्या प्रचाराचे पितळ उघडे पडण्याचे भय आहे. म्हणूनच त्याची उत्तरे द्यायला कोणी पुढे आलेला नाही. बाकीच्या राज्यातले सोडून द्या. गुजरातच्या दंगलीचा इतिहास तपासायला गेल्यास त्यात मोदी वा भाजपा बाजूला पडून; त्यामागे कॉग्रेसच किती मोठा गुन्हेगार आहे, त्याचे पुरावे बाहेर येण्याचा धोका आहे. अगदी २००२ दंगलीत सुद्धा कॉग्रेसवाल्यांचा किती हात आहे, त्याचा तपशील सेक्युलर माध्यमांनी पद्धतशीर लपवलेला आहे. बडोद्याच्या बेस्ट बेकरी खटल्यात दोषी ठरलेल्यात भाजपाचा आमदार असल्याचे ढोल वाजवून सांगितले गेले. पण त्याच प्रकरणात शिक्षा भोगणारा एक आरोपी कॉग्रेसचा नगरसेवक असल्याचे सांगितले जाते काय? भाजपाची सत्ता व बहूमत गुजरातमध्ये येण्यापुर्वी होणार्‍या दंगलीत मुस्लिमांची घरेदारे व दुकान व्यापार जाळणारे लुटणारे कॉग्रेसचे नेते कार्यकर्ते नव्हते काय? त्यांना तेव्हाच्या कॉग्रेस मुख्यमंत्री व सरकारने संरक्षण दिलेले नव्हते काय? तो सगळा तपशील अंगावर शहारे आणणारा आहे. १९६९ च्या दंगली इतिहासातील सर्वात भीषण मानल्या जातात. पण त्यात गुंतलेल्या किती लोकांवर खटले भरले गेले? त्यापैकी कोणाला शिक्षा झालेली आहे? त्याच दंगलीच्या चौकशा झाल्या व अहवाल देखील आले. त्यावर कोणती कारवाई तात्कालीन कॉग्रेस सरकार व मुख्यमंत्र्याने केलेली होती? उलट असे दिसून येईल, की स्वातंत्र्योत्तर काळात मुस्लिम विरोधी दंगलीत कॉग्रेसनेच असा पुढाकार घेतला, की त्यातूनच गुजरात हिंदूत्वाकडे झुकत गेला आणि त्यातूनच भाजपाची तिथे ताकद वाढत गेली. तोंडाने सेक्युलर जपजाप करणारा कॉग्रेस इतका मुस्लिम विरोधी दंगली माजवत होता, की तिथले सरकार व प्रशासनच पक्षपाती होत गेले. मुस्लिमांच्या विरोधी प्रशासनाची मानसिकता जोपासण्याचे पाप कॉग्रेसनेच केले. म्हणूनच १९६९ वा अन्य भीषण दंगलीत हजारो मुस्लिम मारले गेले. पण त्यासाठी जवळपास कुणावरही कधी गुन्हा नोंदला गेला नाही, खटला भरला गेला नाही. थोडक्यात भाजपा सत्तेवर आला तेव्हा, किंवा नरेंद्र मोदी मुख्यमंत्री म्हणून गुजरात राज्यात दाखल झाले तेव्हा, त्यांना मिळालेले प्रशासन मुळातच मुस्लिम विरोधात कॉग्रेसने तयार करून ठेवलेले होते आणि त्याची साक्ष गुजरातच्या दंगलीचा इतिहासच देतो.

   आणि सलीम खान यांनी नेमक्या त्याच दुखण्यावर बोट ठेवलेले आहे. जो इतिहास माध्यमांनी फ़ारसा लोकांसमोर कधी आणला नाही, की जाणकार म्हणून चर्चा करणार्‍यांनी त्याचा उल्लेख करायचे पद्धतशीरपणे टाळलेले आहे. मोदींच्या विरोधात सतत बोलले जाते. पण स्वातंत्र्योत्तर काळात गुजरातमध्ये ज्या डझनभर मोठ्या हिंदू मुस्लिम दंगली झाल्या; त्यात प्रथमच कुणाला शिक्षा होऊ शकली आहे आणि ती मोदी मुख्यमंत्री असताना. अन्यथा कॉग्रेसची सत्ता असताना झालेल्या दहाबारा दंगलीत हजारो मुस्लिम मारले गेले. त्यापैकी कोणाला न्याय मिळू शकला नव्हता, हे ढळढळीत सत्य आहे. असे म्हटले की मोदी सरकारने काय केले, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सुप्रिम कोर्टाने अनेक खटल्यात हस्तक्षेप केला म्हणून न्याय झाला, असेही सांगितले जाते. पण सत्य असे आहे, की सुप्रिम कोर्टाने सहा आठ खटल्यातच हस्तक्षेप केलेला आहे. त्याखेरीज साठ सत्तर खटले गुजरात सरकारच्या पुढाकाराने दाखल झाले; म्हणूनच त्यात निकाल होऊ शकला आहे. त्याचे श्रेय सुप्रिम कोर्टाला नव्हेतर मोदी सरकारला द्यावे लागेल. जे काम आजवरच्या कुणा कॉग्रेसी मुख्यमंत्र्याने कधीच केलेले नव्हते. म्हणजेच संपुर्ण देशात हिंदू-मुस्लिम दंगलीच्या संदर्भातला इतिहास तपासला, तर सर्वाधिक दंगलखोरांवर खटले भरण्यापासून त्यांना शिक्षापात्र ठरवण्याच्या बाबतीत, मुख्यमंत्री मोदी यांचाच अग्रक्रम लागू शकेल. महाराष्ट्रामध्ये दंगल झाली तेव्हा व नंतरही कॉग्रेसचेच सरकार आहे. पण १९९२-९३ च्या दंगलीसाठी किती खटले झाले व किती गुन्हेगार शिक्षापात्र ठरवण्यात इथले सेक्युलर सरकार यशस्वी होऊ शकले आहे? तुलनेने गुजरातमध्ये अनेकपटीने गुन्हेगार पकडले गेले, त्यांच्यावर खटले दाखल झाले व अधिक प्रमाणात शिक्षा ठोठावल्या गेल्या आहेत. ही आकडेवारी निघाली तर मोदींवर खोटे आरोप करणार्‍यांचे पितळ उघडे पडण्य़ाची शक्यता आहे, म्हणूनच यातला कोणी भामटा सलीमखान यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला पुढे येत नाही किंवा खुलासाही देत नाही. हिटलरचा प्रचारमंत्री गोबेल्स म्हणायचा; खोटे सतत बोलत रहा आणि ठासून रेटून बोलत रहा, म्हणजे हळूहळू ते लोकांना खरे वाटू लागते, त्याचे प्रात्यक्षिक आपल्या देशाने व जगाने गेल्या दहा वर्षात गुजरात दंगली व मोदी यांच्या निमित्ताने बघितले आहे. ते खोटे आहे म्हणूनच मोदी्ना तिथली जनता पुन्हा पुन्हा निवडून देते आहे आणि मुस्लिमही मोठ्या प्रमाणात मोदींना मते देऊ लागले आहेत. पण सेक्युलर खोटेपणा संपायची चिन्हे नाहीत.
( क्रमश:)
 भाग   ( १४८ )    २१/४/१३

३ टिप्पण्या:

  1. logic : Ram Mandir abolished by Babar and Babri came to existence
    ... responsibility : Teachings of Islam
    Babri abolished by Hindus
    .... : Prompted by America (as they wanted to have 'problem' in India ,as hurdle in Indian progress)
    Train burnt and Karsevaks charcoaled
    Teachings of Islam (revenge)
    Riot provoked by Islamic group to prove supremacy over Hindus
    : Resisted by Law of land (Modi as CM)
    Americans wanted Modi to be at bay ,for they are afraid of competitor in trade .MM Singh bowed to Uncle Sam as usual.!!

    उत्तर द्याहटवा
  2. प्रिय भाऊ,
    आपने कहीं भी सलिमखान से उस मुलाकात को लेनेवाली पत्रकार मधु पूर्णिमा किश्वर का जिक्र करना जरुरी नहीं समझा है. उसीतरह महेश भट्ट और जफर शरशेवाला के बारे में लिखते समय भी आपने इस बात को पहली बार दुनिया के सामने लाने वाली इस पत्रकार का नाम छुपाना क्यों जरुरी समझा है, यह समझ से परे है. आशा है आप इसका उत्तर अवश्य देंगे.
    एड दिनेश शर्मा

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. इस विषयपर बहूत लेख लिखे है उसमे मधूजी का जिक्र किया है. दुसरी बात, और कही प्रकाशित न्युजसे भी जानकारी मैने उठायी है. फ़िरभी आपकी तक्रार मै सही मानता हू,

      हटवा