शुक्रवार, ३० मार्च, २०१२

हमीदभाई दलवाई आठवतो यापैकी कुणाला?


 १९७२ सालची गोष्ट आहे. तेव्हा मुंबईत राष्ट्र सेवा दलाच्या पुढाकाराने मानखुर्द येथे एक मोठा आंतरभारती मेळावा भरवण्यात आला होता. आज आपण ज्यांना जाणकार, विश्लेषक, सेक्युलर नेते, विचारवंत म्हणून कुठल्या ना कुठल्या वाहिनीवर बघत असतो त्यातले अनेकजण तेव्हा त्या मेळाव्यात तरूण वा शाळकरी मुले म्हणून सहभागी झालेले होते. अगदी नर्मदा बचाववाल्या मेधा पाटकरांपासून राज्यसभेचे खासदार हुसेन दलवाईंपर्यंत अनेकजण. कदाचित ज्येष्ठ विश्लेषक समर खडस त्यात नसावेत. कारण तेव्हा त्यांचे वय लिमलेटच्या गोळ्या चाखण्याचे वा गोट्या खेळण्याचे असावे. तर अशा त्या मेळाव्याच्या काळातच एक भव्यदिव्य असा पस्तीस चाळीस लोकांचा मोर्चा दक्षिण मुंबईच्या नागपाडा विभागातून निघाला होता. त्यात मीसुद्धा एक मोर्चेकरी होतो. त्या प्रचंड मोर्च्याला चहूकडून पोलिसांनी घेरले होते. कारण त्या भव्य मोर्च्याचा भोवताली आणखी अफ़ाट जनसमुदाय गगनभेदी घोषणा देत होता. त्या जनसमुदायापासून आमच्या प्रचंड मोर्च्याला संरक्षण देण्यासाठी पोलिसांनी आमच्याभोवती कडे केलेले होते. तिथल्या महाराष्ट्र कॉलेजमध्ये तेव्हा एक परिषद भरली होती. त्या परिषदेच्या विरोधात आमचा मोर्चा होता. शेवट पोलिसांनी आम्हा मोर्चेकर्‍यांना उचलून गाडीत ढकलले आणि गदारोळ आवरला. त्या मोर्च्यातली नावे ऐकायची आहेत?
 
   पहिले नाव आहे ते आमचे तेव्हाचे नेते, जे आज हयात नाहीत. नाही तर आज माझ्या स्वरात स्वर मिसळून या सेक्युलरांचे धिंडवडे काढायला ते प्रामाणिकपणे उभे राहिले असते. त्यांचे नाव आहे स्वर्गिय हमीद दलवाई. आज राज्यसभेचे कॉग्रेस खासदार म्हणुन वाहिन्यावर वारंवार दिसतात, त्या हुसेनभाई दलवाई यांचे थोरले बंधू व मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई. दुसरे होते ’ज्येष्ठ राजकीय’ विश्लेषक समर खडस यांचे पिताश्री महंमद खडस, तिसरे हुसेन दलवाई दस्तुरखुद्द. त्या खेरीज त्यांच्या सासूबाई व थोर विचारवंत नलिनी पंडित. सासरे मधूभाई पंडित, त्यांच्या पुढे पत्नी झालेल्या शमा पंडित. आज कॉग्रेस नेता म्हणुन काम करणार्‍या शैला सातपुते. बाकी खुप मोठी यादी आहे. पण सगळे मिळून आम्ही चाळीसपेक्षा कमीच लोक होतो. आणि आम्ही तिथे समान नागरी कायदा व्हायलाच हवा म्हणुन मागणी करायला मोर्चा घेऊन गेलो होतो. अर्थात तिथे कोणी सरकारी सत्ताधारी आलेले नव्हते. ती देशातील मुस्लिम धर्मपंडित व धार्मिक नेत्यांची परिषद होती. मुस्लिम व्यक्तीगत कायद्यासंबंधाने ती परिषद भरवण्यात आलेली होती. त्यांचा अर्थातच समान नागरी कायद्याला विरोध होता. आणि म्हणुनच त्यांचा विरोध हाणून पाडण्यासाठी आम्ही चाळीस टाळकी तिथे मोर्चा घेऊन गेलो होतो. हमीद दलवाई हा माणुस सच्चा दिलाचा सुधारक होता आणि त्याने मुस्लिमातील जुन्या कालबाह्य अन्याय्य चालिरिती व रुढी मोडून काढण्यासाठी चालविलेल्या लढ्यात सहभागी झालेले आम्ही काही भारावलेले तरूण होतो. समाजात बदल होऊ शकतो, क्रांती वगैरे होते, अशा कल्पनेने भारावलेले असे होतो. जगाचा व्यवहार कळत नव्हता. मला तो अजून कळलेला नाही. म्हणुनच अजून तसाच तावातावाने बोलत भांडत असतो. बाकीचे मला सोडून गेलेत इतकेच.
 
   तर तेव्हा आम्हाला संतप्त मुस्लिम जनसमुदायाने वेढले होते. हमीद दलवाई मुर्दाबादच्या घोषणांनी त्यांनी आसमंत दुमदुमून टाकला होता. आमच्या हमीद झिंदाबादचा आवाज आम्हाला देखील ऐकू येत नव्हता, इतका त्यांचा गदारोळ होता. आमचा मोर्चा कशासाठी होता? सर्व धर्माच्या भारतीयांसाठी समान नागरी कायदा असावा म्हणून. आज चाळीस वर्षे उलटून गेल्यावर काय परिस्थिती आहे? त्यावेळचे माझे वा हमीद दलवाईंचे सहकारी तरी त्या कायद्याच्या मागणीच्या मागे टिकून उभे राहिलेत काय? तेच आमच्या मोर्च्यातले समान नागरी कायद्याचे समर्थक आज, उलट तेव्हाच्या त्या हमीद विरोधी निदर्शकाच्या सुरार सुर मिसळून, त्याच मागणीच्या विरोधात आवाज उठवत असतात. हे परिवर्तन हमीदभाईला अपेक्षित होते काय? कशामुळे असे परिवर्तन झाले आहे? चार दशकांपुर्वी ज्या मागणीसाठी प्रक्षुब्ध मुस्लिम जमावासमोर समान नागरी कायद्यासाठी जीव धोक्यात घालणारे, तेव्हा मुर्ख होते काय? त्यांना हमीदभाईने मुर्ख बनवले होते का? नसेल तर आज तेच समर्थक आज त्याच समान नागरी कायद्याचे विरोधक का बनले आहेत? की त्यांनी
हमीदभाईचा मुर्दाबाद करणार्‍या त्या शरियत समर्थकांचे नेतृत्व पत्करले आहे? पत्करावे, माझा त्याला विरोध नाही. पण मग त्यांनीही त्याच आवेशात हमीदभाई मुर्दाबाद अशा घोषणा द्यायला हव्यात ना? मला हुसेन दलवाई वा महंमद खडस किंवा शमा दलवाई व शैला सातपुते यांनी हमीद मुर्दाबाद म्हटलेले ऐकायलाही आवडेल. कदाचित हमीदभाईनेही आज हयात असते तर अशीच अपेक्षा त्यांच्याकडून केली असती. कारण आज तेव्हाचे हे सगळे हमीद पाठीराखे बाजू बदलून आज समान नागरी कायद्याचे कडवे विरोधक बनले आहेत?

   का झाले असे? कोणता चमत्कार घडला? एकच नवी गोष्ट चाळिस वर्षात वेगळी घडली आहे. मध्यंतरीच्या काळात भाजपाने वा संघ परिवारानेही समान नागरी कायद्याची मागणी उचलून धरली आहे. देशात सर्वच धर्माच्या नागरिकांना समान व्यक्तीगत म्हणजे नागरी कायदा असावा असे प्रतिपादन भाजपा करु लागला. थोडक्यात १९८० च्या दशकात भाजपाने मुळच्या या सेक्युलर समाजवादी, युक्रांदीय क्रांतीकारकांच्या मागणीला पाठींबा दिला. अकस्मात ती पुरोगामी मागणी जातियवादी बनून गेली. त्याआधी पंधरा वीस वर्षे तीच मागणी हेच समाजवादी करत होते. त्यासाठी मोर्चा काढत होते. तेव्हा ती पुरोगामी मागणी होती. जोपर्यंत भाजपा संघ त्याबद्दल बोलत नव्हता, तोवर ती मागणी पुरोगामी असते आणि भाजपाने तिला स्पर्श केला, मग ती प्रतिगामी होते काय? ही काय भानगड आहे? ती मागणी चुकीची असेल, तर ती १९७२ साली आम्ही मोर्चात गेलो; तेव्हाही चुकीची व गैर वा प्रतिगामी असायला हवी होती. नसेल तर भाजपाने पाठींबा दिल्यावरसुद्धा ती तेवढीच पुरोगामी रहायला हवी ना? भाजपाच्या पाठींबा वा विरोधाने वस्तू, विचार, तत्वज्ञान, धोरणे यात कुठला विटाळ येत असतो? काय मुलभूत बदल होत असतो? का बदल होत असतो? स्वत:ला विज्ञानवादी म्हणवून घेणार्‍यांनी त्याचे स्पष्टीकरण द्यायला नको काय? की हे सगळे आजही कसली अस्पृष्यता मानतात? भाजपाचा स्पर्श झाला म्हणजे काहीही विटाळते असे त्यांचे मत आहे काय? असायला हरकत नाही. पण मग त्यांनी त्याचे वैज्ञानिक स्पष्टीकरण द्यायला हवे किंवा आपण मनुस्मृती प्रमाण मानतो, असे तरी घोषित करायला हवे ना? पण यातले काहीही होणार नाही. कारण ही सगळी मंडळी एक नंबरची बदमाश आहेत. आपले सत्य स्वरूप लपवून, ढोंगबाजी करणे हाच त्यांचा स्वभावधर्म आहे.

   हा पुरावा कसला आहे? ही कशाची साक्ष आहे? स्वत:ला समाजवादी वा सेक्युलर म्हणवून घेतात, त्यांची कसलीही विचारसरणी नाही, की त्यांचे कुठलेही तत्वज्ञान नाही. त्या सर्वांचे तत्व एकच आहे. संघ वा त्याच्याशी संबंधिताचा द्वेष. त्याच निकषावर त्यांचे निर्णय होत असतात. भुमिका बनत असतात. सकाळी उगवणार्‍याला संघाने सुर्य म्हटले, तर हे त्याला चंद्र म्हणायला मागेपुढे बघणार नाहीत. याचे कारण जो उगवतो व जगाला आपल्या तेजाने लखलखित करतो, तो कोण आहे याच्याशी अशा सेक्युलरांना, समाजवाद्यांना काहीही कर्तव्य नसते. त्यांना भाजपा वा संघाला खोटे पाडणे वा विरोध करणे एवढ्याशीच कर्तव्य असते. त्यामुळेच जोवर समान नागरी कायद्याच्या मागणीपासून संघ वा भाजपा दुर होता, तोवर ती मागणी पुरोगामी होती. पण भाजपाने तिचे समर्थन करताच ती प्रतिगामी होऊन गेली. हा आता सेक्युलर असण्याचा नियम व निकष झाला आहे. म्हणुनच मला वाटते, भाजपा वा संघाला खरोखरच अयोध्येत राममंदिर बांधायचे असेल, तर त्यांनी तशी मागणी करण्यापेक्षा तिच्या विरोधात कंबर कसून उभे रहावे. तसे झाल्यास तमाम सेक्युलर पक्ष, नेते, विचारवंत, संपादक, पत्रकार तिथे मंदिर बांधायच्या मागे हिरीरीने उभे ठाकल्याशिवाय रहाणार नाहीत. कारण त्यांना अयोध्या, तिथली पाडली गेलेली बाबरी मशीद, मुस्लिमांच्या भावना वा वेदना, हिंदुंच्या आकांक्षा यापैकी कशाचेच सोयरसुतक नाही. त्यांना जे काही भाजपा बोलेल वा ठरविल, त्याचा विरोध करायचा असतो. त्यांच्याकडे कुठलीही विचारसरणी नाही. आपल्या द्वेषमुलक भावनेने कुढत कुढत त्यांनी स्वत:ला नष्टप्राय करून घेतले आहे. ज्या महाराष्ट्रात साने गुरूजी, एसेम जोशी, मधू लिमये, नानासाहेब गोरे असे एकाहुन एक दांडगे समाजवादी सेक्युलर विचारवंत होऊन गेले व त्यांनी आपली वैचारिक छाप मराठी मनावर सोडली, त्यांच्याच दुबळ्या कर्तृत्वशून्य वारसांनी त्या विचारांचे, द्वेषाच्या आहारी जाऊन याच महाराष्ट्रात थडगे बांधले एवढेच म्हणता येईल. (क्रमश:)
भाग  ( २१९ )      २९/३/१२

२ टिप्पण्या:

  1. "स्वत:ला समाजवादी वा सेक्युलर म्हणवून घेतात, त्यांची कसलीही विचारसरणी नाही, की त्यांचे कुठलेही तत्वज्ञान नाही. त्या सर्वांचे तत्व एकच आहे. संघ वा त्याच्याशी संबंधिताचा द्वेष. त्याच निकषावर त्यांचे निर्णय होत असतात...
    ...देशात सर्वच धर्माच्या नागरिकांना समान व्यक्तीगत म्हणजे नागरी कायदा असावा असे प्रतिपादन भाजपा करु लागला. थोडक्यात १९८० च्या दशकात भाजपाने मुळच्या या सेक्युलर समाजवादी, युक्रांदीय क्रांतीकारकांच्या मागणीला पाठींबा दिला. अकस्मात ती पुरोगामी मागणी जातियवादी बनून गेली. त्याआधी पंधरा वीस वर्षे तीच मागणी हेच समाजवादी करत होते. त्यासाठी मोर्चा काढत होते. तेव्हा ती पुरोगामी मागणी होती. जोपर्यंत भाजपा संघ त्याबद्दल बोलत नव्हता, तोवर ती मागणी पुरोगामी असते आणि भाजपाने तिला स्पर्श केला, मग ती प्रतिगामी होते काय? ही काय भानगड आहे?"
    खरच ही काय भानगड आहे. ते सुंदर समजावलेत भाऊ आपण. धन्यवाद..

    उत्तर द्याहटवा
  2. "भाजपा वा संघाला खरोखरच अयोध्येत राममंदिर बांधायचे असेल, तर त्यांनी तशी मागणी करण्यापेक्षा तिच्या विरोधात कंबर कसून उभे रहावे. तसे झाल्यास तमाम सेक्युलर पक्ष, नेते, विचारवंत, संपादक, पत्रकार तिथे मंदिर बांधायच्या मागे हिरीरीने उभे ठाकल्याशिवाय रहाणार नाहीत. कारण त्यांना अयोध्या, तिथली पाडली गेलेली बाबरी मशीद, मुस्लिमांच्या भावना वा वेदना, हिंदुंच्या आकांक्षा यापैकी कशाचेच सोयरसुतक नाही. त्यांना जे काही भाजपा बोलेल वा ठरविल, त्याचा विरोध करायचा असतो. त्यांच्याकडे कुठलीही विचारसरणी नाही. आपल्या द्वेषमुलक भावनेने कुढत कुढत त्यांनी स्वत:ला नष्टप्राय करून घेतले आहे. ..."
    हम नही सुधरेंगे अशी प्रतिज्ञा केलेल्यांकडून काय अपेक्षा ठेवणार?

    उत्तर द्याहटवा