मंगळवार, १ मे, २०१२

माध्यमांची मालकी सत्याची गळचेपी करतेय


    मागल्या आठवड्यात मुंबईच्या उपनगर रेल्वे वाहतुक करणार्‍या गाड्यांचा खोळंबा झाला होता. विद्याविहार या भागातील रेल्वे सिग्नल केबीनला मध्यरात्री आग लागली व त्यात ती यंत्रणा जळून खाक झाली. त्याचाच परिणाम मग दुसर्‍या दिवशी सकाळपासून रेल्वे वाहतुकीवर झाला. प्रथम जवळपास उजाडेपर्यंत गाड्याच धावत नव्हत्या. मग जसजसे कोडे उलगडत गेले, तसतशी वाहतू्ख हळुहळू सुरू होत गेली. बाकी लोहमार्ग धाडधाकट होते. रेल्वेगाड्या दुरुस्त होत्या. चालवणारे सज्ज होते. विजेचा तुटवडा नव्हता. घोडे अडले होते ते सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे. ठाणे ते कुर्ला या भागातील सिग्नल यंत्रणा खात्रीशीर काम करत नव्हती. त्यामुळे रुळावरून धावणार्‍या गाड्यांना वेगाने धावता येत नव्हते. नेहमी या गाड्या चालवणारे निर्धास्तपणे सिग्नल बघून गाड्या पळवत असतात. पण विद्याविहारच्या अपघाताने ते सिग्नलच निकामी करून टाकले होते. मग चालवणार्‍यांना समोर दिसते, तेवढ्याच्या भरवश्यावरच गाडी पुढे नेणे शक्य होते. नेहमी आपल्याला सिग्नल ही फ़ारशी मोठी गोष्ट वाटत नाही. पण ती किती मोलाची व मोक्याची गोष्ट आहे ते मुंबईकरांना त्या दिवशी कळले. कारण त्या नगण्य सिग्नल केबीनने ठाणे ते कुर्ला वाहतुक थंडावली होती.

   ही सिग्नल काय भानगड असते? तो एक संकेत असतो. पुढला मार्ग सुरक्षित आहे, की अडथळ्याचा आहे त्याची पुर्वसुचना देणारा् संकेत असतो. तो संकेत म्हणजे सिग्नल मिळत नसला, तर एक पाऊल पुढे टाकणे अवघड असते. कारण सिग्नल ही माहिती असते. कधी ती सुरक्षिततेची हमी देणारी असते तर कधी पुढल्या असुरक्षित धोक्याचा इशारा देणारी असते. त्या सिग्नलने गडबड केली तर वेगात जाणारी गाडी पुढल्या गाडीवर आदळून मोठा अपघात होऊ शकतो. शेकडो लोकांच्या जिवाशी खेळ होऊ शकतो. म्हणूनच मुंबईतली रेल्वे वाहतूक त्या सिग्नल अभावी खोळंबली होती.

   पण कोणाला वाटेल मुंबईत शेकडो सिग्नल केबीन आहेत. त्यातली एक जळाली वा नादुरूस्त झाली, तर इतका कल्लोळ का व्हावा? बाकीच्या सिग्नल केबीन तर छान चालत होत्या ना? खरे आहे. बाकी सगळ्या केबीन छान चालू असल्या, तरी त्यांची एक साखळी असते. त्यातली एक केबीन जरी बिघडली तरी साखळी खंडीत होते. मग सगळी साखळीच निकामी ठरू लागते. विद्याविहारच्या आगीने तेच काम केले होते. मुंबईकरांना जीवाभावाची असलेल्या लोकल रेल्वेची वाहतूक कोलमडून टाकली होती. त्या आगीने नेमके काय केले? तर सिग्नल यंत्रणा निकामी केली. सिग्नल म्हणजे रेल्वे धावण्यासाठी लागणारी महत्वाची माहिती देणारी यंत्रणाच निकामी केली. इथे आपल्याला माहितीची महत्ता लक्षात येऊ शकते.

   एका सिग्नल केबीनच्या बिघाडाने गफ़लत केली तर किती कल्लोळ होतो? मुंबईचे जनजीवन कोलमडून पडायची वेळ येते. नशीब म्हणाय़चे, की तिथे रेल्वेगाड्या चालवणारे बेदरकार नाहीत, म्हणून अपघात होऊ शकले नाहीत. समोरचा रस्ता साफ़ नाही वा त्याची खात्री वाटत नाही, तर त्यांनी गाड्या वेगाने पळवल्या नाहीत. भले उशीर होईल, लोक चिडतील, तरी धोका पत्करला नाही. कारण त्यांच्याकडे पुढे मार्ग सुरक्षित असल्याची माहिती नव्हती. समजा अशा आगीने त्या केबीनमधून जाणार्‍या सिग्नलचाच गोंधळ करून ठेवला असता तर? कुठलीही गाडी कुठेही जाऊन आदळली असती. थोडक्यात चुकीची माहिती किती जीवघेणी ठरू शकली असती, त्याचा नुसता अंदाज केला तरी अंगावर काटा आणतो. यातून आजच्या सार्वजनिक जीवनात माहितीचे महत्व किती मोठे आहे, त्याचा अंदाज येऊ शकतो. जी गोष्ट रेल्वेप्रवासासाठी असते, तीच नेहमीच्या जीवनातही असते. चुकीची माहिती आपल्याला अनपेक्षित संकटात ढकलू शकते. म्हणुन माहितीशी खेळणे धोकादायक असू शकते.

   खोटी वा अपुरी माहिती हा धोका असतो तसाच गुन्हाही असतो. आदर्श घोटाळा तरी काय आहे? तिथे कागदावर खोटी माहिती नोंदवून गडबड करण्यात आलेली आहे. कोणी जमिनीच्या नोंदी बदलल्या. कोणी नियमांची दिशाभूल केली. कोणी उत्पन्नाचे आकडे खोटे दाखवले. त्यातून केवढा गगनचुंबी घोटाळा उभा राहिला आहे ना? आजच्या युगात सत्यापेक्षा सत्ता व सत्तेपेक्षा माहिती, किती सामर्थ्यवान बनली आहे, त्याचा हा साक्षात पुरावा आहे. आणि माध्यमे तर रोजच्या रोज, प्रत्येक क्षणाला माहितीशी खेळत असतात. त्यांनी दिलेल्या माहितीवर लोक आपले निर्णय घेत असतात. न्यायालयात जसा न्यायाधीश समोर आलेल्या माहितीच्या आधारे निवाडा करत असतो, तसाच सामान्य माणुस समोर आलेल्या माहितीच्या आधारे निर्णय घेत असतो. त्यामुळेच त्याला मिळणारी माहिती वा पुरवली जाणारी माहिती निर्णायक ठरत असते. अशा माहितीवर अधिकार निर्माण करतो, तो खरा सामर्थ्यवान बनू शकतो. आपण ज्याला लोकशाहीतला चौथा खांब म्हणतो, ती माध्यमे म्हणुनच आधुनिक युगात कमालीची सामर्थ्यवान बनली आहेत. त्या माध्यमांवर ज्याची हुकूमत असेल, तो मोठमोठ्या सत्ताधार्‍यांनाही पळता भूई थोडी करू शकतो.

   कारण ज्याच्या हाती माध्यमांची ताकद असते ते खर्‍याचे खोटे व खोट्याचे खरे करून दाखवू शकतात. याचे एक विदारक उदाहरण म्हणजे विसाव्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्रात गाजलेले रमेश किणी मृत्यू प्रकरण होय. आज मनसे अध्यक्ष म्हणून गाजणारे राज ठाकरे यांनीच त्या किणीचे अपहरण करून त्याला पुण्यात नेऊन ठार मारले, असे बेछूट आरोप तेव्हा जवळपास सर्वच माध्यमे करत होती. त्यावर हजारो बातम्या दिल्या गेल्या. डझनावरी अग्रलेख लिहिले गेले. मग वृत्तपत्रीय बातम्यांच्या आधारे न्यायालयात धाव घेतली गेली. सीआयडी चौकशी झाली, त्यावर हायकोर्ट समाधानी असताना त्यानेही सीबीआयच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यातुनही काही निषन्न झाले नाही. साधा एफ़आयआर दाखल करण्याइतका पुरावा सापडला नाही. मग हे काहुर कशाच्या बळावर माजवले गेले होते? अग्रलेख लिहिणारे संपादक तर असे छातीठोकपणे लिहित होते, की त्यांनी किणीची हत्या प्रत्यक्ष डोळ्य़ांनी बघितली असावी. पण ते सर्व धादांत खोटे ठरले. पण त्यामुळे तेव्हाच्या सेना भाजपा युती सरकारला नामोहरम करण्यात यश आले. स्वत:ला सेक्युलर म्हणवणार्‍या माध्यमांनी यशस्वीपणे केलेले ते कारस्थान होते.

   माध्यमांची ताकद किती भयंकर व विध्वंसक असू शकते त्याचे ते विदारक उदाहरण आहे. राईचा पर्वत करण्याची माध्यमांची किमया आजच्या लोकशाहीत प्रभावी झाली आहे. आणि थेट राजकारणात न उतरता त्याच राजकारणावर प्रभुत्व सिद्ध करण्यासाठी मग माध्यमे हे एक प्रभावी हत्यार बनले आहे. त्याचे हेच सामर्थ्य ओळखून अनेक भांडवलदारांनी त्यात प्रचंड गुंतवणुक केली आहे. नीरा राडीया प्रकरणाने त्याची साक्ष दिली आहे. मनमोहन सरकार मध्ये दुरसंचार मंत्रालय कोणाकडे यावे, यासाठी मोबाईल कंपन्यांच्या वतीने राडीया प्रयास करत होती. मग त्याला पुरक ठरावे असे लिखाण वा चर्चा कराव्या, असे हुकूम तिने प्रभू चावला. वीर संघवी, बरखा दत्त अशा पत्रकारांना दिल्याचे ध्वनीमुद्रित झालेल्या टेपमुळे उघड झाले आहे. पुढे त्याप्रमाणे राडीयाला हवा तोच दुरसंचार मंत्री झाला. त्याने पावणे दोन लाख कोटी रुपयांचा घोटाळा केला. तो त्याने एकट्याने केला नाही. तो करण्यासाठी कंपन्यांनी आपले माध्यमातील शिकारी कुत्रे कामाला जुंपले होते. ते पत्रकार काय करत होते? तर लोकांची दिशाभूल करत दुसरीकडे सरकार व राजकीय नेते यांच्यावर द्डपण आणत होते. चुकीची माहिती देऊन दोन्हीकडली दिशाभूल चालली होती. हेच काम पत्रकारांनी भांडवलदारांसाठी करावे, म्हणून इतकी प्रचंड गुंतवणुक माध्यमात करण्यात आलेली आहे.

   मात्र त्यात कामाला जुंपलेले आपण जनहितासाठी अखंड राबत असल्याचा देखावा निर्माण करत असतात. पण प्रत्यक्षात तेच जनतेची अखंड दिशाभूल करत असतात. जनतेपर्यंत चुकीचे सिग्नल व माहिती पोहोचती करणे, हेच अशा गुंतवणुकदारांच्या हुकूमतीखालील माध्यमांचे खरे काम झाले आहे. त्यांनी जणू सार्वजनिक जीवनातील सिग्नल केबीनवरच कब्जा मिळवला आहे. त्या योगे ते त्यांना उपयुक्त सिग्नल व माहिती पुढे जाईल याची काळजी घेत असतात. त्यांना त्रासदायक होईल अशी माहिती दडपून टाकायलाही अशी मालकी उपयोगी ठरत असते. त्यामुळे भूंकायचे स्वातंत्र्य, पण गळ्यात मालकाचा पट्टा अशीच आजच्या चौथ्या खांबाची दयनीय अवस्था झाली आहे. (क्रमश:)
 भाग  ( २४६ )    २५/४/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा