बुधवार, २३ मे, २०१२

अक्कू यादवची कहाणी ऐकली आहे कधी?


   कागदावरचा कायदा आणि जमावाचा जीवंत कायदा यात नेमका काय फ़रक आहे, ते समजून घ्यायचे असेल तर आपल्याला त्याचे वास्तविक दाखले समजून घ्यावे लागतील. नागपुरच्या अक्कू यादवची कहाणी त्याचीच साक्ष देते. सामान्यांनी सामान्य माणसाला न्याय मिळवून दिल्याची ती अत्यंत रोमहर्षक कथा आहे. कथा म्हणजे काल्पनिक गोष्ट नाही. तर प्रत्यक्षात घडलेली घटना आहे. कदाचित तुम्ही वाचली असेल, ऐकलेली असेल किंवा कधी तुमच्या कानावर सुद्धा आलेली नसेल. पण ही वास्तवात घडलेली व आपल्याला काही शिकवू पहाणारी घटना आहे. कायदा कसा निकामी वा अन्यायाचा साथीदार वा भागिदार असतो, त्याची ही डोळ्यात अंजन घालणारी गोष्ट आहे. अक्कू यादव हा त्यातला खलनायक आहे तर सामान्य जनता हाच त्यातला नायक आहे.

   महाराष्ट्राची उपराजधानी मानल्या जाणार्‍या नागपूर शहरात जरीपटका नावाचा एक विभाग आहे. त्याच परिसरात कस्तुरबानगर नावाची एक झोपडपट्टी आहे. तिथे उषा नारायणे नावाची एक पंचविस वर्षे वयाची दलित तरूणी वास्तव्य करत होती. गरीब व मागासलेल्या कुटुंबातील ही मुलगी हट्टाने खुप शिकली व लौकरच ती पंजाबला एका मोठ्या कंपनीत मॅनेजमेंटच्या पदावर नोकरीसाठी जाणार होती. पण नेमक्या त्याच कालखंडात अशी काही घटना घडली, की नोकरीसाठी नेमणुकीच्या जागी हजर रहाणे उषाला शक्य झाले नाही. कारण तिच्यावर खुनाचा आरोप ठेवला गेला आणि आयुष्यात एक उत्तम संधीला उषा मुकली. पण उषाला त्याचे दु:ख नाही. कारण त्या दिवशी तिच्यासह तिच्या परिसरातील तमाम लोकांच्या आयुष्यातला नरकवास संपला होता. ज्याच्या खुनाचा आरोप उषासह अन्य पाच महिलांवर पोलिसांनी ठेवला होता, त्या अक्कू यादवचा त्या दिवशी खात्मा झाला होता. नोकर्‍या शेकडो मिळू शकतात, पण अक्कू यादवला संपवण्याचा मुहूर्त इतक्या सहजपणे पुन्हा मिळणार नसतो. उषा किंवा तिच्या वस्तीतल्या महिलांनी तो मुहूर्त सोडला नाही, की वाया जाऊ दिला नाही. कोण होता तो अक्कू यादव? काय केले होते त्याने?

   1994 पासून कस्तुरबानगर या झोपडपट्टीमध्ये अक्कू यादव धुमाकूळ घालत होता. कोणालाही मारत होता. कोणाच्याही घरात घुसून महिला, मुलींवर बलात्कार करत होता. पैसे खंडण्या उकळत होता, मारहाण करत होता. कुणाची छेड काढत होता किंवा त्यांच्यावर हात टाकत होता. त्याच्या टोळीने त्या परिसरात इतकी दहशत माजवली होती, की महिला दिवसाही एकट्यादुकट्या घराबाहेर पडायला धजावत नव्हत्या. त्याच्या विरुद्ध तक्रार करायचीही हिंमत कुणामध्ये नव्हती. कारण तक्रार पोलिस घेत नसत किंवा तक्रार घेऊन पकडले, तरी त्याला जामीनावर सोडून देत असत. मग तो तक्रार करणार्‍याच्या मागे सुडबुद्धीने लागत असे, अशी त्याची दहशत होती आणि कायदा त्याच्या केसालाही धक्का लावू शकत नव्हता. एखादी महिला तक्रार करायला गेली, तरी पोलिस तिचीच निंदा करून तिला नामोहरम करीत असत. आणि सुटलेला अक्कू पुन्हा जिवावर उठत असे. वस्तीत बिबळ्या घुसावा आणि लोकांनी दारेखिडक्या बंद करून लपून बसावे; तशी अक्कूची कस्तुरबानगर वस्तीत दहशत होती. उषा नारायणे त्याला आव्हान द्यायला उभी राहिली. तिने पोलिसांत दाद मिळत नाही, तर आपल्या एका वकील नातेवाईकाच्या मदतीने थेट पोलिस उपायुक्तापर्यंत मजल मारली. त्यातून प्रकरण चिघळत गेले.  

   उषा सुशिक्षित होती आणि तिच लोकांना आपल्या विरुद्ध चिथावते, असा अक्कूला संशय होता. म्हणूनच त्याने तिला धडा शिकवण्याचा अट्टाहास केला होता. पण त्याचाच विपरित परिणाम झाला. उषासारखी शिकलेली धाडसी मुलगी सुरक्षित नसेल, तर वस्तीत जगणेच अशक्य होईल अशी भावना त्यातून निर्माण झाली आणि आपण एकत्र येऊन काही करायला हवे; ही प्रेरणा जागी झाली. कायदा, पोलिस वा कोर्टात न्याय मिळणार नाही, आपणच न्याय करायचा ही भूमिका बळावू लागली. एकटा अक्कू शे दोनशे लोकांचे काहीही वाकडे करू शकत नाही, हा त्यातूनच झालेला साक्षात्कार होता. मग ती वस्ती एकदिलाने म्हणजे जमावाप्रमाणे विचार करू लागली. वस्तीत अशी सामुहिक हालचाल सुरू झाली, मग असे गुंड वा दहशतवादी कसे भयभीत होतात, त्याचाही अक्कू हा उत्तम नमूना आहे. लोक एकत्र येऊन आपल्याला संपवण्याचा विचार करतात; अशी कुणकुण लागताच अक्कू वस्तीत दिसेनासा झाला. मात्र लोक गप्प बसले नाहीत. त्यांनी अक्कू सापडत नाही, तर त्याच्या रिकाम्या घरावर हल्ला चढवला. त्यानंतर अक्कू सावध झाला. पोलिसांनी त्याला संरक्षण देण्याची नवी शक्कल काढली. जुन्या एका तक्रारीसाठी त्याला अटक करण्यात आली. संतप्त जमावापासून आता अक्कू सुरक्षित झाला होता.

   लोक जास्त काळ कामधंदा सोडून लढत नाहीत, हीच गुंडांची ताकद असते. त्यामुळेच लोकांचा उत्साह मावळण्यापर्यंत पोलिस कोठडीत रहायचा त्याचा विचार होता. मात्र तो पोलिसांच्या ताब्यात असल्याचे कळताच, लोकही कोर्टात काय होते बघायला धावले. तिथे त्याचा एक साथीदार अक्कूला चाकू देत असताना दिसला आणि लोकांनी गोंधळ घातला. मग पोलिसांना त्यालाही अटक करावी लागली. या विजयाने लोकांत अधिकच उत्साह संचारला. पण अक्कूची मस्ती उतरली नव्हती. त्याने कोर्टाच्या आवारातच आणि पोलिसांच्या समोर, सुटून आल्यावर एका एकाला धडा शिकवण्याची धमकी दिलीच. तो दिवस 8 ऑगस्ट 2004 हा होता. मग लोकांना चेव चढला होता. कोर्टाच्या आवारात व पोलिसांच्या साक्षीने धमक्या देणार्‍या अक्कूला कायदा काहीही करू शकत नाही, याची लोकांना खात्री पटली होती. त्याचा न्याय आपणच करायला हवा, असे लोकांना वाटू लागले आणि अवघ्या पाच दिवसात अक्कूची समस्या कायमची सुटली. म्हणजे लोकांनीच सोडवली.

   पुढली तारीख होती 13 ऑगस्ट आणि त्या दिवशी लोक तयारीनेच आलेले होते. नेहमीप्रमाणे दोन पोलिस शिपाई अक्कूला कोर्टात घेउन आले. त्याला पुढली तारीख देण्यात आली. त्याला घेऊन शिपाई कोर्टाबाहेर पडले. तळमजल्यावरील कोर्टाचे काम संपले असल्याने ती खोली रिकामी होती. अक्कूला घेऊन शिपाई तिथेच थांबले असताना अचानक दोनतिनशे लोकांचा जमाव तिथे घुसला. कोणीतरी अक्कूच्या डोळ्यात मिरचीपुड टाकली. दगडांचा मारा करण्यात आला. शिपाई आपला जीव वाचवायला पळून गेले. मग त्या जमावाने अवघ्या दहा पंधरा मिनीटात अक्कू यादव नावाच्या देहाची अक्षरश: खांडोळी केली. काय होते हे जगाला कळण्यापुर्वीच अक्कूचा अवतार संपला होता. उरला होता रक्तामासाचा चिखल. गडबड ऐकून कोर्टाच्या आवारात विखुरलेले पोलिस धावून येईपर्यंत काम संपले होते. मग जे ऐकायला मिळाले व पुर्वीची माहिती, याआधारे पोलिसांनी पाच महिलांवर हत्या व खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यात बहुतेकजणी अक्कूच्या बळी होत्या. त्याच्या बलात्काराच्या बळी होत्या. त्याच्या विरुद्ध तक्रार करणार्‍या महिलांनाच पोलिसांनी त्याच्या हत्येचे गुन्हेगार ठरवले होते. त्यातच उषा नारायणेचाही समावेश होता. पण उषा त्यावेळी तिथे कोर्टाच्या आवारात नव्हतीच.

   अर्थात गोष्ट इथेच संपत नाही. खरी कथा इथूनच सुरू होते. कारण पोलिसांनी पाच महिलांवर गुन्हा नोंदवला खरा, पण त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नव्हता. आणि दुसरीकडे दुसर्‍या दिवशी कस्तुरबानगरातल्या शेकडो महिलांनी पोलिस ठाणे व कोर्टाच्या आवारात आपणही त्या खुनातले आरोपी आहोत; म्हणून अटकेच्या मागणीसाठी धरणे धरले होते. त्यामुळे कायदा व पोलिस यांची मोठीच तारांबळ ऊडाली. शेकडो महिलांना पुराव्याशिवाय अटक करणे शक्य नव्हते आणि इतक्या मोठ्या प्रमाणात आरोपी असले, मग तपासही अशक्य होता. त्यामुळेच भक्कम पुरावा नसल्याने ज्या पाच आरोपी होत्या, त्यानाही लगेच जामीन देणे कोर्टाला भाग पडले. या घटनेने नागपूरात खळबळ माजली. अनेक नामवंत वकील या महिलांचे वकीलपत्र घ्यायला पुढे सरसावले. महिला व सामाजिक संघटना त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. त्यांना आरोपी नव्हेतर गुन्ह्यातल्या बळी म्हणून समजावे, अशा मागण्या सुरू झाल्या. कायदा हाती घेऊन खुन पाडणार्‍या कुठल्या आरोपींना आजवर इतके समर्थन मिळाले आहे काय? त्या महिलांनी व त्यांच्या सोबत असलेल्या जमावाने काय केले होते? त्यांनी कायदा हाती घेतला होता. अक्कू यादवला शिक्षा करण्यात ज्या कायद्याला अपयश आले होते, तोच कायदा हाती घेऊन त्यांनी न्याय केला होता. अक्कू यादवला न्याय देण्यासाठी कायदा नसतो, तर त्याच्या अन्याय अत्याचाराला बळी पडतात, त्यांना न्याय द्यायचा असतो, हेच कायदा राबवणारे विसरले, मग कायदा निकामी होत असतो. त्याच्या हेतूचाच पराभव होत असतो. कायद्याच्या अंमलदारांनी नव्हे तर त्यांना बाजूला ठेवून कायदा हाती घेणार्‍यांनी शेवटी न्याय केला होता. कधी याची आमच्या विद्वानांना कारणमिमांसा करावी असे वाटले आहे काय? ही सगळी घट्ना गंभीरपणे समजून घेण्याची गरज आहे.  (क्रमश:)
भाग  ( २७४ )   २४/५/१२

1 टिप्पणी: