गुरुवार, २८ जून, २०१२

जळत्या मंत्रालयातले दोन महान सिद्धपुरूष


   काल ज्या दोन बातम्या या सदरात वाचकांनी वाचल्या, त्याचे श्रेय आबासाहेब रणसिंग नावाच्या ’पुण्यनगरी’च्या एका जागरुक वाचकाला जाते. त्यानीच मुद्दाम ईमेल पाठवून त्या बातमीकडे माझे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. सोमवार २५ जुने २०१२ च्या दैनिक पुढारीच्या मुंबई आवृत्तीमध्ये ही बातमी दुसर्‍या पानावर प्रसिद्ध झाली आहे. तसे पाहिल्यास ती बातमी नाही. ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जनसंपर्क अधिकार्‍याचे मंत्रालय आगीसंबंधाने केलेले निवेदन आहे. मात्र ते नेहमीच्या सरकारी पत्रकाप्रमाणे लिहिलेले सरकारी भाषेतले बेचव निवेदन नाही. तर त्या भीषण आगीत सापडलेल्या एका अग्नीकांडग्रस्त नागरिकाचे अनुभवकथन आहे. निदान मांडणी करतानाचा त्यांचा पवित्रा तरी तसा आहे. इतक्या भयंकर आगीच्या प्रसंगीही उपमुख्यमंत्री कसे कार्यक्षम होते व त्यांनी दोनचार डझन पिडीतांचे प्राण वाचवले, त्याची गौरवगाथा या जनसंपर्क अधिकार्‍यांनी सांगितली आहे. सुंभ जळले तरी पीळ जात नाही, अशी उक्ती हजारो वर्षे आपल्या मराठी भाषेत प्रचलित आहे, हे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख त्याचा जिवंत नमूना आहेत. कारण त्यांच्याच म्हणण्यानुसार त्या भीषण आगीत भस्मसात होण्यापासून ते बालंबाल बचावले आहेत. पण त्याची चित्तथरारक कथा सांगतानाही त्यांना आपण उपमुख्यमंत्र्यांचे प्रसिद्धी अधिकारी आहोत या दडपणाखालून बाहेर पडता आलेले नाही. अन्यथा त्यांनी अशी हास्यास्पद भयकथा कशाला सांगितली असती? एकटे देशमुखच नाहीत तर विशाल ढगे नावाच्या अधिकार्‍याचेही असेच रंजक थरारक कथन दैनिक सकाळच्या २६ जुनच्या अंकात प्रसिद्ध झाले आहे. त्यातले तपशील जादूगारालाही थक्क करून सोडणारे आहेत. 

   त्या भीषण आगीतून केवळ अजितदादांच्या समयसूचकतेमुळेच आज संजय देशमुख जिवंत आहेत असा त्यांचा दावा आहे. किंबहूना त्या दिवशी जे कोणी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर अडकले होते व बचावले ते केवळ दादांच्या कृपाप्रसादामुळेच; असाही देशमुखांचा दावा आहे. आपल्यापैकी कोणीही घटनास्थळी उपस्थित नव्हते, पण देशमुख होते. त्यामुळेच त्यांच्या शब्दांवर अविश्वास दाखवण्याचा आपल्याला काडीचा अधिकार नाही असेच मी मानतो. त्यांच्या दाव्यावर शंका घेण्याचेही कारण नाही. पण जे निवेदन देशमुख यांनी "पुढारी"मधून केले आहे, त्या त्यांच्या शपथपत्रात विसंगती असू नये, एवढी तर अपेक्षा आपण करू शकतो की नाही? त्या घटनेचे जे सर्वसाधारण वर्णन अन्यत्र आले आहे, जवळपास तसेच वर्णन देशमुख यांनी केले आहे. आपण टिव्हीवरून सहाव्या मजल्याच्या खिडक्यांमध्ये मदतीची याचना करणारे, वा खिडकीतून बाहेर पडून सज्जावर उभे असलेले व पाईप पकडून खाली उतरण्याचा प्रयास करणारे जे लोक बघत होतो, त्यापैकीच संजय देशमुख एक आहेत. तेव्हा त्यांच्या सुदैवाचे आपण अभिष्टचिंतन केले पाहिजे. मी त्यांच्या गौरवगाथेची उलटतपासणी करण्यापुर्वी त्यांना दिर्घ आयुरारोग्य चिंततो. कारण अशा जिवावर बेतलेल्या प्रसंगातून सहीसलामत सु्टण्याचे भाग्य फ़ार क्वचितच कुणाला मिळत असते. देशमुखांना ते मिळाले तर अपण त्यांचे अभिनंदन करायलाच हवे ना? असो. आता देशमुखांच्या भयकथेकडे वळूया. त्याच्या या प्रदिर्घ निवेदनातील ही मोजकी वाक्ये ज्या क्रमाने आली तशीच वाचा.

१) मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या वेळी सहाव्या मजल्यावरील उपमुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षाच्या खिडकीबाहेर पाऊण तास लटकत होतो. पाऊण तासानंतर नाकातोंडावर तापलेल्या धुराचे काळे लोट यायला लागले. खिडकीत लटकणे अगदीच अशक्य झाले. त्यामुळे खिडकीतून खाली पाचव्या मजल्याच्या सज्ज्यावर उडी मारण्याचा निर्णय अगदी शेवटच्या क्षणी घेतला..... डळमळत्या पीव्हीसी पाईपच्या आधाराने खाली उडी मारली, सुदैवाने तोल गेला नाही. सज्जावर नी्ट पोहोचलो.
२) सहाव्या मजल्यावरील खिडकीतून आम्ही मदतीची वाट बघत होतो. परंतू आम्हाला खाली उतरवण्यासाठी कुणीच येत नव्हते. अर्ध्या तासानंतर धुराचे लोट खुपच वाढले आणि मग आमचा धीर सुटायला लागला. खाली उडी मारायचा विचार डोक्यात चमकून गेला आणि नेमक्या त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजितदादा खाली आलेले आम्हाला दिसले. त्यांनीही हात हलवून आम्हाला विश्वास दिला.
३) आमच्या सुटकेसाठी अजित पवार यांनी वेगाने सुत्रे हलवली. सातव्या मजल्यापर्यंत पोहोचणारी शिडी तात्काळ आणण्यासाठी दादांनी अधिकार्‍यांना सांगितले, नव्हे तर पिटळलेच. गेल्या ४० मिनीटापासून आम्ही वाट पहात असलेले ते शिडीधारी वाहन अखेर दादांच्या कार्यवाहीमुळे वेळेत येऊ शकले.
४) पाचव्या, सहाव्या आणि सातव्या मजल्यावर अडकलेल्या आमच्यासारख्या ३०-४० जणांना सुटकेसाठी सुमारे ४५ मिनीटे वाट पहावी लागली. परंतू सुटकेची खरी कार्यवाही झाली ती शेवटच्या १५ मिनीटात. त्या १५ मिनीटात दादांच्या नेतृत्वाखालीच सगळी सुत्रे हलली. आम्हाला वाचवण्य़ात आणखी  एक-दोन मिनीटाचा जरी उशीर झाला असता तरी आमचे मरण अटळ होते.
५) तत्पुर्वी दुपारी पावणे तीनच्या सुमारास अजितदादांच्या अध्यक्षतेखाली सहाव्या मजल्यावरील त्यांच्या समिती कक्षामध्ये बैठक होणार होती. त्यासाठी ते आले देखील. परंतू धुराचा वास येऊ ला्गल्याने धुर जाईपर्यंत सचिवांच्या दालनात दुसर्‍या ठिकाणी बसावे म्हणून ते बाहेर पडले. परंतु तोवर धुर जमा होऊ लागला होता. त्यामुळे सचिवांच्या दालनात न थांबता नाकावर रुमाल धरत आणि धुरातून वाट काढत, मध्ये भेटणार्‍या प्रत्येकाला बाहेर पड्ण्यासाठी खाली पिटा्ळत ते मंत्रालयाच्या विस्तार इमारतीकडे गेले. तिथून आरसा गेटच्या जिन्याने सहाव्या मजल्यावरून तळमजल्यापर्यंत खाली आले.
६) अजितदादा समिती कक्षातून बाहेर पडल्यानंतर आम्ही सर्वांनी त्यांच्या पाठोपाठ बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. परंतु चौथ्या आणि पाचव्या मजल्यवरील धुराचा प्रचंड मोठा लोळ जिन्याच्या मार्गाने आमच्या कक्षासमोरच्या जागेत आल्याने आम्हाला कुणालाही बाहेर पडणे शक्य झाले नाही. त्यानंतर सुमारे पाऊण तास आम्ही सर्वजण अजितदादांच्या समिती कक्षात अडकून पडलो होतो. परंतु, सुखरुप खाली पोहोचल्यानंतर त्यांनी प्रयत्नपुर्वक आमची सर्वांचीही सुखरूप सुटका केली.

   अजितदादांचे जनसंपर्क अधिकारी असलेले संजय देशमुख मुद्दाम अशा खोट्या गोष्टी लिहितात, की त्यांना जाणिवपुर्वक लोकांची दिशाभूल करायची आहे? वाचकांनी काळजीपुर्वक या सहा उतार्‍यांतील विसंगती तपासून बघाव्यात. क्रमांक १) मध्ये देशमुख पाऊण तास समिती कक्षाच्या खिडकीबाहेर लटकत असतात. पण तेच देशमुख क्रमांक ६) मध्ये पाऊण तास समिती कक्षामध्येच अडकून पडल्याचेही छातीठोकपणे सांगतात. मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या त्या पाऊण तासाच्या कालखंडात संजय देशमुख कुठे कुठे असतात, ते तपासले तर ते अनेक रुपधारी महाचमत्कारी बाबा आहेत काय, अशीच शंका येते. एकाचवेळी ते सहाव्या मजल्यावरील समिती कक्षामध्ये अडकून पडलेले असतात. त्याचवेळी कक्षाच्या खिडकीला लटकत असतात. तर त्याचवेळी खिडकीतून मदतीची वाट बघत असतात आणि त्याचवेळी पाचव्या मजल्याच्या सज्जावरही उभे असतात. मग प्रश्न असा पडतो, की संजय देशमुख नावाची कि्ती माणसे अजितदादांच्या जनसंपर्क कार्यालयात अधिकारी म्हणुन कार्यरत आहेत? त्या तीनचार संजय देशमुखांचा आगीचा दाहक अनुभव या बातमीत एकत्र मांडला आहे काय? नसेल व एकच संजय देशमुख असतील तर ते एकाच वेळी अनेक स्थानी कसे काय असू शकतील? की अजितदादांच्या कार्यवाहीने या देशमुखांना काही खास सिद्धी प्राप्त झालेली आहे, व ते कुठेही केव्हाही असू शकतात? असतील तर त्यांनी त्याचवेळी स्वत:चा अवतार तळमजल्यावर घेतला असता तर अजितदादांना इतकी धावपळ करायची तसदी घ्यावी लागली नसती ना?

   केवळ एकाच वेळी अनेकजागी देशमुख असू शकतात म्हणुन मी त्यांना चमत्कारी सिद्धिप्राप्त महापुरूष म्हणत नाही. त्यांच्यापाशी मोठी दिव्यदृष्टीसुद्धा आहे. क्रमांक २) वाचा. धुराचे लोट वाढले आणि नेमक्या त्याच वाढलेल्या धुरातून त्यांना साठ सत्तर फ़ूट खाली असलेले अजितदादा स्पष्ट दिसले. नव्हे अजितदादा सुद्धा सिद्धपुरूषच असले पाहिजेत. कारण त्यांनाही इतक्या खालून आपल्या समिती कक्षाच्या खिडकीबाहेर धुराचे लोट वहात असताना आपले जनसंपर्क अधिकारी स्पष्टपणे दिसत होते. तेवढेच नाही त्यांनी देशमुखांना हात हलवून विश्वासही दिला. बरे झाले नाहीतर देशमुख थेट पाचव्या मजल्यावरून ( की सहाव्या मजल्यावरून) थेट खाली उडीच घेण्याच्या मनस्थितीत होते. हे सगळे वाचणार्‍या वाचकाने कितव्या मजल्यावरून उडी मारावी अशी देशमुखांची इच्छा व अपेक्षा आहे? देशमुखांच्या या भयकथेची सुक्ष्म उलटतपासणी मला अगत्याची वाटते. म्हणुनच तिकडे माझे लक्ष वेधणार्‍या वाचकाचे मी खास आभार मानतो.   ( क्रमश:)
 भाग  ( ३१० )     २९/६/१२

1 टिप्पणी:

  1. हे असले जे जी- हुजरे, नौटंकी बाज स्तुतिपाठक आहेत त्यांनीच तर देशाची, नितीमत्तेची वाट लावली आहे...मला तर असे वाटते कि हा मनुष्य...माफ करा ..सिद्ध पुरुष त्या दिवशी मंत्रालयातच नव्हता .

    उत्तर द्याहटवा